कशी विसावली सर
कशी विसावली सर
धरत्रीच्या गं कुशीत
कशी विसावली सर,
येई माघारणी जणू
झणी भेटाया माहेर॥१॥
कधी होऊन दामिनी
मेघ राजाशी भांडते
माय बापा भेटण्यास
जसा आर्जव मांडते॥२॥
नाचे कानाकोप-यात
लेक अल्लड वेल्हाळ,
धुंद धुंडाळते माळ
पायी बांधुनिया चाळ. ॥३॥
पाना फुलांना भेटता
चिंब ओलावा साठतो,
भेट सखयांची होता
जसा उसासा दाटतो॥४॥
खेळे अंगा खांद्यावर
पोर लडीवाळ जशी
भिजुनिया चिऊकाऊ
दारी बागडते खुशी॥५॥
श्वास धरेचा भिजतो
लेक बिलगता उरी,
माया वाहे ओसांडून
शालू नेसे भरजरी॥६॥
लड मोतियांची शुभ्र
खाली तुटुनिया येते
डोळा भरून आसवे
घट्ट आलिंगन देते॥७॥
रितं करून मळभ
लेक मातेला भेटते
शालू नेसून हिरवा
पुन्हा न्हातीधुती होते॥८॥
आज भेटून काळीज
खुले निरभ्र नितळ,
सर अंगावर भिजे
हासे धुंद सळसळ॥९॥
