स्पर्शगंधा
स्पर्शगंधा
कृत्तिका जन्मतः स्पर्शज्ञानी होती. अगदी तान्ही होती तेंव्हादेखील कितीही जोरात भोकाड पसरलं तरी नुसते तिला उचलून घ्यायचे आणि हाताचा पाळणा करून डोलवायचे किंवा कडेवर घेऊन खांद्यावर मान टाकून थोपटायचे, की बस, तेवढ्या स्पर्शाने आवाज एकदम बंद!
कृत्तिकेच्या बाबतीत ही स्पर्शाची जादू कायम अशीच राहिली. जसजशी कृत्तिका मोठी होत गेली तसतशी ती हरस्पर्शी वेगवेगळे प्रतिसाद देऊ लागली. आणि माझ्यासाठी तो मोठा निरीक्षणाचा, अभ्यासाचा विषय होत गेला. अगदी तान्ही, म्हणजे ४/५ महिन्यांची असताना, कुठल्याही परक्या स्पर्शाला रडून, हसून, तोंड वाकडं करून प्रतिसाद द्यायची. कधीतरी अगदी भोकाड पसरून, गोंधळ घालायची. थोडीशी मोठी झाली तशी, खेळता खेळता मधूनच येऊन मिठी मारून जायची. जणू काही माझ्या स्पर्शाची खात्री करायची. मात्र कधीच कोरडी नव्हती…
कृत्तिकाचे हे स्पर्शशास्त्र काहीसे और होते, आपल्या डोळ्यांना न दिसणारे; अतर्क्य आणि अनोळखी. माझ्या जाणिवांपलीकडले. शाळेत जायला लागली तशी तिच्या शिक्षकांच्या बाबतीतही असेच काही आगळे अनुभव मला यायला लागले. घरी येऊन सांगायची ‘अगं आई, इतिहासाला नवीन सर आले आहेत इतक्या छान छान गोष्टी सांगतात आणि नं, मला मुद्दाम पहिल्या बाकावर बसवतात. अगं माझी खूप काळजी घेतात ते’. पालकसभेसाठी म्हणून मी एकदा शाळेत गेले होते. तेंव्हा कृतीच्या इतिहासाच्या सरांना जाऊन मुद्दाम भेटले. फारच विचित्र वाटले. म्हणजे कपडे अगदी शरीराला विजोड होते. चेहरा ओबडधोबड होता. बोलताना काहीतरी वेडीवाकडी तोंडं करायचे. मला वाटतं बहुतेक मुलांमध्ये ते अप्रिय असणार. पण कृतीबद्दल फार आस्थेने माझ्याशी बोलले.
आणखी मोठी व्हायला लागली तशी चांगला हात - वाईट हात, चांगला हेतू - वाईट हेतू बरोबर ओळखायची. वयात आल्यावरही मला कधीच तिला जवळ बसवून ‘जपून रहा’, ‘लोकांपासून सावध रहा’ असं समजवायला लागलं नाही. कारण कृत्तिका अगदी लहान वयापासून मला येऊन सांगायची ‘अमका काका हात लावतो तर मला राग येतो’ किंवा ‘तमका काका ना इतका छान आहे, मांडीवर बसवून खूप गोष्टी सांगतो’. ‘तुला त्या काकाचा कां ग राग येतो?’ असं विचारल्यावर म्हणायची, 'आई, त्याचा स्पर्श न छान नाही'.
कृत्तिका जसजशी मोठी होत गेली तसे मला प्रकर्षाने जाणवू लागले होते की, तिचे हे स्पर्शवेड किंवा स्पर्शजाणीव म्हणा, वयाप्रमाणे जास्तच वाढीला लागली आहे. शाळा संपून ती कॉलेजला जाऊ लागली. तिचा मैत्रिणींचा घोळका वाढू लागला. आता त्यात मित्रांचीही भर पडत होती. बरेच जण घरी येत. काही मोकळेपणी वागत, बोलत; तर काही थोडे दूर दूर असत. कृत्तिका तिच्या स्पर्शाविष्काराबद्दल मात्र माझ्याशी सतत बोलायची. तिच्या वाढत्या वयाने तिच्या स्पर्शजाणिवेत होणारे बदल मीही अभ्यासपूर्ण टिपत होते. मधूनच मला म्हणायची, ‘आई, हल्ली नं जरा गोंधळ उडतो बघ. आमच्या पिढीची सर्व मुले, म्हणजे मुली किंवा मुले, फार जास्त स्पर्शाचा वापर करतात. म्हणजे त्यात सहजता जरा जास्त असते. येता जाता टाळया देणे, पाठीवर थाप मारणे, सहज हात धरणे, नमस्काराऐवजी मिठी; अगदी सहज असतं सगळं! त्यामुळे स्पर्शातला सच्चेपणा कळत नाही, जाणवत नाही. तुमच्या पिढीचं तसं नव्हतं बघ. पटकन कोणी येऊन मिठी मारत नसे. अगदी पायाला हात लावून नमस्कार करताना देखील प्रत्यक्ष पायाचा स्पर्श करायचे नाहीत बघ.’
ही चर्चा होऊन काही दिवस लोटले असतील. तेवढ्यात मला जाणवलं की हल्ली कृत्तिका जरा शांत, अबोल, अलिप्त झाली आहे. मला त्यात काहीतरी खटकत होते. हा तिच्या वाढत्या वयाचा परिणाम म्हणत थोडे दिवस त्याकडे दुर्लक्ष केले. पण तरीही बदल दिसेना म्हणून विषय काढला. ‘काय ग काही घडलंय का? हल्ली फारशी बोलत नाहीस’ तरीही तिने पटकन उत्तर दिले नाही. मीही या वेळेस अगदी सोडायचं नाही, असं ठरवलं होतं. परत एकदा खोदून विचारलं. मनात काहीतरी धगधगत होतं. ही नेहमीची कृत्तिका नव्हती. मला दिसत होतं की तिच्या प्रतिक्रिया बदलल्या आहेत. पूर्वीसारख्या नव्ह्त्या. काही काही वेळा ती स्पर्शाने अस्वस्थ असायची. अगदी मी स्पर्श केला तरी कधीतरी नाखूष असायची, इतरांच्या स्पर्शाने तर कधीतरी स्वतःला ओढून, आक्रसून घ्यायची. तशी म्हणाली, ‘आई सांगते. पण आता, मला या क्षणी फार पेचात पकडू नकोस. एक-दोन दिवसात नक्की बोलते मी तुझ्याशी’. मग मीही तो विषय तिथेच थांबवला.
दोन दिवस उलटल्यावर अपेक्षेप्रमाणे कृत्तिका स्वतःच माझ्याशी बोलायला आली, 'आई, अग कोणाचा स्पर्शच नकोसा वाटतोय बघ. प्रामाणिकपणा हरवलेला वाटतो. स्पर्शातला विश्वास गमावल्याची भावना होतेय. असं वाटतं कोणी इतका खोटारडा असेल तर नकोच तो संवाद. या संवादातलं पावित्र्य कळत नसेल तर आपण शांत, मुकाट बसावं. काही वेळा तर स्पर्शातल्या खोटेपणाचा इतका त्रास होतो, की शरीर आक्रसून घ्यावंसं वाटतं. इतका उबग येतो की काही काही वेळा तर अगदी आपल्या माणसांचा, आपल्या परिचयाचा स्पर्श देखील नकोसा वाटतो. जोरात आक्रोश करावासा वाटतो. तेही करते कधी कधी. लोकांना मी वेडीच वाटत असेन. पण काय करू, माझा इलाज नाहीये.'
काय ही पोरीची आगळी वेगळी भाषा आणि आगळी वेगळी जाणीव. तिच्या पिढीला न साजेशी. काय आणि कसं समजावू हिला? कृत्तिकेचा प्रश्न बिकट होता. मी तिची पिढी जवळून पहात होते. मला हे सारे खटकत होतेच, पण मी तर आधीच्या पिढीची म्हणत स्वतःची समजूत काढत होते. त्यातून या पूर्वीचे माझे अंदाज, कृत्तिकेच्या अनुभवांपेक्षा फारच निराळे होते.
हा असा स्पर्शसंभ्रम डोक्यात कल्लोळ करत असतानाच नेमका कोरोना आला. साऱ्या जगाला त्याने व्यापले, अगदी ग्रासून टाकले. नक्की कशामुळे काय घडतंय हे कळायच्या आत, लोक भराभर आजारी पडू लागले. याचे विषाणू कसे पसरतात, याबद्दल अनेक कल्प-विकल्प सर्वदूर पसरू लागले. एकच निश्चित होते, हा विषाणू स्पर्शाने पसरतो. मग तोंडाला मास्क लावा. हात सतत धुवा. हस्तांदोलन करू नका. घरी रहा आणि काळजी घ्या...
आता कृती आणखीनच अस्वस्थ झाली. जणू तिच्या संवादाला कुलूप बसलं. मला म्हणाली,' हे काय चाललंय ग आई? कोणाचा स्पर्श नाही. संवाद नाही. जणू कोणी बोलतच नाही. फार म्हणजे फार अस्वस्थ वाटतं.' मलाही कळेना काय करावं. ही मुलगी आधी वेगळ्याच गोंधळात अडकली होती, आता हे नवीन अरिष्ट. आधी स्पर्शातिरेकाने गांजली होती, आता स्पर्शाभावाने पोखरली आहे. मी जमेल तेवढा प्रयत्न करत होतेच, पण एकटीने पुरे पडणे अवघड होते!
कॉलेजचे तास कॉम्पुटरवरून व्हायचे. अधून मधून मैत्रिणींसोबत झूम, स्काइप, व्हाट्सअपवर भेटी व्हायच्या, पण ते तेवढ्यापुरतंच. एरवी अभ्यासात हुशार असणारी मुलगी, अभ्यासातही रस घेइनाशी झाली. दिवस अन दिवस नुसती बसून असायची. कधी खिडकीबाहेर पहात, कधी प्राणायाम करत, तर कधी शवासनात शांत आडवी. मनातली खळबळ मी ओळखून होते. माझे जणू परीक्षेचे दिवस होते. ती मानसिक विषण्णतेत जात नाही न, यावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे होते.
एकदा जाऊन डॉक्टरना भेटून आले. त्यांनी उत्तम सूचना केल्या. नक्की कुठल्या खुणांकडे लक्ष द्यायचं ते ठोकताळे सांगितले. आणि कधीही वाटलं तर मुलीला निःसंकोचपणे घेऊन या, असं आश्वस्थ केलं.
अन योगायोग म्हणजे एके दिवशी कृत्तिकाचे शाळेतले इतिहासाचे सर अचानक बाजारात भेटले. 'काय कशी आहे आमची विद्यार्थिनी? काय करतेय अलीकडे?' कॉलेजला आहे, वगैरे सांगितले. आणि का कोण जाणे कृतीची सध्याची अवस्था त्यांना सांगावीशी वाटली. तेही थोडंसं बोलले. 'सर, घरी या की. कृतीला आनंद होईल, तुम्हाला भेटून. कदाचित तुमच्याशी बोलेल मोकळेपणाने'. 'बरं येतो हं, दोन चार दिवसात' असं म्हणाले अन त्यांच्या कामाला निघून गेले.
आणि आठवड्याभरात कृतीचे इतिहासाचे सर खरंच घरी आले की. ते आल्याने कृतीला आश्चर्य आणि आनंद झाला. सुरुवातीचा, बरेच वर्षांनी भेटल्यावरचा औपचारिक संवाद झाला. मग शाळेतल्या काही आठवणी काढल्यावर कृती खुलली. थोडेसे हास्य विनोद झाले. मी सरांना म्हंटलं, 'चहा घेऊन येते'. तेवढ्या वेळात सरांनी कृतीकडे, तिच्या एकूणच आधीच्या, सध्याच्या मनःस्थितीचा विषय काढला. आधी कृती त्यांना म्हणाली, 'आईने सांगितले ना तुम्हाला या बद्दल?' पण नंतर मात्र बोलती झाली. त्यांच्याशी मोकळेपणी बोलली. मी चहा घेऊन खोलीत गेले तर कृती रडत होती आणि सर तिची समजूत काढत होते. मी खोलीत आल्याचं कळल्यावर जराशी शांत झाली. चहा पिऊन झाल्यावर सर म्हणाले,'बरं, येतो हं मी'. मी त्यांना दारापर्यंत सोडायला गेले तर त्यांनी मला भेटीचा घडलेला आलेख चट्कन सांगितला. अन मला म्हणाले, 'उद्या तुमच्या नेहमीच्या वेळेला बाजारात भेटूया. मी सांगतो तुम्हाला काय झालंय ते'. कृतीला नक्की काय झालंय हे जाणून घेण्याची मलाही उत्सुकता होतीच!
ठरल्याप्रमाणे कृतीचे सर बाजारात भेटले. मी विषय काढल्यावर म्हणाले, 'तसं काही विशेष सिरियस झालंय असं वाटत नाहीये. पण आधी स्पर्शातल्या अती संवादाने मनात कल्लोळ माजला होता. त्याचा जणू उबग आला होता. आणि अचानक आता मात्र स्पर्शसंवादाचा अभाव. त्यामुळे पुरती गोंधळली आहे. एक गोष्ट करून पाहूया. तिला काही वेगळ्या स्पर्शाची जाणीव करून द्यायची. म्हणजे विणकाम, क्रोशे करायला शिकवा. तो मऊ मुलायम लोकर स्पर्श तिला वेगळी जाणीव देईल. ऊब देईल. किंवा पोहायला शिकवा. पाण्याचा स्पर्श तिला मोहर देईल. आणि यातलं काही आवडू लागलं तर तिला एक नवीन छंद आपोआप सापडेल. मी परत लवकरच भेटायला येईन. तिच्याशी गप्पा करीन...इतिहासातल्या गोष्टी सांगेन. पण आपण तिला नक्कीच या गोंधळावस्थेतून बाहेर काढू शकू, याची खात्री आहे मला'.
कृत्तिकाला आयुष्यात प्रथमच मी इतकं दोलायमान बघत होते. माझी अतिशय समजूतदार, शहाणी मुलगी संभ्रमावस्थेत होती. आणि नकळत मला तिच्या शारीरिक वैगुण्याची आठवण झाली, ज्याचा आतापर्यंत जवळपास विसरच पडला होता. कृत्तिका जन्मजात अंशतः दृष्टीहीन होती. तिला समोरच्या व्यक्तीची फक्त छायारेखा किंवा असं म्हणूया रूपरेखा दिसायची. चेहऱ्याचे, हावभावाचे बारकावे दिसायचे नाहीत. कृती लहान असल्यापासून अनेकदा मी तिची दृष्टी झाले होते. अगदी नकळत. तिला जाणवू न देता. पण आता मलाही थोडासा ताण आला होता. तिच्या नजरेने मी पाहूच शकले नाही तर मीच नाही का अधू ठरणार?
