वनभोजनची गोष्ट
वनभोजनची गोष्ट


मार्गशीर्ष संपला.पौषही सुरु झाला.बोचरी थंडी सुरुच झाली होती.आता सकाळचे दाट धुके आणि कधीकधी वाढणारी थंडी असा खेळ चालूच होता.कमी कमी होत असलेली थंडी जशी जाणवू लागली तशी शाळेतील मुलाना सह शालेय आनंददायी उपक्रमांचे वेध लागले. शाळेतील क्रीडा स्पर्धाही संपल्या होत्या . थंडीच्या दिवसात सकाळी झोपेतून उठताना जशी अंगावरची उबदार शाल अथवा गोधडी हवीहवीशीच वाटते तसेच असतात हे हवेहवेसे आल्हाददायक गुलाबी दिवस पण, हे दिवस येतात तोच जातात भुर्र्कन चिमणीसारखे उडूनही.माझ्या शाळेत नेहमी परिपाठ झाला की मुलांचे कान टवकारलेलेअसायचे की गुरूजी कधी वनभोजनचा दिवस सांगतात. मुलांचा हा वार्षिक आनंदाचा सोहळा. दोन चार दिवस वाट पाहिली आणि मुलानी एक दिवस प्रार्थनेनंतर गलका सुरु केलाच."गुरूजी वनभोजन," "गुरूजी वनभोजन ". "अहो गुरूजी आमचे वनभोजन कधी जाणार? "
असा एकच धोशा पाठीमागे लावुन त्यानी मला कोणता दिवस पक्का करताय ते सांगा .असा तगादा सुरुच ठेवला. शेवटी मी माझे सहकारी,पोषण आहार शिजवणा-या नानी यांचे मत विचारात घेऊन बुधवारचाच दिवस ठरवला.त्या पूर्ण एक दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन मुलाना सांगितले आणि मी वर्गावर निघालो.
वनभोजनचा दिवस म्हणजे आनंदाचे उधाणच.दररोज सकाळी दहा वाजता येणारी मुलेही आज लवकरच आली होती. शाळेला कधीकधी दांडी मारणारी मुले तर सकाळी नऊलाच शाळेत हजर.रंगीबेरंगी पोशाख केलेली ही मुले फुलपाखरां सारखी आज सुंदर दिसत होती. सगळी मुले आपापल्या तयारीने आली होती .खेळायला लागणारे साहित्य,जेवणासाठी लागणारी भांडी-दोन मोठे टोप,लहान सहान भांडी, तांदूळ ,किराणा माल सर्वकाही मुलानी दहापूर्वीच नानीना विचारणा करुन बांधले होते. मी तिथे पोहचताच त्यानी जाण्यासाठी उड्या मारायला सुरुवात केली.त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता.मी त्याना सर्व साहित्य घेतले काय याची आठवण करुन दिली.शाळेच्या वार्ताफलकावर 'आजचे वनभोजन कार्यक्रमाचे स्थळ- श्री देव धावबा मंदिर परिसर' असे मोठ्या अक्षरात रंगीत खडूने लिहीले आणि श्री देव धावबाकी जय अशी घोषणा करत मार्गस्थ झालो.
शाळेतून निघताना सर्व मुलानी आपापल्या परीने साहित्य डोक्यावर घेतले.आपल्या साहीत्यासह त्यानी मंदिर परिसराकडे जात असताना ओढ्यातील दगड गोट्यांचे मार्गाने त्यानी जाणे पसंद केले. ओढ्यातील आटलेले पाण्याची डबकी न्याहाळत मुले मंदिर परिसरात पोहचली.आज निसर्ग हिच शाळा होती.बिनभिंतीची उघडी शाळा त्याना आज अनुभवायला मिळत होती. मंदिर परिसरातील महाकाय वृक्ष,त्यावर आढळणारी बांडगुळा सारखी परजीवी वनस्पतींची माहिती घेत मुले तेथील गार सावलीत विसावली.आपल्या जवळचे सर्व पिशव्यातील साहित्य त्यानी खाली ठेऊन हुश्श असा आवाज केला. थोडे थंडगार पाणी पिऊन त्यानी मंदिर परिसरातील स्वछ्तेला सुरुवात केली. परिसर प्लास्टीकमुक्त , पालापाचोळा गोळा करुन स्वच्छ केला. तेथे असणा-या चि-याच्या चुलीवर मुलीना घेऊन जेवण बनवायच्या तयारीला नानी लागली. मार्गशीर्ष महिन्यातील उपवास संपल्यामुळे मांसाहारीच जेवण्याचा बेत मुलांच्या आवडीने आखला होता.
मुलानी आपल्या घरातील आणलेला खाऊ जेवण तयार होई पर्यंत खाणे पसंद केले. सर्व मुलानी क्रिकेट, लगोरी असे आवडीचे खेळ सुरु केले. मुले खेळण्यात दंग झाली. खेळ संपल्यावर मुलांच्या पोटात भुकेने कावकाव सुरुच केले होते.इकडे चुलीवर तयार होणारा तांबडा रस्सा जसा उकळी येऊ लागला तसा परिसरात खमंग वास पसरू लागल्यावर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही? पोटातील भूक खवळून उठली होती.थोड्याच वेळात जेवण तयार झाले.मुलांची पंगत रांगेत बसली. मुलानी यथेच्छ मटण -भातावर ताव मारला.सर्वांच्या चेह-यावर खमंग चवीचा आनंद दिसत होता.तो होता वनभोजनातला आनंदाचा परमोच्च बिन्दू! सर्वाना सदैव आठवणीत राहणारा. सर्वानी तृप्तीचा ढेकर दिला आणि स्वयंपाक करणा-या नानींचे अभिनंदन केले.नंतर गुरूजींचीही छोटी पंगत बसली.
जेवणानंतर सर्वांची गायनाची मैफिल जमली.कराओके माईकवर गायन करताना मुलांचा उत्साह दिसून येत होता.मुले आपल्या आवडीची पारंपरिक गाणी, कविता,चित्रपटातील गाणी गाऊ लागली. तिसरीतल्या छोट्या ईशाने आपल्या गोड आवाजाने सर्वांची वाहवा मिळवली. तोपर्यंत नानीनी सर्व भांडी स्वच्छ केली होती व साहित्याची आवराआवरही. सर्वानीच परतीची वाट धरली पण पाऊले पुढे जाता जाता मन मात्र चालत होते त्या वनातील भोजनाची आठवण साठवूनच.