राजकारण्यांनो उघडा डोळे, माय मराठी रडते
राजकारण्यांनो उघडा डोळे, माय मराठी रडते
होण्यासाठी भाषा अभिजात, हात तुम्हा जोडते,
राजकारण्यांनो उघडा डोळे, माय मराठी रडते
ज्ञानदेव आणि तुकोबांचा, जरी सांगे वारसा,
शासन दरबारी ना चाले, तिचा वचक फारसा
अमृताशी जिंकून पैजा, आजही ती धडपडते
राजकारण्यांनो उघडा डोळे, माय मराठी रडते!
दुकानातल्या पाट्यांसाठी, किती तुम्ही लढतात,
अस्मितेचा करुनी दिखावा, ढोल किती पिटतात
बघुनी तुमची स्वार्थी वृत्ती, सदा मनांमध्ये कुढते,
राजकारण्यांनो उघडा डोळे, माय मराठी रडते
शाहीर गाती इतिहासाचे, पोवाडे अभिमानी,
कुठे रंगे लावणी ईष्काची, कुठे भजन-विराणी
गझल-अभंग या मातीचं, हृदय बनून धडधडते,
राजकारण्यांनो उघडा डोळे, माय मराठी रडते
मोजून चार जणांनी ठेवली, ज्ञानपिठाची शान,
साहित्यिकांनो जागे व्हा, येवू द्या तुम्हाला भान
उठता बसता नोबेलचे इथे, स्वप्न मराठीस पडते,
राजकारण्यांनो उघडा डोळे, माय मराठी रडते
घराघरामध्ये पुजले जाती, ज्ञानेश्वरी अन गाथा,
आधुनिक साहित्याच्या पुढे, झुकवितं विश्व माथा
तिच्या दुधावर महाराष्ट्राची, पिढी बघा हो घडते,
राजकारण्यांनो उघडा डोळे, माय मराठी रडते
