ती...
ती...
काल अचानक तिची भेट झाली.काहीतरी कामानिमित्त ती मार्केटला आली होती, मी माझ्या मोटारसायकलवरून रस्त्यावरून जात असताना अचानक ती समोरून येताना दीसली. तीला पाहुन माझा गाडी वरचा ताबा सुुुुटता सुटता राहिला, डोळ्यासमोरून झरझर झरझर दोन वर्षांपूर्वीचे दीवस तरळुन गेले. तीचे आणि माझेे एकमेकांवर खूप प्रेम होते.आम्ही दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. आमच्या नात्यात कोणी ही विष कालवू शकत नाही असे आम्हाला वाटत होते.
आमच्या नात्यात कोणीतरी विष कालवू शकतो ही कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती. पण म्हणतात ना माणूस हा नियतीच्या हातातील बाहुला असतो.नियती माणसाला पाहीजे तसे खेळवते.कधी सुखांच्या हिरवळीत नेऊन गार झुळूक बनून मुग्ध करते, तर कधी वाळवंट होऊन रणरणत्या उन्हात चालायला लाऊन जिवाची काहीली करते.परंतु या सगळ्यांपासून दूर आम्ही आमच्याच विश्वात मग्न होतो.
ती म्हणजे एक अल्लड, अवखळ, वाऱ्यासारखी होती,तीचे डोळे खुप काही सांगुन जायचे.जेव्हा मी त्या डोळ्यांत पाहायचो, एक वेगळीच चमक मला त्यात दीसायची.तीच्या मनीचे भाव जराही त्यात ती उमटु द्यायची नाही.तरीही जेव्हा ती प्रेमाने माझ्याकडे बघत असे... माझ्या रोमारोमात रोमांच उभे राहत होते.ती फारसं बोलत नसत.सगळ मीच बोलावं आणि तीने न बोलताही मी समजून घ्यावं अशी तीची अपेक्षा असायची.
पण जेव्हा ती रागवायची तेव्हा माहीत नाही कुठुन पण तीच्या सगळ्या भावना एकत्रित व्यक्त व्हायच्या. अशी 'ती' कशीही असली तरी माझं तिच्यावर नितांत प्रेम होतं, कदाचित आजही आहे. आजही तीला पाहुन माझा तोल जाऊ शकतो म्हणजेच मी तीला अजुनही विसरलो नाही.विसरेन तरी कसा? खर प्रेम केलं होतं मी तिच्यावर, अगदी जिवापाड. मग आम्ही वेगळे कसे झालो ? हा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे.
काही माणसांच्या जिवनात चांदणं नसतेच, आयुष्यभर त्यांना उन्हातच चालावं लागतं, माझंही काहीसं तसंच आहे. ज्यांच्या भरवशावर मी स्वत:ला दुनियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजत होतो त्याच लोकांमुळे मला तिच्यापासून दूर व्हाव लागलं. लोकं काय म्हणतील? समाज काय म्हणेल ? या गोष्टीचा विचार करून आम्ही दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
प्रेम 'अनैतिक'असते का हो? असु शकते का? राधेचे कृष्णावरील प्रेम अनैतिक होते का ? भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये माता गंगेला लपवने दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मस्तकात जागा देणे हे ही अनैतिकच होते का? जगाने घालून दीलेले नियम प्रेमाला जशेच्या तशे लागु होतात का ?
जाऊ द्या...एवढा विचार मी कधीच करत नाही पण आज 'ती' अचानक समोर आली आणी मनात ह्या विचारांचे काहूर माजून गेले.

