STORYMIRROR

Aarti Mungase

Abstract

4.5  

Aarti Mungase

Abstract

शरीर जपा हीच आपली संपत्ती ...

शरीर जपा हीच आपली संपत्ती ...

3 mins
30

एक काका पाठीत चमक भरली म्हणून ओपिडीत आले,मला फ्रोजन शोल्डरचा एलिमेंटही जाणवला म्हणून शूगर तपासली तर इट वॅाज 360..


आकडा बघून काका थोडे चक्रावले,”ते दोनेक दिवस झाले जरा आमरस वगैरे पिण्यात आला,सकाळीही एकानं दिलेला दगडूशेठचा पेढा खाल्ला त्यामुळं असेल” त्यांनी स्वत:ची समजूत काढण्यासाठी काहीतरी दावा केला..


“गोड खाल्ल्यानं मधुमेह होतो” हा आपल्याकडचा एक ढोबळ गैरसमज आणि खोलवर रुजलेला सिद्धांत पण असं होत नसतं,ज्याला मधुमेह नसतो त्यानं एका बैठकीत किलोभर साखर खाल्ली तरी त्याला लागलीच मधुमेह होत नसतो पण ज्याला आहे त्याची रक्तशर्करा चमच्याभर खाल्ल्यानंही वाढू शकते..


थोडक्यात गोडानं मधुमेह होत नाही मधुमेह झाल्यानंतर गोड कमी/बंद करावं लागतं-एरवीही केलं तरी उत्तमच..


“तमाशानं समाज बिघडत नाही आणि किर्तनानं समाज सुधरत नाही” अगदी तसंच “गोडानं मधुमेह होत नाही आणि रोज फक्त कारल्याचा ज्यूस पिला तरी तो जात नाही” 


तमाशाच्या अतिरेकानं दुष्परिणाम होऊ शकतो तसंच अतिरेकी गोडानंही शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो आणि  रोज किर्तनातून प्रबोधन होत असेल तर त्याचे समाजावर सकारात्मक परिणाम होतील तसंच नियमित पथ्य पाळण्यानं शरीराबाबत होईल..


“कालपर्यंत मी ठीक होतो डॉक्टर आणि अचानक आज इतकीऽऽ साखर?? सगळं एकदम कसं काय ??” काकांनी भयचकित होत विचारलं..


मी काकांकडं कटाक्ष टाकला.वाढलेलं पोट,चालण्याचा व्यायाम शून्य,डोळ्यात अपुरी झोप आणि चेहऱ्यावर ताण मात्र भरपूर..


“काका,मोटर ॲान केली की पाण्याचा टाकी लगेच एक मिनिटात भरते का ?” मी काकांना विचारलं..


“नाही ना..वेळ लागतो..” काका पुटपूटले..


“बस्स शरीरातले आजारही असेच भरत जातात” त्यांना जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो..शारिरिक असो वा मानसिक,आजार अचानक होत नाहीत ते ‘साचत’ जातात..


आपण समजतो की एक दिवस गोड खाल्लं आणि मधुमेह झाला,थोडा ताण आला आणि हार्ट अटॅक आला,दोन दिवस तेलकट खाल्लं आणि कोलेस्टेरॉल वाढलं पण शरीराची गोष्ट इतकी सोपी नसते..


खरंतर शरीरात वर्षानुवर्षे सूक्ष्म बदल चालू असतात.आज थोडी जास्त साखर-उद्या थोडं कमी चालणं-परवा उशीरापर्यंत जागरण-त्यानंतर ताण-फास्टफूड-व्यायामाचा अभाव-वजनवाढ असं करत करत शरीरात ‘रोगांचा हिशेब’ जमा होत जातो..


मधुमेह म्हणजे फक्त ‘साखरेचा’ आजार नाही,प्रत्यक्षात हा शरीराच्या पेशींनी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देण्याचा दीर्घकालीन प्रवास असतो..


सुरुवातीला शरीर प्रतिकार करतं.पॅन्क्रिया जास्त इन्सुलिन तयार करतं.काही वर्षांनी ते दमायला लागतं.मग साखर हळूहळू वाढू लागते;म्हणजे रिपोर्टमध्ये शुगर दिसण्याच्या कितीतरी आधी शरीरात प्रक्रिया सुरू झालेली असते..


हृदयरोगही असाच शांतपणे वाढतो; एका दिवसात रक्तवाहिनीत ब्लॉकेज तयार होत नाही.ते वर्षानुवर्षे धूम्रपान,ताण,झोपेचा अभाव,तेलकट पदार्थ,मधुमेह,

व्यायामाचा अभाव यांच्या एकेका थरांनी साचत जातं 

अगदी पाण्याच्या पाईपमध्ये गंज जमा व्हावा तसं..


अन् मग एखाद्या दिवशी अचानक छातीत दुखतं आणि लोक म्हणतात ‘अचानक हार्ट अटॅक आला’ प्रत्यक्षात तो ‘अचानक’ नसतो; तो अनेक वर्षांच्या सवयींचा शेवटचा अध्याय असतो..


जसं आजार थेंबाथेंबानं साचतात तसेच ते हळूहळू कमीही होऊ शकतात,एक चांगली सवय,एक सकारात्मक बदल,

एक पुढं टाकलेलं पाऊल यामुळं मधुमेह किंवा हृदयरोग क्षणात नाहीसे होतात असं नाही पण नियंत्रणात हमखास येतात..


शरीराला स्वतःला दुरुस्त करण्याची अद्भुत क्षमता असते पण कधी आपण शरीराला योग्य संधी दिली तर..


शरीर इन्सुलिनचा प्रतिसाद सुधारू शकतं,वजन कमी करू शकतं,रक्तदाब सुधारू शकतं,कोलेस्टेरॉल कमी करू शकतं,हृदयाचा धोका कमी करू शकतं पण त्यासाठी “एका दिवसाचा उत्साह” नाही तर “दररोजची सातत्यपूर्ण शिस्त” लागते..


अनेकदा औषधांपेक्षा चांगल्या सवयी मोठं औषध ठरतात,साधा डाएट चार्ट,रोज नियमित चालणं,रात्री वेळेवर झोप,साखर आणि मैदा कमी,ताण कमी,वजनावर लक्ष,मोबाईल कमी,जेवण सावकाश..


शरीर म्हणजे शिक्षा देणारं मशीन नाही तर संकेत देणारा मित्र आहे; आपण शरीराचं ऐकलं नाही की ते आधी कुजबुजतं..


थकवा,पोट वाढणं,झोप न लागणं,दम लागणं,

अॅसिडिटी,डोकेदुखी हे सगळे शरीराचे ‘Warning Signals’ असतात पण आपण दुर्लक्ष करतो आणि मग एक दिवस रिपोर्ट्स आपल्याला वास्तव दाखवतात..


“थेंबे थेंबे तळे साचे” हा फक्त म्हण नाही तो आरोग्याचा नियम आहे..


रोजचं चालणं,एखादं ताजं सिझनल फळ,थोडी कमी साखर,थोडं कमी रागावणं,थोडी जास्त झोप आणि थोडा कमी ताण हे किरकोळ वाटणारं बदल भविष्यात प्रचंड मोठा फरक निर्माण करतात कारण शरीराला चमत्कार नको असतो,त्याला सातत्य हवं असतं..


आजार हा एका दिवसात पडलेला वीजेचा आघात नसतो तर तो वर्षानुवर्षे साचलेल्या सवयींचा आरसा असतो आणि म्हणूनच उपचार म्हणजे फक्त औषधं नसतात तर जीवनशैलीतला हळूहळू केलेला बदल असतात कारण “शरीर बिघडायलाही वेळ लागतो आणि सुधारायलाही.”


योग्य दिशेनं टाकलेलं प्रत्येक छोटं पाऊल शरीराला पुन्हा निरोगीपणाकडं घेऊन जात असतं.”


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract