"तुळस-मोगरा"
"तुळस-मोगरा"
ती नाजूक
हाही तसाच
ती शेलाटी
हा हिरव्या देठी
ती मुग्ध
हा लुब्ध
ती कुंद
हा धुंद
तिची अदा
हा फिदा
ती विरक्त
हा आसक्त
ती आरक्त
हाही मस्त
ती बंधनात
हा मुक्त
ती परंपरा
हा अपरंपार
तिला वृंदावन
ह्याला मुक्तांगण
ती उंबरठयात
हा गारठयात
तिला आभाळ
ह्याला आकाश
ती कसनुशी
हा असोशी
तिचं आज लग्न
हा आपल्यातच मग्न
आली मुहूर्त घटिका
न येता हा परका
ती हिरमुसली
ह्याला काळजी कसली
अंतरपाट झाला दूर
हा दिसत नाही दूर दूर
घातली माळ कृष्णाने
हीचे डोळे भरले पाण्याने
हातावर जेंव्हा टचकन्
पडले दोन उन अश्रू
मनात म्हणाला ही
कां होतेय ही साश्रू
हार घालायला जेंव्हा
केली तिने वर मान
वर म्हणून दिसला तिला
तिचाच मिस्किल सखा
तोच तोच तोच तिचा
तो होता मोगरा
हसत हसत म्हणत होता
वेगळे आहोत कां आपण
आता व्यापला एकमेकांच्या
मनी मनीचा कोपरा न् कोपरा
म्हणतील आता सारे
"तुळस मोगरा" " तुळस मोगरा" !!!
