सखी
सखी
सखी
आजच सगळं शेड्युलच बिघडलं, शी बाई फक्त पाच मिनिटांत बस मिस झाली. अजून भाजी घ्यायची, घरी जाऊन स्वयंपाक करायचंय, मुलांचा अभ्यास पण घ्यायचाय. फक्त पाच मिनिटं लेट झालं ऑफिस मधून निघायला पण माझं आजच सगळं गणितच कोलमडल. नीता स्वतःशीच पुटपुटत होती, दुसऱ्या येणाऱ्या बसची एकदम आतुरतेने वाट बघत होती. एकदा नजर हातातील घड्याळाकडे तर दुसऱ्या क्षणाला येणाऱ्या जाणाऱ्या बस कडे..... नीताच्या घरी जाणारी अजून बस आली नव्हती, रिक्षा करावी तरी आज एकही रिक्षावाले थांबेना. खूपच चिडचिड होत होती तिची.कोणताही इलाज नसल्या कारणं ती निमूटपणे बसची वाट पाहू लागली.
जवळ जवळ पाऊण तासाने बस आली, खूप गर्दीची बस, माणसांच्या गर्दीने एका बाजूने झुकलेली बस.... तरीही घरी जाण्याच्या ओढीने नीता बस मध्ये चढली. गर्दीतून वाट काढत काढत हातातील बॅग सावरत कशी बशी ती बस मध्ये एका पायावर उभी होती. आठवड्याचे सहा दिवस नीताची अशीच ओढाताण व्हायची.ऑफिसला जरी रविवारची सुट्टी असली, तरी नीताला काही रविवारी घर कामातून सुट्टी मिळत नसायची. घर ऑफिस नुसती तारेवरची कसरत व्हायची नीताची. तरीही सगळं ती योग्य प्रकारे सांभाळत होती.अनायसे एवढ्या गर्दीत नीताला बसमध्ये बसायला जागा मिळाली. बर झालं बाई जागा मिळाली, बसल्या बसल्या दिवसभराचा थकवा आता तिला जाणवत होता.
खिडकीच्या बाजूची सीट काही मिळसली नसल्या कारणाने नीता आता बस मधल्या माणसंच निरीक्षण करत होती.सगळे अगदी थकलेले चेहरे, घामाने ते भिजलेला अंग, तशीच एक पायावर गर्दीत सगळे उभे होते.कोणी आपल्या स्टॉपची वाट बघत होते, तर कोणी एवढ्या गर्दीत आपल्याला बसायला जागा मिळते का नाही ह्याचा विचार करत होते.मला तर वाटतं त्यांना बसलेल्या माणसांचा जणू हेवाच वाटत असावा. प्रत्येक माणसंच निरीक्षण करताना जणू मजाच वाटत होती, आणि आपल्याला खूप थकवा आलाय हे विसरून जात होती. अचानक नीताच लक्ष आपल्या समोरच्या सीटकडे गेलं.एवढ्या गर्दीत , गोंधळात समोरच्या सीट कडून हसण्याचे ,खिदळण्याचे आवाज येत होते. जणू त्यांचं आपल्या आजूबाजूला काय होतंय? ह्याकडे लक्षच नव्हतं. आपल्याच विश्वात त्या दोन मुली गुंतल्या होत्या. साधारण 18 -19 वर्षाच्या असतील त्या मुली, एका मोबाईलमध्ये एक कॉर्ड लावून दोघी एकमेकींच्या डोक्याला डोकं लावून गाणी ऐकत होत्या. मधेच काहीतरी कंमेंट पास करून हसत होत्या, एकमेकींना चिडवत होत्या.काहीतरी बोलत होत्या बहुतेक कोड वर्ड मध्ये बोलत असाव्या.त्यांचं हसन काही थांबत नव्हतं, खूपच आनंदी होत त्यांचं हे आयुष्यच वळण.
त्यांच्याकडे बघून नीताला तिचे कॉलेजचे दिवस आठवले. तिच्या मैत्रिणी सोबत तिनेही असेच दिवस घालवले होते. अगदी आनंदाचे,लाडाने नीता न ती एकमेकींना सखी म्हणत.किती भुर्रकन उडून गेले ते दिवस.....अचानक कंडक्टरचा मोठयाने आवाज आला, नीताचा एव्हाना स्टॉप आला.घाई घाईने नीता बस मधून खाली उतरली. घरी लगबगीनं तिची पाऊलं जात होती. नीता एव्हाना घरात पोहचली, अग नीतू आज तुला खूप उशीर झाला. अरे रवी आज नेहमीची बस चुकली म्हणून झालं लेट. बर रवी मी फ्रेश होतें न लगेच चहा टाकते, लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागते.अग मी केला चहा, तू फ्रेश होऊन घे नीतू. फ्रेश होऊन नीता बाहेर आली.लगेच नवऱ्यानं हातात चहाचा कप दिला. चहाचा घोट घेताना घेता अरे रवी मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते नाहीतर खूप उशीर होईल.
अग नीतू सावकाश चहा घे, मी वरण भाताचा कुकर लावला. फक्त तुला भाजी करायची आहे. रवीच अस समजूदार असनच माझ्यासाठी किती महत्वाचं आहे.चहाचा कप बाजूला सारून एक मोठी स्माईल तीन रवी कडे बघत दिली. सगळी काम झाल्यावर नीता झोपण्यासाठी बेडरूम कडे वळली. आज इतकी झोप येऊन सुद्धा नीताला झोप येत नव्हती.अंथरुणावर पडल्या पडल्या तिला त्या दोन मुलीच आठवत होत्या.किती छान असतात ना ते दिवस, पण जसजसे दिवस निघून जातात सगळं काही संपून जात. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी असतात, काही खूप जवळचे, काही नेहमीचे.प्रत्येकाला ते असावेच.आपले आनंद,सुख- दुःखाचे क्षण आपण त्यांच्या सोबत घालवतो. जे आपल्या आईवडिलांना माहिती नसतं ते त्यांना माहिती असत. सगळ्यांप्रमामाणे माझ्या पण आयुष्यात तीच स्थान महत्वाचं आहे, माझी नलिनी माझी सखी.
नलिनी आणि माझी मैत्री कॉलेज पासून, माझी आणि तिची भेट झाली ती ऍडमिशनच्या वेळेस. कॉलेजच्या पहिल्या दिवशी कोणी कोणाला ओळखत नसत अगदी थोडा आनंद आणि थोडी भीती अशी माझी सिच्युएशन झाली होती.त्यात मॅडमने अगदी पहिल्या बाकावर बसवलं होत, त्यामुळे धाकधूक अजूनच वाढली होती.अचानक नलिनी वर्गात आली, वर्ग अगदी गच्च भरला होता.तिची ती भेदरलेली नजर कुठे बसायचं?जागा शोधत होती.मॅडमने तिला माझ्याशेजारी बसवलं.खूपच आनंद झाला होता मला त्या वेळेस. माझ्याकडे बघून हसऱ्या चेहऱ्याने ती माझ्याशेजारी बसली.दबक्या आवाजात मी तिला विचारलं, अग मी तुला ऍडमिशनच्या वेळेस पाहिलं होतं.तिनेही दबक्या आवाजात उत्तर दिलं मीसुद्धा तुला पाहिलं होतं. माझं नाव नीता आणि तुझं नाव काय? माझं नाव नलिनी...दोघीही एकदमच हसलो कारण दोघींच्याही नावच पाहिलं अक्षर सेम होत.थोड्याच दिवसात आमची एकदम घट्ट मैत्री झाली होती.लाडाने आम्ही एकमेकींना सखी म्हणत असू.
एकत्र कॉलेजला जाण येणं होत होत.एकाच बेंच वर बसणं ,एकमेकींच्या घरी येणं जाण होत होत. रुसवेफुगवे पण होत होते, भांडण पण होत होती.पण तो राग पण लटका असायचा. दुसऱ्या क्षणाला परत मैत्री व्हायची. मला तिच्याबद्दल सगळं न तिला माझ्याबद्दल सगळं माहिती असायचं. एकमेकींच्या चेहऱ्यावरून काय झालं हे आम्ही ओळखत असू.कॉलेज मध्ये पण त्यांची मैत्री फेमस होती,एखाद्या तासाला उशीर झाला की मॅडम म्हणायच्या नीता आणि नलिनी हातात हात आणि गळ्यात गळे बसा आता दोघी तुमच्या जागेवर. कधी सहलीला जायचं असेल तर आई नलिनी त्या साहिलीला जाणार असेल तरच मला पाठवायची.परीक्षा आली की एकत्र अभ्यास करण,अगदी माझा रोल नंबर कुठल्या वर्गात आहे हे सुद्धा नलिनी शोधून द्यायची.
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी खूप वाईट वाटलं होतं दोघींना, डोळ्यातून न कळत अश्रू येत होते. तरी पण एकमेकींना आम्ही प्रॉमिस केलं.आयुष्यात अगदी काहीही झालं तरी आपली मैत्री तोडायची नाही.आपली कोणत्याही कारणाने भांडण झाली तरी अबोला धरायचा नाही. कॉलेज संपलं तरी एकमेकींच्या संपर्कात नेहमी राहायचं. कॉलेज संपल्यावर सुद्धा आम्ही दोघी एकमेकींना भेटत होतो, कधी शॉपिंगला तर कधी सहज सुद्धा. नंतर दोघीही नोकरीला लागलो तरीसुद्धा महिन्यातून एकदा आम्ही भेटायचो. आपआपली सुख दुःख शेर करायचो.सगळा त्राण निघून जायचा अगदी रिलॅक्स वाटायचं.थोड्या दिवसांनी नलिनीच लग्न ठरलं, चांगली आठ दिवस राहिले होते तिच्या लग्नात मी.खूपच मज्जा त्या वेळेस आली.पाठोपाठ माझंही लग्न ठरलं, नलिनीने तर चिडवून चिडवून नुसता वैताग आणला होता.लग्न झाल्या नंतरही आम्ही दोघी वेळात वेळ काढून एकमेकींना भेटू लागलो.नंतर दोघीही आपआपल्या संसारात इतक्या गढून गेलो की भेटणं काही होतच नाही. थँक्स टू मोबाईल त्याच्यामुळे आम्ही भेटत असतो. कधी सनावारांच्या,वाढदिवसाच्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी.
कधी कधी सहज म्हणून पण फोन होतो, पण प्रत्येक्ष भेटून बोलणं आणि फोन वर बोलणं वेगळं असत ना? रवी आजही आपल्या मित्रांसाठी वेळ काढतो, वर्षातला एखादा दिवस मित्रांसोबत घालवतो.त्यांच्यासोबत सहलीला जातो. तस मी का नाही करत? एखादा दिवस सुद्धा मी माझ्या सखीसाठी काढू नाही शकत का? कधी कधी रवी मला चिडवण्यासाठी म्हणत असतो, तुम्ही बायका स्वतः साठी काही वेळ देत नाही.बरोबरच आहे म्हणा त्याच म्हणणं. कधी कधी तर मला त्याचा हेवा वाटतो, किती वेळ मित्रांना भेटत असतो.रात्रभर नीता हाच विचार करत होती.
सकाळी काहीतरी मनाशी तिन ठरवलं. नलिनीचा नंबर डायल केला. हॅलो नलिनी कामात आहेस का?का नंतर फोन करू? नाही ग नीता झाली सगळी काम,आता काय मी एवढा सुद्धा वेळ देऊ नये का ग?बोल ना कशी आहेस तू? नलिनी खर सांगू का ग तुला, मनानं बरी नाही मी.अग सखी काय झालं ग?काही नाही ग नलू किती वर्षे झालेत आपण भेटलोच नाही. मला वाटाय भेटावस तुला. तुला नाही वाटत का ग? वाटत ग नीता खूप वाटत पण वेळच मिळत नाही?पण नीता आपण वेळ काढू शकतो ग? ठरलं तर नलिनी येत्या रविवारी भेटायचं का ? जमेल का तुला? न जमायला काय झालं नीता, आपल्या सखीसाठी एवढ तर नक्कीच जमेल. तर मग ठरलं तर.चल नलू ठेवते फोन, येत्या रविवारी भेटतोय आपण. हो सखी बाय. फोन ठेवताना एक वेगळाच आनंद नीताच्या चेहऱ्यावर होता. काय मॅडम ?आज एवढ्या खूष दिसताय, क्या बात हे? येत्या रविवारी संपूर्ण वेळ मी माझ्या सखीसाठी देणार आहे.मी आणि नलिनी येत्या रविवारी भेटणार आहे. शेवटी तुम्ही बायका स्वतः साठी , आपल्या मैत्रीसाठी वेळ देत आहात ह्यातच आनंद आहे.रवीच हसरा चेहरा सगळं काही सांगत होता, नीतासाठी तो खूष होता.नीताला आता रविवार केव्हा येतोय?केव्हा मी माझ्या सखीला भेटते अस झालं होतं.सखीला भेटायला तीच मन आतुर झालं होतं.
