"किमयागार"
"किमयागार"


मन असतंच आतुर
त्या चिंबचिंब पावसासाठी
ओल्याचिंब पावसातल्या
हिरव्याकंच श्रावणासाठी!
श्रावण म्हणजे काय असतो
दुधावरची साय असतो
प्रत्येकाच्या मनात
घर करून राहत असतो!
प्रत्येकालाच हवाहवासा
हा असतो श्रावण सखा
खुलवत असतो मना-मनाला
जादूची कांडी फिरवल्यासारखा!
काय असावे गुपित ह्याचे
जो तो ह्याचेच गुण गातो
कानोकानी कुठला मंत्र
सांगा बरे हा गुणगुणतो!
विचार करता काही कळते
गूढ ह्याचे थोडे उलगडते
उमजते याचे अपुले नाते
जे आपल्याला खूप शिकवते!
आता म्हणावे ऊन आहे तर
क्षणात येते पावसाची सर
सुखदुःखाच्या सरमिसळीची
दाखवतो हा कलाकुसर!
कधी आकाशी मेघ दाटती
दिशा दिशा मग झाकोळती
इंद्रधनू सूर्यकिरण साकारती
मळभ मनीचे दूर लोटती!
निसर्ग फुलतो असा सत्वर
उलगडतो सौंदर्याचे पदर
श्रावण सांगे, अरे ते घेण्यासाठी
पसर फक्त तू अपुला पदर!
जीवनाचे एकेक मर्म
सांगतो हा सदा सदैव
क्षणार्धात मग जुळते नाते
ऋणानुबंधाची असते ही ठेव!
असा 'मित्र' क्वचितच लाभतो
असे 'मैत्र' खचितच गवसते
'श्रावण' मनोमनी म्हणूनी वसतो
'किमयागार' हा मला भासतो!!!