उंबरठा ओलांडताना
उंबरठा ओलांडताना


शारदा आज स्वतःला फार कौतुकाने आरशात न्याहाळत होती, अर्थात कारणही तसंच होतं. आज तिचं लग्न होतं. दिसायला तशी ती बरीच. शेतात आई-बापासह राबायची. उन्हाने रापलेल्या त्वचेची. सावळीशीच; उंचीला शोभेल अशी देहयष्टी. केस मात्र लांबसडक कमरेच्याही खाली येणारे. लहानपणापासूनच गरिबीत वाढलेली. शिक्षण तिच्यापर्यंत पोहोचणे शक्यच नव्हते. तिला चार लहान भावंडे होती. सोळाव्या वर्षातच तिचं लग्न होत होतं. आपल्यापेक्षा परिस्थितीने बऱ्या असणाऱ्या मुलाशी लग्न करायला ती चटकन तयार झाली. तो कारखान्यामध्ये काम करायचा. संसार करण्याचेच स्वप्न तिच्या उरी होते, याला अर्थातच कारणीभूत शिक्षणाचा अभाव. तिच्या आईच्या हाकेने तिची तंद्री भंगली. तिला बाहेर बोलावले होते. ती बाहेर गेली. सर्व विधी झाले. शेजारच्याच गावात तिचे सासर होते. बैलगाडीतून तिचा प्रवास सुरू झाला. सारा प्रवास गोड संसाराची स्वप्नं बघण्यात आणि नवऱ्याकडे चोरून बघण्यातच सरला. बघता बघता बैलगाडी थांबली. दोघेही जोड्याने दरवाज्यात उभे राहिले. तिची सासू आणि बऱ्याच बायका त्यांची वाट पाहत होत्या. सासूने दोघांचेही औक्षण केले. तिचा गृहप्रवेशही झाला. तिच्या संसाराची सुरुवात झाली.
बघता बघता ती घरच्यांची मनं जिंकू लागली. लग्नानंतर काहीच दिवसात तिला पहिली पाळी आली. आईने तशी कल्पना दिलेली; परंतु बोलण्यात आणि प्रत्यक्ष अनुभवण्यात फार फरक असतो. तिला प्रचंड वेदना होत होत्या. तिला पाळी आली हे समजताच तिच्या सासूने तिच्या नणंदेस तिचे कपडे बांधण्याचा आदेश दिला. कपडे बांधले जात होते. परंतु तिला काहीच समजत नव्हते. शेवटी न राहवून तिने प्रश्न केला, "कपडे का बांधत आहात? मला कुठे नेत आहात? आणि का?" यावर तिच्या नणंदेने उत्तर दिले, "तुला 'पाळी' आली आहे. आपल्याकडे बायकांना पाळी आल्यावर गावाबाहेरील रानातील झोपडीत सहा दिवसांसाठी राहाव लागतं. तुझे कपडे सोबत धान्य आणि काही भांडे देते. रानातील झोपडीपासून थोड्या दूर तलाव आहे, तिथून पाणी घेत जा. रानात प्राणीही असतात म्हणून जरा सांभाळून." हे सर्व ऐकून शारदा सुन्न झाली. तिच्या डोळ्यांत भीती दाटून आली. 'असं कसं राहायचं रानात एकटंच? ती जागा सुरक्षित असेल का?' या व यांसारख्या अनेक प्रश्नांनी तिच्या मनात कल्लोळ माजवला होता. परंतु तिला जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ती त्या झोपडीत गेली. आजूबाजूचे जंगल पाहूनच तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. जेवणाची इच्छा नसल्याने तशीच झोपली. दुसऱ्या दिवशी तलावाकडे पाणी भरायला गेली; परंतु पाणी पिण्यालायक वाटत नव्हते. अशा परिस्थितीत दर महिन्याचे सहा दिवस काढावे लागणार, या कल्पनेनेच तिचा जीव पिळवटून गेला. कसेबसे ते सहा दिवसही सरले. ती पुन्हा सासरी आली. तिचा संसार मस्त चाललेला.
बघता बघता एक वर्ष झालं. तिच्या घरी सुखाची चाहूल लागली. सारं घर आनंदून गेलं. तिला मुलगी झाली 'पहिली बेटी धन की पेटी' मानून साऱ्यांनीच तिचे स्वागत केले. तिच्या संगोपनात शारदाही हरखून गेली. लहान मुलं असतातच अशी गोड, सोबत सुख आणि समृद्धी आणणारी. दोन-तीन वर्षांतच शारदा पुन्हा एकदा आई झाली. यावेळी मुलगा झाला. तिची सासू भलतीच खूश झाली. त्याचेही घरात प्रचंड लाड होऊ लागले. वर्षांमागून वर्षे सरू लागली. शारदाची दोन्ही मुलं मोठी होऊ लागली. अचानक तिचा नवरा काम करत असलेला कारखाना बंद पडला. नियतीच्या या घाताला तोंड देणे फार कठीण होत होते, तिच्यासह तिच्या परिवारासाठी. अशातच तिच्या नवऱ्याने आई, बायको आणि मुलांसमवेत शहरात जाऊन राहायचा निर्णय घेतला. राहतं घर त्यांनी सोडलं.
शहरात येऊन इमारतीसाठी ते मजुरी करू लागले. तिने मात्र दोन्ही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. साऱ्या मजुरांसह ते बांधकामाच्या ठिकाणीच राहू लागले. नव्याने शारदाने संसाराला सुरुवात केली. तिची मुलगी मोठी होऊ लागली. दुष्ट लांडग्यांची नजर तिच्यावर पडू लागली. ती शारदाकडे तक्रार करत असे परंतु नेहमी शारदा तिला दुर्लक्ष करण्याचा सल्ला देई. तिची मुलगी पंधरा वर्षांची झाली. अचानक शाळेतून रडत रडत ती घरी आली. शारदाने कारण विचारल्यावर, "पोट आणि कंबर फार दुखत आहे" असं ती उत्तरली. त्याच दिवशी संध्याकाळी तिला 'पहिली पाळी' आली. सासूने तिला घराबाहेर राहायला सांगितले. वयात आलेल्या आपल्या मुलीला असे बाहेर ठेवणे कोणत्याही आईला पटण्यासारखे नव्हते. दुष्ट लांडगे लचके तोडण्यासाठी बसलेलेच असतात, हे ती पुरेपूर जाणून होती. शारदा तिच्या सासूला विनवण्या करू लागली. तिची सासू मात्र निर्णयावर अडून राहिली. आता मात्र शारदा पेटून उठली. ती सासूला प्रत्युत्तर देऊ लागली. आपल्या आईशी ती भांडते, हे पाहून तिच्या नवऱ्यानी तिच्यावर हात उचलला. संसारापेक्षा तिला तिच्या मुलीची इज्जत महत्त्वाची वाटली जे योग्यही होते. मुलाला आणि मुलीला तसंच घेऊन ती घराबाहेर पडली. सासू आणि नवऱ्याला न जुमानता कसेही करून मुलांना वाढवायचे, हे स्वप्न डोळ्यांत घेऊन ती चालू लागली; एक अनोळखी परंतु तेजोमय वाट...
'पाळी' म्हणजे स्त्रीचा एक महत्त्वाचा घटक आहे. सैनिक जर देशासाठी रक्त सांडत असतील; तर स्त्रीचे रक्त हे त्यांना जन्म देते. परंतु, अजूनही समाजात 'पाळी' हा शब्द उच्चारताना लाज बाळगली जाते. अजूनही कथेत सांगितल्याप्रमाणे असे प्रकार घडत आहेत. त्यांना आळा बसवणे गरजेचे आहे. 'त्या' दिवसात ती कोण कोणत्या परिस्थितीला सामोरे जाते हे तिच जाणते. असंख्य वेदनांशी ती लढत असते. अशावेळी तिला मायेची ऊब हवी असते. दोन प्रेमाचे शब्द तिच्या वेदनांना शमवायला पुरेसे असतात. तेव्हा जाणून पाहा एकदा तिलाही...