sayali Kasture

Fantasy

3  

sayali Kasture

Fantasy

संवाद

संवाद

3 mins
348


आज सुट्टीचा दिवस. भरधाव वेगात राधिका बीच वर पोचली. खाली उतरून वाऱ्याने विस्कटलेले केस सारखे करत किनाऱ्याच्या दिशेने चालू लागली. संध्याकाळी पाचची वेळ . भरती लागायला अजून तीन तासांचा अवकाश होता. 

बहार नजरा ! असं मनात म्हणत तिने पाठीमागे लांबवर एक दृष्टिक्षेप टाकला. 

वलाटी पलीकडे खड्या पहाऱ्यासारखा उभा असलेला सह्याद्री, किनाऱ्या लगतची असंख्य नारळी- पोफळीची झाडं, समोर शुभ्र विस्तीर्ण पुळण. क्षितिजापर्यंत पसरलेला निळाशार समुद्र आणि त्याच्या कुशीत विसावू पहाणारं रवीबिंब !

किनाऱ्यावर बसून फेसाळनाऱ्या लाटांचा पायांना होणारा अलवार स्निग्ध स्पर्श अनुभवत असतानाच अचानक मागून आवाज आला. 

आज सुद्धा ठरलेल्या वेळी आलीस तू.

अंऽऽ हो.

आज काय नवीन? 

नवीन? काही नाही. 

गेले तीन महिने पाहतोय मी. दर सुट्टीच्या दिवशी तू इथे येतेस, भरतीच्या वेळेपर्यंत थांबतेस. समुद्रात बुडणारा सूर्य पहात राहतेस. त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसतेस. 

काय पहात असतेस नक्की? आणि ते ही इतक्या सातत्याने, न थकता ? 

हं... ते रविबिंब समुद्रात बुडत नसतंच मुळी. त्याच्या कुशीत विसावणार असतं ते! सूर्याला माहीत असतं की हा समुद्र मला बुडवणार नाही, आजची रात्र विसावून मी उद्या उगवणार आहे परत. आणि समुद्राला ठाऊक असतं की हा तप्त गोळा मला तापवणार नाही. 

हा विश्वास ! न कंटाळता न चुकता सातत्यानं हे होत राहतं हे त्या दोघातील प्रेम!

त्यांच्यातील प्रेम आणि विश्वास पहात

 राहते मी.

वा ! 

आणि तुझ्या बोटंची लेखणी करून या वाळूत लिहीत राहतेस तू, ते काय?

पत्र असतात ती , मनातलं मळभ व्यक्त केलेली. इतर कुठे व्यक्त होण्यापेक्षा त्यातून व्यक्त होते इतकंच! 

एका पत्रतला मजकूर पुन्हा येत नाही. हो नं?

तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. 

म्हणजे तू वाचतोस तर ती? 

अंऽऽऽ होय. या रत्नाकरला अर्पण करतेस तू ती, मग वाचायला नकोत? 

छान वाटलं, कुणीतरी वाचतय हे पाहून. 

आणि एका पत्रातला मजकूर, दुःख पुन्हा कसं येईल? ते तर समर्पित केलेलं असतं. प्रत्येक पत्रासरशी मनातला दुःखाचा घडा रिक्त होत जातो. 

आणि त्या असंख्य प्रश्नांचं काय? जे तू त्या पत्रातून मांडलेले असतात? त्यांची उत्तरं कोण देणार? 

उत्तरं ? ती कधी शोधायची नसतातच. उत्तरं येतात प्रश्नांपाठी आपोआप त्यांचा माग काढंत आणि त्या प्रश्नाची कलेवरं होण्यापूर्वी! 

हे घे...

इतके शिंपले? ते ही वेगवेगळ्या रंगाचे? पण तुला कोणी सांगितलं, मला शिंपले आवडतात ते? 

मी पहात असतो. तू गोळा करतेस परत जाताना. 

म्हणजे तू माझ्या हालचाली टिपत असतोस तर.

का नाही? 

तू नाहीस का पहात? अगदी टक लाऊन पहात असतेस माझ्याकडे. 

खोटं...तुझ्याकडे पहाते मी? 

होय. अगदी संपूर्ण वेळ पहात नसलीस तरीही अनेक वेळा पहातेस. 

हं मग?

प्रेमात पडलीस माझ्या? 

काऽऽय ? नाऽऽ हीऽऽ. 

प्रेम या गोड शब्दासरशी इतकी तत्काळ तिखट आणि अगोड प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. 

हं. प्रेमाचा सुखाचा स्पर्श कोणाला नको असतो? पण भीती असते ती त्यामागून डोकावूं पाहणाऱ्या दुःखाच्या सावलीची.

पण मग अशा प्रतिक्रियेचं कारण काय?

कारण कोणत्या व्यक्तीशी निगडीत असण्यापेक्षा भावनेशी निगडीत आहे. 

प्रेम नावाच्या भावनेच्या खांद्यावर माझ्या विश्वासाने डोकं ठेवलं आणि त्याच प्रेमाने माझ्या विश्वासाचा घात केला! 

असो.

इतके सुंदर शिंपले दिलेस मला.

घरी येतोस?

कोणाच्या, तुझ्या??

अर्थातच!

नको. तू एकटीच असतेस बहुदा. कारण तू नेहमी एकटीच इथे येतेस त्यावरून अंदाज. 

तुझी तर्कशक्ती वाखाणण्याजोगी आहे. 

हो. एकटीच असते मी. 

पण मग म्हणून मझ्या सोबत यायची भीती वाटते? का? विश्वास नाही? माझ्यावर की स्वतः वर? 

दोघांवरही पूर्ण विश्वास आहे माझा. 

मग हरकत काय? 

मी तुझ्या सोबत आलो तर महाप्रलय येईल. मी मर्यादा सोडू इच्छित नाही.

म्हणजे? 

मी तुझ्या सोबत आलो तर ...तुला सामावून घेतल्या खेरीज रहावणार नाही मला आणि तू ही समर्पित व्हायला मागे पुढे पहाणार नाहीस.

ठीक आहे. असं असेल तर मी येते तुझ्याकडे.

अंऽऽऽ नको‌.

माझ्याकडे फार जण आहेत. मी तुला नाही नेऊ शकत आणि माझ्याकडे आलीस तर कदाचित तुला परतावं वाटणार नाही आणि मी पुन्हा इथेच आणून सोडलं तरीही तू , "तू" राहणार नाहीस. 

हवं तर ते शिंपले घेऊन जा सोबत आणि मीच आलोय असं समज. 

इथे किनाऱ्यावर भेटत जा अशीच. 

ठीकय मला निघायला हवं आता. पण...

पण काय? 

मी इथे येईल पण तू पुन्हा कधीच येऊन बोलणार नसलास तरच.

का? म्हणजे मी आज बोललेलं तुला आवडलं नाही तर? 

आवडलं नाही असं नाही पण, तू माझी पत्र वाचतोस, मला दुरून पाहतोस, मीही तुला दुरूनच पाहते, इतकंच ठीक आहे. 

तुझ्या बोलण्याची मला सवय होऊ नये कारण सवयी व्यसनात बदलतात आणि व्यसनाच्या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त करण म्हणजे भगीरथ प्रयत्नांशी गाठ! 

मनातल्या दुःखाचा घडा माझ्या पुढ्यात विश्वासाने रिक्त करतेस म्हणून वाटलं प्रेम करतेस माझ्यावर.

प्रेमाच्या कसल्या गोष्टी करतोस रे तू? 

किती जणी समर्पित झाल्या? आजवर कोणाचा झालास तू? किमान कोणाच्या रंगात तरी रंगलास का?

खरंय. नाही झालो कोणाचाच आणि इच्छा असूनही कोणाचाही होऊ शकत नाही. ही माझी शोकांतिका! 

पण एक वचन देतो. माझ्या पत्यावर जेव्हा कधी येशील तू न बोलावता तुझ्या भेटीसाठी हजर असेल आणि प्रत्येक लाटेसरशी अलवार प्रेमाचा स्पर्श आणि सुखाचे चार क्षण तुझ्या ओंजळीत घालण्यासाठी कटिबद्ध असेल शतकानुशतकं!


Rate this content
Log in

More marathi story from sayali Kasture

Similar marathi story from Fantasy