गुंडू
गुंडू
गुंडू शाळेत जाऊ लागला आणि आईने निश्वास सोडला. गुंडूच्या सततच्या प्रश्नांना, शंका-कुशंकांना तोंड देता देता, आईची दमछाक व्हायची. का, कुठे, कशासाठी, केंव्हा, कधी, कशाला; एक न अनेक....सततचे प्रश्न. आता आईला एक जोडीदार मिळाली, गुंडूची टीचर. आईचा थोडासा तरी भार हलका करणारी. गुंडूच्या निदान काही प्रश्नांना उत्तरं देणारी.
गुंडूला शाळा आवडत होती. म्हणजे टीचर आवडत होत्या. मित्र मिळाले होते. आणि इतर गमती जमतीत गुंडू पटकन रमला. त्यामुळे आई पण निवांत झाली.
रोज शाळेतून आलं की दूध अन खाण्यासोबत शाळेतल्या दिवसाचा अहवाल असायचा. म्हणजे अगदी तासभर तरी टीचर, मित्र, मैत्रिणी आणि जवळ जवळ सर्व दिवसभराचे धावते समालोचन. अगदी भांडणं, मारामाऱ्या; टीचरने कोणाला कॅलेंडर मध्ये शेरा दिला, शिक्षा केली; सगळं सगळं. मग गुंडूला दामटून, आटपा आता, खेळायला जा; करून आवरावं लागायचं. या गुंडूच्या शाळा पुराणात आईने फक्त अधून मधून 'हुं हुं' करायचं. म्हणजे ऐकतेय असं दाखवायचं.
एके दिवशी गुंडू घरी आला तो जरासा नाराज दिसला. आईला वाटलं, झालं असेल शाळेत भांडण. म्हणून तिने गुंडूला विचारलं,' काय रे, आज शाळेत भांडलास का?' 'नाही ग आई', गुंडू उत्तरला, 'भांडण नाही झालं. आज काय झालं माहिती आहे का...टीचरने आज वर्गात म्हटलं, आपल्याला आज सगळ्यांना फुलाचं चित्र काढायचंय बरं का. मला तर चित्र काढायला आवडतंच, हो की नई ग आई. मला चित्राचा कागद दिल्यावर मी मस्त निळी, पिवळी, जांभळी फुलं काढली. तेवढ्यात टीचर म्हणाली,'थांबा हं, घाई करू नका. सगळ्या क्लासला कागद वाटून झाले की मगच चित्राला सुरुवात करूया'. मग सगळ्या क्लासला कागद वाटून झाल्यावर टीचरने बोर्डवर एका फुलाचं चित्र काढलं. गुलाबी फुल आणि त्याला हिरवी पानं. त्याला एक हिरवा देठ. 'आता असं चित्र काढा' म्हणाली टीचर. मग काय, मी चित्र काढलंच होतं, तर कागद उलटा केला आणि गुलाबी फुलाचं चित्र काढलं. पण आई सांगू का, मला न मी काढलेली निळी, पिवळी, जांभळी फुलंच जास्त आवडली बघ. आई, असतात की नाही ग, निळी, पिवळी, जांभळी फुलं?'. 'हो गुंडू, असतात की. सर्व रंगांची फुलं असतात बरं का', आई पुढे म्हणाली, 'असू दे हं. आता खेळायला पळा'.
पुढचे काही दिवस नेहमीसारखे मज्जेत गेले. गुंडूचा ठराविक दिनक्रम चालू राहिला. शाळेत सगळं निवांत होतं. म्हणजे निदान गुंडूच्या दृष्टीने.
तेवढ्यात एकदा मागच्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. गुंडू पुन्हा शाळेतून आला, तो खजील होऊन. 'काय रे, आज काय झालं? शाळेत काहीतरी घडलंय बहुतेक', आईने गुंडूला विचारलं. 'आई, आज आमच्या गेम्सच्या टीचर म्हणाल्या तुम्हाला लंगडी शिकवते. मला तर लंगडीचा खेळ येतो. आम्ही खाली खेळतो नं. माझी लंगडी घालायची वेळ आली तर मी नेहमीसारखी डाव्या पायाने लंगडी घातली. टीचर म्हणाली, उजव्या पायाने घाल. आई, मी नेहमी डाव्या पायानेच लंगडी घालतो. उजव्याने मला लंगडी येतच नाही. मी कशी घालणार, सांग ना? अग, सगळ्यांना टीचर उजव्या पायाने लंगडी घाला असंच सांगत होती. माहिती आहे का, विश्वास डाव्या हाताने लिहितो आणि जेवतो पण. तर त्याला पण टीचर म्हणाली, उजव्या पायाने लंगडी घाल. आई, डाव्या पायाने लंगडी घालतात न?' गुंडूने विचारले. 'हो, गुंडू. अरे मी पण डाव्या पायानेच लंगडी घालते. अरे तुला डाव्या पायानेच नीट घालता येत असेल तर तशीच घाल बरं का.... काही काळजी करू नकोस. खूप लोक डाव्या पायाने लंगडी घालतात', आईने गुंडूची समजूत काढली. गुंडू खाणं आटोपून खेळायला पळाला.
आईला मात्र जरा काळजी वाटू लागली. म्हणजे शाळेत जाऊन बोलायला हवंय का, अशी चिंता वाटली. ठरवलंच. दोन दिवस वाट पहावी आणि शाळेत जाऊन गुंडूच्या टीचरशी बोलावं. तर त्या आठवड्यात नेमक्या सुट्ट्याच सुट्ट्या. गुंडूची शाळा दोन दिवस बंद होती. आणि घडलं असं की, शुक्रवारी गुंडूचे बाबा एक बातमी घेऊन घरी आले. त्यांची बदली झाली होती. सगळ्यांना हे शहर सोडून, थोड्या छोट्या गावात जावं लागणार होतं. मग आईने गुंडूच्या शाळेत जायचा बेत रद्द केला. आता गुंडूची शाळाच बदलणार होती, तर मग..... गुंडूला बदलीची बातमी सांगितली. त्याच्या प्रश्न मंजुषेला आता नवीन विषय मिळाला. शाळा कशी असेल, मित्र/मैत्रिणी आवडतील का, घरा भोवती खेळायला जागा असेल का....एवढ्याश्या डोक्यात आता नवीन प्रश्नांची गर्दी....
आता या महिना अखेर बांधाबांध करून निघायचं होतं. गुंडूच्या बाबांना १ तारखेपासून नवीन ऑफिसात रुजू व्हायचं होतं. त्यामुळे आईला भरपूर काम होतं. गुंडूला प्रश्नांपासून थोडं परावृत्त करायला म्हणून त्यालाही बारीक-सारीक कामात गुंतवलं. मुलांचं एक छान असतं. जे हाती येईल, त्यात रमून जायचं. गुंडूने त्याची खेळणी, गोष्टींची पुस्तकं, त्याचे जास्तीचे कपडे; अगदी व्यवस्थित नेमून दिलेल्या खोक्यांमध्ये भरले. नीट मांडून. लहान-मोठे वर्गीकरण करून. आईला हा असा गुंडू, व्यवस्थित नेमलेलं काम करणारा, जरासा अपरिचित होता! सगळी आवराआवर इतकी मन लावून केली की त्याच्या व्यवस्थितपणाकडे पाहून आईला वाटलं यातून मीच खूप काही शिकले.
नवीन घरात, नवीन गावात सगळे दाखल झाले. घर छान होतं. गुंडूला खेळायला पुढचं-मागचं आंगण होतं. गुंडूचे डोळे घर बघून चमकले होते. मोकळं आवार, भरपूर जमीन आणि मनसोक्त आकाश. नंतरचे चार-सहा दिवस गुंडू नुसता घरात हुंदडत होता. शेजार-पाजार आठवड्याभराने आठवला. मित्र मिळाले. थोडीशी लहान पण एक गोड मैत्रीण मिळाली.
आता आईचं काम शाळा शोधणं होतं. हल्लीच्या प्रघातानुसार महागडी पब्लिक स्कूल की राज्य सरकारी शाळा, अशी दुविधा. आई सरकारी शाळा बघून आली. छान होती. टुमदार. दोन-तीन शिक्षकांना भेटली. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक चांगले वाटले. मग गुंडूच्या बाबांशी बोलून, तीच शाळा ठरवली.
शाळेचे सत्र उघडल्यावर पहिल्या दिवशी गुंडूला घेऊन आई शाळेत गेली. गुंडूतर प्रथम दर्शनी शाळेच्या प्रेमात पडला. मोठं खेळाचं मैदान. त्याला एका बाजूला बास्केटबॉलचं कोर्ट. छोटी बैठी इमारत. आणि स्वागताला अगदी हसतमुख टीचर. अपेक्षेप्रमाणे गुंडू शाळेत चटकन रुळला. वर्गात अवघी तीस मुलं. त्यामुळे टीचर सगळ्यांकडे जातीने लक्ष घालत होती.
आणि मग गुंडूचा दिनक्रम नियमित झाला. म्हणजे रोज शाळेतून आलं की दूध अन खाण्यासोबत शाळेतल्या दिवसाचा अहवाल. अगदी तासभर तरी टीचर, मित्र, मैत्रिणी आणि जवळ जवळ सर्व दिवसभराचे धावते समालोचन. अगदी भांडणं, मारामाऱ्या; टीचरने कोणाला कॅलेंडर मध्ये शेरा दिला, शिक्षा केली; सगळं सगळं पूर्ववत. आईही मग निवांत झाली. सगळेच नवीन जागेशी, परिसराशी, शेजाऱ्यांशी; जुळवाजुळव करत होते.
एके दिवशी गुंडू घरी आला तो जरासा नाराज दिसला. नाराज म्हणण्यापेक्षा, चिंतातूर. आईने विचारले,'काय झालं रे, गुंडू? टीचर ओरडली का?' 'नाही ग आई. या शाळेत टीचर मारत नाहीत आणि फारश्या ओरडतही नाहीत. आज काय झालं माहिती आहे का...टीचरने आज वर्गात म्हटलं, आपल्याला आज सगळ्यांना फुलाचं चित्र काढायचंय बरं का. चित्र काढायला कागद वाटले. मी वर्गातल्या सगळ्यांना कागद वाटेपर्यंत थांबलो. वाट बघितली, टीचर बोर्डवरती चित्र केंव्हा काढते याची. पण अग, टीचरने बोर्ड वर चित्र काढलंच नाही बघ. मी बसून आहे असं पाहून टीचर माझ्या बेन्चपाशी आली. टीचरने मला मी चित्र का काढत नाहीये, असं विचारलं. तुला चित्र काढायला आवडत नाही का, म्हणून विचारलं. मग मी टीचरला म्हणालो, तुम्ही बोर्डवर चित्र काढायची वाट पाहात होतो. टीचर म्हणाली नाही रे बाळ, आपल्या मनाने ज्या रंगांची फुलं आवडतात ती काढ. मग ना; मी एक गुलाबी फूल, त्याला हिरवी पानं आणि हिरवा देठ असं चित्र काढलं'
आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं....
(हेलेन बकली यांच्या द लिटील बॉय या कवितेवरून स्फुरलेली कथा)
