प्रेमधून
प्रेमधून
कशी नकळत सखे
धुंदी प्रेमाची चढली
ध्यानीमनी तुझे ध्यान
धून प्रेमाची छेडली !
तुझ्या नजरेचे तीर
वेध काळजाचा घेती
डोळ्यातून प्रेमधारा
शब्द मौनात बोलती !
शब्दांविना दोघांनीच
किती केले हितगुज
डोळ्यातून डोळ्यांशीच
प्रेमाचीच कुजबुज !
शब्दाविना कानी माझ्या
येई ऐकू प्रेम गीत
ओठातल्या गुलाबात
दरवळे धुंद प्रीत !
गाली लज्जेचीच लाली
अधरांची थरथर
काळजात धडधड
ओढ आणि हुरहुर !
हात तुझा येता हाती
मोरपीस हळुवार
रोमरोम शहारती
ओढ वाटे अनिवार !
नको भाषेचे बंधन
नको शब्दांचा पसारा
स्पर्शातून फुले प्रेम
प्रणयाचा खेळ न्यारा !
शृंगारली तनुलता
येई प्रेमास बहर
मनोमनी फुले प्रेम
वसंताचा ये मोहर !!

