गावाकडची सांज.
गावाकडची सांज.
घराकडं परतती
चरून गुरेवासरे...
घेऊनी भरारी
घरटी शोधती पाखरे...
लेकराच्या ओढीने व्याकुळ
होते शेतातली आई...
भुकेल्या वासराचा हंबरडा
गोठ्यात पान्हवती गाई...
मंदिरी घुमू लागतो
मृदूंगाचा मुग्ध नाद...
दिवे लागणीची वेळ होता
माय घालते लेकरांना साद...
भजनाच्या रंगी रंगतो
तो मृदुंग अन् झांज...
किती भाग्यवान मी
माझ्या नशिबी गावाकडची सांज..
