Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

शस्त्रविद्यानिपुण "भीमा लोहार"

शस्त्रविद्यानिपुण "भीमा लोहार"

5 mins
968


        शिवाजीराजे आता साऱ्या मावळ मुलखात फिरू लागले. मावळ मुलुखात पसरलेल्या उंच उंच गडांकडे पाहतांना राजांना वाटे की ही संपूर्ण जहागीर आपली आहे मात्र हे गड आदिलशाहीचे आहेत. असा विचार करतांना राजे बैचेन होत. मावळ मुलूखात शिवरायांच्या शब्दाला खूप मान होता. शहाजीपुत्र शिवाजीराजांना पाहून वतनदार वठणीवर येत होते. देशमुख प्रेमाने वळत होते. प्रजेच्या सुखदुःखाला वाचा फुटत होती. सामोपचारासोबत दंडाचाही वापर केला जात होता. गुंडगिरी, अरेरावी करणाऱ्या बांदल- देशमुखांना जबर शिक्षा केल्या जात होत्या.बाल शिवरायांवर, मांसाहेबांवर, शहाजीराजांवर लोकांचे फार प्रेम होते. शिवापूर व शहापूर ही नवीन नावांची गावही लोकांनी याच प्रेमापोटी वसवली होती.


           अशातच पुन्हा दुष्काळाने थैमान घातले. ते दिवस मावळ खोऱ्यासाठी अतिशय कठीणाईचे व वाईट होते. अस्मानी- सुलतानी संकटांमुळे मावळ बेचिराख झाले होते.सकाळी दहा-अकराची वेळ होती. वाड्याच्या पुढच्या चौक-सदरेवर शिवाजीराजे- मांसाहेब जिजाऊ बसले होते. तोच घामाने ओलाचिंब झालेला, पिळदार ,सावळा, उंचपुरा, भरड्या वस्त्रांची बंडी घातलेला मजबूत शरीरयष्टीचा एक इसम शिवरायांकडे येत होता.


        वाड्याच्या चौकात आल्यावर शिवरायांना मुजरा करत तो इसम म्हणाला, " ह्यो शिवाजीराजांचाच वाडा हाय ना..!


        "हो.. का..?" शिवाजीराजे म्हणाले.


       तसा तो इसम म्हणाला ,"काम हाय..." 


        शिवरायांनी त्याला वर यायला सांगून बसायला सांगितले. तो इसम बिचकत शिवरायांच्या बाजूला बसला. त्याच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या होत्या ; आणि त्या जखमातुन रक्त ओघळत होतं. त्या इसमाला पाहून पाहणाऱ्यालाच त्याची भीती वाटत होती. पण त्या इसमाला जणू त्या जखमांचं काहीच वाटत नव्हतं. त्या वेदना तो मोठ्या हिमतीने सहन करत होता. 


         शिवाजीराजांनी तिथल्या शिपायाला तातडीने वैद्याला बोलावण्याची आज्ञा दिली आणि मोठ्या प्रेमाने ते भिमाला म्हणाले , "कोण रे बाबा तू ? इथे कशाला आला आहेस?" 


          शिवाजीराजांचा तेजस्वी चेहरा, प्रेमळ बोलणं व प्रेमळ वागणं पाहून भिमा गहिवरला होता. " मी भीमा लव्हार.. ! सातारकडचा आहे. दुष्काळात उपासमार व्हायला लागली म्हणून मोगलाईत गेलो... रानात काटक्या गोळा करत हुतो आणि मला लांडग्याच्या टोळीने गराडा घातला... एक लांडगा मारला तव्हा बाकीचे पळून गेलं... गावातल्या लोकांसनी सांगितलं की लांडग्याचे शेपूट राजांना दावलं की पैसं मिळत्यात..." असं म्हणत भिमान आपल्या कंबरपट्ट्यात खोचलेलं लांडग्याचे शेपुट काढून शिवाजीराजांसमोर धरलं. 


        मावळात जंगली प्राण्यांचा विशेष करून लांडग्यांचा भयंकर उपद्रव होता. पूर्वी लांडग्यांच्या टोळ्या बिनधास्तपणे गावात घुसायच्या आणि गावातल्या लोकांची आरामात शिकार करायच्या. पुन्हा शिवाजीराजांच्या आदेशाने तरुणांच्या टोळ्या लांडग्यांची, तरसाची शिकार करू लागल्या होत्या. लांडगे तरसे किंवा इतर जंगली प्राण्यांना मारून त्याचे शेपूट आणून जमा करणाऱ्यास रोख पैशांची इनामे दिली जात होती. माजलेले रान तोडून शेती करण्यासाठी शिवाजीराजांनी कुऱ्हाडी, नांगर टिकाव इत्यादी साहित्याचं वाटप सुरू केलं होतं. लोकांना बियाण्यासाठी आणि खाण्यासाठी धान्याची मदत केली जात होती.


        केवळ काठीनेच लांडग्याची शिकार करणाऱ्या एकट्याने लांडग्याच्या टोळीशी झुंज घेणाऱ्या भिमाबद्दल शिवाजीराजांना फार कौतुक वाटलं. राजांनी एका शिपायाला सांगितलं , " या भिमाच्या जखमांवर वैद्यांकडून चांगल्या पट्ट्या करून घ्या... याला चांगलं जेवू घाला, चांगला पोशाख द्या.. आम्ही याची नंतर भेट घेऊ..."  


         दुपारी चांगला पोशाख घालून शिवाजीराजांच्या प्रेमाने भारावलेला भीमा शिवाजीराजांना समोर उभा होता. शिवाजीराजांनी त्याला रोख पैसे तर दिले पण इनाम म्हणून एक तलवारही भेट दिली. तलवार भेट देतांना राजे म्हणाले," भिमा... आता काठीनं नाही तर तलवारीनं लांडगे मारायचे..." 


         भिमा तलवार पाहून खूष झाला. भिमानं ती तलवार आपल्या हातात घेऊन उलटी पालटी करून नीट निरखली आणि त्याचा चेहरा एकदम पडला. शिवाजीराजांना अतिशय आश्चर्य वाटलं. न राहवून राजे म्हणाले," काय रे भीमा..! तलवार आवडली नाही का तुला..?" 


          यावर भिमा म्हणाला, " नाही आवडली राजं.. ! हित भेसळ हाय .लढाईत कवाबी दगा देईल..." 


         आतामात्र शिवाजीराजांच्या भुवया विस्फारल्या गेल्या. शिवाजीराजांच्या आजूबाजूचे सर्वजण कावरेबावरे झाले. शिवाजीराजांच्या समोर शिवाजीराजांनी दिलेल्या इनामाबद्दल वाईट बोलणं फारच वाईट गोष्ट होती. त्या अडाणी लोहाराला शिष्टाचार वगैरे काहीच माहीत नव्हता. शिवाजीराजे आता भयंकर चिडणार असंच सगळ्यांना वाटलं. पण बारा-तेरा वर्षांचे शिवाजीराजे मात्र शांत होते. तद्नंतर त्यांनी स्वतःच्या कमरेची तलवार काढून भिमाच्या हातात ठेवली. " भीमा.. या तलवारीची परीक्षा करून या तलवारीबद्दल तुझं काय म्हणणं आहे ते एकदा मला सांग.. ? " 


        शिवाजीराजांची ती देखणी तलवार एकवार भिमानं उलटून- पालटून बघितली आणि म्हणाला," राजं.. हिचं लोखंड एकदम भारी हाय पण हिची मूठ थोडी ढिली हाय... चांगलं दोन-चार वेळा पाणी द्याव लागल..." 


          शिवाजीराजे - मांसाहेब जिजाऊ बंगळुरूला गेलेली असतांना फिरंगी बनावटीची बंदूक व तलवार शहाजीराजांनी शिवरायांना भेट दिली होती. विजापूरच्या एका नामांकित कारागिराकडून ती तलवार बनवलेली होती. पण भीमानं त्या तलवारीबद्दल पूर्णपणे चांगले मत व्यक्त केलं नव्हतं. शिवाजीराजांच्या रागाचा पारा आता खूप चढणार असच सगळ्यांना वाटलं. पण तरीही शिवाजीराजे शांत होते. शिवाजीराजांनी भिमाकडून ती तलवार घेऊन आपल्या कमरेवरच्या म्यानात घातली आणि मोठ्या प्रसन्नतेने भिमाच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले,"तुला हत्यारांची चांगली जाण आहे... आम्ही तुला येथे लोहारशाळा काढून देतो. आमच्यासाठी तू हत्यारं बनवशील का.. ?" 


        आश्चर्यचकित आणि आनंदविभोर झालेला भिमानं आनंदात शिवाजीराजांना प्रेमानं मुजरा केला. त्या दिवसापासून भीमा लोहार स्वराज्याचा झाला तर अखेरपर्यंत स्वराज्याचाच राहिला. शिवरायांनी त्याच्यातील गुण हेरून त्या गुणांना योग्य दिशा दिली. भर दुष्काळात रानोमाळ हिंडणारा " भीमा लोहार" जर शिवरायांना येऊन मिळाला नसता तर इतिहासात अजरामर झाला असता का..? त्याच्या अंगी असलेल्या कलेची व गुणांची माती झाली असती... आणि शिव इतिहासातील मुंगीचा वाटाही त्याला मिळाला नसता..केवळ वयाच्या बाराव्या- तेराव्या वर्षी योग्य माणसांची पारख करून त्यांच्या कलागुणांना दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्याअर्थाने मॅनेजमेंट गुरू होते.


        भीमा लोहाराच्या पाठीवर पडलेली एक कौतुकाची थाप आणि त्यामुळे मिळणारे प्रोत्साहन जीवनाला कशी कलाटणी देऊ शकते हे शिवइतिहासापासून आपण शिकायला हवे. म्हणून वाचक मित्रहो, चांगल्या कार्याचे तोंडभरून कौतुक करा. कौतुक करायला मोठं मन लागतं. अशी मोठया मनाची माणसं आजकाल हरवलेली आहेत. एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानणारे आज समाजात सर्वत्र पाहायला मिळतात.

 

          मित्रांनो... शिव इतिहासातील या प्रसंगातून मला आपणांस सांगावेसे वाटते की... आपल्या भारतातील शिक्षण पद्धतीत केवळ संख्यात्मक मूल्यमापन केले जाते. परीक्षेत भरभरून गुण मिळवणारा विद्यार्थी हा केवळ"पैसे कमावण्याचे यंत्र" बनतो पण एक चांगला माणूस मात्र बनू शकत नाही. यासाठी विद्यार्थ्यांचे गुणात्मक मूल्यमापन होणेही तितकेच महत्वाचे आहे. आपण आपल्या पाल्यावर अवास्तव गुणांची (संख्यात्मक) अपेक्षा करतो आणि त्याच्या सुप्त गुणांकडे मात्र दुर्लक्ष करतो. परिणामी जर पालकांच्या अपेक्षा जर तो पाल्य (विद्यार्थी) पूर्ण करू शकला नाही तर आत्महत्येला कवटाळतो. आपल्या पाल्याचा कल, आवड लक्षात घेऊन जर आपण त्याच्या छंद व सुप्त गुणांना प्रोत्साहन दिले तर आपण त्याला खऱ्या अर्थाने माणसातील माणूस बनवू शकतो हे मात्र निश्चित..!   


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational