Gunjar Patil

Inspirational

3  

Gunjar Patil

Inspirational

शिवाई देवीचा आशीर्वाद

शिवाई देवीचा आशीर्वाद

5 mins
159


सुमारे दोनशे वर्षे उत्तर भारतावर सत्ता केल्यानंतर संपूर्ण भारतवर्षावर आपला धर्म, संस्कृती व सत्ता पसरवण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या सुलतानांची दक्षिण भारताकडे नजर वळू लागली होती. सुलतान जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीच्या महाराष्ट्रावरच्या पहिल्या आक्रमणानंतर (१२९३-९४) अधूनमधून महाराष्ट्रावर कोणातरी सुलतानाची वक्र नजर पडतच होती. महाराष्ट्रातील लोकांची चीड, शौर्य, स्वाभिमान सारं काही संपलं होतं. त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष महाराष्ट्रावर एकामागून एक सुलतान सुलतानी गाजवीत होते.

     एवढ्या वर्षांच्या अनुभवातून बादशाहांना एक कळून चुकलं होतं की आपण ज्यांच्यावर राज्य करतोय ते शूर आहेत पण त्यांच्याकडे नेता नाही आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात एकी नाही. काही काळानंतर हळूहळू सुलतानांनी मराठी माणसांनाही सैन्य आणि राज्यकारभारात सामील करायला सुरवात केली.

     लढाया होत होत्या आणि मराठी माणसं मरत होती; ती बादशहासाठी, सुलतानांसाठी. त्यांची सेवाचाकरी करण्यातच धन्यता माहित होती. वतनदारी, पाटीलकी, देशपांडे इत्यादी मानपानाची पिल्लं बादशहांनी सोडली होती. स्वतःचं साम्राज्य वाढविण्यासाठी मोगल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह आपापसात लढत होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मराठे लढत होते ते छोट्या छोट्या वतनांसाठी, जहागिरीसाठी.

     अशाच एका लढाईत पुणे प्रांताचे निजामशाहीचे जहागीरदार मालोजीराजे भोसले मारले गेले (१६०५). त्यांच्या मागं त्यांची पत्नी उमाबाई आणि दोन मुलं होती. थोरल्याचं नाव शहाजी आणि छोट्याचं नाव शरीफजी. मालोजीराजे गेले तेव्हा शहाजी आणि शरीफजी अगदी लहान होते. मालोजीराजांचा बंधु विठोजीराजे यांनी विनंती करून, मुलांच्या मायेची आपल्या वाहिनीबाईंना सती जाण्यापासून परावृत्त केलं.

    निजामशाहानं जहागिरी जप्त न करता लहानग्या शहाजीस जहागिरी बहाल केली आणि जहागिरीच्या कारभाराची जबाबदारी विठोजीराजेंकडे सोपविली. वयाच्या पाचव्या वर्षी शहाजीराजे निजामशाहीचे जहागीरदार झाले.

    पण राजांना बालपण असं नसतं. ते झटपट मोठे होऊ लागतात. हळूहळू शास्त्रास्त्रांत राजे पटाईत होऊं लागले. सिंधखेडच्या लखुजी जाधवरावांची लेक जिजाऊ; आपल्या घरी सून म्हणून यावी; ही मालोजीराजांची इच्छा होती. पण ती इच्छा पूर्ण करायच्या आतच देवानं त्यांना आपल्याकडं बोलावून घेतलं. तोच विचार पुढं घेऊन विठोजीराजांनी जाधवरावांशी बोलणी केली. दोन्हीकडच्यांनी शुभमंगल मुहूर्त बघितला आणि जिजाऊ भोसल्यांच्या घरची सौभाग्यलक्ष्मी झाली. लवकरच शरीफजीचंही विश्वासरावांची लेक दुर्गाबाई हिच्याशी लग्न झालं. 

    भोसल्यांचं कुटुंब आता दौलताबाद येथे बादशाही राजधानीत राहत होत. सुल्तानशाहीतील सुलतानी चाळे आणि नवे नवे अत्याचार बघून जिजाऊचं काळीज फाटू लागलं. तिला सुलतानी सत्तेची चीड येऊ लागली.

     एके दिवशी निजामशाहाचा दरबार बरखास्त झाल्यावर सर्व सरदार घरी जाण्यासाठी बाहेर पडले. राजवाड्याबाहेर घोडे, हत्ती, पालख्या, नोकर-चाकर यांची गर्दी होती. एवढ्यात सरदार खंडागळयांचा हत्ती बिथरला! त्या हत्तीला आवरण्यासाठी जिजाऊचा भाऊ दत्ताजी जाधवराव थेट हत्तीवर धावून गेला. त्यांना आवरण्यासाठी शहाजीराजेंचा चुलत भाऊ संभाजी भोसले मध्ये पडला. जाधवरावाच्या हल्ल्यातून हत्तीला सोडविण्यासाठी खंडागळेही धावला. पण तेवढ्यात दत्ताजीनं हत्तीवर घाव घालण्यास सुरवात केली. त्यानं चिडून हत्तीची सोंडच छाटली. हत्ती संपला. पण दत्ताजीच्या अंगात तो बिथरलेल्या हत्ती संचारला होता. त्यानं एकदम संभाजीवर हल्ला चढवला. दोघांत लढाई सुरु झाली! दोघांची झटापट पाहून दोन्हीकडची मंडळी एकमेकांवर हत्यारे घेऊन धावली आणि दोन्ही पक्षात लढाई सुरु झाली.

    दत्ताजी आणि संभाजी दोघांच्याही तलवारी सपासप चालत होत्या आणि संभाजीचा एक घाव दत्ताजीच्या जिव्हारी लागला. दत्ताजी मेला. मघाशी दरबार बरखास्त झाल्यावर पुढे गेलेले लखुजीराजे गडबडीची वार्ता ऐकून परत फिरले होते. त्यांनी काहीही विचार न करता आपला घोडा चालू असलेल्या गदारोळात टाकला आणि त्यांना समोरच दिसले ते लढणारे शहाजीराजे. सर्व नाती विसरून लखुजीराजेंनी शहाजीराजांवर घाव घातला. घाव राजांच्या दंडावर बसला तसे ते भुईवर कोसळले. त्याच क्षणी ते बेहोष झाले. लखुजीराजे तसेच पुढे गेले आणि त्यांनी संभाजीवर घाव घातला. काही समजायच्या आताच संभाजी ठार झाला (१६२२). 

     प्राणाचा बदला प्राणाने घेतला गेला पण नाती तुटली. भोसले आणि जाधव वैरी झाले. पण ह्या भांडणाचा परिणाम जिजाबाई आणि शहाजीराजेंनी आपल्या संसारावर होऊ दिला नाही. दोघांचाही एकमेकांवर खूप प्रेम होतं. लवकरच जिजाबाईंना पुत्र झाला. त्याचं नाव संभाजी ठेवण्यात आलं. (१६२३)

     ह्याच दरम्यान मोगलांनी आपली प्रचंड फौज दख्खनवर पाठवली. निजामशाहानं मदतीसाठी अदिलशाहाशी बोलणी केली पण उलट आदिलशाह मोगलांना जाऊन मिळाला. मोगल आणि आदिलशाह दोघांनीही आपली फौज निजामशाहीवर धाडली. घनघोर लढाई झाली आणि मोगल आणि आदिलशाही फौजांना हरवून शहाजीराजांनी निजामशाहला विजय मिळवून दिला. पण ह्या लढाईत राजांचा धाकटा भाऊ शरीफजी भोसले मारला गेला.

     एका नंतर एक लढाया चालूच होत्या. दिल्लीचा मोगल जहांगीर वारला आणि शाहजहान बादशाह झाला. विजापूरलाही महंमद आदिलशाह बादशाह झाला. (१६२७).

    जिजाबाई खूप अस्वस्थ होत्या. त्यांना महाराष्ट्राची होणारी वाताहात पाहवत नव्हती. त्यांना दास्याची कल्पनाच सोसवत नव्हती. त्यांना हवं होतं स्वतःचं राज्य. असच काहीसं मत शहाजीराजेंचंही होतं. पण त्यांना ठाऊक होतं आपण जर ह्या अन्यायाविरुद्ध उठलोच तर आपल्याला आडवायला आपलेच लोक पुढे असतील. त्यामुळे त्यांनी योग्य वेळेची वाट बघणं हेच योग्य असं ठरवून निरुपायानं निजामशाहीत नोकरी करत राहिले.

     दरम्यानच्या काळात जिजाबाई पुन्हा गरोदर राहिल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज दिसू लागलं. शहाजीराजे आनंदले. पण अशाही परिस्थितीत त्यांना जिजाबाईंना सोडून स्वारीवर जावं लागलं.

    जिजाबाईंच्या सासरी त्यावेळी सर्वकडे आनंदी वातावरण होते. पण त्याच वेळी तिचं माहेर उद्ध्वस्त झालं. निजामशाहनं दगा करून लखुजीराजे व अचलोजी, रघुजी आणि यशवंतराव या त्याच्या तीन पुत्रांना मारून टाकलं. (१६२९).

     जाधवरावांच्या हत्याकांडामुळे शहाजीराजेही चिडले. त्यांनी निजामशाही सोडली. पण ह्यावेळी त्यांनी दुसऱ्या कोणत्याही बादशाहाकडे न जाता एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी बंड केलं. पुणे जहागीर त्यांच्या स्वतःच्या ताब्यात होती. त्यांनी पुण्याच्या आजूबाजूला असलेला आदिलशाही प्रदेश भराभर ताब्यात घेतला आणि पुणे स्वतंत्र म्हणून घोषित केलं. राजांनी धाडस केलं खरं पण त्यावेळी जिजाबाईंची तब्ब्येत सांभाळणं हे ही तितकच महत्वाचं होतं. राजांनी पुण्याच्या उघड्या मुलखातून जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर हलविण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत विश्वासू कारभारी घेऊन शहाजीराजे शिवनेरीला आले.

    त्याच वेळी पुण्यात गोंधळ उडाला. शहाजीराजांचा बंड मोडून काढण्यासाठी अदिलशाहानं रायाराव नावाच्या एका मराठी सरदाराला पुण्याच्या मोहिमेवर पाठविलं. रायारावनं सारं पुणं पेटविलं. शहाजीराजांचे वाडे पेटविले. रायारावनं तर पुणे प्रांतात गाढव बांधून नांगर फिरवला आणि एक लोखंडी पहार जमिनीमध्ये ठोकून त्यावर फुटकी कवडी ठेवली. पुणे प्रांताला त्याने स्मशान बनविलं.

    स्वराज्य एका झटक्यात संपलं! शहाजीराजांचा डाव फसला होता. त्यांनी मुकाट्यानं मोगलांची पंचहजारी सरदारी पत्करली (१६३०).

    शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या बाळंतपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. गडावर आधीपासून जाणत्या आणि अनुभवी सुईणी आणि वैद्य हजर ठेवण्यात आले होते. शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. जिजाबाईंचं पोट दुखू लागलं. सुईणींची आणि वैद्यांची गडबड सुरु झाली. लवकरच सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला. सर्वत्र आनंदाचा कल्लोळ झाला. शिवाई देवीच्या आशीर्वादाने जिजाबाईंच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला होता. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झडू लागला (१९ फेब्रुवारी १६३०).

    शहाजीराजे त्यावेळी दर्याखान रोहिल्याशी लढण्यात गुंतले होते. त्यांच्याकडे बातमीची साखरथैली रवाना झाली. बातमी समजताच शहाजीराजेंना घराची ओढ लागली. पुत्रदर्शनासाठी ते फार उत्सुक झाले होते पण मोहीम अर्धवट सोडून जाणं शक्य नव्हतं.

    आज बाळाचं बारसं होतं. सुहासिनींनी बाळाला व आईसाहेबांना ओवाळलं. बाळाचा जन्म शिवनेरी गडावर झालेला तसेच या गडावर शिवाई देवी वास्तव्य करते. त्यामुळे बाळाचं नाव ठेवण्यात आलं, 'शिवाजी'.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational