पुतळ्या
पुतळ्या
जीवनाच्या प्रवासात सतत बाईपण जपणाऱ्या
कितीतरी बहुरंगी,बहुढंगी भेटतात पुतळ्या
थोडासा संवाद, थोडंसं कौतुक, थोडासा
आधार नि आदर एवढी अपेक्षा करत करत
जीवनाला भिडतात पुतळ्या.
बहुतांश इतरांसाठी तर मुठभर स्वतःसाठी
लढता लढता शरीरमनाने थकतात पुतळ्या
आपली दुःख, पराभव, आपली अन् आघाताचे
घाव झेलत झेलत कणखर बनतात पुतळ्या
परिस्थितीच्या महायज्ञकुंडातून
तापून निघता निघता समर्थ नि
स्वयंपूर्ण बनतात पुतळ्या
हर एक शृंगारलेल्या मुखवट्याखाली दुखरे
कढ अन् सलणारे हुंदके दाबून
धरता धरता हिमनगाप्रमाणे थिजतात पुतळ्या
खडतर मार्गावर कितीही हतबल अन्
अगतिक झाल्या तरी आशेचा चिवट तंतू
ताणता ताणता आवघ जग तरतात पुतळ्या
कर्तव्य आणि अर्थाजनाच्या प्रक्रियेत
जगता जगता हजारो युगांचे एकटेपण
इतरांचे जीवन सुगंधित करतात पुतळ्या
शेवटी
आपल्या भावविश्वाची हळूवार वीण
सांधता सांधता माणूस म्हणून जगण्याचा
अट्टाहास धरतात पुतळ्या.