Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

"न्यायी" शिवाजीराजा

"न्यायी" शिवाजीराजा

5 mins
671


         सन १६४५ ची संक्रांत तिळगुळाच्या गोडव्यासह आनंदाने साजरी झाली. मांसाहेब जिजाऊ आपल्या सुनांना घेऊन खेड-शिवापुरी थांबल्या होत्या. तेव्हा तेथे अचानक एक पन्नाशीतला बाप आर्त दुःखाने टाहो फोडत आपल्या विशीतल्या तरुण पोरीचं प्रेत घेऊन जिजाऊंच्या पुढ्यात उभा ठाकला. राग अनावर जाऊन जिजाऊंनी प्रेताच्या चेहऱ्यावरील पदर दूर सारत प्रेत न्याहळले. त्या मृत पोरीच्या आक्रोश करणाऱ्या बापाकडे विचारपूस केल्यावर कळले की, त्या निष्पाप पोरीसोबत "बदअंमल" म्हणजे व्यभिचार / बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. कुणाकडे तक्रार केल्यास सर्वांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ढसाढसा रडणाऱ्या त्या मृत पोरीच्या बापाला मांसाहेबांनी सांत्वन करून धीर दिला शिवाय संरक्षणाची हमी दिली. पण काही केल्या त्या पोरीच्या बापाच्या करुण किंकाळ्या कमी होत नव्हत्या. बाबाजी बिन भिकाजी गुजर उर्फ "रांज्याचा पाटील" अशा त्या व्यभिचार करणाऱ्या गुन्हेगाराचे नाव होते.

           

       मांसाहेब जिजाऊंनी लालमहालात निरोप पाठवून शिवरायांना बोलावून घेतले आणि व्यभिचारी बलात्कारी रांझाच्या पाटलाची चौकशी करून पकडून आणण्याचे आदेश दिले. शिवरायांनी तत्क्षणी काही मावळ्यांना रांज्याला पाठवून अपराधी पाटलास पकडून सोबत आणण्यासाठी पाठवले. दिवस मावळल्यावर रिकाम्या हाताने परतले. 


      रिकाम्या हाती परतण्याचे कारण विचारल्यावर मावळे शिवरायांना सांगू लागले की,"रांजाचा पाटील म्हणतोय कोण शिवाजी? कुठला शिवाजी? आम्ही आदिलशहाचें जुने वतनदार आहोत. आम्ही त्या पोरीसोबत जे काही कृत्य केले तो आमचा अधिकार आहे." रांजाच्या पाटलाचे असले उर्मट उत्तर ऐकून शिवरायांना राग आला. जिजाऊंच्या डोळ्यात अंगार थांबत नव्हता. रांजाचा पाटील उद्या सकाळी आपल्यासमोर हजर होईल असे वचन शिवरायांनी मांसाहेबांना दिले.

             

       खेड-शिवापूरच्या सीमेवरील रांजे गावाचा पाटील निष्पाप पोरीवर व्यभिचार करून हत्या करतो, स्वराज्यात झालेला हा अन्याय व अपमान शिवरायांना स्वस्थ बसू देत नव्हता. शिवरायांनी येसाजीस बोलावून घडलेले सारे वृत्त सांगितले. येसाजी तडक रांजे गावी गेला व मध्यरात्री पाटलाच्या वाड्यास वेढा घातला. दरवाजा फोडून वाड्यात शिरला आणि रांजाच्या पाटलाच्या मुसक्या बांधून बैलगाडीत टाकले. सकाळी तांबडं फुटत असतानाच पाटलास शिवरायांसमोर उभे केले. गावाच्या चावडीवरच गावकऱ्यांसमोर न्यायनिवाडा सुरू झाला. 


       शिवरायांनी पाटलास निरपराध मुलीवर व्यभिचार केल्याचा जाब विचारल्यावर गर्विष्ठ, निर्लज्ज पाटील म्हणाला, "तू कोण आम्हाला विचारणारा? अजून मिसरूड फुटलं नाही आणि आमच्यासारख्या आदिलशहाच्या जुन्या वतनदाराला हात लावण्याची तुझी हिम्मत कशी झाली? मला सोड, अन्यथा वाईट परिणाम भोगण्यास तयार रहा."

            

       रांजाच्या पाटलाचे गुर्मीचे बोल ऐकून येसाजीसह काही मावळे पुढे सरसावले पण शिवरायांनी त्यांना इशारा करून जागेवरच थांबविले. शिवरायांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते, त्या रागातच पण संयमाने शिवराय पाटलाकडे पाहून म्हणाले, "पाटील तुम्ही गावचे पालक! गावातल्या काय परकीयांच्या स्त्रियांनाही तुम्ही आया-बहिणीसारखं वागवलं पाहिजे. तुम्ही त्या गरीब शेतकऱ्यांच्या पोरीसोबत व्यभिचार करून हत्या केली, हे तुम्हांस कबूल आहे की नाही?"

             

        शिवरायांच्या नजरेतील जरब, बोलण्यातील करारीपणा पाहून पाटील वळणावर आला. गुर्मीत का होईना पाटलाने गुन्हा कबूल केला. शिवरायांनी शेजारी उंचावर बसलेल्या मांसाहेबांकडे पाहिले. 


     मांसाहेबांच्या सहमतीने न्याय देत शिवराय म्हणाले की, "रांजाच्या पाटलाने आपल्या अधिकारास काळिमा फासला आहे. हा सर्व परिसर आता आमच्या स्वराज्यात समाविष्ट झाल्याने या भागावर आमचे शासन चालेल. स्वराज्याचा भगवा व राजमुद्रा ह्या जनतेच्या कल्याण व सरंक्षणासाठीच आहेत. पाटलाने आपला गुन्हा कबूल केलाय. व्यभिचारी पाटलाचे चावडीवरच दोन्ही हात-पाय तोडून डोळे फोडावेत. रांजाच्या पाटलाची सर्व मालमत्ता जप्त करून त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरती त्यांच्याजवळ ठेवावी. शिवाय त्यातील काही भाग निष्पाप मृत पोरीच्या आई-बापाला देण्यात यावी. हा निवाडा संपूर्ण स्वराज्यात जाहीर करण्यात यावा."

            

        शिवरायांचा न्यायनिवाडा ऐकून गावकऱ्यांनी शिवरायांचा जयजयकार केला. त्यावेळी मांसाहेब जिजाऊ शिवरायांना म्हणाल्या, "राजे, त्या विकृत रांजाच्या पाटलास जिवंतच का ठेवला? देहदंड द्यायला हवा होता तुम्ही? स्त्री म्हणजे स्वराज्यातील देवता. तिच्या पदराला हात घालणाऱ्याची कदर कसली?"

         

       यावर शिवराय दृढ निश्चयाने म्हणाले, "मांसाहेब, खरं आहे. देहदंड द्यायला हवा होता पाटलाला! पण देहदंड दिल्याने विषय इथेच संपला असता पण हातपाय तोडून डोळे फोडलेल्या पाटलाची अवस्था येणारा-जाणारा जेव्हा पाहील तेव्हा समजून घेईल की या स्वराज्यात जर कोणी स्त्रीच्या पदराला हात घातला तर त्याचा "रांजाचा पाटील" केला जातो. परत अशी कृती कोणीही करणार नाही." मांसाहेब जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. डोळे पुसत त्या म्हणाल्या,"जेवढं शिकवलं होतं त्यापेक्षा अधिक शिकलात तुम्ही राजे."

          

          रांजाच्या पाटलाला सकाळी सुनावलेली कठोर शिक्षा दुपारपर्यंत गावातील चावडीवरच अमलात आणली गेली. त्वरित त्याची पाटीलकी जप्त केली गेली. दुष्कर्माबद्दल रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले गेले. सर्वांसमक्ष बाबाजीला म्हणजे पाटलाला चौरंग करण्याची शिक्षा दिली गेली. त्याची पाटीलकी काढण्यात आली. पण हातपाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होऊन दगावू नये यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या गेल्या. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जाण सर्वांना यावी यासाठी महाराजांनी पाटलाचा चौरंग करण्याची कठोर शिक्षा दिली. ही घटना २८ जानेवारी १६४५ रोजी घडली. गावोगावी- घरोघरी शिवरायांचे कल्याणकारी नाव पोहोचले. जनतेला ३०० वर्षांच्या मोगलाईनंतर न्याय देणारा वेगळा राजा स्वराज्यातील जनतेला मिळाला.


     चौरंग शिक्षा केल्यानंतर शिक्षा पूर्ण करून त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था मृदू मनाच्या महाराजांनी केली. बाबाजी निपुत्रिक असल्याने त्याच्या अपंगावस्थेत त्याचा सांभाळ करायची तयारी गुजर कुळीच्याच सोनजी बिन बनाजी गुजर याने दर्शविली. शिवाजी महाराजांनी या बदल्यात मेहेरबान होऊन रांजाची पाटीलकी सोनजीच्या नावे करत बाबाजीस पालनपोषणार्थ त्याच्या स्वाधीन केले.


         वाचक मित्रहो, रांझाच्या पाटलाने गरीब पोरीबरोबर केलेला व्यभिचार शिवरायांना सहन झाला नाही आणि चक्क हातपाय तोडून डोळे फोडले. अवघ्या पंधरा-सोळा वर्षे वय असलेल्या शिवबाच्या विचारांची उंची बघा, संस्कार बघा, लोकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला. काही माणसे पराक्रमी असतात, तर काही चारित्र्यावान असतात. पराक्रमी असणारी माणसे चारित्र्यशील असतीलच असे नाही आणि चारित्र्यशील माणसे पराक्रमी असतीलच असेही नाही. पण पराक्रमी व चारित्र्यशील या गुणांचा संगम जगात एकच राजात आढळतो तो म्हणजे आपला शिवाजीराजा... 


        आज देशात सगळीकडे बलात्कार, अपहरण, छेडछाड असे किळसवाणे प्रकार घडतात. बसस्टँड, रेल्वेस्थानक, बाजार, ऑफिस, रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकात आज रांजाचा पाटील दिसतो. तो गुन्हे करतो पण त्याला शिक्षा मात्र होत नाही. दरवर्षी होणाऱ्या बलात्कारांचे गुन्हे तर नोंदवले जातात, पण शिक्षा मात्र न्यायालयातील तारखांत धूळ खात असते. ते रांझाचे पाटील मोकाट फिरतात. आपली लोकशाही केवळ नावाला आहे. इंग्रज भारतातून गेले व आपण आपल्या स्वकीयांची गुलामगिरी आता करतोय. लोकशाहीतील कायदे असून खोळंबा आहेत. जर बलात्कार करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली गेली तर दुसरे बलात्कार करण्याची हिंमत करणार नाहीत. "परस्त्री मातेसमान" मानणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात, देशात नवजात स्त्री अर्भकापासून ते म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत होणारे दररोजचे बलात्कार आपल्यासाठी खेदाची बाब आहे. त्यासाठी पुन्हा शिवशाही अवतरणे आवश्यक आहे. आपण शिवइतिहासपासून प्रेरणा घेऊन शिवरायांच्या विचारांप्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे.                 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational