वात्सल्य मूर्ती आबा
वात्सल्य मूर्ती आबा
माझ्या आयुष्यातील कायापालट हा गुरूंनी दिलेले ज्ञान आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे भावी आयुष्यात , बालपणातील छोटे छोटे अनुभव ही चिरकाल स्मरणात राहतात . त्यामुळे आपल्या जीवनात किती अमुलाग्र बदल होतात तो अविस्मरणीय अनुभव मला आज तुम्हाला सांगण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते.
माझे आदरणीय सर्व गुरूंना माझी मानाची वंदना कारण त्यांच्या वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझ्या आयुष्यात अवर्णनीय असा आत्मविश्वास जागृत झाला.
माझे सर्व शिक्षक अनुक्रमे आदरणीय श्री. आबासाहेब वाघमारे सर, श्री. साठे सर, श्री. गाढे सर हे माझे सर्व आवडणारे आदरणीय गुरुजन आहेत.
सर्व शिक्षकांमध्ये मला जास्त वाघमारे सर आवडायचे. एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे माझे आदरणीय गुरू श्री . आबासाहेब वाघमारे सर यांना माझे कोटी कोटी वंदन . आबा तुम्ही असे शिल्पकार आहात ज्यामुळे अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडून गेले. तुमच्यातील मितभाषी पण, सतत हसतमुख चेहरा, मोजके पण अतिशय समर्पक विश्लेषण, तुम्ही असे शिकवायचे की ते ज्ञान चिरकाल स्मरणात राहील.
सर मला तीन वर्षात चुकून एकदाही तुम्ही कधीच रागावलेले दिसले नाहीत . कारण तुमच्या स्वभावात खूप शांतता प्रेमळपणा ,आपुलकी, जिव्हाळा आम्हाला पावलोपावली जाणवत होता. द्वेष , मत्सर, राग, हेवे दावे यांचा लवलेशही तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. हे सारे गुण आम्ही आजही आत्मसात करण्याचे प्रयत्न करतोय . कारण जीवनात आपण ज्या व्यक्तीला आदर्श समजतो त्यांच्या आवडलेल्या सर्व गोष्टी आपण आवरजुन आत्मसात कराव्याच आणि त्याप्रमाणे जीवनात अपेक्षित असा वर्तन बदल निश्चित करावा. आदर्श गुरू जीवनात लाभणे म्हणजे आनंदाचा कल्पवृक्ष मिळणे. आदर्श गुरू चे मंजुळ बोलणे म्हणजे आपल्या जीवनात प्राजक्ताचा सडा पडणे होय.
आजही मला इयत्ता आठवीचा तो वर्ग , तो सर्वात शेवटचा बाक मला आठवत आहे . ज्यावर मी सदैव बसायची . आणि आजही मला आबासाहेब वाघमारे सर यांनी आपला आहार कसा असावा,याबद्दल बोललेले एक ना एक वाक्य जशास तसे आठवत आहे. सरानी आम्हाला सांगितले की आपण जसे खातो तसेच आपण दिसतो. प्रत्येकाची खाण्याची आवड ही वेगवेगळी असते उदा. कोणाला केळी सोलून खायला आवडते कोणाला केळी सालीसकट खायला आवडते . या छोट्या दिसणाऱ्या वाक्यात किती मोठा बोध सरानी दिला . असेच सखोल ज्ञान त्यांनी सतत आम्हा सर्व विद्यार्थ्यांना दिले.
गुट्टे उद्या तुझ्या वडिलांना शाळेत घेवून ये असे जेव्हा तुम्ही मला
पहिल्यांदा म्हणाला होतात तेव्हा मला खूप खूप भीती वाटली . मनात विचार येत होते सारखे माझं काही चुकलं असेल का म्हणून सरानी पप्पाला शाळेत बोलावलं असेल मला तर खी सुचेनासे झाले . घरी आल्यावर पप्पांना तुमचा निरोप आठवणीने भीती वाटत होती तरीही दिला.
दुसऱ्या दिवशी पप्पा शाळेत आले आणि मला पण वर्गाबाहेर बोलावण्यात आले मी घाबरत घाबरत बाहेर गेले आणि खाली मान घालून उभी राहिले.
साठे सर आणि वाघमारे सर दोघेही उभे होते माझे पप्पा पण त्यांच्यासोबत बोलत उभे होते. मी तिथं आल्यानंतर सर म्हणाले , तुमची मुलगी खूप खूप हुशार आहे . खूप कुशाग्र बुद्धिमत्ता आहे तिच्यामध्ये . फक्त तिच्या तब्बेतीची काळजी घ्या आणि तिला फळ पेंड खजूर भरपूर खावू घाला . मला तर पहिल्यांदाच कळलं की मी हुशार आहे . मला थोड बर वाटलं कारण मनातील भीती गेली होती. साठे सर म्हणायचे की हे कसं शक्य आहे वंजारी समाजात एव्हडी कुशाग्र बुद्धिमत्ता कशी काय असू शकते. त्यावर तुम्ही म्हणाले होतात की , जातीचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध नसतो . बुद्धिमत्ता कोठेही असू शकते ,
हे वाक्य माझ्या आयुष्यातील
अतिशय मोठा टर्निंग पॉईंट घेवून आले ते म्हणजे माझा आत्मविश्वास या वाक्यांनी खूप वाढला..
आयुष्याला कलाटणी देणारे
आमचे आबा गुरुजी
जीवनात संकटाना न डगमगता सामोरे जायचे
अशी शिकवण देणारे
आमचे आबा गुरुजी
विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद
प्रोत्साहन देवून सुप्त गुण
विकसित करणारे
आमचे आबा गुरुजी
अवांतर वाचनाची
लेख , कविता लिखाणाची
विद्यार्थ्यांमध्ये आवड
निर्माण करणारे
आमचे आबा गुरुजी
गरीब श्रीमंत असा भेदभाव
ना करणारे
सर्वांना माणुसकीचे
धडे शिकवणारे
आमचे आबा गुरुजी
वैज्ञानिक दष्टीकोनातून
जगाकडे पहायला शिकवणारे
आमचे आबा गुरुजी
कोटी कोटी वंदन
आमच्या आबा गुरुजींना
साधारण विद्यार्थ्यांमध्ये
आत्मविश्वास निर्माण करून
एक परिपूर्ण आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
घडवणाऱ्या देवमाणूस
शिक्षकाला
आमचा मानाचा मुजरा
ज्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने आपण घडलो त्या व्यक्तीबद्दल लिहायला माझे शब्द अपुरे पडत आहे . सर परत विद्यार्थी होवून तुमच्याकडे शिकावे वाटत आहे.
