ती आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट
ती आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट
" दमले खूप आज " नेहमीच्या वाक्याची पुनरावृत्ती करत तिन दरवाजा उघडला. ती ' आरवी '. म्हणायला एका कंपनी मध्ये जॉब करणारी एक साधी सरळ मुलगी. तितकीच हळवी, निरागस, भोळी. ओठांवरती नेहमी विसावलेले एक निर्मळ हास्य, पाणीदार टपोऱ्या डोळ्यात सामावलेल मार्दव अन् हळूवार, कोमल, निष्पाप मनाची. एकटीच राहायची. भूतकाळ कधी तिला आठवायचा नव्हता ना होती भविष्याची चिंता. आज आलेला प्रत्येक क्षण भरभरून उत्साहाने जगणारा एक स्वच्छंद जीव.
तिची नित्यावली ठरलेली . आजही तिने ऑफिस मधून आल्यावर तिची आवडती कॉफी बनवली आणि बाल्कनी मध्ये जाऊन बसली. गच्चीतून कॉफी पिताना दिसणाऱ्या रहदारी मधे माणसांची मन वाचायचा तिचा नित्य छंद. हरवून जायची ती त्यांच्यात. अगदी आलिशान गाडीतून उतरून टापटीप हॉटेल मध्ये जाणारे साहेब आणि मेम असोत , त्याच हॉटेल समोर आपली छोटीशी गाडी लावून बसलेला फळवाला असो...किंवा कोपऱ्यावरती आपल्याच नादात गुणगुणणारा चहावाला आणि त्याची टपरी.....सर्वांना निरखायची. त्यांच्या मनात, त्यांच्या विचारात भटकून यायची निवांत. रात्री काय उरलेला असेल तर बॅकलॉग ..जेवण आणि मग दुसऱ्या दिवशीचा अलार्म लावून स्वप्न बघण्यासाठी उशीवर डोकं ठेवून ओढलेल पांघरूण.
दुसऱ्या दिवशी ती उठली . आज एक महत्त्वाची मीटिंग होती. नेहमीपेक्षा उठायला जरा उशीरच झाला तिला त्यामुळे गडबडीत आवरून , ब्रेकफास्ट करून तयार होतीय तोपर्यंत तिचा फोन वाजला. तिची कॅब आली होती. पटपट पायऱ्या पार करत ती आली खाली आणि निघाली.वाटेत तिन जाता जाता बॅग चेक केली. घेतलेलं सगळ तिन लॅपटॉप, फाईल्स... तरी एकदा खात्री. ऑफिस मध्ये पोहचताच बॉस समोर उभा. आल्या आल्या बॉसने कामाला जुंपले. खूप मोठी कंपनी होती. त्या कंपनीचे मालक आज स्वतः येणार होते एक मोठी ऑफर घेऊन. हिची नुसती धावपळ चाललेली. कारण त्यांच्या स्वागताची , त्यांच्या समोर होणाऱ्या प्रेझेंटेशन ची सगळी जबाबदारी हिची होती. मध्येच तिने आरशात स्वतःला न्याहाळले. विस्कटून गालावर ओघळलेले केस सरळ केले अन् हलकासा मेकअप केला चेहऱ्याला. आणि ती सुसज्ज स्वागतासाठी.
तिला खर काय माहिती आज काय होणार होत ते. आज नियतीच्या मनात काही वेगळेच होत.एक वेगळीच कलाटणी मिळणार होती तिच्या आयुष्याला. एक वेगळच वळण होत तिच्या आयुष्यात आणि त्या वळणावर तो उभा होता..... मि. वेदांत कपूर. खूप मोठी आसामी.फक्त काम करणं आणि आपला बिझिनेस वाढवणं हेच त्याचं ध्येय.खरतर दिसायला राजबिंडा तरुण ,उंच,गोरापुरा,एक वेगळीच गुर्मी असणारे रोखठोक पण टपोरे काळेभोर डोळे, वागायला अगदीच निराळा. तो आणि त्याच काम हेच त्याच विश्व ... या स्वतःच्या वलयाबाहेर तो कधीच पडला नाही.आजही कामासाठीच तो आलेला. काम संपवून लगेच निघायचं त्याच ठरलेलं.
आत आला तो कंपनी मध्ये. त्याच पाऊल मात्र पुढं सरकेना .एरवी एक वेगळीच गुर्मी असणारे डोळे अचानक मृदू झाले होते.अन् एकाच जागी खिळून राहिले होते. आरवी आली होती त्याच्या समोर वेलकम साठी. तिने ' हॅलो मि. कपूर ' म्हणत हात पुढे केला ..खर हा स्तब्ध. भानावर येत त्याने देखील हातमिळवणी केली. त्यालाच कळत नव्हतं नक्की काय होतंय ते.पहिल्यांदाच त्याच्या मनात अस काहीतरी झालं होतं.त्याच्या विश्वात कोणीतरी शिरकाव करू पाहत होत.एक मन तयार तर दुसरीकडं काहीतरी खटकत होत. ' let's focus ' त्याने मीटिंगला सुरुवात केली. इथे देखील तिचे एक एक शब्द त्याच्या मनात घर करत होते. आणि नकळत का होईना एक मनोरा रचत होता त्याच्या हृदयामध्ये....तिच्या प्रेमाचा.
मीटिंग संपली. ऑफ कोर्स त्यांच्या ऑफिस बरोबर त्यानं डील केली. आरवी ला घेतलं त्यानं सगळ सांभाळण्यासाठी कंपनीची मुख्य प्रतिनिधी म्हणून. खूप जड पावलांनी तो निघाला तिथून. गाडीतून जाताना पण हवेच्या झुळुकेत तिच सापडत होती त्याला. घरी गेल्यावर आपल्या आलिशान बिछान्यावर पडून डोळे मिटले तरी समोर परत तिच. इकडे आरवी मात्र खूष होती. लीड रोल मिळाला होता तिला आणि एवढ्या मोठ्या व्यक्ती सोबत काम करायची संधी. वेगळ्याच आनंदात घरी आली ...नेहमीच रूटीन पण रात्री मात्र तिच सुरू होणार नवीन जग याचाच विचार....त्या विचारातच गाढ झोपली.
दुसऱ्या दिवशी उठून फर्स्ट क्लास तयार झाली. एक साधा फॉर्मल शर्ट, जीन्स, खांद्यावरती रुळणारे मोकळे केस आणि हलकासा मेकअप. तो ही उत्साहात तयार झाला तिला पाहायला मिळणार म्हणून. दोघंही भेटले. परत तेच...त्याची रोखलेली नजर काही हटेना.
कामानिमित्त रोज भेटायचे दोघं. तो दरवेळी नव्यानं तिच्या प्रेमात पडायचा तिच्या. तिला खरतर काहीच जाणीव नव्हती याची. तिच्या साठी तो तिचा बॉस होता. त्या पलीकडं काहीच नाही. त्याला समजेना तिला कस सांगावं. कधी तिला कळेल याची वाट पाहत होता.
एक दिवस मात्र त्याच्यासाठी आला. नुकतच ऑफिस उघडलेल....पायऱ्या ओल्या....आत्ताच पुसलेल्या. दोघे येत होते वर आणि तिच पाऊल घसरल. पडणार म्हणून घट्ट डोळे मिटून घेतले...दोन क्षणात तिला जाणवलं आपला हात पकडला गेलाय..कोणीतरी सावरलं आहे आपल्याला. तिने हळूच डोळे किलकीले करत उघडले. तिच्या डोळ्यात त्याच्या नजरेनं प्रवेश केला.तिलाही आज जाणवलं नेहमीपेक्षा वेगळ काहीतरी .कितीतरी वेळ तसच पाहून झाल्यावर दोघंही भानावर आले.काम सुरू केलं.घरीही गेले.
तिला मात्र घरी आल्यावर रोजच्या सारखं वाटेना. कोणीतरी मनात डोकावत होते.तिला समजून नव्हतं घ्यायचं.रात्री डोळा लागता लागेना.मिटलेल्या पापण्यांमध्ये फक्त नी फक्त पायऱ्या दिसू लागल्या.पडणारी ती.... सावरणारा तो. इकडून तिकडे कूस बदलत बदलत सकाळ झाली.तयार होताना तिने दोनदा स्वतःला आरशात निरखले. स्वतःशीच हसली.कॅब ड्रायव्हर चा कॉल...हिने सामान गोळा केले आणि पोहोचली वर्क प्लेस ला.
दिवसामागून दिवस असेच जात होते.कामामध्ये हरवताना दोघे एकमेकांमध्ये गुंतत होते.त्याला भेटण्यासाठी रोज वाट पाहणारी ती आणि तो ही आतुर तिला पाहायला.फरक इतकाच की मनातल्या भावना कोणी कधीच व्यक्त केल्या नाहीत.रोजच तेच नजरेनं पाहणं, एकमेकांसाठी झुरण आणि रात्री स्वप्नांमध्ये रमून जाणं.अखेर त्यानं ठरवलं सांगायचं तिला सगळ.सगळ म्हणजे अगदी सार .कॉफी साठी त्यानं तिला तिच्या आवडत्या कॅफे मध्ये बोलावलं.छान तयार झाला.ती सुध्दा नेहमीच फॉर्मल सोडून वन पिस घालून रेडी.आणि चालले दोघे एकमेकांना भेटायला.....
पण.... सगळचं इतकं सुरळीत होईल असं कधीच नसत.एखाद्या चांगल्या प्रसंगाला ही गालबोट लागतच की. त्यांच्या प्रेमाला नजर लागली....अद्वैत ची. ' अद्वैत ' ..तिच्याच कंपनी मध्ये काम करायचा.त्यालाही ती आवडायची कधीपासून .सांगायची हिम्मत नव्हती केली कधी त्यानं.आता मात्र त्याला तीच दुसऱ्या बरोबर असणे सहन होईना. तडफडायचा तो....राग अनावर व्हायचा त्याला.आणि राग माणसांकडून काहीही करवून घेऊ शकतो.तेच झालं जे व्हायला नको होत.तो सुध्दा गेला त्या कॅफे मध्ये आणि योगायोगाने ती सुद्धा वेळेच्या आधी पोहोचली होती...त्याची वाट पाहत होती.अद्वैत आला खर. सर्वांसमोर त्यानं प्रपोज केलं तिला अनपेक्षित रित्या.आणि वेळ म्हणा की काय वेदांत ही त्याच वेळी तिथे पोहोचला.समोरच दृश्य पाहून गांगरला तो.काही सुचेना. हातातला गुलाब टाकून तो आल्या पावली मागे फिरला .ती पळाली त्याच्या मागे....त्याला हाक मारत...शेवटी निराशाच.तो खूप दूर निघून गेला होता.
सैरभैर झालेले दोघं ही.जे झालं ते कोणीच स्वीकारायला तयार नव्हतं.तिने खूप फोन केले त्याला...खूप सारे मेसेज.खर तो विखुरला गेला होता.कोणाशीच बोलायचं नव्हतं त्याला.बंदिस्त करून घेतलेलं त्यानं स्वतःला.इकडे तिचीही अवस्था तशीच.काही दिवस असेच गेले.ना फोन ...ना मेसेज....ना काम ...ना भेटणं...नुसता दुरावा. सतत येणारी आठवण तेवढी होती सोबत.
नियती पण इतकी निष्ठुर नसते कधी.ज्यान मोडलेल तोच आला आज परत जोडायला तिला त्याच्याकडे घेऊन.त्याच्या डोळ्यात पश्र्चातापाचे अश्रू होते आणि नजरेत स्वतःबद्दल वाटणारी शरम.दोघांना एकमेकांसमोर आणून सर्व काही कबूल केलं आणि तिथून तडक निघाला...कदाचित दोघांच्या आयुष्यातून ही कायमचाच.
नुसती भिडणारी नजर दोघांची. गालांवरून ओघळणारे अमाप अश्रू...प्रेमाने ओथंबून वाहणारे.एकमेकांना खुणावणारे.पुतळ्या सारखे स्तब्ध दोघं.मनाची नुसती कालवाकालव. उचंबळून येणाऱ्या प्रेमानं ओतप्रोत भरलेल्या भावना.... आता मात्र त्याच्या सहनशक्तीच्या पार गेलं सगळ...त्यानं तिला मिठीत ओढल...तिने पण मुक्त अश्रू वाहू दिले आणि झोकून दिले स्वतःला त्याच्या बाहुपाशात.बाहेर कोसळत असणारा पाऊस आणि आत ही दोघं.तो पाऊस अजूनच मुसळधार बरसू लागला...त्यांच्या नितांत प्रेमाची जणू तो ग्वाही देतोय ..आणि तो आहे बनलेला साक्षीदार..एका छोट्याश्या त्यांच्या हळुवार उलगडत जाणाऱ्या प्रेमकथेचा.........

