स्वगत
स्वगत
"हे काय चाललंय माझं?"स्वतःशीच बोलत मी माझा मोबाईल अक्षरशः फेकून दिला. सोशल मीडियाचे विष माझ्या सर्वांगात पसरले होते.
क्षणार्धातच माझे डोळे दिपतील अशा लख्ख प्रकाशाने माझी अंधारलेली खोली उजळून निघाली आणि माझ्या डोळ्यांसमोर एक चलचित्र दिसायला लागले.
अगदी सातवीमध्ये शिकणारी बालिश मुलगी मला दिसली
"सा..."
अरेच्चा! ही तर मीच! मी रियाज करीत होते.
"वैशे..." अशी हाक माझ्या कानी आली.आवाजाच्या रोखाने मी धावले.
"शिवानी!अगं ये ना." माझी मैत्रीण आली होती.
"अगं तुला माहितीये का,मला ना 'तो' दिसला.तुझ्या घरासमोरूनच गेलाय!"ती म्हणाली.
"अय्या खरंच!चल ना आपण त्याच्या घरासमोर चक्कर मारूयात."मी म्हणाले.आणि आपापल्या सायकली घेऊन आम्ही दोघी निघालो.
जोरात भूकंप व्हावा आणि घरातील भांडी पडावी अशा कर्णकर्कश् आवाजात मोबाईल वाजला आणि 'त्याचे' दर्शन न घडताच मी वास्तवात परतले.
समाधान फक्त याचेच की काही क्षणाकरिता का होईना मी स्वतःमध्ये गढले होते आणि फक्त स्वतःचीच झाले होते!