सोलमेट
सोलमेट
"एक्सक्युज मी! ही माझी सिट आहे", वैदेही जरा रागातच म्हणाली. " ओह! सो सॉरी".... खाली मोबाईल मध्ये पाहत बसलेला वरूण तिच्याकडे पाहून म्हणाला. त्याच्याकडे पाहताच त्या दोघांची नजरानजर झाली. दिसायला हँडसम असणारा एक तरुण तिच्या सीटवर बसलेला होता. त्याला पाहताच तिचा राग कुठल्याकुठे निवळला. त्याने एखाद्या सभ्य माणसाप्रमाणे लगेच उठून तिला सिट दिली. वैदेहीला नेहमी खिडकी शेजारची सीट हवी असायची म्हणून आज देखील नेहमीप्रमाणेच खिडकी शेजारील सीट बुक केली होती. वैदेही २२-२३ वयाची एक एम कॉम मध्ये पदवी घेतलेली मुलगी तिच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये त्यांना मदत करत असे. ती तिच्या कुटुंबासमवेत आजीकडे काही दिवसांपूर्वी गेली होती. काही कारणास्तव तिला तिथं जास्त काळ राहावं लागलं. तिचं कुटुंब आधीच पुण्याला पोहोचले होते आणि आज ती एकटी पहिल्यांदाच कोल्हापूर ते पुणे असा दूरचा प्रवास करत होती. दिसायला खास नाही पण निटनेटकी राहणारी, बोलके डोळे आणि आपल्या अल्लड स्वभावाने कोणालाही आपलेसे करून घेणारी अशी ही वैदेही ऊर्फ वैदु...
वैदेही आपलं सामान ठेवत होती पण तिला एखाद्या वेगळ्याच कोशात गेल्यासारखे वाटले. ती उगाचच खूप कॉन्शिअस झाली होती. त्याचं कारण तिला स्वतःला कळत नव्हतं का त्याचे कारण तो शेजारी बसलेला हँडसम व्यक्ती होती? कोण जाणे...आज काय हे भलतेच होत होते तिच्या सोबत.. "मी काही मदत करू का", वरूण तीला विचारू लागला. वैदेही,"नाही! नो, थॅंक यू" असे म्हणत सीटवर बसली आणि तीसुद्धा मोबाईल मध्ये व्यस्त झाली. "हॅलो, आई! मी वैदही बोलतेय!.. अगं मी आत्ताच ट्रॅव्हल मध्ये बसले.. एक सहा वाजेपर्यंत पोहोचेल बघ.. मी जवळ आले की कॉल करेन..मग दे दादाला पाठवुन मला न्यायला...तू नको काळजी करू मी येईन व्यवस्थित...चल ठेऊ मग मी.. बाय!"
तिच्या फोनवरील संभाषणामुळे वरूणला शेजारी बसलेल्या वैदेही चे नाव ठाऊक झालं होत. ती बोलत असताना अधून मधून कानामागे घेणारे केस...तिचे हावभाव पाहून का कोण जाणे त्याला ती पाहता क्षणी आवडली. चला आजचा दिवस छान जाणार.. असे मनातच म्हणत असताना त्याच्या फोनची रिंग वाजली.."हा, बोल कार्तिक! अरे मी निघालो आहे पुण्यालाच यायला...आत्ता ट्रॅव्हल मध्ये आहे."
"अरे यार वरूण! मला तुला कधी एकदा भेटेन असे झालेय", कार्तिक एक्साईट होऊन म्हणाला. " अरे हो हो... मी काय गर्लफ्रेंड आहे का तुझी उद्या भेटतो मी तुला.", वरूण हसत हसत... "मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे.. आणि आजच आपण भेटतोय मग तुला यायला किती का उशीर होईना?... ते काही मला माहीत नाही", कार्तिक.
"अरे! मग आत्ता सांग ना!...", वरूण.
नाही...! तु मला आज भेट... आणि तसाही आठ दिवस झाले गायब आहेस तु...ते काही नाही तु मला आज भेटतो आहेस... मला काॅल कर कोरेगाव पार्क ला आल्यावर... ओके...बाय...सी यू!"
"कार्तिक माझं ऐकुन तर घे!...अरे हॅलो!...हॅलो!"
वरूण पुढे काही बोलणार त्याच्या आतच फोन डिस्कनेक्ट झालेला. अरे यार हा कार्तिक पण ना...!
एव्हाना गाडी सुरू झाली होती आणि हायवेला लागली होती. काही अंतर गेल्यावर गाडी थांबली. एक काळा माणूस, लाल शर्ट परिधान केलेला आणि गाॅगल घातलेला व्यक्ती गाडी मध्ये चढला. तो येऊन वैदेही आणि वरूण च्या पलिकडील सीटवर बसला. उगाच इकडं तिकडं पाहु लागला. कसलेसे गाणं तो गुणगुणत होता. तोच त्याची नजर वैदेही वर पडली. त्याचे हावभावच बदलले. हे त्या दोघांच्या देखील लक्षात आले. त्याने खिशातून हेडफोन्स काढून कानात घातले आणि भसाड्या आवाजात मोठ्याने गाणं म्हणु लागला. वैदेही ला अजिबात आवडले नाही पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. वरूणच्या लक्षात येताच त्याने त्यांच्याकडे तोंड करून बसला आणि म्हणाला," ए भाऊ! नाही ठिक आहे..तुझा आवाज फार भारी असेल...पण आपण पब्लिक व्हेईकल मध्ये आहोत याचे भान ठेव ना! आजुबाजुला अनेक लेडिज् आहेत...तु त्यापेक्षा इंडियन आयडॉल ट्राय कर हा!"
"साॅरी हा! भाऊ पण खरं माझा आवाज इतका आवडला तुला?... मी तुला ते गाणं म्हणून दाखवू का?", "अरे ...नको रे बाबा" मध्येच त्याचे वाक्य तोडत वरूण म्हणाला... इकडे हे सर्व पाहून वैदेहीला खूप हसायला येत होत. नंतर त्यांच्यात काय खुसरफुसरखुस चालली होती ते ऐकायला येत नव्हतं. काही वेळानी ती व्यक्ती पुढच्या सीटवर जाऊन बसली आणि वरुण त्याच्या जागेवर... थोडक्यात त्यांनी त्या व्यक्तीला कटवले होते. " अरे देवा! काय काय अजब माणसं असतात या जगात.." वरूण मनाशी हसत बोलत होता. "फायनली तुम्ही त्याला कटवले तर.. थँक्यू हा!", वैदेही वरूणला म्हणाली.."ओह वेलकम! हो ना काय कार्टून होता तो... बापरे!", वरूण. "हो! म्हणजे जरा जास्तच गाण्याचे मनावर घेतले ना त्यानी", वैदेही मनापासून हसत होती. तीचे ते हसण इतकं मिश्कील होता की जणू काही वाहणारा झराच. तिच्या हसण्यातुन तिच्या अल्लड स्वभावाच सहज दर्शन होत होत आणि हे पाहून वरूण मात्र स्वताला हरवत होता.
तु मुळ कोल्हापूर ची आहेस का? वरूण ने वैदेही ला विचारले. "अहो नाही! मी पुणेकर आहे. माझ्या आजीला भेटायला गेले होते ना! तर ती असते कोल्हापूरला", वैदेही. "ओह अच्छा! म्हणजे भारीच की, मी पण पुण्याचाच आहे.", वरूण. "हो का छान!" विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तर देत होती वैदेही ती स्वतःहून बोलणाऱ्या तील नव्हती. "मग पुण्यात कुठे आहे रहायला?", वरूण विचारत होता पण तिला आवडेल का नाही या विचाराने साशंक होत पुन्हा म्हणाला "तुम्हाला राग तर नाही आला ना मी विचारलं म्हणून?"
ती हसून "नाही", असं म्हणाली कोणत्याही मुलीला असे अनोळखी व्यक्तीने विचारलेले प्रश्न आवडत नाहीत पण हो असं कसं सांगणार ना! वैदही म्हणाली, "अहो असं काही नाही मी ना कोरेगाव पार्क ला राहते."
वरूण तिने प्रश्न विचारता सुद्धा स्वतः उत्तर देत होता. "अरे वा! मी पण विमान नगरला राहतो."
ती "ओके, गुड!"
ती जास्त बोलत नाही म्हटल्यावर त्यानी शांत राहणे पसंत केले. काही वेळ शांततेत गेला. थोड्यावेळाने तो काहीतरी शोधत होता. "काही प्रॉब्लेम आहे का?", वैदेहीने विचारलं.
"हो ना! माझा हेडफोन मिळत नाहीये.. इथेच तर होतं मघाशी", वरूणनी शोधाशोध करत उत्तर दिले. "काही हरकत नसेल तर माझा घेऊ शकता तुम्ही काही वेळा साठी.. माझ्याकडे आहे थांबा हा!" असे मनात वैदेही बॅग मध्ये पाहू लागली. "अ.. हो पण तुम्हाला लागेल ना?", वरूण असे म्हणत आहे तोच तिने बॅगमधील हेडफोन काढून समोर धरला. "नाही ठीक आहे मला नाही लागणारी आत्ता..ओके..", पुन्हा एक छान स्माईल देत वैदेही बोलली आणि बाहेरचा देखावा पाहू लागली. वरूणने कानात हेडफोन्स घातले आणि डोळे मिटुन गाणी ऐकु लागला...
काही वेळाने कोरेगाव पार्कचा स्टाॅप येणार होता. वरूणचा मित्र कोरेगाव पार्कला येणार असल्यामुळे त्याने तिथेच उतरायचा निर्णय घेतला. वैदेही तिथेच उतरणार होती. स्टॉप आल्यानंतर वैदेही तिचं सामान वरून काढू लागली. वरूण देखील तिच्या मागे उभा होता बॅग निघत नाही हे पाहून तो देखील तिला मदत करु लागला. बॅग तर काढली गेली पण तिचे केस कशामध्ये तरीअडकले होते. "आउच! " , केसांना हात लावत ती ओरडली. "ओह! सो सॉरी", तिचे केस वरूणच्या जॅकेट च्या चैन मध्ये अडकले होते. एक तर उतरायची घाई त्यामध्ये झालेला हा घोळ, कसेतरी अडकलेले केस सोडवून ते गाडीमधून खाली उतरले.
वैदेहीने ऑलरेडी घरी फोन करून भावाला पाठवायला सांगितले होते. वरूणनी देखील कार्तिकला कॉल करून उतरल्याचे सांगितले. तिचा भाऊ ऑलरेडी कार घेऊन तिला न्यायला आला होता. त्याला बाय करून ती निघून सुध्धा गेली. सर्व इतक्या पटापट घडत गेलं की, तिचे हेडफोन्स द्यायचे राहूनच गेले. दिवसभरातील घडलेले क्षण दोघांच्याही डोळ्यांसमोर एकापाठोपाठ येत होते. काही वेळासाठी एकत्र असणारी ही दोन माणसं आपली मनं मात्र हरवुन आपापल्या घरी जाणार होती.
वरूणला वैदेही आवडली होती. पण वैदेहीला वरूण आवडला होता का? आवड, आकर्षण आणि प्रेम या तीनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. काही लोक आकर्षणालाच प्रेम समजून चुकीचे निर्णय घेतात. त्यांना एकमेकांबद्दल वाटणारे ते प्रेम आहे की आकर्षण हे काहीवेळ गेल्यानंतरच कळेल. पुढे काय होणारे हे वाचायला तुम्हाला आवडेल का? मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

