नकळत सारे घडले गं
नकळत सारे घडले गं
साद त्याची कानावर येता,
अवचित मागे वळले गं,
क्षणात गेले विरघळूनी मी,
विसरले स्वतःचे 'असणे' गं....नकळत सारे घडले गं...
स्पर्शसुखाची नसे लालसा,
लोप पावल्या विषयजाणिवा,
दाटे हुरहूर मनात माझ्या,
अनिवार आत्मिक ओढ गं....नकळत सारे घडले गं...
संकोचबंध तुटले सारे,
तो माझा, मी त्याची झाले,
राखुनही शारीर अंतरे,
अंतरे आमुची जुळली गं....नकळत सारे घडले गं...
आत्म्याचे हे मीलन ऐसें,
देहभावना विरुनि जातसे,
परी उरी मज धकधक भासे,
एक अनामिक कोडे गं....नकळत सारे घडले गं...
विस्मयकारक एकभाव हा,
ह्रद्-गाभारा भरुनी गेला,
विशुद्ध निर्मळ प्रेमभावना,
शब्दांतूनही उतरे गं....नकळत सारे घडले गं...

