कल्याणच्या सुभेदाराची सून
कल्याणच्या सुभेदाराची सून
जावळी जिंकल्यानंतर शिवराय काही थांबले नाहीत. कोकण किनारपट्टीवर त्यांनी धडक मारली आणि तद्नंतर सर्वत्र आदिलशाही मुलखात धुमाकूळ घालू लागले. आदिलशाहीचे लचके तोडू लागले. पक्षाघाताने अंथरुणाला खिळलेला महम्मद आदिलशहा लवकर गचकत नव्हता. परिणामी विजापूरची कोंडी लवकर सुटत होती. या सर्व गोष्टींचा फायदा उठवून शिवराय आदिलशाही मुलुखात धुमाकूळ घालत होते. अखेर ४ नोव्हेंबर १६५५ रोजी महम्मद आदिलशहा गचकला आणि रक्तरंजित संघर्ष होऊन महम्मद आदिलशहाचा अल्पवयीन मुलगा अली आदीलशहा गादीवर बसला. महम्मद आदिलशहाची पत्नी बडी बेगम साहिबा हुशार व मुत्सद्दी होती. आदिलशाही तख्तातील सर्व संभाव्य काटे तिने विषप्रयोग करून व हत्या करून दूर केले. आदिलशाहीतील हा गादीचा संघर्ष स्थिरस्थावर होईपर्यंत शिवरायांचे स्वराज्य दुपटीपेक्षा जास्त विस्तारलेले होतं.
शिवरायांची लाडकी लेक सखुबाई आता थोडी मोठी झाली होती. तिला सासरी घेऊन जाण्यासाठी जावई महादजी आले असता शिवाजीराजांनी महादजीला जेजुरीला जाताना वाटेत असलेले वाल्हे गाव सखुबाईच्या चोळीबांगडीसाठी इनाम म्हणून दिले. यानंतर शिवजीराजांच्या आज्ञेनुसार दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदर जिंकण्यात आले. तद्नंतर मोगलांची दक्षिणेकडील किमती पेठ जुन्नरवर शिवाजीराजे चालून गेले व जुन्नर पेठ जिंकली. तीन लक्ष होनांची मालमत्ता, मौल्यवान कापड, जडजवाहिर शिवाजीराजांना मिळाले. जुन्नर नंतर शिवाजीराजे अहमदनगरवर चालून गेले. मोगल सरदार नौसीरखान राजांवर चालून गेला. पण शिवरायांनी त्याचा पराभव केला. त्यावेळी औरंगजेब बिदरला होता.
शिवाजीराजांनी आपली जुन्नर व अहमदनगर ठाणी जिंकली हे समजल्यावर तो खूप संतप्त झाला. पण त्यावेळी शहाजहान आजारी असल्याने औरंगजेबाचा भाऊ दारा सर्व सूत्रे सांभाळत होता. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे औरंगजेबला भाग होते. जुन्नर-अहमदनगर जिंकून शिवाजीराजे पुण्याला आले. तेथून लागलीच त्यांना पुरंदरवर जावे लागले. पुरंदरवर आनंदीआनंद पसरला होता. १४ मे १६५७ रोजी सईबाई प्रसूत होऊन गोड-गोंडस मुलाचा झाला होता. गमावलेला "संभाजी" परत आला म्हणून मुलाचे नाव "संभाजी" ठेवण्यात आले. संभाजीच्या जन्मानंतर लगेचच शहाजीराजांच्या सुटकेसाठी द्यावा लागणारा कोंढाणा परत स्वराज्यात आला. सईबाईंना खूप अशक्तपणा आल्याने संभाजीला दूध पुरत नव्हते. म्हणून नरसापुर जवळच्या कापूरवहाळ गावच्या गाडे पाटील घराण्यातील धारावी नावाची स्त्री संभाजीराजांची दूध आई बनली.
रायगड, प्रतापगड हे किल्ले उभारले जात असताना पैसा कमी पडत होता. एके दिवशी रामशरण नावाच्या एका गुप्तहेराने कल्याणहुन विजापूरला निघालेल्या खजिन्याबाबत शिवरायांना सूचना दिली.
दादाजी लोहकरे, सखो लोहकरे व आबाजी महादेव यांच्यासह फौज घेऊन शिवाजीराजांनी कल्याणची वाट धरली. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमदने विजापूर दरबाराचा गोळा केलेला खजिना सशस्त्र घोडदळासोबत विजापूरला पाठविण्यासाठी वाटी लावला होता. खजिन्याबरोबर अग्रभागी सुभेदाराचा मुलगा मुल्ला याहिआ हा आपल्या सुंदर पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना संथगतीने पुढे जात होता. पालखीतून जाणारी सुभेदारसून घाटाचे निसर्गसौंदर्य पाहत होती.
घाटाची चढण लागल्यावर बैलगाड्यांचा वेग आणखी मंदावला. बैलांच्या पाठीवर चाबकाचे पट्टे पडत होते. मुकी जनावरे कष्टाने पाऊल उचलत गाड्या ओढत होती. काही घोडेस्वार खाली उतरून बैलगाड्यांच्या दोन्ही बाजूंना हात लावून मदत करत होते. घाट पार होण्याची धडपड साऱ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होती. तोच "हर हर महादेव" असा गजर उठला. घाटात लपलेले मराठे मुल्ला याहीआ व त्याच्या सैन्यावर तुटून पडले. काही वेळाच्या लढाईनंतर मुल्ला याहीआचा पराभव झाला. कल्याण खजिना विजापूरची वाट सोडून परत उलट दिशेने म्हणजे कल्याणची वाट चालू लागला.
दोन प्रहरानंतर मराठा घोडेस्वारांची तुकडी कल्याणला कल्याण दरवाज्यापाशी आली. काही वेळातच कल्याण शहर घोड्यांच्या टापांनी भरून गेले. सुभेदार मुल्ला अहमदला कैद करण्यात आले. कल्याणवर भगवा डौलाने फडकू लागला. कल्याण पाठोपाठ भिवंडीही काबीज झाली.
कल्याणच्या वाटेवर असलेल्या शिवाजीराजांना ही बातमी सांगण्यासाठी घोडेस्वार धावला. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजांनी देखण्या व ऐश्वर्यसंपन्न कल्याण शहरात प्रवेश केला. भयचकित नजरेने कल्याणचे लोक शिवरायांकडे पाहत होते. कल्याण बाहेरच्या माळावर उभारलेल्या शामियान्यात शिवाजीराजे आले. लोहकरे बंधू व आबाजी महादेव यांनी केलेला पराक्रम ऐकून शिवाजीराजांनी त्यांचे कौतुक केले.
शिवाजीराजे शामियान्यातील आसनावर बसले. कल्याणच्या खजिन्यातील सुवर्ण-रौप्य नाणी, अलंकार, रत्नांची मोजदाद सुरू झाली. कल्याण मोहिमेत जखमी झालेल्यांना भरपूर द्रव्य देण्यात आले. आबाजी महादेवांना सुभेदारी देऊन दादाजी लोहकरे व सखो लोहकरे यांना कल्याण-भिवंडीचा कारभार सांगितला गेला. शेवटी कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद व त्याचा मुलगा मुल्ला याहीआ यांना शिवाजीराजांसमोर
उभे करण्यात आले. शिवाजीराजांनी त्यांना सुखरूप सोडण्याचा हुकूम देऊन विजापूरला जाण्याची परवानगी दिली.
आबाजी महादेवने मुजरा केला व म्हणाले,"आणखी एक कैदी आपल्यासमोर हजर व्हायचा आहे!"
"कोण?"
"कल्याणच्या सुभेदाराची सून!”
राजे संतप्त झाले, "आबाजी..!"
"राजे, कल्याण खजिना हाती आला तेव्हा खजिन्याबरोबर ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती. तिच्या नवऱ्याला कैद केले. तेव्हा हिलाही कैद करण्यात आले. आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार?"
"सुभेदाराच्या सुनेला हजर करा..."
आबाजींनी टाळी वाजवताच दोन दासींसह सुभेदाराच्या सुनेने शामियान्यात प्रवेश केला. शिवरायांनी एकवार त्या सुभेदार सुनेकडे निर्मळ, निरागस भावाने पाहिले आणि आबाजींना म्हणाले, "आबाजी, ही मुलगी सौंदर्याची खाण आहे. आता तुम्ही हजर केली आहे.... तर तुम्हीच सांगा हिचे काय करावे ?"*
"राजे, हिला नाट्यशाळेत स्थान दिलं तर तिचा सन्मान होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवली नाही. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबराने जनानखान्यात कोंडली होती."
"आबाजी..! तोंड सांभाळून बोला..स्वराज्यात आया- बहिणींबद्दल असे बोलणाऱ्यास कठोर शिक्षा दिली जाते हे जाणत असूनही पापाचं समर्थन तुम्ही करत आहात...कोणी काय केलं ते आम्हांस सांगू नका.. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो... आमचा भगवा पवित्रतेचे प्रतीक आहे. त्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मानाने ओटी भरून तिच्या नवऱ्यासोबत विजापूरला पाठवा..."
शिवाजीराजांच्या या निर्णयाने सुभेदार पिता-पुत्रांच्या नजरा विस्फारल्या गेल्या. तर त्या सुभेदारसुनेच्या डोळ्यात अश्रू आले. त्या साऱ्यांनी शिवाजीराजांना मुजरे केले. शिवरायांनी हात जोडून त्यांना निरोप दिला. कल्याण-भिवंडीची व्यवस्था लावून शिवाजी महाराज पुरंदरवर परतले.
आपल्या लेकाच्या वागणुकीने जिजाऊसाहेब पुन्हा एकदा सुखावल्या. शत्रुच्या लेकीबाळींकडे वाकडी नजर करून बघायचं नाही असा कडक नियमच शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना घालून देतात.
एक अनामिक कवी या प्रसंगाचे फार सुरेख वर्णन करतो.. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पाहून शिवाजीराजे बोलले, "अशीच आमुची माता असती सुंदर रुपवती । आम्हीही सुंदर झालो असतो वदले शिवछत्रपती ."
याचा अर्थ "अशीच आमुची माता असती तर आम्ही सुंदर झालो असतो.." असे शिवाजी महाराज म्हणतात असे सांगितले जाते. सर्वात महत्वाचे असे आहे की, जगात कोणताही विवेकी पुत्र स्वत:च्या आईच्या सौदर्याची तुलना इतर स्त्रियांशी करणार नाही. स्वत:ची आई कुरुप असो अथवा सुंदर असो प्रत्येकाला स्वत:च्या आईबद्दल नितांत आदर असतो.
शिवभारतकार परमानंद जिजाऊमाता यांच्या सौंदर्याबद्दल लिहितात, "जिजाऊ लावण्यवती असुन भुवया धनुष्याप्रमाणे.. डोळे पाणीदार.. कान सोन शिंपल्यासारखे..नाक सरळ..मुख प्रफ़ुल्लीत कमळासारखे... होते.” तर परमानंद शिवरायांबद्दलही लिहितात, “शिवराय लावण्य अपार..वर्ण सुवर्णासारखा..शरीर निरोगी.. नेत्र कमळासारखे..नासिका पळसाच्या पुष्पासारखी.. मुख स्वभावत:च हसू.. बाहु मोठे..मोहक शरीर यष्टीचे धनी होते.”
जिजामाता सुंदर होत्या, त्या कुरुप असत्या... तरी त्यांच्या योग्यतेला..कर्तृत्वाला.. कमीपणा येत नाही. पण त्या सुंदर होत्या, ही वस्तुस्थिति आहे. शिवाजी महाराजदेखील सुंदर होते. हे समकालीन परमानंदाने लिहिलेले आहे. त्यामुळे "माझी आई सुंदर असती तर मी ही सुंदर झालो असतो" असे शिवाजी महाराज कधीही म्हणणार नाहीत.
रयतेच्या कल्याणाचा विचार सोडून व्यक्तिगत सौंदर्याकडे लक्ष देणारे शिवाजी महाराज म्हणजे कोणत्या चित्रपटातील अभिनेता नव्हते. आपण एक सामान्य नागरिक असून, आपण आपल्या आईची तुलना कुणासोबत करत नाही. मग युगपुरुष शिवाजी महाराज कशी तुलना करतील? याबाबत "विचारमंथन" होणे अत्यावश्यक आहे.
मित्रहो, शिवाजी महाराज त्यांच्या आदर्श वागणूकीमुळे रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले. स्त्रीच्या मानसन्मानाला स्वराज्यात सर्वोच्च स्थान आहे हे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले.
फक्त कायदे करून चालत नाही तर त्याची कडक अंमलबजावणी करावी लागते. हे शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यात दाखवून दिले. इतरांना आदर्शवादाचे धडे देताना आपण स्वतः चारीत्र्यसंपन्न राहावे लागते हेदेखील शिवाजी महाराजांनी स्वतः दाखवून दिले.
४००० करोडचे शिवस्मारक आणि शिवाजी महाराजांचे मंदीर बांधून देशातील, समाजातील प्रश्न सुटणार नाहीत..स्टेजवरील शिवरायांच्या पुतळ्यास, प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेची सुरूवात करणारे सर्वपक्षीय राजकारणी आणि कार्यकर्ते शिवरायांच्या शिवशाहीतुन व आचार-विचारातून आदर्श घेत नाहीत, तोपर्यंत भारत महासत्ता होणे कठीण आहे.