vinit Dhanawade

Inspirational


2.5  

vinit Dhanawade

Inspirational


"एक होता राजा"

"एक होता राजा"

48 mins 16.7K 48 mins 16.7K

"Hello….Hello…. राजेश… ",

" हा… बोलं गं… ",

"अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?",

"थांब जरा… बाहेर येऊन बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला.

"हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. ",

"हा… आता येतो आहे clear… कसा आहेस तू…",

"मी ठीक आहे आणि तू कधी आलीस केरळ ट्रीप वरून…. फोटो बघितले तुझे…. सगळे फोटो छान आहेत हा… ",

"हो का…. तुला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एक तरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही… सांग. ",

"ते तर आहेच… कारण तू दिसतेस सुद्धा छान…. मग चांगलेच असणार ना फोटो… " त्यावर निलम हसली. " तू पण ना राजेश… बरं ते जाऊ दे… तुला एक good news सांगायची आहे." राजेशला त्याचचं टेंशन होतं.

" हा … बोलं…" जरा चाचरत बोलला राजेश.

" अरे…. लग्न ठरलं माझं…" राजेशच्या मनात लागलं कूठेतरी. " हो… " तेवढंच बोलला राजेश.

" अरे… हो काय… अभिनंदन नाही करणार का ? " ,

"हं … हो… congratulations निलम." राजेश उगाचच आनंदाचा आव आणत बोलला. " चल… तुला नंतर call करतो. बॉसने बोलावलं आहे." राजेश खोटंच बोलला. "Ok…. Bye then…. भेटू संध्याकाळी… " म्हणत निलमने call कट्ट केला.

तसाच थोडावेळ उभा होता राजेश. निलमचं लग्न ठरलं… कधी… कळलचं नाही मला. तिने तरी सांगायचे होते ना मला… हं… तिला ते सांगणं महत्वाचं वाटलं नसेल मला कदाचित… राजेश विचार करत उभा होता." अरे राजा…. " मागून कोणीतरी आवाज दिला. तेव्हा राजेश भानावर आला. मंगेश होता तो. " अरे राजा… इकडे काय करतो तू ? … चल ना, lunch time झाला,जेवायचे नाही का… " राजेशची भूक पळून गेली होती.

"नको रे… भूक नाही… तू जा जेवून घे." ,

"Tiffin आणला नाहीस का…नसेल तर माझ्याकडे आहे तो अर्धा-अर्धा share करू… चल. ",

"tiffin आहे रे… पण… " मंगेशने ओळखलं, राजेश जरा नाराज आहे ते.

"काय झालं राजा… ",

"काही नाही… जा तू, जेवून घे… मी येतो आत थोडयावेळाने." मंगेशने त्याला जबरदस्ती केली नाही मग. तो गेला आत ऑफिसमध्ये. राजेश बाहेरच थांबला विचार करत.

आज सगळा दिवस, राजेश कसल्याश्या विचारात होता. मंगेशला कळलं ते. त्याने पुन्हा त्याला विचारलं नाही. संध्याकाळ झाली, ऑफिस मधून निघायची वेळ… मंगेश राजेश जवळ आला. " राजा… " राजेश तसाच बसून खुर्चीवर. " ये राजा… " मंगेशने पुन्हा हाक मारली.

" हं… हा… काय… काय झालं… ",

"अरे निघूया ना घरी… चल.",

"हा… सामान आवरतो मग निघू. "राजेशने पटपट सामान आवरलं आणि निघाले दोघे. Bus stop वर पोहोचले. ऑफिस ते bus stop … १० मिनिटाचा रस्ता. या वेळात राजेशने एक शब्द काढला नाही तोंडातून. मंगेश सुद्धा काही बोलला नाही मग. पाचचं मिनिटं झाली असतील तिथे येऊन, अचानक निलमची गाडी आली समोर." हे निलम… " मंगेशने निलमला हाक मारली. धावतच गेला गाडीजवळ.

" अरे… कधी आलीस केरळ वरुन…",

"पहिला गाडीच्या आत तर ये.… घरी सोडते दोघांना. " मंगेश पटकन जाऊन बसला गाडीत. राजेश तसाच उभा bus stop वर. निलम आणि मंगेश एकमेकांकडे पाहू लागले. मंगेश गाडीतून उतरला… " अबे… राजा, ये राजेश… चल ना पटकन… नाहीतर ट्राफिक जाम होईल पुन्हा." मनात नसताना राजेश गाडीत, मागच्या सीटवर जाऊन बसला. आता ही सुद्धा नवलाईची गोष्ट होती, निलम आणि मंगेश साठी. निलम सोबतच म्हणजे तिच्या बाजूलाच बसायचा गाडीत नेहमी. आणि आज चक्क मागच्या सीटवर. मंगेश पुढे बसला. निलमने राजेशकडे एक नजर टाकली आणि गाडी सुरु केली.

"बरं… कधी आलीस आणि कशी झाली केरळ ट्रीप… ?", मंगेशने विचारलं.

" धम्माल रे… काय मस्त वातावरण असते रे तिथे… म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही असं… beautiful environment… अरे राजाने फोटो दाखवले नाहीत का… काय रे राजा… " राजेश गाडीच्या बाहेर बघत होता. त्याचं लक्ष बाहेरच होतं, त्याच्याच दुनियेत… मंगेश राजेशकडे बघत होता. निलमला कळलं नाही, कि राजेश का उत्तर देत नाही ते. विषय बदलण्यासाठी मंगेश बोलला.

"बरं झालं हा, तू भेटलीस ते… नाहीतर अजून कितीवेळ बसची वाट पहावी लागली असती देव जाणे… मग तिथून ट्रेनची वाट बघायची… कटकट नुसती… आज आरामात घरी.",

" घरी नको निलम… स्टेशनला सोड. " खूप वेळाने राजेश पहिल्यांदा बोलला.

" अरे… स्टेशन कशाला… सोडते ना घरी.",

"नको… तुला लांब पडेल ते." ,

" काहीच काय राजा… इतर वेळेस सोडते ना घरी दोघांना… तेव्हा असं बोलला नाहीस कधी.",

"तसं नाही… पण आज लवकर जायचे आहे घरी… ट्रेनने लवकर पोहोचेन, कार पेक्षा.",

"राजेश… मित्रा… कारने आरामात जाऊ कि…" मंगेश मधेच बोलला.

" तुला कारने सोडेल ती, मी ट्रेनने जातो आहे…" राजेश बोलला. मंगेश गप्प झाला. निलमने दोघांना स्टेशनला सोडलं आणि ती गेली पुढे निघून.

३ character's … निलम,राजेश आणि मंगेश… तिघे जवळचे मित्र. त्यातले राजेश आणि मंगेश, हे दोघे लहानपणापासूनचे मित्र… एकाच शाळेत नसले तरी एकाच चाळीत, शेजारी-शेजारी होते. निलमची ओळख कॉलेजमधली. त्यात मात्र तिघे एकत्र होते. फक्त निलम commerce ला होती आणि हे दोघे Arts ला होते. शाखा वेगळ्या असल्या तरी त्याचं भेटणं असायचं रोज. आता निलम आणि त्यांची ओळख कशी…? ११ वीला असताना, एक नाटक बसवलं होतं कॉलेजमध्ये. त्यात या तिघांनी भाग घेतला होता. राजेशला मूळातच आवड अभिनयाची. मंगेशने राजेश होता म्हणून स्वतःच नाव दिलं होतं नाटकात. तर निलम फक्त एक टाईमपास करण्यासाठी म्हणून ते नाटक करत होती. नाटक पूर्ण तयार झालेलं. कास्टिंग तेवढी बाकी होती. राजेश छान अभिनय करायचा. त्यामुळे त्याला प्रमुख भूमिका होती. नाटक पौराणिक विषयावर आधारित होते. त्यात राजेश " राजा" चा रोल करत होता. राजेशच्या सांगण्यावरून, मंगेशला प्रधानमंत्री केलं होतं. ऐनवेळी राणीची भूमिका करणारी आजारी पडली आणि फक्त टाईमपास साठी आलेली निलम… तिच्या वाटणीला "राणी" चा रोल आला तो, ती चांगली दिसायची म्हणून. नाटक छान बसलं आणि सगळ्यांना आवडलं सुद्धा. त्याच्या तालिमी चालायच्या रोज कॉलेजमध्ये. रोज भेटणं व्हायचं तिघांचे. त्यातून मैत्री झाली तिघांची. नाटक संपल तरी मैत्री राहिली. ११ वी संपून १२ वी सुरु झाली. निलमचा तिचा असा ग्रुप होता, परंतू या दोघांबरोबर आपलं tuning छान जुळते, हे तिला समजलं होतं. मग काय, ११ वीत सुरु झालेली friendship… अगदी १५ वी म्हणजे कॉलेज सुटे पर्यत होती.

राजेश…. चाळीत राहणारा एक सर्वसामान्य मुलगा. ४ वर्षाचा असताना, एक दिवस अचानक… कोणाला न सांगता, त्याचे वडील कूठेतरी निघून गेले… का गेले ते फक्त आणि फक्त त्यांनाच ठाऊक… ते अजूनही परत आलेले नाहीत. छोट्या राजेशला आईनेच सांभाळलं. वडील अचानक निघून गेल्याने, त्याच्या बाल मनावर परिणाम झालेला. तेव्हापासून राजेश काहीसा अबोल. जास्त कोणाशी मिसळणे नाही… फारच कमी बोलायचा. कधी कधी तर स्वतःमधेच गुरफटलेला. साधा, सरळमार्गी. कोणाचं वाईट करू नये आणि कोणाविषयी वाईट चिंतू नये. अश्या मनाचा. पण खूप हळवा. भावूक मनाचा. रस्त्यावरल्या किती मुलांना तो मदत करायचा. स्वतः गरीब होता तरी पोटाला चिमटा काढून त्यातलं त्या मुलांना देयाचा थोडंतरी… आईचा खूप जीव राजेशवर. कधी कधी तिला त्याच्या साधेपणाची चिंता वाटायची. कोणावरही विश्वास ठेवायचा लगेच, म्हणून.… राजेशला सगळे "राजा" बोलायचे.Thanks to मंगेश, कॉलेजमध्ये नाटक केल्यापासून आणि नाटकाच्या सवयीमुळे…. मंगेशने प्रथम राजेशला "राजा" बोलायला सुरुवात केली. मग हळू हळू संपूर्ण चाळ त्याला "राजा" याच नावाने ओळखायला लागली. तरी सुद्धा तो "राजा"च होता… सगळ्यांना आवडायचा तो. काही वाईट गुण नव्हता त्यात. शिवाय गरीब मुलांना मदत करायचा. राजेश नावाने आणि मनाने सुद्धा " राजा " होता.

मंगेश…. राजेशचा मित्र. चाळीत शेजारी शेजारीच रहायचे. स्वभाव मात्र राजेशच्या उलट अगदी. मंगेश सगळ्यात मिळून मिसळून वागणारा. दुनियादारी माहित असलेला. बडबड्या… समोरचा अनोळखी असला तरी काही वेळातच त्याच्याबरोबर ओळख करणारा. सांगायचं झालं तर एकदम मस्तमौला माणूस. त्याच्या अश्या स्वभावामुळे त्याचे खूप मित्र होते. पण राजेश त्याला जवळचा वाटायचा. तो समजून घ्यायचा राजेशला. जणू काही त्याला राजेशच्या मनातलं कळायचं. दोघांमध्ये एक गोष्ट common होती… कोणालाही मदत करायला तयार असायचे नेहमी.

आणि राहिली निलम… या दोघांपासून भिन्न…. सगळ्याच बाबतीत… हुशार, इतर गोष्टीपेक्षा अभ्यासात जास्त आवड. पहिल्यापासून काहीतरी मोठ्ठ करून दाखवायचं हे ध्येय. घरची परिस्तिथी श्रीमंतीची, त्यामुळे लागेल ते आणि लागेल तेव्हा हातात देण्याची घरच्यांची तयारी. त्याचा गैरवापर कधी केला नाही निलमने. बारीक शरीरयष्टीची, दिसायला एकदम अप्सरा वगैरे नसली तर छान होती दिसायला. "नाकी-डोळी नीटसं "…. एखादी आपली 'Best Friend' असते ना, जिच्याबरोबर आपण आपले "secret, personal matter" share करतो ना…. अगदी तशीच होती निलम. कॉलेजमध्ये जास्त कोणाशी मुददाम मैत्री केली नाही तिने. होत्या त्या तीन मैत्रिणी फक्त. नाटकाच्या तालिमी सोबत राजेश, मंगेश यांची भेट झाली. राजेशचा स्वभाव आणि मंगेशची दुनियादारी आवडली तिला. म्हणून त्यांच्यासोबत "दोस्ती" आपोआप झाली तिची, ती कायमची.

तसे तिघे एकाच area मध्ये राहायचे. राजेश, मंगेश चाळीत… तिथूनच १५ मिनिटांच्या अंतरावर निलमची सोसायटी होती. बहुतेकदा तिघे कॉलेजमधून एकत्र घरी यायचे. निलमला चाळीतल्या त्यांच्या घरात खूप आवडायचं. कधी कधी परस्पर राजेशच्या घरीच जायची निलम,त्याच्या आईला भेटायला. राजेशची आई जेवण छान बनवायची. कधी सुट्टी असली कि निलम मुददाम राजेशच्या घरी जायची जेवायला. आता निलमच्या घरी ते माहित होतं. त्यांना राजेश आणि मंगेश बाबत माहिती होती. त्यामुळे त्यांना या मैत्रीत काहीच प्रोब्लेम नव्हता. अशीच त्यांची मैत्री होती…. छान अशी.

त्यात खंड पडला तो कॉलेज संपल्यावर. निलमला M.B.A. साठी बंगलोरला जायचे होते. राजेश तसा अभ्यासात हुशार नव्हता. पास झाला तेच बरं झालं. त्याला कूठे जाता येणार होतं M.B.A. साठी, शिवाय तेवढे पैसे आणि M.B.A. साठी लागणारी हुशारी त्यात नव्हती. मग काय करणार ना… कॉलेज संपल्या संपल्या नोकरीला लागला. निलमपासून दूर होणं त्याला रुचलं नव्हतं… कसं ना, ५ वर्षाची मैत्री कशी break होणार पटकन. सुरुवातीला तसंच वाटलं राजेशला. राजेश इथे तर निलम बंगलोरला. मोबाईल काय साधा घरी फोनही नव्हता राजेशकडे. काही फोन वगैरे असतील तर ते मंगेशच्या घरी यायचे. मंगेशला राजेशचे मन कळायचं. त्यानेच मग स्वतः पैसे साठवून राजेशला एक "second hand"मोबाईल घेऊन दिला. नकोच म्हणत होता राजेश. पण जबरदस्ती केली तेव्हा त्याला मोबाईल घ्यावा लागला. निलमकडे साहजिकच होता मोबाईल. मंगेशने लगेच तिला फोन लावला आणि या दोघांचे बोलणे पुन्हा सुरु झालं.

तीन वर्ष होती निलम बंगलोरला. एकदाही मुंबईला आली नाही. पण या दोघांचे बोलणं असायचं नेहमी, दिवसातून एकदा तरी. मैत्री तुटू दिली नाही तिघांनी. दरम्यान, राजेश आणि मंगेशला चांगला जॉब मिळाला होता. जरा लांब होता, तरी salary बऱ्यापैकी ठीक होती. पैसे साठवून राजेशने स्वतःला आणि मंगेशला गिफ्ट म्हणून नवीन मोबाईल घेऊन दिला. रोज call करायची निलम. दिवसभरात काय काय झालं ते सांगायची राजेशला. कधी घरी असताना call आला तर आई बरोबर गप्पा व्हायच्या. आईला बरं वाटायचं. लांब जाऊन पण 'राणी' विसरली नाही आपल्याला आणि 'राजा' ला सुद्धा. निलमला राजेशची आई "राणी" म्हणूनच हाक मारायची. कधी कधी मंगेशसमोर बोलून दाखवायची,"राजा आणि राणीचा जोडा छान दिसतो." मंगेश हसायचा, त्याला माहित होतं…. राजेशला निलम खूप आवडायची. फक्त अबोल स्वभावामुळे तिला कधी बोलून दाखवलं नव्हतं.

M.B.A. चे शिक्षण पूर्ण करून निलम मुंबईत आली. आणि आल्या आल्या एका मोठया कंपनीत रुजू झाली. खूप हुशार निलम… त्यामुळे फक्त सहा महिन्यातच तिची पोस्ट वाढून assistant manager झाली. योगायोग बघा किती. निलमचे ऑफिस आणि या दोघां मित्रांचे ऑफिस, एकाच ठिकाणी… काही मिनिटांच्या अंतरावर. पुन्हा तिघे एकत्र आले. निलमला कंपनीने प्रवासासाठी कार दिली होती. मग काय… कधी लवकर निघाले तर तिघे एकत्रच घरी यायचे. छान चाललेलं तिघांचे.… निलम आता खूप छान दिसायची. किती फरक पडला होता तिच्या personality मध्ये. जास्त confident झाली होती ती. पण आपला राजेश तसाच राहिला होता, अबोल… अजून पुढे ३ वर्ष निघून गेली. या तिघांची मैत्री जास्तच घट्ट झाली होती. ऑफिसमधून निघाले कि निलम सोबतच घरी यायचे. सुट्टी असली कि निलम राजेशकडे यायची. आईला भेटायला. छान गप्पा जमायच्या मग. वरचेवर फिरायला जायचे तिघे. मंगेश कधी कधी मुद्दाम बहाणा काढून घरी थांबायचा. दोघांना एकत्र काही वेळ मिळावा म्हणून, पण राजेश कसलं तिला मनातलं सांगतोय. मग मंगेशला राग यायचा. बोलून दाखवायचा राजेशला सरळ… राजेश फक्त हसण्यावर न्यायचा. त्यालाही वाटायचं… एकदा तरी विचारावे लागेल तिला.

असेच दिवस जात होते. त्यात पुन्हा खंड पडला तो निलमच्या केरळ ट्रीपमुळे. ऑफिस टूर होती. शिवाय कामही होतंचं. पण त्याआधी मंगेशला एक खबर लागली होती. आणि ती म्हणजे, निलमच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे याची. निलम मोठया पोस्टवर होती,हूशार होती, salary चांगली होती. त्यामुळे समोरूनच तिला किती चांगली 'स्थळं' येत होती. राजेशला याची कल्पना होती. त्याच्या मनात धाकधूक होती त्याचीच. त्याने ठरवलं होतं कि आपणच तिला विचारू आधी. त्यात ती केरळला गेल्याने तो विचारू शकला नाही. ४ महिने चालली तिची केरळ ट्रीप… मुंबईला कधी आली ते सांगितलंच नाही…. आणि सांगितलं ते थेट…. लग्न ठरल्याची बातमी.

निलमच्या लग्नाची बातमी ऐकल्यापासून राजेश जरा बावरलेला होता. ऑफिस ते घर… मंगेश आणि राजेशचा रोजचा प्रवास…. निलम आणि यांची भेट झाली तरच ते तिच्या कारने घरी यायचे नाहीतर ट्रेन आहेच. ट्रेनमध्ये कितीही गर्दी असली तरी या दोघांच्या गप्प्पा गोष्टी चालू असायच्या. मंगेश उभ्या उभ्याच, त्या गर्दीत मस्करी, भंकस करत असायचा. त्यामुळे तो दीड तासाचा प्रवास छान व्हायचा… मात्र आज राजेश शांतच होता, त्यात आज अचानक window seat मिळालेली. म्हणजेच दरवाज्याजवळ टेकून उभा रहायला भेटलं होतं. मंगेश सवयीप्रमाणे बडबड करत होता. राजेश ट्रेनमधून मागे पळणाऱ्या देखाव्याकडे पाहत होता. मंगेशने उगाचच दोन-तीनदा त्याला हसवण्याचा प्रयन्त केला. पुरता फसला प्रयन्त त्याचा. अर्थात मंगेशला, निलमच्या लग्नाची गोष्ट ठावूक नव्हती. आणि राजेश वा निलम, दोघांपैकी एकानेही त्याला सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्याला राजेशच्या Mood off चे कारण कळत नव्हतं.

राजेश तसाच घरी आला. हात-पाय धुतले आणि शांतपणे एका जागी जाऊन बसला. आई जेवण बनवत होती. राजेशला तिने आलेलं पाहिलं. राजेश दमून आला कि असाच एका कोपऱ्यात जाऊन शांत बसायचा. खिडकीतून बाहेर बघत बसायचा. घरात TV नाही, त्याला आवड सुद्धा नव्हती TV ची, आई सकाळपासून कामात. मग कशाला पाहिजे TV घरात.… हा… करमणुकीसाठी एक टेपरेकोर्डर होता घरात. तो लावायचा कधी तरी. त्यात केसेट्स लावू शकत होते. वडिलांची आवड ती… बऱ्याच जुन्या गाण्याच्या केसेट्स होत्या राजेशच्या घरी, त्यात बहुतेक शास्त्रीय संगीताच्या.… वडिलांची ती आवड राजेशला पण होती.… शास्त्रीय संगीत… ते लावून बसायचा कधी कधी, मंगेश बोलायचा कि, कशाला रडगाणी लावतोस. राजेशची आई हसायची मनसोक्त. कारण काही गाणी मुद्दाम शोधून शोधून मंगेशने राजेशच्या मोबाईलमध्ये भरून ठेवली होती. फावल्या वेळात राजेशला ऐकण्यासाठी…त्यातून शोभा गुर्टू यांचे " याद पिया कि आये… " हे गाणे राजेशला विशेष आवडायचे. आईला सुद्धा तेच गाणं जास्त आवडायचे. वरचेवर लावायचा ते गाणं राजेश. का आवडते असं विचारलं तर सांगायचा, हे गाणं ऐकलं कि सगळा त्राण निघून जातो शरीरातून, मन फ्रेश होते अगदी.

आज राजेश तसाच खिडकीबाहेर बघत बसला होता. " राजा…. " आई त्याच्या जवळ आली. राजेश त्याच्याच विचारात.…. डोक्यावरून हात फिरवत आईने विचारलं," काय झालं रे राजा…. " , राजेशने मान हलवून नकार दिला.

" जेवतोस ना…. ",

"नको आई, भूक नाही आज… ",

" का रे… काय झालं… बाहेर खाऊन आलास का काही… ?",

"नाही… पण नको आज जेवायला.",

"बरं… ठीक आहे." आईला त्याचा स्वभाव माहित होता. काही झालं तरी मनातलं सांगणार नाही कधी…. आईने सगळी जेवणाची भांडी झाकून ठेवली. राजेशला कळल, आपण जेवलो नाही तर आईसुद्धा जेवणार नाही. तसा तो उठला… "आई… चल, जेवायला बसू." आई हसली त्यावर. मनात नसताना सुद्धा केवळ आईसाठी तो जेवायला बसला. असा होता राजेश… भोळा अगदी.

पुढचे २ दिवस, तसच अगदी. राजेश गप्प गप्पच होता. मंगेशला समजत नव्हतं कि नक्की काय झालं आहे ते. ऑफिसचं काम झालं कि निघायचे घरी… निलमची वाट बघणं नाही कि तिला call नाही. तिसरा दिवस तसाच गेला राजेशचा, शांत अगदी. काम झालं ऑफिसचं आणि नेहमी सारखा निघाला मंगेश बरोबर घरी. त्यादिवशी पण निलम त्याला सकाळपासून call करत होती. एकदाही त्याने call उचलला नाही. न राहवून मग तिने मंगेशला call करून राजेशबद्दल विचारलं. नक्कीच काहीतरी बिनसलं होतं राजेशच. म्हणून त्याने निलमचा call उचलला नसेल. त्यासाठी, राजा सकाळपासून बॉस सोबत आहे म्हणून त्याने call उचलला नाही, असं खोट सांगितलं. निलमचा call कट्ट करून तो राजेश जवळ आला. मोबईल तर शेजारीच होता. राजेश कामात गुंतलेला. मोबाईल उचलून त्याने चेक केला. २२ missed call निलमचे. "राजा… " राजेश कामातच. " अरे राजेश…. माणसा, आहेस का जमिनीवर…. " तेव्हा राजेशने एक थंड नजर टाकली मंगेशवर. "अबे…. काय झालंय तुला…. राणी कधीपासून call करते आहे तुला… हे बघ, २२ missed call आहेत.… कूठल्या जगात आहेस रे… "," ह्म्म्म… " मंगेशकडे न बघता त्याने उत्तर दिलं आणि पुन्हा कामात लक्ष घातलं त्याने. काय झालंय याला… पहिला तर कधी वागला नाही असा.… आणि निलमचा फोन….असं कधीच झालं नाही कि त्याने तिचा call receive केला नसेल. मग आज का ? मंगेश विचार करत करत त्याच्या जागेवर जाऊन बसला.

संध्याकाळ झाली तरी निलम त्याला call करत होती. दोनदा call receive केला नाही राजेशने. त्यानंतर मोबाईल बंद करून ठेवला. मंगेश सर्व पाहत होता. मंगेशला call आला निलमचा.

" अरे… राजा call receive का करत नाही आणि आता तर स्विच ऑफ येतो आहे. अजूनही तो बॉस बरोबर आहे का",

"हं… हो गं, सकाळपासून तो आतच आहे बॉसच्या केबिनमध्ये… तुझं काही काम होतं का… ",

"नाही रे, असंच… तुम्ही निघत आहात का दोघे… मी थांबते मग, bus stop वर या दोघे, कारने जाऊ घरी आज.",

"ok" म्हणत मंगेशने call कट्ट केला.

" राजा, येतो आहेस ना, निलम वाट बघत आहे. " ,

"तू जा पुढे…. मला थोडा वेळ लागेल… ",

"चल ना राजा… उद्या कर काम ते, चल लवकर… ",

"मंगेश खरंच जा… मला वेळ आहे निघायला अजून… प्लीज जा… " नाराजीने मंगेश निघाला. Bus stop वर निलम वाट बघत होती.

" Hi मंगेश… ",

"Hi… ",

" अरे, राजा कूठे आहे… ? " निलम राजेशला शोधू लागली.

"अगं… sorry, त्याला जरा काम आहे म्हणून थांबला आहे तो.",

" ok… ok , चल मग तुला सोडते घरी." ,

"नको गं… जाईन ट्रेनने." निलमने त्याचा हात पकडला आणि गाडीत बसवलं.

"म्हणे जाईन ट्रेनने…. काय झालंय रे तुम्हा दोघांना… ",

"तसं नाही गं, पण राजा नाही ना सोबत म्हणून…",

"अरे… किती वेळा call केला त्याला.… एवढा काय बिझी आहेत आज राजे… " ,

" आज खूप काम आहे ना त्याला… बरं, काही काम असेल तर सांग मला, मी सांगेन तुझा निरोप त्याला." ,

"हे घे… " म्हणत निलमने साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका मंगेशच्या हातात ठेवली.

मंगेश दचकला. " अरे… हे काय… ",

"माझ्या engagement चे invitation… " मंगेशला धक्का बसला. निलमकडे बघत राहिला.

"अरे, असा काय बघतोस…जसं काही तुला माहीतच नाही.",

"मला कसं कळणार ? ",

" राजा बोलला नाही तुला… " मंगेशने नकारार्थी मान हलवली.

"त्याला तर पहिलच सांगितलं… आणि त्यालाच पहिलं invitation देयाचे होते म्हणून तर call करत आहे सकाळपासून." मंगेश अजून त्या धक्यातून सावरला नव्हता. "पण तुझं नशीब चांगलं आहे हा… तुला पहिलं invitation… " मंगेश खोटं खोटं हसला.

" अभिनंदन… " ,

" Thanks… नक्की यायचे हा… " ,

"हो नक्की… " मंगेश निमंत्रण पत्रिका पाहू लागला. स्वप्नील दामले…. म्हणजे ब्राम्हण… " दामले म्हणजे ब्राम्हण ना… " मंगेशने विचारलं.

" हो… का रे ? ",

" नाही,सहज विचारलं… तू बोलायचीस ना, आमच्याच जातीचा पाहिजे घरच्यांना… ९६ कूळी मराठा… मग आता ब्राम्हण… म्हणून विचारलं… " त्यावर निलम काही बोलली नाही.…. शांतता… थोडयावेळाने निलम बोलली,

" पपांच्या ओळखीचा आहे तो… चांगलं स्थळ आहे म्हणून आवडला पप्पांना तो. engineer आहे ….दुबईला असतो, कधी कधी मुंबईला येतो… मोठे मोठे प्रोजेक्ट केले आहेत त्याने. मग घरी आवडला तो.",

"आणि तुला… ",

"हा… चांगला आहे. मला सुद्धा बाहेर जायचे होते, इंडियाबाहेर… मग बरं झालं ना… " निलम हसली.

" ok… ok, ठीक आहे, छान. ",

"राजेशला निमंत्रण पत्रिका कधी देऊ… तुझ्याकडे दिली असती पण मला स्वतः त्याला देयाची होती.",

"उद्या दे ना मग…",

"नाही ना… उद्या पासून सुट्टीवर आहे मी. आपली भेट नाही होणार संध्याकाळी… चार-पाच दिवसतरी… ",

"मग… आईंना दे…",

"हा… आताच जाऊ देयाला ना… " निलम आनंदात सांगत होती. मंगेश मात्र राजेशचा विचार करत होता. हेच कारण होतं त्याच्या शांत असण्याचे.

निलम, मंगेशसोबतच राजेशच्या घरी आली." आई… !!! " म्हणत म्हणत निलमने राजेशच्या आईला मिठी मारली. किती दिवसांनी भेटत होत्या दोघी. राजेशच्या आईला किती आनंद झाला. मंगेश दारातच थांबला.

" ये… ये राणी, कित्ती दिवसांनी आलीस घरी. कोणी ओरडलं का इकडे येतेस म्हणून… " राजेशची आई मस्करीत बोलली.

" काय आई… तुम्हीपण ना… मला कोण ओरडणार… कोणी ओरडलं तरी मी काय थांबणार आहे का इकडे यायची… " दोघीही हसायला लागल्या.

"बरं… कधी आलीस केरळ वरून…",

"झाले चार-पाच दिवस… राजा बोलला नाही का… " ,

"नाही… ",

"काय झालं ते कळत नाही त्याला… हम्म… ते असू दे, आई… हि घ्या , निमंत्रण पत्रिका… ",

"कसली गं… ",

"माझं लग्न ठरलं आहे आणि पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे. त्याचं आमंत्रण देयाला आले मी. पाया पडते हा आई… " निलम राजेशच्या आईच्या पाया पडली. धक्कादायक एकदम… मंगेश दारातच होता. आईने त्याच्याकडे पाहिलं.

" आई… नक्की यायचं हा… ",

"हं… हो, अजून मोठी हो… " असा आशीर्वाद दिला निलमला.

"चला आई, निघते मी. या निमंत्रण पत्रिका वाटायच्या आहेत ना… आणि राजाला सुद्धा सांगा हा… येते मी… चल मंगेश, Bye… " म्हणत निलम निघून गेली.

मंगेश बाहेरच उभा होता. आईने त्याला विचारलं," राजेश नाही आला का रे… ? ","नाही… पण येईल तो जरा उशिराने… काळजी घ्या त्याची." मंगेश त्याच्या घरात आला. तसाच जाऊन झोपला. राजेशची आई, खूप वेळ त्याची वाट बघत होती. जरा उशिरानेच आला राजेश. रात्रीचे ११.३० वाजले होते. हात-पाय धुतले, फ्रेश झाला. त्या खिडकीजवळ जाऊन बसला. पुन्हा उठला. आणि टेपरेकोर्डेर लावला. आवडतं गाणं लावलं. " याद पिया कि आये… " ध्यानस्त झाला. खिडकीबाहेर कूठे तरी दूर पाहू लागला. संपूर्ण चाळ झोपली होती. नीरव शांतता पसरली होती. त्यात त्या गाण्याचा आवाज अधिक वाटत होता. शेजारीच मंगेश राहायचा. त्यालाही ते ऐकू येत होतं. पडल्या पडल्याच तोही ते गाणं ऐकत होता. त्या शांततेत ते गाणं मनात कूठेतरी लागत होतं.

राजेशची आई, कधीपासून त्याला बघत होती. किती स्वप्न पाहिली होती तिने. निलम-राजेशची जोडी… आता ते शक्य नव्हतं. पण राजेशला कसं समजावायचे… शेवटी राजेश जवळ आली ती.

"राजा जेवतोस का ? " तिला माहित होतं, तो जेवणार नाही ते, तरी विचारलं.

" नाही… नको मला, आज खूप उशीर झाला आहे ना… " राजेश बाहेरच बघत म्हणाला.गाणं तसच चालू होतं. आईच्या काळजात कालवाकालव सुरु होती. खूप धीर करून बोलली,

" राणीचं लग्न ठरलं ना… " राजेशने एक नजर टाकली आईकडे.

"तुला कसं कळलं ते… ",

"ती स्वतः आलेली, साखरपुड्याचे आमंत्रण घेऊन… ",

"हम्म… " राजेश पुन्हा बाहेर बघू लागला. "चांगलं झालं ना आई, निलमचं…. ",

"अरे पण तुझं प्रेम…. ",

"नाही गं आई… असं नको वाटून घेऊस… नाहीतरी, ती कूठे …. मी कूठे…. मैत्री केली तिचं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. " राजेश उगाचच हसला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. राजेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

" राजा… नको रे असा राहत जाऊस… इतका साधा नको राहूस रे…आजकालच्या दुनियेत नाही राहत रे असा कोणी. ",

"आई, स्वभाव आहे ना तो … कसा बदलणार… थोडे दिवस वाटेल निलम बद्दल… मग… ",

"मग काय… " ,

" नंतर सवय होईल ना… म्हणून आता पासून सवय करतो आहे , तिच्यापासून दूर रहायची… " ,

"किती दिवस असा राहणार… ",आई रडत म्हणाली.

" माहित नाही… कोणीतरी दूर जाते… ते दुःख कसं असते ते माहित आहे मला. पहिलं बाबा गेले सोडून आणि आता निलम… " राजेश बोलता बोलता थांबला, आईला खूप वाईट वाटलं. "याद पिया कि आये…. " गाणं तसंच सुरु होतं.आणि आई… राजेशला पोटाशी घेऊन रडत होती.

पुढचा दिवस… राजेश नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. पुन्हा निलम त्याला सकाळपासून call करत होती. राजेशने एकदाही उचलला नाही. मंगेशला कळत होते कि राजेशला काय वाटतं असेल मनातून. तरीसुद्धा राजेश जवळ आला तो.

"चल… " मंगेशने राजेशला सांगितलं.

"कूठे ? ",

"चल जरा… बाहेर, बोलायचे आहे.",

"आता नको, काम आहे. रात्री घरी गेलो कि बोलू.",

"प्लीज राजा… तुला तुझ्या आईची शप्पथ आहे." राजेश नाईलाजाने उठला. आणि बाहेर आला.

" राजेश… मला कळते आहे, तुझ्या मनात काय चालू आहे ते… पण एकदा बोल तरी तिच्याशी.… ",

"काय बोलू… ",

"अरे तुझ्या मनातलं सांग ना तिला… ",

"काय बोलतो आहेस तू… आता तीन दिवसांनी साखरपुडा आहे तिचा… आणि मनातलं सांगू… ",

" अरे पण, बोल ना तिला… इतके call करते ती… एकदा बोल ना… " राजेश तयार नव्हता बोलायला. शेवटी मंगेशने call केला निलमला.

" Hi… अरे राजा कूठे आहे… कधीपासून call करते आहे त्याला… भेटली का निमंत्रण पत्रिका त्याला …." निलम बोलली.

" हा… भेटली. पण तुला भेटायचे होते जरा… कधी भेटशील… ",

"आता तर मी निमंत्रण पत्रिका वाटत आहे friends कडे… रात्री भेटू… चालेल ना. " ,

"हो… चालेल, रात्री भेटू… ८ वाजता, तिथेच… चहाच्या टपरीवर",

"ok, चालेल… " मंगेश - निलमचं संभाषण संपलं.

संध्याकाळी मंगेश, राजेशला जबरदस्ती घेऊन गेला. राजेशला लवकर निघायचे नव्हते. ८ वाजता बरोबर पोहोचले दोघे त्या टपरीवर.… तिघे अगदी कॉलेजमध्ये असल्या पासून या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबत आणि टाईमपास करत. चाळीपासून जवळच होती टपरी. निलम तर आधीच आलेली.

" काय रे राजा… कालपासून call करते आहे तुला, एकदाही उचलला नाहीस…. " राजेश गप्पच. निलम मंगेशकडे पाहू लागली. मंगेशला समजलं ते. त्यानेच विषय सुरु केला.

" निलम, मला काहीतरी बोलायचे आहे.",

"हं… बोलं.",

"मला माहित नाही, हि योग्य वेळ आहे का नाही बोलायची… ",

"हा… काही असेल ते आत्ताचं बोलून घे हा…. कारण लग्न झाल्यावर मी भेटणार नाही." निलम हसत म्हणाली.

"म्हणजे… " मंगेश बोलला.

"अरे, लग्नानंतर direct… दुबई.",

"म्हणजे… तिकडेच राहणार का तू ? ",

"हो.",

"आणि जॉब ? ",

"आमची branch आहे ना तिकडे, दुबईला… मग तिकडेच जॉब करणार. Transfer करून घेणार मी." मंगेश… राजेशकडे पाहू लागला. राजेश शांतच होता.

"अरे पण या राजाला काय झालं आहे… बोलत का नाही." ,

"तेच सांगायचे होते.",

"मंगेश प्लीज…नको." राजेश खूप वेळाने बोलला.

"गप्प बसं राजा… बोलू दे… निलम." मंगेश निलमकडे पाहत बोलला."तुला वाटत नाही. तुझा निर्णय चुकला आहे ते.… जोडीदार निवडण्याचा.",

"what do you mean… ",

"तुला खरंच… त्याच्याशी लग्न करावेसे वाटते कि… घरच्यांसाठी लग्न करते आहेस… ?",

"मला अजूनही कळत नाही… तूला काय सांगायचे आहे ते.… ",

"एवढीही बनाव करू नकोस निलम, जसं काही तुला कळतच नाही… मी राजेशबद्दल बोलतो आहे." तेव्हा निलमच्या चेहऱ्याचे expression बदलले. "त्याचं प्रेम होतं तुझ्यावर, ते माहित होतं ना तुला… तरी तू… ",

" अरे… पण… घरी कसं सांगू मी हे… आणि आता काही होऊ शकत नाही. " निलम बोलली. मंगेशकडे बोलण्यासारखे काहीचं नव्हतं. सगळेच शांत झाले. निलम राजेशकडे पाहत होती.

" राजेश… अरे पण आपण मित्र तर राहू शकतो ना… बोल ना काहीतरी.… बोलत का नाहीस माझ्याबरोबर. ",

"तुझ्यापासून दूर रहायची सवय व्हावी म्हणून… " राजेश शांतपणे बोलला." मला वाटते आपण पुन्हा नको भेटायला. call पण नको करूस. तुला आणि तुझ्या घरी चालायचे ते… तुझ्या जोडीदाराला आपली Friendship कळणार नाही, may be… ",

"म्हणजे Friendship पण नको का तुला. " निलम रागात बोलली.

"तसं नाही… पण सवय झाली आहे तुझी… जरा वेळ लागेल ना, लग्नानंतर अश्या भेटी होणार नाहीत पुन्हा. म्हणून बोललो…. चल Bye… निघतो मी, आई वाट बघत असेल. " म्हणत राजेश निघाला. निलम गाडीत जाऊन बसली. मंगेश सुद्धा निघाला. निलमने मंगेश समोर गाडी थांबवली आणि बोलली.

"मी घेतलेले कोणतेच निर्णय चुकलेले नाहीत… हा निर्णयसुद्धा…" गाडी start केली… गेली निघून.

साखरपुड्याचा दिवस आला. रविवारचं होता. त्यामुळे ऑफिसचे कारण नव्हतेच. आईने सांगितलं म्हणून राजेश तयार झाला. मंगेश होता सोबतच. गिरगावला साखरपुडा होता… साखरपुडा काय, लग्नच होतं ते जणू काही… एवढा खर्च केला होता. श्रीमंती दिसूनच येत होती त्यांची. मंगेशचे डोळे दिपून गेले. निलम तर किती छान दिसत होती आज. गुलाबी रंगाची साडी… त्यावर गळ्यात, हातात दागिने. उजळून दिसत होती अगदी. त्यांची जोडी तर द्रुष्ट काढण्यासारखी होती. राजेश त्यांच्याकडेच पाहत होता कधीचा. मोठे मोठे पाहुणे आलेले समारंभाला. त्यात हेच दोघे साधे वाटत होते. म्हणून सगळ्यात शेवटच्या रांगेत बसले होते. हळूहळू एक-एक जण त्या जोडप्याचे अभिनंदन करत होते. राजेशला तिथे पुढे जायची इच्छ्या नव्हती.… मंगेशला हिंमत होत नव्हती पुढे जाऊन तिचे अभिनंदन करण्याची. थोडावेळ दोघे बसले आणि मागच्या मागे निघून गेले. छान सोहळा झाला. रात्रसुद्धा झाली होती. रात्रीचे १० वाजलेले. तिथून गिरगाव चौपाटी जवळच होती.

" चल… जरा बसू चौपाटीवर… " राजेश मंगेशला बोलला.

" अबे… वाजले बघ किती… पुन्हा घरी जायला उशीर होणार… आणि आता चौपाटीवर कोणी नसेल.",

"तू जा… मी जातो चौपाटीवर…" राजेश निघाला. मंगेश मागोमाग.…. बसले थोडावेळ… मंगेशने इतरत्र नजर फिरवली.कोणी कोणीच नव्हतं. राजेश समुद्राकडे पाहत होता. मंगेशला बोलायचे होते राजेश बरोबर.

" राजा… मला बोलायचे होते.… तुझ्याशी.",

"हं… बोल.",

"तू का सांगितलं नाहीस तिला कधी मनातलं… " राजेश हसला फक्त.

"बोल ना हसतोस काय ?",

"काही नाही रे… असंच हसायला आलं… " राजेश, मंगेशकडे न पाहताच म्हणाला.

" हा जानेवारी महिना आहे ना… मार्चमध्ये लग्न आहे बोलली ना ती. ",

"हो… मग.",

"नाही रे… असचं… आणि लगेचच दुबईला जाणार ना निलम.…. हम्म, यावर्षी रंगपंचमीला नसेल ना ती… ",

"काय बोलतो आहेस तू… " मंगेश राजेशकडे पाहत म्हणाला.

" दरवर्षी असेत ना ती… चाळीत येऊन रंगपंचमी खेळायची.… पुन्हा गुढीपाडवा, त्यादिवशी आपण जायचो त्यांच्याकडे… गुढीला पाया पडण्यासाठी…. नंतर १ मे, मुद्दाम कूठेतरी फिरायला जायचो आपण…तेव्हा पण नसेल ती,… जून,जुलै मध्ये येणाऱ्या पावसात नसेल ती, मग… गोविंदाला "हंडया" बघायचा हट्ट करायला नसेल ती… यावर्षी गणपतीमध्ये चाळीतल्या सार्वजनिक आरतीला नसेल ती… मला गरब्याला सुद्धा कोणीतरी नवीन जोडीदार बघावा लागेल ना… ती तर नसेलच यावर्षी कोणत्याच सणांमध्ये…. " आणि राजेश हसायला लागला. थंडीचे दिवस होते. त्यात समुद्रकिनारा… थंड, बोचरा वारा… राजेशचे ते बोलणे ऐकून मंगेशच्या अंगावर शहारा उठला… कसं सहज बोलून गेला तो.

"राजेश…. तू तिला आधीच का सांगितलं नाहीस हे… ",

"कसं सांगू मंगेश तिला… सांग मला, कसं सांगू… , बघितलंसं न आता… किती खर्च केला त्यांनी साखरपुड्याला, त्यात मी कूठे बसतो सांग… ती manager आहे आणि मी साधा चाकरमानी… तिचं सगळं काम मोठ्या माणसाबरोबर असते… त्या लोकांना काय सांगणार होती ती, माझा नवरा साधा जॉब करतो… कसं जमणार होतं आमचं.… निलमचं घर बघितलंस ना, लग्न करून तिला का चाळीत आणलं असतं का मी… साधा TV नाही माझ्याकडे… तिच्या नवऱ्याचा पगार माहित आहे तुला, १.५ लाख… माझा किती, १५,०००… फरक, १.३५ लाख… निलमने गेल्या महिन्यात ६००० ची फक्त shopping केली.… आपल्या खोलीचे भाडे ८०००… त्यात घरातलं राशन, वस्तूसाठी पैसे, आपल्या प्रवासाचा खर्च… त्या अनाथ मुलांसाठी करतो तो खर्च… एवढं सगळं करून १५,००० मधले उरतात ते फक्त ३००० रुपये हातात. त्यातून बँकेत टाकतो पैसे… कस सांभाळणार होतो निलमला मी आणि बोलतोस तिला आधी का विचारलं नाहीस ते… कसं सांगू रे… इकडे ऑफिस मधून सुटलो कि पहिला विचार येतो… बस वेळेवर मिळेल का, वेळेवर भेटली तर नेहमीची ट्रेन मिळेल… ती चुकली कि पाऊण तास थांबा… मग घरी पोहोचायला उशीर, आई तशीच राहते मग न जेवता… निलमला तिच्या गेल्या वाढदिवसाला वडिलांनी कार गिफ्ट दिली… शिवाय कंपनीची कार आहेच… मला जमणार होतं का ते…" राजेश थांबला बोलायचा. मंगेशला भरून आलं होतं. दोघेही समुद्राच्या येणाऱ्या - जाणाऱ्या लाटांकडे बघत होते.

खूप वेळाने राजेश बोलला. "निलम सांगत होती, तो दुबईला मोठा engineer आहे, मुंबईत स्वतःचे दोन Flats आहेत. १.५ लाख पगार, दुबईत असतो… वरचेवर india मध्ये येतो. खूप छान मुलगा भेटला तिला… शिवाय तिचं एक स्वप्न होतं, निलमला world tour करायची होती… मला ते काही जमलं नसतं कधीच… आता तरी निलम जगभर फिरू शकेल… " राजेश हसत म्हणाला.

" पण यार… असं कसं रे …. " मंगेश खूप वेळाने बोलला." किती वर्ष एकत्र आहोत आपण… त्यात तुम्ही दोघे किती जवळ… कधीच वेगळे झाला नाहीत तुम्ही,तुम्हा दोघांना ते जमलंचं नाही… दूर जाणं, रोज एकतरी call असतो ना तुमचा एकमेकांना… नाहीतर मेसेज तरी चालू असतात… आणि निलम, तू एक reply केला नाहीस तर किती बेचैन व्हायची. मला call करून तुझी चौकशी करायची… मग सांग, एवढ्या वर्षांत एकदातरी, असा दिवस गेला का… कि ज्या दिवशी तुम्ही बोलला नाहीत." राजेशने नकारार्थी मान हलवली.

" मग आता हे असा का, मध्येच कुठून गरिबी - श्रीमंती आली रे… " राजेशने मंगेशच्या खांदयावर हात ठेवला. " आता झालं ना चांगलं तिचं… बस ना मग, आपल्याला काय पाहिजे अजून." मंगेश शांत झाला. अजून थोडा वेळ बसले दोघे. मंगेश उठला मग…"चल राजा… घरी जाऊ… "राजेश बसूनच होता… " मी बसतो आहे थोडावेळ अजून… खूप दिवसांनी समुद्र किनारा बघतो आहे… "मंगेश पुढे काही बोलला नाही. निघून गेला तो.

आता , तिथे फक्त राजेशच होता.… सोबतीला थंड वारा, धीरगंभीर असा लाटांचा आवाज आणि राजेश,… राजेशला जुन्या गोष्टी आठवत होत्या. कॉलेजच्या गोष्टी, त्यांच्या friendship च्या… एकत्र जेवायचे राजेशच्या घरी येऊन. सुट्टी असली कि अभ्यास करण्याच्या बहाणा करून निलमचे घरी येणे… अभ्यास बाजूलाच, गप्पा-मस्करी भंकस… मस्त चालायचं. त्यात कधी कधी आई सहभागी होत असे.… गरबा खेळायला यायची निलम मुद्दाम… इतकी वर्ष ते दोघे "बेस्ट जोडी" चा पुरस्कार घेत होते. छान जमायचं दोघांचं… गणपतीच्या शेवटच्या दिवशी, जागरण करताना… किती धम्माल करायची निलम… कोजागिरीला शेकोटी भोवती कसे फेर धरायचे निलम आणि मंगेश… आठवणी येताच राजेश एकटाच हसत बसला होता. मग जॉबला लागलो, तरी एकत्र होतो. गाडीतून येताना एक - दीड तासाचा प्रवास कसा पटकन संपायचा. त्याच गप्पागोष्टी, मजा-मस्करी.… दिवसभराच्या ऑफिसच्या गोष्टी सांगताना सगळा त्राण नाहीसा होत असे. आणि सुट्टीच्या दिवशी, कूठेतरी बाहेत फिरायचा plan.… तिघेच जण, मी , निलम आणि मंगेश… कधी कधी मंगेश सांगायचा, पोटात दुखते… डोकं दुखते.… नाटकी नुसता… उगाचच…,निलम सोबत मी एकटं जावं म्हणून… राजेशच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. अचानक त्याला आजचा दिवस आठवला. सगळं हसू नाहीस झालं चेहऱ्यावरचे… स्वतःचा राग आला त्याला. बाजूला एक लहानसा दगड होता. उचलला,जोरात भिरकावला समुद्रात आणि मोठयाने ओरडला." आ…. " पुन्हा पुन्हा ओरडत होता, घसा दुखेपर्यंत…मग चालत समुद्राजवळ गेला,वाळूत बसला आणि वाळू हाताने उचलून समुदात भिरकावू लागला, ते थकेपर्यंत… शेवटी हात दुखले… शांत झाला. डोळ्यात पाणी जमा झालेले… एकदाही रडला नव्हता तो इतक्या वर्षात… वडील सोडून गेले तेव्हासुद्धा नाही, सगळी दुःख अशीच मनात साठवून ठेवलेली त्याने… पुन्हा मोठयाने बडबडू लागला समुद्राकडे बघत " काय चूक होती माझी यार !!! सांग ना… काय चूक होती, प्रेम केलं होतं ना मी, तिचं पण प्रेम होतं ना माझ्यावर… मग मलाच का शिक्षा, एवढी वर्ष होतो ना एकत्र… असं कोणी अचानक सोडून जाते का कोणी… एवढं मोठ्ठ भगदाड पडलं आहे तिच्या जाण्याने मनात…. ते कसं भरायचं आता…सांग मला." पुन्हा दोन्ही हाताने वाळू समुद्रात फेकू लागला… दमला शेवटी आणि ढसाढसा रडू लागला.

खूप वेळाने राजेश शांत झाला… मनातलं बाहेर काढलं होतं त्याने… घड्याळाकडे पाहिलं त्याने… रात्रीचे ११ वाजले होते. शेवटची ट्रेन निघायच्या आधी स्टेशनला पोहोचलं पाहिजे. राजेशच्या डोक्यात विचार आला पटकन. डोळे पुसले, रुमालाने चेहरा पुसला. कपड्यावरची वाळू झटकली आणि निघाला.… थांबला, वळला… समुद्राच्या लाटाजवळ आला… खाली वाकून समुद्राला "sorry" म्हणाला… मनातला राग काढला होता ना त्याने समुद्रावर… एकदा बघितले त्याने समुद्राकडे… तो तसाच होता, पहिल्यासारखा… राजेश निघाला घरी… शेवटची ट्रेन सुटण्या अगोदर…

बघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती. जाणार तरी कसं देयाला.… निलम विचार करत होती. त्या टपरीवरच्या "मिटिंग" नंतर एकदाही भेट नाही तिघांची, वा फोन नाही कोणाचा.…. साधा miss call सुद्धा नाही. massage तर लांबची गोष्ट. राजेशने तर बोलणं सोडलं होतं जवळपास. गप्प-गप्प असायचा. मंगेशने सुद्धा या २-३ महिन्यात निलमला फोन लावला नाही. पत्रिका तर दिलीच पाहिजे, राजेशच्या आईसमोर जायची हिम्मत नव्हती निलमकडे. राजेशसमोर तर मुळीच नाही. शेवटी न राहवून निलमने मंगेशला call लावला.

" Hi मंगेश…",

"Hi… " एवढंच बोलला मंगेश.

" कसा आहेस मंगेश ? ",

"मी ठीक आहे… ",

" आणि राज… " निलम थांबली बोलता बोलता.

" आणि कोण… राजेश… राजेश म्हणायचे आहे का तुला… " निलम काही बोलली नाही त्यावर. " राजेशचं विचारत असशील तर तुला स्पष्टच सांगतो… मला माहित नाही… ok ?? " निलमला वाईट वाटलं.

"बरं, काय काम होतं… कशाला फोन लावलास.",

"भेटायचं होतं तुला… ",

"कशाला?",

"प्लीज यार मंगेश…. एकदा भेटूया ना आपण. ",

"ठीक आहे. मी येऊ शकतो… पण राजेशचं मी काही सांगू शकत नाही, आणि मला फोर्स पण करू नकोस… " निलम गप्प झाली.

" उद्या भेटू, त्याच टपरीवर… रात्री ९ च्या दरम्यान… चालेल का… ",

"हो… हो, चालेल पण नक्की ये, वाट बघते तुझी."

बोलल्याप्रमाणे, मंगेश ९ वाजता टपरीजवळ आला.राजेश आधीच निघून गेलेला घरी. निलम आलेली तिथे.

" Hi मंगेश… " निलमने मंगेशला येताना बघताच, त्याच्या मागे कोणी आहे का ते पाहिलं. मंगेशला कळलं ते." मी एकटाच आलो आहे, त्याला सांगितलं नाही हे मी.",

"सांगायचे ना, एकदा तरी… ",

"तो आला असता, असं वाटतं का तुला." निलम खाली बघू लागली. "बरं, ते जाऊ दे, काय काम होतं ते सांग." निलमने लग्नाचे निमंत्रण हातात ठेवलं. " अरे व्वा…. very good." मंगेशने तिचं अभिनंदन केलं.

" दोन पत्रिका… मी तर एकटाच आहे." ,

"एक राजा साठी… ",

" तू दे ना मग…. माझ्याकडे कशाला… साखरपुड्याचे आमंत्रण देयाला तर आली होतीस ना घरी त्याच्या…. मग आता सुद्धा जाऊ शकतेस त्याच्याकडे आणि हो, आता तो घरी भेटेल पण तुला… ",

" प्लीज मंगेश, असा का वागतोस…",

"असंच… आणि sorry , तुला वाईट वाटलं असेल तर… ",

"आणि engagement ला का आला नाहीत दोघे." त्यावर मंगेश हसला फक्त.एवढ्या मोठ्या लोकांमध्ये आम्ही कूठे दिसणार हिला."चल bye… देतो मी पत्रिका राजाला… " मंगेश निघाला.

लग्नाचा दिवस, खूप मोठा सोहळा… केवढा मोठ्ठा हॉल… सगळी मोठी माणसं, पुरुष मंडळी सुटा-बुटात तर बायका-मुली… भरजरी साड्या आणि महागातले ड्रेसेस मध्ये, श्रीमंती तर डोळे दिपवणारी. निलम त्या लग्नाच्या साडीत, दागिन्यात राणी दिसत होती अगदी. तिचा होणारा नवरा, स्वप्निल… त्याने सुद्धा राजा सारखा पेहराव केला होता. भव्य-दिव्य लग्न अगदी… अर्थात त्या दोघांच्या परिस्तिथीला साजेशा असा. या सर्व लवाजम्यात, मंगेश एका कोपऱ्यात उभा राहून ते सर्व पाहत होता. त्याला माहित होतं, कि हा सोहळा मोठा असणार, मोठी नावाजलेली माणसं येणार म्हणून त्याने एक सूट भाड्याने घेतला होता, एका दिवसासाठी. तरीसुद्धा त्याला अवघडलेलं वाटतं होतं. सरतेशेवटी, गिफ्ट्स आणि फोटोशेसन ची वेळ आली. सगळे एका मागोमग एक असे, त्या जोडीला स्टेजवर जाऊन गिफ्ट देत होते, फोटो काढत होते. मंगेश गेला स्टेजवर… निलमला किती आनंद झाला. " अभिनंदन निलम… " मंगेशने दोघांचे आभिनंदन केलं." राजा…. राजा नाही आला. " निलमचा प्रश्न… नकारार्थी मान हलवली मंगेशने… "थांबा सर… एक फोटो… " फोटोग्राफरने मंगेशला थांबवलं. हातानेच 'नको' अशी खूण केली आणि मंगेश स्टेजवरून खाली उतरला. तसाच बाहेर निघाला. जाता जाता वळून बघितलं एकदा… सोहळा खूप छान आहे… राजा-राणीचा जोडा… तसाच पेहराव आहे अगदी दोघांचा. निलम एखादी राणीचं दिसते आहे आज… फक्त तिचा राजा वेगळा आहे… मंगेशच्या मनात विचार चमकून गेला…. आणि घरी निघाला तो.

निलम लग्न झाल्यानंतर एका आठवड्याने दुबईला गेली राहायला. आठवड्यात तिची सगळी कामं पूर्ण करून घेतली तिने. स्वतःची बदली करून घेतली तिथे. इकडच्या सामानाची आवराआवर करून घेतली. तिच्या मित्र-मैत्रीणीना, नातेवाईक… सगळ्यांना भेटून आली. आणि बरंच काही… एक-दोनदा , मंगेश,राजेश आणि त्याची आई… यांना भेटायचा विचार तिच्या मनात आला होता, पण गेली नाही.दररोज राजेशला एक call करावा असं वाटे, पण तेही जमलं नाही तिला. शेवटी त्याचा विचार करत करत निलम दुबईला गेली कायमची… आणि आपला राजा.… तो राहिला इथेच, त्याच्या आईसोबत, सोबतीला मंगेश होताच… राजा-राणीची कहाणी अपूर्ण राहिली.


त्या दिवशी, खूप पाऊस होता… मुसळधार अगदी. समोरचं काय दिसेल तर शप्पथ… निलम कशीबशी गाडी चालवत होती…. शिवाय, या रस्त्यांची तिला सवय राहिली नव्हती आता. airport वरून थेट ती घरी निघाली होती. तब्बल १५ वर्षांनी निलम पुन्हा भारतात येत होती,ऑफिसच्या कामानिमित्त. पहिली, २ दिवस दिल्लीला होती. त्यानंतर मुंबईला येत होती. इतक्या वर्षांनी तिला रस्ते कसे लक्षात असणार ना… १५ वर्षात खूप बदल होते मुंबईत. रस्ते, नवीन इमारती… खूप बदललेलं होतं, त्यात पावसाचे दिवस. त्यामुळे अजून त्रास होतं होता निलमला गाडी चालवताना. निलमचे मम्मी-पप्पा तिथेच राहत होते अजून. त्याच सोसायटी मध्ये. निलमचे काम होते मुंबईला आणि मम्मी-पप्पांना भेटण्यासाठी मुंबईला आली होती.

"काय वैताग आहे या पावसाचा… " निलम घरात येत म्हणाली.

"ये… ये…" तिच्या पप्पांनी तिचं स्वागत केलं.

"आणि काय झालं एवढं… पाऊसच तर आहे ना… " पप्पा हसत म्हणाले.

" अहो… तिथे कुठे असतो पाऊस… म्हणून तिला त्रास झाला असेल… " निलमची मम्मी म्हणाली.

" ते जाऊ दे… तू कशी आहेस… किती वर्षांनी बघते आहे तुला… " घट्ट मिठी मारली आईने तिला. निलमला बरं वाटलं…

" काय चाललंय माय-लेकीच…. मी सुद्धा आहे इथे… शिवाय ४ वर्षापूर्वी तर गेलेलो ना तिला भेटायला.… मग तेव्हा तर भेटली होतीस ना… ",

"तरी पण… ",

"ok बाबा… भेटा तुम्ही… पण तिला पहिलं फ्रेश तर होऊ दे… ",

"हा मम्मी… पहिली फ्रेश होते… खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्यासोबत…. " निलम आत गेली फ्रेश होण्यासाठी…. आणि तिची आई, तिच्या आवडीचं जेवण बनवायला किचनमध्ये गेली. थोड्यावेळाने त्यांच्या गप्पा रंगल्या, जेवणाच्या टेबलावर… मस्तपैकी जेवण झालं. झोपायची वेळ झाली. निलमला झोप येत नव्हती. ती जागीच होती. बाहेर पाऊस सुरु होता. शेवटी बाल्कनीत येऊन उभी राहिली. मम्मी शेजारी कधी येऊन उभी राहिली ते कळलचं नाही.

"काय निलम…. झोप येत नाही का…. ",

"हम्म… तशी झोप कमीच झाली आहे माझी… तिथे असताना सुद्धा उशीरच झोपते मी.… कामच चालू असते ना…. ",

"कशाला एवढं काम करायचं आणि कोणासाठी…. " निलम फक्त पावसाकडे पाहत होती.

" किती वर्षांनी बघते आहे पाऊस मी… १५ वर्ष झाली ना… " ,

"हो… तिथे गेल्यापासून असा पाऊस कधी बघितलाच नसशील ना… आता आलीस तेव्हा किती वैतागून पावसाबद्दल बोलत होतीस…. तेव्हा लग्नाआधी…. किती भिजायचीस पावसात…. ",

"नको मम्मी…. पुन्हा त्या आठवणी नको…. झोपते मी आता… तू पण जाऊन झोप आता… " निलम झटपट तिच्या बेडरूम मध्ये गेली झोपायला.

पण झोप तर आली पाहिजे ना… तशीच तळमळत होती बेडवर निलम. शेवटी उठली पुन्हा आणि खिडकीजवळ आली. पाऊस तसाच कोसळत होता. इतक्या वर्षांनी बघत होती ना ती पाऊस.…. नकळत भूतकाळात गेली ती. काय वेड्यासारखी भिजायची ना पावसात… या सोसायटीमध्ये तर फार कमी भिजली असेन,राजाच्या चाळीत तर मुद्दाम भिजायला जायची… राजाची आई, मस्त भजी बनवायच्या… त्याची चव अजून रेंगाळते जीभेवर… कधी पावसात गरमा-गरम चहा व्हायचा त्या टपरीवर, निदान २ कप तरी… किती छान ना…. पावसात भिजत भिजत चहा पीत बसायचो… आम्ही तिघेच…मी,मंगेश आणि राजेश…अचानक निलमच्या डोक्यात राजेशचा विचार आला.… राजा… कसा असेल ना तो… त्या टपरीवरची भेट शेवटची… मंगेश लग्नाला तरी आलेला, राजेशला तर त्या दिवसापासून पाहिलंचं नाही मी… किती मनात होतं त्याच्याशी बोलावं एकदातरी…हिंमत झाली नाही कधी… सांगायचं होतं मनातलं, ते सुद्धा राहून गेलं… गालावर काही पडलं तिच्या, गालावून हात फिरवला तिने… पाण्याचा थेंब… पावसाचं पाणी होतं का ते… नाही… तिच्या डोळ्यातूनच येत होतं पाणी… तेही कळलं नाही तिला… तशीच उभी राहिली पावसाकडे पाहत… आज काही झोप येणार नव्हती तिला.

निलम मुंबई ब्रांचला जाऊ लागली. त्यासाठीच तर आली होती ना ती. २ दिवस झालेले, पुन्हा कामात गुंतली निलम. उशिराच निघायची ती ऑफिसमधून. त्यादिवशी काम लवकर संपलं, खूपच लवकर…. निघाली घरी कारमधून.बाहेर मुख्य रस्त्यावर आली. जरासं ट्राफिक लागलं. गाडीतूनच आजूबाजूला पाहू लागली. अचानक तिला आठवलं, राजेश आणि मंगेशचं ऑफिस जवळच होतं ना. जाऊया का तिथे… कदाचित भेट झाली तर. निलमने गाडी तिकडे वळवली. किती वर्षांनी आली होती तिथे. अनोळखी सगळं. निलम कार मधून उतरली. काहीच ओळखीच नाही. ती पुढे आली. राजेश-मंगेशचं ऑफिस होतं, तिथे आता अर्धवट बांधकाम सुरु होतं.


मग तिथे उभ्या असलेल्या watchman ला विचारलं तिने… " ते ऑफिस….ते तर कधीच बंद झालं, ते पाडून हि नवीन इमारत बांधत आहेत.",

"मग त्या ऑफिस मधले कर्मचारी… ते कूठे गेले, माहित आहे का तुम्हाला… " त्याने नाही म्हणून मान हलवली. निलम नाखुशीने निघाली. गाडी सुरु केली. आता ट्राफिक थोडं कमी झालेलं. त्या bus stop जवळ आली. राजेशची आठवण एकदम उफाळून आली तिच्या मनात.… मुद्दाम थांबून रहायची मी… त्या दोघांची वाट बघत… मग एकत्र जायचो घरी. गप्पा मारत मारत कधी घरी पोहोचायचो, कळायचे नाही. काय दिवस होते ते. निलमला सगळं जुनं आठवत होतं. या २ दिवसात वेगळ्या रस्त्याने घरी आलेली ती. आज तिला "त्या" रस्त्याने जावसं वाटलं. त्याच जुन्या रस्त्याने कार घेऊन गेली ती. त्यावेळी कसा होता हा area… आणि आता,… एका मागोमाग एक चाळी होत्या इथे… आता तर इमारतीच दिसत आहेत. निलम हळू हळू कार चालवत होती, बाहेर बघत बघत. एका ठिकाणी गाडी थांबवली तिने. उतरली गाडीतून. छानपैकी बाग होती तिथे. निलम तिथेच घुटमळत होती. इकडेच तर ती चहाची टपरी होती ना.… एवढी वर्ष इकडेच चहा घेयाला यायची मी. तोडली वाटते ती टपरी. अडचण होत असेल ना त्या सोसायटीवाल्यांना…आपण सुद्धा सोसायटी मध्ये राहतो ना… निलम स्वतःशीच हसली. थोडावेळ थांबली अजून. आणि गाडीत बसून पुढे आली. काही मिनिटांवर चाळ होती ती, राजेश-मंगेश रहायचे ती… लांबूनच बघितलं तिने. ती चाळ मात्र तशीच होती. निलमला हायसं वाटलं. गाडीतून उतरून जाऊया असं क्षणभरासाठी तिच्या मनात आलं. पण मनातच ठेवलं तिने. गाडी start केली, गेली निघून घरी तिच्या.

पुढचे २-३ दिवस, निलमचा तोच उपक्रम.… ऑफिस मधून निघाली कि मुद्दाम त्या रस्त्याने यायची. क्षणभर का होईना… थांबायची चाळीकडे बघत… तशीच निघून जायची.आता तर मुंबईतले काम सुद्धा होतं आलेले. एकदातरी भेटायला हवे राजाला… खूप वेळा मनात आलं, तसंच राहिलं मनात. अशीच एकदा तिने गाडी थांबवली आणि चाळीकडे बघू लागली. त्याक्षणी, अचानक कोणीतरी गाडी समोर येऊन उभं राहिलं. बघते तर मंगेश,… मंगेशला सुद्धा निलमला बघून आश्चर्य वाटलं. "अरे तू… " मंगेश बोलला. तशी निलम गाडीच्या बाहेर आली.

" अरे… निलम, कशी आहेस… किती वर्षांनी बघतो आहे तुला…", मंगेश उत्साहात विचारात होता अगदी. निलमला सुद्धा आनंद झाला मंगेशला बघून.

"पण… तुला कसं कळलं, गाडीत मी आहे ते. ",

"मला कसं कळणार ते… ",

"मग गाडीच्या समोर आलास ते… ",

"ते होय… अगं, तुझी गाडी बघतो आहे, गेले ४-५ दिवस… गाडी थांबायची, कोणी बाहेर यायचे नाही, आणि ५ मिनिटांनी निघून जायची. म्हणून आज बोललो, बघू कोण आहे ते. तर तू निघालीस." मंगेश हसत हसत म्हणाला.

" अगं… मग यायचे ना वर घरी… का आली नाहीस." निलम त्यावर काही बोलली नाही. "चल… आता येतेस का…",

"न… नको, आज नको… काम आहे घरी… नंतर येईन कधीतरी." मंगेश त्यावर हसला.

" का रे हसलास… ",

"असंच…. तुला आवडत नसेल आता… चाळीत कशी येणार तू… ते जाऊदे… इकडे कशी…",

"मुंबईला काम होतं… actually, दोनच आठवडे झाले… पहिली दिल्लीला होते… आता मुंबई ब्रांचला काम होतं. म्हणून आली इंडिया मध्ये.",

"अच्च्चा… आनंद आहे… मला वाटलं,भेटायला आलीस… " निलम खोटंखोटं हसली. थोडावेळ असाच गेला. कोणीच बोललं नाही.

निलम बोलली मग, " काय चाललंय मग… ",

"माझं… मजेत चालू आहे… ",

"लग्न केलंस… ",

"हो मग… तुला mail केली होती लग्नपत्रिका… तुला भेटली का माहित नाही… नाहीतरी तू कूठे आली असतीस…" पुन्हा गप्प निलम." आणि एकटीच आलीस का इंडियात… कि मिस्टर आहेत सोबत.एकदा ये घेऊन गरीबाकडे… त्यांनी तर अशी चाळ पण बघितली नसेल ना कधी… " मंगेश हसत म्हणाला. निलम शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती.

"अरे हा… तुझी पोस्ट पण वाढली असेल ना आता. ",

"हो… manager आहे आता. " ,

" Wow !! ग्रेट यार… ".

"आणि तुमचं ऑफिस…. बंद झालं ना… " ,

"अरे व्वा !! तिथे पण जाऊन आलीस.पण इथे यायचे नाही ,अस सांगून ठेवलं आहे वाटते नवऱ्याने… "मंगेश तिला चिडवत म्हणाला.

" मंगेश प्लीज… " निलम रागात म्हणाली.

"राग आला का…. त्यांना बोललो म्हणून… राहिलं मग… मस्करी करत होतो… खूप वर्षांनी भेटलीस ना म्हणून मस्करी केली.",

"तसं नाही रे पण…. "निलम थांबली बोलता बोलता. "चल,मी निघते… घरी पोहोचायला उशीर होईल मग… " मंगेशला कळलं ते.

"sorry यार… प्लीज रागावू नकोस… खरंच मस्करी केली मी. तेवढातरी अधिकार आहे ना या मित्राला… बरं… त्यांची माफी मागतो मी… झालं का समाधान, मला फक्त विचारायचे होते कि ते पण आले आहेत का… " निलम गप्पच.

"बोलं गं… sorry बोललो ना आता… ",

"तो नाही आला… ",

"ok, ठीक आहे… कामातून वेळ मिळत नसेल, कसे आहेत ते… ",

"मला माहित नाही." मंगेश अचंबित.

"म्हणजे… ? ",

"नाही माहित… ",

"अरे… माहित नाही म्हणजे काय… ",

"आम्ही नाही राहत एकत्र…तो कूठे असतो ते मला माहित नाही.",

"काय चाललंय… निलम,काय झालं."निलम शांत. मंगेशला कळत नव्हतं काय ते.

" निलम… एक काम करू… तुला वेळ असेल तर… इकडे पुढे एक छोटंसं हॉटेल आहे. मी तिथे जातो आहे चहा घेयाला. तू पण चल… असं रस्त्य्यात नको बोलणं… " निलम तयार झाली. गाडीत बसून दोघे पोहोचले हॉटेलमध्ये.

चहाची order दिली मंगेशने. चहा आला." हा… काय झालं नक्की निलम… एकत्र का राहत नाही तुम्ही दोघे.",

"आमचा divorce झाला आहे." मंगेश उडालाच.

"काय बोलतेस तू… " निलम काही न बोलता चहा पिऊ लागली. मंगेश अजून shock मध्ये, निलम शांतपणे चहा पीत होती. मंगेश थोड्यावेळाने पुन्हा बोलला.

" मला वाटते मी काहीतरी चुकीचं ऐकल आहे , बरोबर ना निलम… ",

"नाही, जे ऐकलंसं ते खरं आहे.",

"कधी झालं हे… " ,

" लग्नाच्या second anniversary ला… मी त्याला गिफ्ट दिले divorce papers… त्याने सही केली आणि आम्ही वेगळे झालो.",

"का असं ?".

"जमलं नाही मला… ",

"काय जमलं नाही." ,

"त्याच्या सोबत राहणं जमलं नाही मला.",

"तू काय बोलते आहेस… तुला तरी कळते का… " ,

"सांगते सगळं… पहिला तो चांगला वागायचा.म्हणजे सुरुवातीला… तेव्हाचे दिवस छान होते, तो वेळेत घरी यायचा…. मोठा flat आहे दुबईला त्याचा… छान वाटायचं मोठ्ठ घर तेव्हा. वरचेवर तो दुबई दाखवायला घेऊन जायचा. कधी कधी घरी पार्टी असायची. मज्जा यायची तेव्हा. वाटायचं किती छान life झाली माझी… आता खऱ्या अर्थाने settle झाली मी, असंच वाटायचं. हे फक्त सुरुवातीला हा… नंतर त्याने खरी life काय आहे ते दाखवून दिलं. माझं मुक्त वागणं त्याला आवडायचे नाही. कोणा अनोळखी व्यक्ती बरोबर बोलणं त्याला नको असायचे. उशिरा यायचा ऑफिस मधून. कूठे बाहेर फिरायला जाऊ म्हटलं तर वैतागायचा. वर बोलली मी एकटी जाते तर बोलायचा, दुबई माहित नाही तुला अजून. चडफडत घरी थांबायला लागे. कधी कधी सुट्टीच्या दिवशीपण कामावर तो, मग एकटीच त्या घरात… TV बघून तरी किती बघणार ना… सुरुवातीला आवडणारं ते मोठ्ठ घर, खायाला उठायचे अगदी. वेडी होऊन जायचे मी… मग हा यायचा रात्री उशिरा.…. न बोलता तसाच झोपायला जायचा. नंतर नंतर तर, त्याच्या ऑफिसच्या सिनिअरने काढलेले राग माझ्यावर काढायचा.… भांडणं सुरु झाली ती अशी…. उगाचच कसलेशे वाद काढत राहायचा. रोजच्या रोज भांडणं… भांडण झालं कि हा जाऊन बसायचा त्याच्या reading room मध्ये. तिथेही काम करत बसायचा.… मी एकटी पडली होती.… रडत बसायचे मग. एकदा खूप ताप होता अंगात… मला वाटलं तेव्हा तरी थांबेल तो…बोलला,"डॉक्टर येतील, त्यांना call केला आहे मी… मी थांबू शकत नाही… महत्त्वाची मिटिंग आहे. आणि निघून गेला. ताप खूप होता म्हणून हॉस्पिटलमध्ये होते ३ दिवस…. हा माणूस… ३ दिवसात फक्त एकदा आला,मला बघायला… ते पण कशाला, तर त्याची कार बंद पडली होती आणि माझ्या कारची चावी भेटत नव्हती म्हणून…. चावी कूठे आहे ते विचारलं,डॉक्टरसोबत काही बोलला आणि निघून गेला… म्हणजे मी कोणीच नाही का याची… तेव्हा ठरवलं, बस्स झालं!! बरी होऊन घरी आली. तेव्हा याने पार्टी ठेवली होती. मला वाटलं माझ्यासाठी….तेही चुकीचं होतं. पार्टी होती एक मोठा प्रोजेक्ट भेटल्याची… तेव्हा आपण हे सगळं खोटं खोटं, बनावट जीवन जगतो आहे, याची जाणीव होऊन गेली. पार्टीत आलेल्या लोकांसमोर उगाचच खोटी smile देयाची… आपण किती सुखी आहोत ते दाखवायचं…. कशाला ते.… जीव गुदमरत होता माझा,त्या मोठ्या घरात.… मग एकदा तो लवकर आलेला घरी, वाटलं हीच वेळ आहे बोलायची… बोलून टाकलं मनातलं सगळं… तो शांत होता, आणि शांतपणेच बोलला, divorce papers घेऊन ये… मी sign करतो. सगळे divorce papers तयार होण्यास वेळ लागला आणि बरोब्बर… लग्नाच्या second anniversary ला पेपर्सवर sign झाली…. वेगळे झालो." निलमचं बोलणं संपलं.

मंगेश स्तब्ध झाला होता. आपल्याला काय वाटतं होतं आणि काय झालं हे… काय बोलावं कळत नव्हतं… शेवटी बोललाच मंगेश…

" अगं… मग आम्हाला का सांगितलं नाहीस… मित्र होतो ना… आणि एवढी वर्ष कूठे होतीस मग… ",

"तिथेच दुबईला… माझी पोस्ट वाढली होती ना, मग कंपनीने घराची व्यवस्था केली. तिथेच होती राहत मी.",

"इकडे का आली नाहीस पुन्हा… ",

"कशी येणार होती मी इथे… आणि कोणत्या तोंडाने… सगळं मागे सोडून अगदी अभिमानाने गेली होती India सोडून. सगळे परतीचे मार्ग मीच बंद केले होते ना… कोणत्या वाटेने येणार होती परत… " निलमच्या डोळ्यात पाणी आलं. ते आवरलं तिने. चहा संपवला.

" त्या टपरीवरच्या चहाची सर नाही ना या चहाला… " विषय बदलला मुद्दाम निलमने.

"हम्म… " मंगेश बोलला.

" कधी तोडली रे ती टपरी… ",

"झाली… ३ वर्ष तरी झाली असतील. त्या सोसायटीला त्यांची बाग करायची होती ना आणि टपरीमुळे त्या बागेचं "सौदर्य" झाकलं जात होतं… तोडली म्हणून.",

"आणि तुझा जॉब कसा चालू आहे… ",

"छान… तोही छान आहे… आता इकडे जवळच जॉब आहे आमचा. salary सुद्धा चांगली आहे. प्रवासाचा खर्च नाही कि दगदग नाही.…. ",

"तेव्हाचं आठवतंय… एकत्र यायचो कार मधून…." निलमला आठवण झाली आणि हसली ती.

" राजासाठी थांबायचीस ना मुद्दाम… " मंगेश… निलम काही बोलली नाही त्यावर.

" बोल आता तरी निलम… " खूप वेळाने निलमच्या तोंडातून शब्द आले.

"हो… मुद्दाम त्याच्यासाठीच यायची मी आणि थांबायची… छान वाटायचं बोलताना त्याच्याशी… कायम तो जवळ असावा असं सुद्धा वाटे मला… ",

"मग कधी बोलली नाहीस ती.",

"नाहीच बोलू शकले… माझ्या पप्पांना राजा आवडायचा पण फक्त मित्र म्हणून… त्यांच्या मनात वेगळेच विचात होते…जावयाबद्दल आणि त्यांना भेटला तसाच जावई… मी फक्त त्यांच्यासाठी लग्न केलं हे… राजा मनापासून आवडायचा मला.",

"खूप मोठी चूक केलीस निलम… ",

"हो… म्हणून तर एवढी वर्ष वनवासात होती जणूकाही… एकटीच राहायची तिथे.… पप्पा-मम्मी सांगायचे,परत ये मुंबईला… मीच नाही आले… वाटायचे, राजा समोर आला काय बोलेल… आयुष्यात बहुतेक निर्णय बरोबर घेतले मी… हा एकाच निर्णय चुकला माझा." निलम सांगत होती." एवढी वर्ष, खूप काही मीस केलं मी रे … इकडचे सण, पाऊस, या वास्तू, आपल्या भेटण्याच्या जागा आणि… ",

" आणि राजेशला… बरोबर ना… " मंगेशने तिचं वाक्य पूर्ण केलं.

" हो… आज बोलू शकते मी… राजाला खूप मीस केलं मी… " पुन्हा शांतता… मंगेश निलमकडे पाहत होता आणि निलम बाहेर कूठे तरी.

" राजा… कसा आहे रे… " निलमने विचारलं.

" राजा ना… मस्त आहे अगदी." निलम जरा हसली.

" त्या टपरीवर भेटलो होतो ते शेवटचं. लग्नात सुद्धा आला नव्हता राजा ना. माझा राग आला असेल म्हणून आला नसेल कदाचित.",

"नाही ग… राजाला कधी बघितलस का कोणावर रागावलेलं… आईंना खूप ताप होता त्यादिवशी… तरी ती सांगत होती, तू जा लग्नाला… पण राजा आईला सोडून येणार होता का… नाही ना… तेच कारण होतं, लग्नाला न येण्याचं.",

"तसाच आहे का अजून राजा… ",

"तसाच म्हणजे… स्वभाव तर तसाच आहे, जो लहानपणापासून आहे. फक्त जरासा जाडा झाला आहे बस्स.… तेव्हा कसं, तुझ्यासमोर यायचे म्हणून टापटीप असायचा. जेवणाकडे लक्ष असायचे. बाहेरचं तेलकट, तुपट खायचा नाही. फक्त तुझ्या सोबत असायचा म्हणून हे सगळं करायचा.… तू निघून गेल्यावर कशाला पाहिजे ते… शिवाय कधी आईला बरं नसलं कि बाहेरचं खाणं होयाचे ना… वेळेअवेळी जेवण… सुटला आहे जरासा… ",

"मी नव्हते, पण तू तरी होतास ना…",

" मी… मी कधीच सोडणार नाही त्याला… तशी शप्पतच घेतली आहे मी. बायकोला पण लग्न करायच्या आधी सांगून ठेवलं आहे मी.… कधी काही झालं आणि तुमच्या दोघांमध्ये जर कोणी निवड करायला सांगितली,तर मी राजेशची निवड करणार. अशी माणसं आता दुर्मिळ होत आली आहेत. माझ्यासोबत आहे एक, तेच माझं नशीब… आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला सोडणार नाही मी, हे नक्की… " निलम सगळं ऐकत होती.

" आणि राजाची family…",त्यावर मंगेश हसला.

"येऊन बघ एकदा… मोठी family आहे राजाची आता… आणि त्यात तो खूप आनंदी आहे, सुखी आहे." निलम गप्प झाली त्यावर.

बोलता बोलता रात्रीचे ९ वाजले. निघायला हवं म्हणून दोघेही बाहेर आले हॉटेलच्या.

"चल निलम… छान वाटलं बोलून, इतक्या वर्षांनी… नशीब आठवण तरी ठेवलीस आमची… ",

"हो रे… तुम्हाला कुठे विसणार होती मी…",

"बरं…. आता किती दिवस आहेस इंडिया मध्ये…",

"actually…मी आता बदली करून घेणार आहे, प्रोसेस सुरु झाली आहे, दिल्ली ब्रांचला बदली करून घेईन.",

"आणि इकडे नाही येणार का… ",

" may be नाही… पप्पा-मम्मीनी ठरवलं आहे, ते सुद्धा दिल्लीला शिफ्ट होतील. पप्पा तर retire झालेत ना…. मग तसं पण काम नाही त्याचं इथे… सगळेच तिथे राहू मग… पण अजून नक्की नाही… ",

"ठीक आहे… पण जाण्याआधी, एकदातरी…. राजेशला भेटून जा… कारण आता फक्त या २ चाळी शिल्लक आहेत… त्या पाडल्या तर कूठे जाऊ ते माहित नाही आम्हाला… बघ , जमलं तर… " म्हणत मंगेश निघून गेला. निलम तशीच उभी होती विचार करत.

पुढच्या २ दिवसात निलमचं मुंबईतलं काम संपलं. अजून २ दिवसांनी परतीचा प्रवास सुरु होणार होता तिचा. पुन्हा एकदा निलम त्या रस्त्याने आली. चाळीसमोर कार थांबवली आणि बघत बसली चाळीकडे. काय मनात आलं तिच्या. उतरली गाडीतून आणि आली चाळीत… जुने दिवस आठवले… पुढच्या महिन्यात गणपती आहेत बहुतेक… चाळीत मंडपाची तयारी चालू होती, त्यावरून तिने ओळखलं. त्या सार्वजनिक आरत्या आठवल्या तिला.… मस्त मज्जा करायचो. रात्रभर जागायचो, मग कॉलेजला lecture ला झोप यायची. निलमला हसायला आलं. राजाची आठवण झाली पुन्हा तिला. चाळीकडे मोर्चा वळवला तिने. तिसरा मजला ना… हो, तिथून ५वी खोली… असेल का राजेश घरात… ८ वाजले होते रात्रीचे… निलम पोहोचली राजेशच्या खोली जवळ.… या बाल्कनीत किती वेळा गप्पा मारत उभे असायचो आम्ही…. तासनतास गप्पा चालायच्या तिघांच्या… मंगेशचं घर शेजारी… त्या खोलीला कुलूप होतं… बाहेर गेला असेल मंगेश कदाचित… राजेशच्या खोलीचं दार बंद, पण कुलूप नाही… म्हणजे आतून बंद असेल… आत असेल कोणीतरी… राजेश may be… निलमने दरवाजा ठोठावला.

"कोण पाहिजे तुम्हाला ? ",एका लहान मुलीने दरवाजा उघडला.

"राजा… ",

"राजा… कोण राजा… ?",

"sorry, sorry…. राजेश… इकडेच राहतो ना… ",

"बाबा… बाबा पाहिजे का तुम्हाला… बाबा आला नाही अजून",

"मग कोण आहे का घरात … ",

"आज्जी आहे ना… थांबा हा जरा… " म्हणत ती मुलगी धावत आत गेली. राजाची मुलगी वाटते… छान आहे, मंगेश बोलला होता ना छान family आहे त्याची… निलम मनातल्या मनात बोलली.

" हि बघा आज्जी… "त्या लहान मुलीने राजेशच्या आईचा हात धरून बाहेर आणलं.

" कोण आहे ग बबडी… ?" राजेशची आई म्हणाली. निलमला पाहिलं आणि थक्क झाली. तोंडातून शब्दच फुटत नव्हते.

" रा… राणी ना तू… ",

हो आई… " आणि दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ तश्याच रडत होत्या दोघी. खूप वेळानंतर दोघी शांत झाल्या.

" ये … आत ये. " म्हणत राजेशच्या आईने तिला घरात आणलं.

"बस हा… पाणी आणते." आई लगबग करत गेली. निलम ती खोली बघू लागली. तशीच अगदी. काहीच फरक नाही. जशी शेवटची पाहिली होती तशीच. आई सुद्धा तश्याच आहेत, फक्त केस पांढरे झाले आहेत… आणि घरात ३ लहान मुलं… सगळी कुतूहलाने निलमकडे बघत होती.

" हे घे पाणी… " निलमने ग्लास घेतला.

आई निलमच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती, डोक्यावरून हात फिरवत होती. आनंद तर चेहऱ्यावर दिसत होता तिच्या.

" कशी आहेस ग राणी… ",

"कशी वाटते तुम्हाला?",

" अगदी आहेस तशीस आहेस, जरा बारीक झाली आहेस…जेवत नाहीस का ?", निलम हसली त्यावर.

"जेवते आई… काम जास्त असते ना म्हणून… ",

"जरा स्वतःकडे पण लक्ष देयाचे ना… ",

"हो आई… नक्की देईन. "छान वाटतं होतं निलमला… तिलाही किती आनंद झाला होता.

" मग, कधी जाणार आहेस दिल्लीला राहायला ? ",त्यावर मात्र निलम चाट पडली.

" आई !!! तू… तुम्हाला कसं माहित ?",

"मंगेश… ज्यादिवशी तुमची भेट झाली ना, त्याच रात्री मला सांगितलं सगळं त्याने. ", निलमला मंगेशचा राग आला. आईंना कळलं ते.

" मंगेश पण माझाच मुलगा आहे ना… तू मुलगीच आहेस ना माझी, त्याला खूप वाईट वाटत होतं तुझ्याबद्दल… सांगावसं वाटलं म्हणून सांगून टाकलं त्याने." ,

" आणि राजाला…. " ,

"घाबरू नकोस, त्याला माहित नाही हे आणि सांगणार सुद्धा नाही त्याला…. ", निलमला हायसं वाटलं.

" आई… मला सांगायचे नव्हते कोणाला, मंगेश विचारू लागला म्हणून सांगितलं त्याला.",

"म्हणजे तू राजेशला ओळखलं नाहीस… " ,

"त्याला वाईट वाटू नये म्हणून मी त्याच्यासमोर आली नाही कधी. " निलम ते बोलून शांत बसली.

"कसा आहे राजा… ?",

"राजा ना… बघ आता येईल थोड्यावेळात… ",

"ऑफिसला गेला आहे का ? ",

"नाही गं, पुढच्या महिन्यात गणपती आहेत ना, तो खालीच आहे मंडपाजवळ… तुला दिसला नाही वाटते तो… " ,

" नाही…. पण मला भेटायचे आहे त्याला… " तेवढ्यात राजेश दारात हजर… निलम उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. राजेशचं लक्ष तिच्यावर गेलं, तोही तिच्याकडे बघू लागला.

" बाबा !!! …. " म्हणत तिन्ही मुलं राजेशला जाऊन बिलगली तेव्हा राजेश भानावर आला.

"बाबा… खाऊ काऊ आणला… " एका मुलाने विचारलं.

" नाही रे… उद्या आणीन हा नक्की. " तशी तिन्ही मुलं जाऊन पुन्हा अभ्यासात गुंतली.

राजेश घरात आला. आईने पाणी आणून दिलं. राजेश निलमकडे पाहत नव्हता आता. पण निलम त्याच्याकडेच बघत होती अजूनही. निरखून अगदी. राजा खूप बदलला होता आता. अर्थात मंगेश बोलला तसा. त्याची हेअर स्टाईल खूप आवडायची निलमला. आता सुद्धा तशीच होती, फक्त काही पांढरे केस बऱ्यापैकी काळ्या केसांतून डोकावत होते… पहिलं एकदम क्लीन शेव असायचा, आता दाढीही पांढरी होती बहुतेक.… पहिला बारीक म्हणजे ठीकठाक होता शरीरयष्टीने… आता त्याने घातलेल्या त्या ढगळ शर्टातून वाढलेलं पोट दिसत होतं. पहिला नेहमी उत्साही असणारा राजा, आता थकलेला वाटत होता.

"कशी आहेस ?", राजेशच्या त्या प्रश्नाने निलम भानावर आली.

" हं… हा , छान आहे मी… तू कसा आहेस… ",

" मी…. कसा वाटतो तुला… " ,

" छान वाटतोस. ",

"छान… ??" राजेश हसला.

" का रे हसलास… ",

"कुठल्या angel नी मी तुला छान वाटतो…" पुन्हा हसला राजेश… हा, ते एक होतं… त्याचं हसू …. अगदी लहान गोंडस बाळासारखा हसायचा तो. ते तसंच होतं अजून. हसू आवरत राजेश बोलला.

" कधी आलीस मुंबईला",

"कालच आली आणि तुला भेटायला आली." खोटं बोलली निलम.

" अजून किती दिवस मग… आणि मिस्टर असतील ना सोबत… ",

"काम होतं ना मुंबईला, म्हणून एकटीच आली आहे, त्याला वेळ नाही ना भेटत, नाहीतर आला असता तोही. ",

"हा… काम असतील ना खूप… बरोबर मग. " निलमला वाईट वाटत होतं.आपण जास्त काही थांबू शकत नाही राजासमोर म्हणून ती उठली.

"चल मग… निघते मी, घरी काम आहे थोडं… नंतर भेटू कधीतरी… ",

"ठीक आहे." म्हणत राजेश सुद्धा उठला.

खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं आणि जोरात पावसाला सुरुवात झाली." थांब निलम… पाऊस थांबला कि जा… भिजशील उगाच… " निलम थांबली. आता, दोघे त्या बाल्कनीत उभे राहून पावसाकडे बघत होते. राजेशची आई… दोघांना आतूनच पाहत होती. किती वर्षांनी ते असे उभे होते. निलम बोलली थोड्यावेळाने.

"भिजतोस का अजून पावसात…. मी तर किती miss केलं पावसाला… "राजेशने smile दिली.

"तिथे दुबईला नसेल ना पाऊस वगैरे… तुला खरं सांगू… मला पाऊस असा आवडला नाही कधी. शाळेत असताना तर, बाहेरच पडायचो नाही मी, पाऊस सुरु झाला असेल तर…. वाटायचं, आपण विरघळून जाऊ आपण पावसात. तरी लहानपणी कूठे अक्कल असते एवढी… पण नाही आवडायचा पाऊस मला. फक्त तू भिजायला यायचीस म्हणून… तुझ्यासाठी मी भिजायचो पावसात… मला थंड सहन होत नाही ना… लगेच शिंका सुरु होतात.",

"मग कशाला भिजायचं?",

"तू असायचीस ना म्हणून… तुझं भिजून झालं कि तू घरी जायचीस. आणि मी इथे शिंका देत बसायचो." राजेश हसत म्हणाला.

" तुला थंड चालत नाही, मग…. मी ice -cream देयाचे ते… ",

"तुझ्यासाठी फक्त… नाहीतर इकडे कूठे , कोणाला सवय आहे ice-cream ची… ",

"अरे… पण आधी सांगायचे ना… ",

"कशाला… तुझ्यासाठी काहीही करायची तयारी असायची माझी तेव्हा… "निलमला काय बोलावं ते कळत नव्हतं.

पाऊस काही कमी होतं नव्हता. निलमच्या डोक्यात खूप विचार सुरु होते.विचारू का राजेशला…. नको… विचारूया…. पुन्हा नको… शेवटी विचारलं तिने.

"खूप miss केलंस का मला",राजेशने एकदा पाहिलं निलमकडे…

"खूप……. खूप म्हणजे खूप, सांगता येणार नाही एवढं… सगळीकडे तुलाच शोधात असायचो. दिवस सुरु झाला कि पहिला मोबाईल चेक करायचो… तुझा एखादा missed call , निदान massage तरी… ते नाही दिसलं तर दिवसभर वाट बघायचो तुझ्या call ची… ते घडलंच नाही कधी, तरी रोज करायचो. ऑफिस मधून निघालो कि मुद्दाम २-३ बस सोडून द्यायचो. वाटायचे…. आता तू कार घेऊन येशील… मग तिघे तश्याच गप्पा मारत घरी जाऊ… मंगेश वैतागून मग मला बळजबरीने बसमध्ये कोंबायाचा…. त्यानंतर घरी आलो कि पुंन्हा तेच… तुझ्या call ची किंवा massage ची वाट बघत बसायचो.…. एवढ्या वर्षात तसं काही घडलंच नाही." निलम शांतपणे ऐकत होती.

"त्यानंतर…. हे उत्सव,सण आणि हा पाऊस…. वाटायचं, एकदातरी येशील पावसात भिजायला…. आणि आलीस कि खालूनच आवाज देशील…. "ये राज्जा !!!!! ये भिजायला… " मला आवडायचे ते… त्या टपरीवर… आता तोडली ती… जाऊन चहा पीत बसायचो, एकटाच जायचो… तू नसलीस तरी, २ चहा सांगायचो. तू काही यायची नाहीस. थोड्यावेळाने तो थंड झालेला चहा मीच प्यायचो.…. रंगपंचमीला कशी धावत यायचीस खोलीत,रंग लावायला… आठवतेय. " निलमने होकारार्थी मान हलवली.

"एवढ्या वर्षात एकदाही बाहेर गेलो नाही मी रंगपंचमीला… आई बोलायची, जा खेळायला… मी बोलायचो, निलम येऊन घेऊन जाईल,तेव्हा जाईन मी… दिवाळीत पण… तुझा फराळ वेगळा काढून ठेवायचो मी… दरवर्षी हा, न चुकता… शेवटी तो खराब व्हायचा आणि आई टाकून द्यायची मग… म्हणजे खरंच…. सांगता येणार नाही एवढं miss केलं तुला… " निलमच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं.

"तुला आठवतंय…. आपण तिघे फिरायला जायचो ते… कित्ती मज्जा करायचो… movie बघायला जायचो… महिन्यातून एकदातरी.… मी पैसे साठवून ठेवायचो त्यासाठी. तू निघून गेल्यावरही, मी २ तिकीट काढून ठेवायचो,अर्थात गेलो नाही कधी movie ला… तू घेऊन जायचीस म्हणून मी जायचो… एकटा जाण्याची हिंमत नव्हती माझ्यात… तरी दर महिन्याच्या , एका रविवारची २ तिकीट काढून ठेवायचो. आणि वाट बघायचो तुझी. कधीच आली नाहीस तू. जास्तच आठवण झाली कि तुझा फोटो बघत बसायचो. ठरवायचो, कंटाळा येईपर्यंत बघत राहीन फोटो… कंटाळा तर कधी आलाच नाही असा… हा, पण वेडं लागलं होतं, तुझ्या फोटोबरोबर बोलायचं…. आई बोलते कि वाईट सवय पटकन लागते… कितीवेळ तुझ्या फोटोसोबत गप्पा मारायचो… आपण जसं बोलायचो ना, अगदी तसचं… ऑफिसमध्ये काय झालं दिवसभर… ते सगळं तुला सांगायचो, सगळा त्राण नाहीसा होत असे तेव्हा…. " निलमच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. पटकन पुसून टाकलं तिने,राजेशला न दाखवता.

"एवढं प्रेम करायचास माझ्यावर… सांगितलं नाहीस कधी ",

"सांगणार होतो गं… राहून गेलं ते… तू केरळला गेली होतीस ना… त्याच्या आधीच विचारायचे होते… राहून गेलं, सगळ ठरवलं होतं मी… तू नकार दिला असतास तरी त्यात आनंद मानला असता, होकार दिला असतास तर काहीतरी वेगळंच झालं असत म्हणा… किती स्वप्न पाहिली होती मी… आपली जोडी छान दिसायची ना, आई म्हणायची… राहून गेलं ते सुद्धा…" राजेश मनापासून सांगत होता.निलम बोलली,

"मग आता सुखी आहेस ना संसारात… किती छान बाळं आहेत तुझी… अरे हो…. तुझी बायको नाही दिसली… जॉबला आहे का ?", राजेश नाही म्हणाला.

"लग्न तर करायला हवं ना, बायको असायला… " ,

"means…अरे मग हि मुलं…. तुला बाबा म्हणतात ना… मला काही समजत नाही आहे. " ,

"आठवतेय तुला, मी त्या रस्त्यावरच्या मुलांना मदत करायचो ते… एकदा मंगेश बोलला कि यांना मदत करतोस ते चांगलं आहे, पण अनाथाश्रमात तर त्या मुलांना माहित पण नसते… कोण पालक आपले… तेव्हा वाटलं, त्यांचा पालक होऊ आपण… म्हणून या दोघांना घेऊन आलो. एकाच दिवशी आलेले हे दोघे, लहान बाळ होती… ",

"आणि ती लहान मुलगी… " ,

"हा…. ती मला अशीच सापडली होती,रस्त्यात… एका रस्त्याच्या कडेला कोणीतरी ठेवून दिली होती… काहींना आवडत नाही ना मुली… टाकून दिलं असेल मग, आलो घरी घेऊन मग… तिचं नावं सुद्धा 'निलम' ठेवलं आहे मी." राजेश हसला.

"अरे… लग्न का केलं नाहीस तू… ",

"तुझी माझ्या मनातली जागा कोणी कधीच घेऊ शकत नाही.…. तुझ्या जाण्याने एक,खूप मोठी जागा रिकामी झाली होती… त्यात दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करू शकलो नाही मी कधी…. मग लग्न करून एखाद्या मुलीचं आयुष्य कशाला बरबाद करायचे… तिच्यावर प्रेम करणार नसेन तर त्या लग्नाला काही अर्थ नव्हता… म्हणून केलं नाही… तसं पण माझं कुटुंब छान आहे आता… तुला कसं वाटते…" निलम काही बोलली नाही त्यावर."हा… एक बरं वाटते, तुझ्याकडे बघून… खूप छान दिसतेस… एवढी वर्ष तिथे राहून सुद्धा बदलली नाहीस तू… आठवण ठेवलीस मित्राची… छान… त्यातून एक गोष्ट, एवढं सुखी ठेवू शकलो नसतो तुला, जेवढी आता आहेस… पण मला जेवढे प्रयन्त करता आले असते तेवढे केले असते मी.… तरी आता बरं वाटते…. नाहीतर हि मुलं कूठे भेटली असती ना मला…" निलमला आता रडू येत होतं… कसबसं आवरलं तिने स्वतःला…

" अजून फोटो बघतोस का माझे… ",

"हा… कधी जास्त आठवण झाली कि… तसं हि तू नेहमी असतेस हृदयाजवळ… " राजेशने त्याच्या शर्टाच्या खिश्यातून निलमचा एक फोटो काढला… निलमने ओळखला फोटो… एकदा दोघेच फिरायला गेले होते तेव्हा राजेशनेच काढला होता तो फोटो. मस्त lamination करून ठेवला होता फोटो… आता निलम खरंच रडू लागली. राजेशला फोटो परत केला आणि त्याला घट्ट मिठी मारली.

थोडावेळ दोघे तसेच होते. निलमने त्याला मिठी मारली होती,मात्र राजेशने नाही. नंतर राजेशने स्वतःच तिची मिठी सोडवली. "असं बरं नाही गं आता… तुझं लग्न झालंय… मिस्टरांना काय वाटेल तुझ्या… " पाऊस थांबला होता…

" पाऊस थांबला आहे तो पर्यंत निघ तू… शिवाय घरी काम सुद्धा आहे ना घरी तुझं… " निलमने डोळे पुसले आणि निघाली.

" बघ… जमलं तर…. पुढच्या महिन्यात इथे सार्वजनिक गणपती आहेत… बहुतेक शेवटचा असेल यावर्षी…. माहित नाही… चाळ तोडून इमारत बांधायची आहे… try कर हा… पुढच्या महिन्यात…" निलमने होकारार्थी मान हलवली.

"चल… कार पर्यंत सोडतो तुला… " निलम आणि राजेश कारजवळ आले, निलम बसली गाडीत. निघायचा विचार नव्हता तिचा. राजेशला समजलं.

" जेवून जातेस का… ",

"नको… एक शेवटचं विचारू का… ",

"हो… विचार ना…",

"स्वतःसाठी काही केलंस का कधी…. आतापर्यंत… " राजेश उगाचच हसला.

" तुला आठवतेय का मला माहित नाही. आपण नाटक केलं होतं कॉलेजमध्ये… ",

"हो… ते कसं विसरणार…तेव्हापासून ओळख झाली आपली… म्हणून तर तुला 'राजा' बोलते मी… राजा झालेलास ना तू… ",

"हो… राजा केलेलं मला… त्यात एक dialogue होता मला… अजून आठवतो मला… "राजाला स्वतःच असं आयुष्य नसतेच.प्रत्येक वेळेस त्याला दुसऱ्यासाठीच जगावं लागते… एक राजा जातो,दुसरा येतो. फक्त नाव बदलतं… जबाबदारी तीच राहते…. त्याची प्रजा आनंदात रहावी म्हणून… "…. तसाच जगतो आहे मी. बस्स, बाकी काही नाही." तितक्यात वरून राजेशच्या "निलम" ने हाक दिली.

" बाबा… जेवायला ये. " तेव्हा राजेश निघाला.

" Thanks निलम… आठवण ठेवल्याबद्दल… पुन्हा आपली भेट होईल का ते माहित नाही… तरी माझी निलम माझ्याजवळच आहे… एक ती… आणि एक हि… " राजेशने शर्टाच्या खिशाला हात लावला. निलमने गाडी स्टार्ट केली आणि घरी निघून आली, खूप रडली.

रात्रीचे १२ वाजत होते. पुन्हा पाऊस… थोडासा रिमझिम असा, सोबतीला गार वारा… गणपतीच्या मंडपात मंडळी त्यांचे काम करत होती. राजेश घरी येऊन झोपला होता शांत… तिकडे निलम, तळमळत होती आजही… तिच्या त्या महागड्या, मऊ अश्या बेडवर तिला झोप येत नव्हती.काहीतरी टोचत होतं तिला… उठली आणि बाल्कनीत येऊन रडू लागली पुन्हा… पावसाच्या सोबतीने… इकडे राजेश, त्या थंड झालेल्या जमिनीवर शांत झोपला होता. त्याच्या वर खाली होणाऱ्या मोठ्या पोटावर त्याची चिमुकली निलम झोपली होती आणि बाजूला अजून एक मुलगा… त्यातल्या एकाला झोप येत नव्हती… तो आजीजवळ बसला होता… त्याचे नावं राजेशने " राजा" ठेवलं होतं. आजी तिचं आवडीचं गाणं ऐकत होती. "याद पिया कि आये… " सोबतीला राजेश आणि निलमचे विचार होते. राहून राहून तिला तेच वाटतं होतं, यांची जोडी जमायला पाहिजे होती. गाणं संपलं. तिला वाटलं, राजा झोपला असेल… पण तो जागाच होता.

" काय रे… झोप येत नाही का आज… ",

"नाही ना… आज्जी, एक गोष्ट सांग ना…. छान अशी…. राजा-राणीची… "छोटा राजा तिच्या मांडीवर जाऊन झोपला.

"हं… सांग आता." ,

"आठवते आहे… थांब जरा… हा आठवली. एक आटपाट नगर होते, तिथे एक राजा राहत होता… मग ",

"आज्जी… आज्जी… ",

"अरे काय… ? " ,

" प्रश्न आहे एक…",

"गोष्ट तर पूर्ण होऊ दे… ",

"नको… मला सांग आधी… शाळेत शिकवलं मला, शिवाजी महाराज… ते राजा होते ना… त्याच्यासोबतीला पण खूप राजा होते… मग, गोष्टीत असा का म्हणतात, एक राजा होता… म्हणून."आजीला त्या बाल-प्रश्नावर हसू आलं.

" सांगते हो… झोप तू… " आजीची नजर झोपलेल्या राजेशवर गेली. कसा शांत निजला होता तो.

"सांग ना आज्जी… ",

"सांगते… राजा खूप होते… खूप सम्राट होऊन गेले… खूप जणांनी राज्य केलं. पण जो मनावर राज्य करतो, आपल्या प्रजेची काळजी घेतो, तो खरा राजा… लोकांच्या मनावर राज्य करणारा खरा राजा… तसे फार कमी झाले आतापर्यंत… आणि फार कमी लोकांना तो तसा राजा बघायला भेटला." पुन्हा तिने राजेशकडे नजर टाकली. स्वतःशीच हसली. " समजलं ना आता तुला….चल, तुला आता एक वेगळीच गोष्ट सांगते… गोष्टीच नावं आहे,…. एक होता राजा… "


Rate this content
Log in