Sunil Jawale

Inspirational

4  

Sunil Jawale

Inspirational

तूच माझ्या नशिबी

तूच माझ्या नशिबी

12 mins
7.2K


' तूच माझ्या नशिबी '



मंतरलेल्या वनराईतून

गंधित वाहे वारा ,

कोकिळ गातो धुंद तराणे

छेडीत पंचम तारा ...

नवी-नवेली चैत्रपालवी

झाडांवर ये धुमारी ,

गर्द केशरी बांधून फेटा

गुलमोहर फुलला दारी ...

अंगावरती माळून काटे

आरक्त तुरे - कंगोरे ,

दीपशिखेसम उन्हात जळते

पांगा-याचे झिपरे ....

पळस फुलांनी बहरून आला

बहरल्या सावरी ,

सातिवनाची फुले गोजिरी

नाजूक गंधबावरी ...

अजुन बाई रुसून आहे

कळी- कळी पुष्करिणी ,

पाकळी पाकळी सारून हलके

उमलली कुमुदिनी....

रंग बिरंगी फूलें उमलली

तरू तरू मोहरला ,

मंद मंद मधुगंध दरवळे

दिशांत दाही भरला ...

वसुंधरेने साज फुलांचा

आपदमस्तक शृंगारिला ,

भ्रमर रुणुझुणू घालीत पिंगा

खट्याळ कुणी अलबेला...

नववधू ती लाज-लाजली

अनुरागे वनमाला ,

रंगबावरा ऋतुराज तो

पाहुनी , ' वसंत ' आला...

जान्हवी वसंत ऋतूमध्ये बहरलेल्या गुलमोहोराच्या झाडाखाली हवेवर लांबसडक रेशमी केस वाळवण्यासाठी एकटीच बसून होती. तिचे आवडते कवी डॉ. प्रकाश गोसावी यांचा काव्यसंग्रह हाती धरून झाडाच्या बुंध्यापाशी ती बसलेली होती. मऊशार हिरव्याकंच गवतावर पाय सैलावत लांब सोडून कविता वाचनात गुंग होऊन जात अगदी ब्रम्हानंदी टाळी लागून स्वतःला विसरून गेली. आजूबाजूला उभ्या असलेल्या गर्भार केळीची तरतरीत झाडे वा-यावर डोलत होती. चाफ्याच्या फुलांचा बेधुंद करणारा सुगंध दरवळत मंद वा-याच्या झुळूकीनिशी तिच्यापर्यंत धावत आल्या. सकाळचे कोवळे उन झाडांच्या पाना - फांद्यामधून झिरपत जमिनीवर नाचत होते. नुकतीच न्हाऊन गुलमोहोराला भेटायला आलेल्या जान्हवीने कमरेपर्यत येणारे ओलेते केस मोकळे करीत पसरवून खांद्यावर, पाठीवर सोडलेले होते. तिच्या गो-यापान वर्णाला खुलून दिसणारा गर्द हिरव्या रंगावर पांढऱ्या फुलाफुलांची डिझाईन असलेला टॉप व काळी लेगिन्स पेहरलेली जान्हवी कमालीची सुंदर दिसत होती. मोठाले टपोरे काळेभोर डोळे कवितेच्या ओळींवरून पुन्हा पुन्हा धावत होते. चार वेळा तरी कविता वाचून झाली तरी मन तृप्त होत नव्हते. कवी डॉ. प्रकाश यांनी आपली सारी बुध्दीसंपदा पणाला लावून वसंतातील सृष्टी सौंदर्य कवितेत साकारले होते.

नुकतीच आठवड्यापूर्वी चैत्र प्रतिपदा होऊन गेली होती. नवीन पोपटी, गुलाबी रंगाची पालवी धारण केलेले पिंपळ, गुलमोहोर व अशोक वृक्ष कोवळ्या पानांनी डवरलेले होते. वातावरणात एक मन बेधुंद करणारा सुगंध दरळवून होता. छत्रीकार व्यापून असलेल्या गुलमोहोराच्या पर्णसंभाराच्या छायेखाली मुग्ध अबोध कलिका आपल्या स्वप्नांचे महाल उभे करीत वसंताच्या चाहूलीने हरखून जात आनंदून गेली. थंडगार वा-याच्या झुळूका सरसरत येऊन तिच्या शरीराशी लगट करीत केस भुरभुरून उडवत होत्या. हृदयात हलके संगीत सुरू होत चित्तवृत्ती बहरून आल्या. अंगावर थंडगार शिरशीरी उठून मंद हवीहवीशी सणक संपूर्ण देहातून वीजेसारखी सळसळत गेली. कोमलांगीच्या कमनीय पुष्ट देहास हलकासा झटका बसून पुस्तक खाली गळून पडले. वसंतोत्सवाच्या सुंदर कल्पना मनी रूंजी घालत होत्या. मनात एक अनामिक हुरहूर दाटून येत तिने डोळे बंद करून घेतले. प्रणयातुर गुलमोहोर लाजरी बावरी जान्हवीच्या डोक्यावर लालजर्द कोवळ्या फुलांचा वर्षाव करीत आनंदाने डोलू लागला. बांधावरील तरण्या केळींची सळसळ वाढली, मोठमोठाली हिरवी पाने एकमेकांवर आदळून आवाज करीत आनंदाने प्रतिसाद देऊ लागली. दूरवरून अशोकांच्या झाडांनी सळसळत खाली झुकत नवयौवनेला सलामी दिली. आंब्यांच्या झाडांवरून कोकिळकूजन सुरू झाले. मस्तवाल उनाड वारा संचारल्यासारखे होत गिरक्या घेत दौडत आला व तिला मिठीत घेण्यासाठी तिच्याभोवती गरगरत फिरू लागला. तिचे रेशमी केस उंच उडू लागले, थंडी भरून येत कोमल काया थरथरली. आनंदाने डोळे मिटून घेतलेली जान्हवी स्वप्नलोकात पाऊल ठेवत नव्या दुनियेत सामावून जाऊ लागली.

दूर दूरवर आकाशाची निळाई ल्यायलेली पर्वत शिखरे पौर्णिमेच्या चंदेरी प्रकाशात झळाळत होती. दोन्हीही बाजूंनी उंचच्या उंच सळसळत उभी असलेली वृक्षमालिकांमधून नागमोडी धावणारा रस्ता नजरेस पडत होता. पायघड्या अंथरल्याप्रमाणे लाल - पिवळ्या रंगाच्या गुलमोहोराच्या फुलांचा सडा रस्त्यावर पसरलेला होता. लाल पिवळ्या रंगातील फुलांनी सजलेले विस्तीर्ण पट्टे पर्वताच्या पायथ्याशी जाऊन संपत होते. निळसर चंदेरी प्रकाशाने आकाश उजळून निघाले होते. आकाश दिवा लावल्याप्रमाणे चमचमता चंद्रमा धरणीवर उभी असलेल्या कामिनीकडे अनिश्चलपणे पाहत सौंदर्याचे आकंठ रसपान करीत तिला अमृतमयी किरणांची बरसात करीत भिजवू लागला.

जान्हवी गुलमोहोराची साथ सोडून मंतरलेल्या वाटेवर येऊन थांबली. स्वतःकडे नजर पडताच ती हरखून गेली. सुकुमार कोमल देहावर चमचमती चंदेरी तलम सैलसर वस्त्रे वा-याच्या जोरकस झोतांनिशी फडफडू लागली. खांद्यावरील गर्द निळ्या रंगाची रेशमी ओढणी पाठीमागे उंच उडू लागली. निसर्गाचे बदललेले आगळे वेगळे मनोहारी रूपडे बघत ती भारावल्यासारखी हलकेच पावले उचलत धीमेपणे चालू लागली. जणू स्वर्गातील परी उतरून येत पैंजणांचा छनछनाट करीत स्वप्निल वाटेवरून जात होती. चंद्रिका म्हणावी की गजगामिनी अशी स्वतःच्या मस्तीत चूर लावण्याची खाण जान्हवी गुलमोहोराची फुले अंथरलेल्या वाटेवरून हळूवार चालत येऊ लागली. दूरवरून ऐकू येणाऱ्या बासरीच्या सुरेल जादूई स्वरांनी भारलेले वातावरण तिला मोहवित होते. मधुर संगीताचे सुस्वर तिला मोहिनी घालत अनामिक स्थानाच्या दिशेने खेचून नेऊ लागले. पाठीमागून ऐकू येऊ लागलेल्या घोड्याच्या टापांचा टपटप आवाज जवळ आल्याचे जाणवून तिने मान मागे वळवून पाहिले. पांढऱ्या उंच तगड्या अश्वावर आरूढ झालेल्या घोडेस्वाराची धूसर आकृती तिच्याच रोखाने दौडत येत असल्याचे चंद्रप्रकाशात दिसू लागली. ती अत्यानंदाने मोहोरून जात जागीच थांबली. जवळ येऊन ठेपलेल्या घोडेस्वाराने घोडा तिच्या पुढे आणून लगाम ओढून धरत थांबवला. दोन्हीही टापा उंचावून घोड्याने खिंकाळत तिला सलामी दिली. डोक्यावर तुरा असलेला चमचमता मंदील, पाठीवर कमरेपर्यंत आलेले मंदीलाचे टोक हवेवर उडत होते. अंगावर भरजरी अंगरखा, घट्ट तुमान, पायात राजेशाही जोडे, कमरेला तलवार असलेल्या लाल मखमली म्यान.... जान्हवी डोळे विस्फारून घोडेस्वाराचे मर्दानी सौंदर्य न्याहाळत उभी राहिली. त्याचा तरतरीत आकर्षक चेहरा ओळखीचा वाटत होता. तो सामोरा आला चंद्रप्रकाशाचे कवडसे झाडांच्या पानांमधून सरळ येत त्याच्या चेहऱ्यावर नाचत होते.

अरेss हा तर सुमित ... माझ्या स्वप्नातील राजकुमार ! होय सुमितच नक्की .... तिने भावगंभीर मोठाले डोळे त्याच्यावर रोखून विव्हल नजरेने पाहिले. तो तिच्याभोवती घोड्यावर बसून गोल प्रदक्षिणा करीत तिच्याकडे पाहत फिरू लागला. तिने देहभान विसरून हात उंचावले. त्या घोडेस्वाराने घोडा अधिक जवळ आणून जरा खाली झुकत तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा घातला. कोमलांगी जान्हवी आपसूकच जमिनीवरून अलगद उचलली जात त्याच्या मिठीत सामावून गेली. घोडेस्वाराने घोड्याला टाच देताच घोडा उधळला व लांब झेपा घेत चौखूर धावू लागला. जान्हवी लाजलाजून चूर होत त्याच्या बलदंड देहास वेलीप्रमाणे घट्ट बिलगली. स्वप्निल वाटेवरून पांढराशुभ्र अश्व वेगाने दौडत दूर दिसत असलेल्या पर्वतरांगाच्या दिशेने दौडत जाऊ लागला. लाल पिवळ्या रंगाची गुलमोहोराची फुले टापागणिक उंच उसळून उडू लागली. 'हा स्वप्नमयी प्रवास जगाच्या अंतापर्यंत चालत राहावा... कधीच संपू नये' जान्हवी मनाशी बोलत सुकुमार राजकुमाराच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत राहिली.

अचानक चंद्र ढगाआड लपला... समोर काळोख पसरला. मंद मंद वाहणारा वारा अंगात मस्ती भरल्यासारखा उनाडपणे धावू लागला. जमिनीवरील गुलमोहोराची फुले उंच उडून भोवरा बनून येत समोर गरगरू लागली. आकाशात ढगांचे गुरगुरणे सुरू झाले, मध्येच विद्युलत्ता तडतड करीत आकाशातून झळकून गेली. निसर्गाचे तांडव सुरू झाले होते. चेहऱ्यावर धुळीचे कण ताडताड आदळू लागले. डोळ्यात धुळीचे कण गेल्याने तिने डोळे घट्ट मिटून घेतले. भरधाव धावणारा अश्व अडखळू लागला. दोन्ही पाय उंचावून दाणदिशी जमिनीवर आदळून पुढे जाण्यास नापसंती दर्शवत खिंकाळत होता. घोडेस्वार लगाम खेचून उधळलेल्या घोड्यास काबूत आणण्याचा प्रयत्न करीत एका हाताने नाजूक परीलाही सांभाळून ठेवण्याचा अथक प्रयत्न करीत होता. आकाशात बिजलीने लखलखत नागमोडी रेषांनी रांगोळी काढायला सुरूवात केली. ढगांचाही गडगडाट वाढत होता. त्यात बिजलीनेही आसमंत लख्ख झळकवून टाकत प्रचंड आवाज करीत जंगल परिसर दणाणून सोडला. जान्हवी भीतीने गारठून जात राजकुमारास अजूनच घट्ट बिलगली. तिच्या डोक्यावर हलकेच थोपटून तिला आश्वस्त करीत घोडेस्वाराने घोडा फेकला. वादळी वारे जोराने वाहू लागले. अवेळी आलेल्या पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरूवात झाली. हवाहवासा वाटणारा मृदागंध हवेवर दरवळू लागला. जोरदार वा-याचा केवढा तरी आवाज होत होता, मध्येच कडाडणा-या बिजलीच्या आवाजाने कानात दडे बसत होते.

दूरवरून घोंगावणा-या वादळी वा-याचा भयंकर आवाज ऐकू येऊ लागला. उंच आकाशात भलेमोठे राक्षसी वातचक्र गरागरा फिरत असल्याचे राजकुमाराने पाहिले. काहीच क्षणाच्या अवधीत झपाटयाने धावत येणारे वातचक्र त्यांना गाठणार जाणून राजकुमाराने घोडा थांबवला व घोड्यावरून पायउतार होत अलगद फुलाप्रमाणे जपत त्याच्या प्रियतमेला उचलून खाली ठेवले. घोड्याला लगाम काढून घेत मुक्त केले. काही वेळातच राक्षसी वातचक्राने त्यांना गाठले. राजकुमाराने प्रियतमेला छातीशी घट्ट धरून ठेवत गरगरत आलेल्या वा-याच्या भोव-याशी दोन हात करायला सरसावला. त्याच्या डोक्यावरील मंदिल उडून दूर जाऊन पडला तिची रेशमी ओढणी कधीच भोव-यासोबत गरागरा फिरत उंचावर जाऊन भिरभिरत होती. वा-याच्या जोरदार झोतांनी दोघेही मागे ढकलले जाऊ लागले. राजकुमाराची मिठी सुटून जाऊ लागली. जान्हवी वा-याच्या तडाख्याने दूर जाऊन पडली तर राजकुमारात भोव-यात अडकून पडत तिच्यापासून दूर दूर खेचला जाऊ लागला. चक्रीवादळाने अचानक दिशा बदलली व राजकुमाराला तिच्यापासून दूर घेऊन जात जंगलाच्या दिशेने मोर्चा वळवून भयंकर तुफान दिसेनासे झाले.

जान्हवी भानावर आली. पाऊस थांबला होता. राक्षसी चक्रीवादळ कैक मैल दूर निघून गेलेले होते. वा-याचा जोर कमी झालेला वाटू लागला. राजकुमार जवळपास कुठेच दिसत नसल्याने तिचे काळीज लकदिशी हलले... पोटात भीतीने गोळा उठला... थंडगार शिरशिरी देहातून सर्रदिशी उठली व हातपाय लटलटू लागले. तिने टाहो फोडण्याचा प्रयत्न केला पण जीभ जडावून शब्द आतल्या आत विरून जात राहिले. दातावर दात कटाकटा वाजू लागले. सुमितच्या नावाचा पुकारा करीत ती वेड्यासारखी धावत सुटली. डोळ्याभोवती अंधारी येत ती भोवळ येऊन जमिनीवर कोसळून पडली.

" जानू दीss अग दी.... प्लीज डोळे उघड ना... काय झाले आहे तुला... तू बोलत का नाही आहेस... बाबाss बाबाss लवकर या... बघा ना दी ला काय झालेयं ! " जान्हवीची धाकटी बहिण रुपल तिला गदागदा हलवून भानावर आणण्याचा प्रयत्न करून अक्षरशः किंचाळत होती.

जान्हवीने हलकेच डोळे उघडले, समोर धूसर आकृती बघत डोळे चोळून समोर पाहू लागली. रुपाचे शब्द कानापर्यंत येऊन परतून जात होते. वैशू भानावर येऊ लागली. रुपाच्या रडण्याचा आवाज ऐकून तिला एकदम गलबलून आले तिने रुपाला मिठीत घेतले.

" सुमित कुठेयं... माझा सुमित हरवला ग रुपा... त्या राक्षसाने ओढून नेले त्याला ! " जान्हवी हमसाहमसी रडू लागली. रुपल आश्चर्याने तिच्या असंबध्द बोलणे ऐकून दचकलीच.

"जानूss अग असे काय करतेस... सुमित आलायं आणि सोबत पुण्याची आपली दादी माँ देखील... तेवढ्याचसाठी मी बोलवायला आले... पण बाईसाहेब सुमितच्या स्वप्नात रंगून गेलेल्या आणि काय ग ही राक्षसाची काय भानगड आहे ? " रुपल तिच्या डोक्यावर हात फिरवून शांत करीत बोलत होती.

जान्हवीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.. म्हणजे ती वर्तमानात परतलेली होती त्या भयानक स्वप्नातून आणि सुमित घरात बसलेला आहे... काय पण जबरदस्त टेलिपॕथी म्हणायची ना ? तिने हातात कवितासंग्रह उचलून उभी राहत कपडे सावरले व रुपलला हाताने घट्ट धरून परसदारातून घराकडे धाव घेतली. आतमध्ये मम्मी पप्पांसोबत दादीचा संवाद चालू होता. सुमित हाताची घडी बांधून सोफ्यावर शांतपणे बसलेला होता. रुपासह जान्हवीने हॉलमध्ये प्रवेश केला.

जान्हवीला पाहताच सुमितचा चेहरा आनंदाने उजळला. त्याने तिच्याशी हसून हात मिळवला व सोफ्यावर शेजारी बसवले. रुपाही धाडकन तिच्या बाजूला येऊन बसली. दादीने डोळ्यावरचा चष्मा उतरवून जानूकडे सहेतूक पाहिले. जान्हवीला तिची करडी नजर मुळीच आवडली नव्हती. जान्हवी सुमितशी बोलत राहिली. तो केवळ भीडेखातर हो - नाही म्हणत होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पाहून जान्हवी चापापली. काहीतरी वेगळेच घडू पाहत असल्याचे तिला सिक्स्थ सेंन्सने जाणवून दिले होते. ती मुकाटयाने दादीचे बोलणे ऐकू लागली.

" तर सुनील बेटा माझा निर्णय झाला आहे. शर्वरी सुमितसाठी अगदी योग्य राहिल.... जानूलाही मी पुण्यात स्थळ बघून ठेवले आहे. अरे पीएमटीमध्ये अकाऊंटट आहे... पगार चांगला आणि जॉईन्ट फॕमिली आहे. आपली जान्हवी सहज सामावून जाईल त्यांच्यात... स्वतःचे घर आहे त्यांचे वारजेत ! शर्वरी आता डॉक्टर होत आहे तर सुमितच्या क्लिनिकमध्ये हाताशी येईल ना मदतीला ... तू काय म्हणतोस ?" दादीचे जळजळीत वाक्ये तप्त शिशाचा रस कानात ओतल्यासारखे भासत जान्हवी हादरून गेली.

" आई आता तू निर्णय घेतलाच आहे तिथे मी तरी काय बोलणार ना ? जानूची काळजी तू करू नकोस, मी हवंतर मुंबईतीलच स्थळ बघेन तिच्यासाठी !" जान्हवीचे पप्पा नाराजीने म्हणाले.

" ठीक आहे... तुम्हा दोघांचा माझ्यावर विश्वास नाहीच ना... करा हवे ते लेक तुमची आहे... मी कोण सांगणार ?"

" तसे नाही पण .... ?"

" कळतात म्हटलं हं मला... तुझा रोख कोणाकडे आहे ते... पण शरूच सुमितची बायको होणार हे सांगून ठेवते. अनिल तुझा मोठा भाऊ ना...मग शरूही तुला जानूसारखीच ना ? दोघीही त्याला मामाच्याच मुली ना ? काही नको माधवी माझ्या शब्दाबाहेर नाही.... मी सांगितले आहे तिला !" दादीने सुमितकडे नजर टाकत म्हटले.

दादीची चर्पटपंजरी चालूच होती पण काहीच कळत नव्हते. डोळ्यापुढे घराच्या भिंती गरागरा फिरत असल्यासारखे भासत जान्हवी डोके धरून बसली. डोळ्यातून कधीच गंगा जमना ओघळू लागल्या होत्या, संपूर्ण शरीर कंप पावत होते. शेवटी स्वप्न खरेच ठरत आहे म्हणायचे... दादीरूपी चक्रीवादळाने तिला पुरते कोलमडून टाकले होते. जानूने सुमितकडे अपेक्षेने पाहिले तर त्यानेही दुसरीकडे मान वळवली. जान्हवी तरातरा उठली व हाताच्या ओंजळीत चेहरा लपवून बेडच्या दिशेने धावत सुटली. सुमित तिच्याशी बोलायला बेडपर्यंत आला पण जान्हवीने बेडचे दार लावून कडी घातली होती. सुमित माघारी वळला. जान्हवी आतमध्ये रडत असणार आहे हे त्याला जाणवत होते पण.... ?

सुमित आणि दादी दुसऱ्या दिवशी पुण्याला निघून गेलेले होते. कालपासून जान्हवी त्याला टाळत दूर दूर राहत होती. तिचा चेहरा रडून रडून लाल झालेला होता. डोळे सुजलेले दिसत होते. कसातरी मनाला आवर घालून सुमितला हसून निरोप दिला होता. त्या गोष्टीला जवळजवळ पंधरा दिवस उलटून गेले होते. आज जान्हवी एकटीच तिच्या खोलीत बसून होती. आगावूपणा करणाऱ्या दादीचा भयंकर राग आलेला होता. पण जहांबाज दादीपुढे कोणाचेच काही चालणार नव्हते. शेवटी ती रिटायर्ड प्रिन्सिपाल होती पुण्याच्या कॉलेजची... अधिकार गाजवाण्याची वृत्ती तिच्या नसा नसात भिनलेली होती. जानूचे पप्पा आणि मोठेबाबा तिच्या शब्दाबाहेर जाऊच शकत नव्हते. जान्हवी विचार करू लागली दादीने शर्वरीला सुमितसाठी का निवडले असावे.... तशी तर ती होतीच जरा सावळी तरीपण गो-यापान सुंदर जान्हवीला डावलले गेले.... दादीच्या अट्टाहासापायी.... आणि सुमित ? तो तर त्याच्या आई वडिलांच्या पूर्णपणे आज्ञेत होता.... शरूचे पप्पा हॉस्पिटलसाठी फायनान्सही करणार होते म्हणून दादीने ह्या लग्नाचा घाट घातला असावा ? जान्हवीच्या मनात विचारांचे वादळ घोंगावू लागले.

चार वर्षांपूर्वीची घटना जान्हवीच्या डोळ्यापुढनं तरळून गेली. मुंबईत एका नातेवाईकाच्या घरच्या लग्नात जान्हवी आणि शर्वरी दोघीही आलेल्या होत्या. बारावीला असलेल्या ऐन तारूण्यात पाऊल ठेवलेल्या दोघींही दृष्ट लागेल अशा सुंदर दिसत होत्या. दोघीही सजून धजून लग्नाच्या हॉलमध्ये बसून होत्या. दादीने दोघींसाठी एकाच रंगाचे आणि पॕटर्नचे अनारकली ड्रेसेस आणले होते. दोघींही ड्रेसमध्ये अगदी सारख्या दिसत होत्या. दोघीही अगोदरच हॉलमध्ये आपआपल्या आयांसोबत बसून होत्या. जान्हवी व शरूची आत्या व दादीही एकाच रांगेतील चेयर्सवर त्यांच्या सोबतच बसलेल्या होत्या. सुमित हॉलच्या दारातून आत येत सर्वत्र नजर फिरवून दोघी कुठे दिसताहेत म्हणून पाहू लागला. जान्हवीला तिच्या आत्याने शरूपासून उठवून आपल्याजवळ प्रेमाने बसवून घेतले. सुमित आणि जान्हवीचा जोडा छान दिसेल अशा भावनेने ती जान्हवीमध्ये आपली सून म्हणून पाहत होती. सुमित दबक्या पावलाने चेयर्सच्या रांगामधून वाट काढत त्यांच्यापर्यंत मागे येऊन उभा राहिला. त्याने शर्वरीलाच जान्हवी समजून पाठीमागे जात तिचे डोळे झाकले. शर्वरी रागारागाने ओरडून अद्वातद्वा बोलू लागली. सलिलने डोळ्यावरून हात काढून घेतले. शर्वरीने रागाने मान मागे वळवली तर लाल चमचमती शेरवानी घातलेला सुमित उभा असलेला दिसला. आनंदाने चेकाळून उठत तिने सुमितला सर्वांदेखत मिठी मारली. सुमित तिची माफी मागून दूर पळाला तर जान्हवीला काहीच उलगडा होई ना... सुमितने असे का करावे.... कदाचित राँग नंबर लागला असावा.., शरूलाच जानू समजून त्याने गंमत केली असावी. रांगेत बसलेले सर्वजण खो खो हसून उठले. शरूने लाजून मान खाली घातली. दादी उठून तिच्याजवळ येत तिला छातीशी घट्ट धरले व सांगू लागली " आमची शरू ना सुमितचीच बायको होणार " हॉलमध्ये हास्याचे लोट उसळले व टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. माधवीआत्या आणि जान्हवी डोळे फाडून फाडून दादी वा शरूकडे आश्चर्याने पाहतच राहिल्या. तेव्हाच शर्वरी व सुमितच्या लग्नावर दादीने शिक्कामोर्तब केलेले होते. शरू आणि जानूचे बाबालोकही ह्या खुशीत सामील झाले होते. दैवाचे दान शर्वरीच्या बाजूने पडले होते. जान्हवी अचानक फोनच्या रिंगने भानावर आली. तिने सुमितचा नंबर पाहून फोन कट् केला. तिला आता कोणाशीही बोलायची इच्छा नव्हती. ती मनाने सुमितपासून खूप खूप दूर गेलेली होती.

पुन्हा पुन्हा फोन किंचाळून तिची तंद्री भंग करीत राहिला. तिने वैतागून फोन बंद करून टाकला व दोन्ही हातात डोके धरून एकटीच रडत बसली. बाहेरून बेडचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज ऐकून तिने नाईलाजास्तव उठून दरवाजा उघडला. तर दारात मम्मी - पप्पासह रुपल उभी असलेली तिने पाहिले. रुपा मोठ्याने किंचाळून तिला हाताला धरून ओढत आणून घट्ट बिलगली. सुनीलराव व सायलीच्याही डोळ्यात पाणी तरळले होते.

" ओयेss जान्यूड्डीss सुमितचा फोन का नाही घेत आहेस.... तू जिंकलीस ग ताई... सुमितशीच तुझे लग्न होणार आणि उद्यालाच मोठेबाबा आणि आई माधवी आत्या व मामांसह सुमितला घेऊन आपल्याकडे येताहेत .... नाजूकशा परीराणीला मागणी घालायला ! अब जानू और सुमित को कोई कोई भ्भी नहीं जुदाँ नही कर सकता... तेरी खडूस दादी भी नहीं !" रुपल उड्या मारून आनंदाने नाचून तिला सांगत होती. जान्हवीने ममी - पप्पांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले. तिच्या मम्मीने तिला पोटाशी धरून डोक्यावरून हात फिरवत रुपा खरेच सांगत असल्याची गोड बातमी दिली. क्षणार्धात जान्हवीच्या चेहऱ्यावरचे रडके भाव पालटून आनंदी होत ती हसू लागली.

" पण मम्मा हा चमत्कार घडला तरी कसा ग ?" जान्हवीने शंकाकुल चेहऱ्याने विचारले.

" अग ती शरू म्हणतेयं... आधी तिला गायनॕकमध्ये एमडी करायचे आणि डॉक्टर माणसाशी तर अजिबात लग्नच करायचे नाही असे ! आणि खरं कारण तर दुसरंच आहे की ती दुसऱ्याच कोणाच्या प्रेमात आहे आणि सुमित तर दुल्हा म्हणून नकोच आहे .... कळलं आता ?" जान्हवीच्या आईने खुलासा केला.

" हो पण सुमित येणार.... तेही उद्याच ? थँक्स माय डियर माधवी आत्तू.... लव्ह यू टू मच !" वैयक्तिक आनंदाने गिरक्या घेत नाचत म्हणाली. रुपाने तिला हळूच चिमटा काढत म्हटले.... चक्रीवादळ पळालेय दूर सुमितला तुझ्या पुढ्यात सोडून... जा पळाss गुलमोहोराला गुपित सांगा मॕडम !!" जान्हवी लाजेने लालीलाल होत तिचा हात झटकून परसदारी पळत आली. तिचा सखा गुलमोहोरही आसुसलेला होता तिच्याकडून गोड गुपित ऐकायला !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational