STORYMIRROR

Bahinabai Choudhari

Classics

2  

Bahinabai Choudhari

Classics

जयराम बुवाचा मान

जयराम बुवाचा मान

1 min
14.3K


तुझ्या लाडक्या लेकाचा

देता मान तुले

जाऊं आतां सम्दे जनं

लोडगे खायाले


च्यारे पुंजापत्री हातीं

उदबत्ती कापुर

वहा हात जोडीसनी

जयराम् बोवावर


'आज आली तुझ्या दारीं

मांगन रे तुले

दे जयराम बोवा आतां

आऊक्ष लेकाले'


आतां सांगते मी ऐका

एका रे काहानी

काय अवगत घडली या

पुन्यात्री ठिकानीं


"बारा वरसाचा मुंजा

वाटसरू कोनी

टिस लागीसनी गेला

पेयालेज पानी


त्याले सोंबर दीसली

येहेर मयांत

तांब्या शिकाई घेतली

टाकली गयांत


मंग वडांग कुदीसनी

येहरीजोय आला

तव्हां तितक्यांत कोनी

कोनी खकारला


जोय वडाच्या खालती

कोनी आवलिया

तढी व्हता देवध्यानीं

जयराम बोवा


म्हनें जयराम बोवा

'कोन तूं पोरगा

अरे, पानी पेयाआंधी

खाई घे लोडगा'


व्हत मुंजाबी भुकेला

बोवा पुढें आला

हातीं घेतला लोडगा

खायाले लागला


मंग खाऊन लोडगा

वाटली हुशारी

गेला पेयासाठीं पानी

आला येहरीवरी


त्यानं सोडली शिकायी

नित्तय पान्यांत

घेये भरीसनी तांब्या

घटाघट पेत


तव्हां पानी पेतां पेतां

वडाच्या खालुन

गेला सर्पटत साप

मुंजाच्या बाजुनं


तसा पाहे जयराम बोवा

डोये रोखीसन

आतां लागीन लागीन

मुंज्याले रे पान


पेत होता मुंजा पानी

पेयांत मगन

तो कशाले देईन

आठे तठे ध्यान ?


तसा उठे जयराम बोवा

तीराच्या सारखा

देला सापावर पाय-

सापावर देखा


साप चेंदता चेंदता

साप उलटला

आन् मुंजाच्या वाटचा

बोवाले डसला


तव्हां पयाला पयाला

मुंजा घाबरत

पडे जयराम बोवा

लह्यर्‍याज देत


गेली गेली रे बातनी

आवघ्या गांवाले

आला तठे 'हीराबाबू'

साप उतार्‍याले


गेला जयरामबोवा मरी

उपेग काय रे

काय चालीन मंतर

सापाले उतारे ?


अरे, उलटला मंतर

हीराबाबू वर्‍हे

गेलं चढीसनी ईख

सोताज लहरे


झडपला 'हीराबाबू'

गेला रे पयत

आन् मधींच पडला

सोंबरल्या शेतांत


मौत जयराम बोवाची

गेली नही हाटी

लोक आले रे पाह्याले

झाली तठी दाटी


देवमानूस शेवटे

देवाघरीं गेला

जिव धोक्यांत घातला

मुंजा वाचवला


देलं जयराम बोवानं

जीवाचं रे दान

आतां मुंजासाठीं लोक

देती त्याले मान


जारे 'बिढ्याच्या' वरते

'आसोद्याच्या' वाटे

तठी वडाच्या खालते

जयराम बोवा भेटे"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics