Gunjar Patil

Tragedy

2  

Gunjar Patil

Tragedy

वियोग

वियोग

5 mins
3.8K


सकाळचे सहा वाजले होते. सुनीता आत्ताच उठली होती आणि नेहमीप्रमाणे डबे करण्यासाठी आधी स्वयंपाक घरात शिरली होती. एवढ्यात फोनची घंटी वाजू लागली. इकडे श्वेता म्हणजे सुनीताची मुलगी उठली होती. तिनेच फोन उचलला आणि जांभया देतच कानाला लावला.

"हॅलो!"

"हॅलो, कोण बोलतोय?"

"मी श्वेता, आपण?"

"अगं, मी मामा, आई उठली आहे का? तिला जरा फोन दे."

"हं, एक मिनिट. आई मामाचा फोन, ये लवकर."

'दादाचा फोन एवढ्या सकाळी, काय झालं असेल?' सुनीता मनातल्या मनात विचार करतच आली आणि श्वेताकडून फोन घेतला.

"हॅलो दादा, सुनीता बोलतेय, काय झालं? एवढ्या सकाळी फोन का केलास? सर्व ठीक आहे ना?"

"नाही काही ठीक नाही. एक दुःखाची बातमी आहे जी तुला सांगायलाच हवी."

"काय झालं?" दादाने काही सांगायच्या आत एका क्षणात बरेच विचार सुनीताच्या डोक्यात फिरून गेले.

"अगं, आपल्या शेजारचा सुनील काल वारला. तुझा तो खूप चांगला मित्र होता. त्यामुळे तुला फोन केला."

सुनीता डोक्यात एखादा प्रहार व्हावा असा आवाज झाला. तरी कशीबशी स्वतःला सावरून तिने विचारले,

"कसं रे झालं असं अचानक? तब्येत वगैरे तर ठीक होती ना त्याची?"

"तब्येत ठीक होती पण काळ आला होता. काल रात्री कामावरून परतताना त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंन्ट झाला. त्याला दवाखान्यात न्यायच्या आधीच तो मरण पावला."

दादा बोलत होता पण सुनीताला काहीच ऐकायला येत नव्हतं. तिच्या डोक्यात विचारांचे ढग जमा झाले होते.

"हॅलो सुनीता, ऐकतेस न. तुला आता यायला जमणार आहे का?"

"नाही मला नाही जमणार." कसंबसं उत्तर देऊन तिने फोन ठेवून दिला. तिला काहीच कळत नव्हतं. ती अगदी रडकुंडीला आली होती. पण तिने स्वतःला सावरलं आणि आपल्या कामाला लागली. ती पटापट काम उरकायचा मागे लागली. पण तिचं लक्ष कामात बिलकुल नव्हतं. तिला खरं तर आता एकांताची गरज होती जेणेकरून ती आपला दुःखाश्रूंना वाट करून देऊ शकली असती.

घरातल्या सर्वांनी आपापल्या आंघोळी उरकल्या होत्या. सुनीताने सर्वांना नाश्ता दिला. प्रत्येकजण आपापल्या कामाला निघून गेला. तिचा नवरा कामाला गेला. मुलगी श्वेता शाळेत गेली.

आता घरात कोणीही नव्हतं. तिला ह्याच एकांताची गरज होती. कारण तिचं दुःख, ते बाहेर काढण्यासाठी तिला हा एकांत हवा होता. ती तशीच पलंगावर पडली आणि रडू लागली. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नव्हते. ते अश्रू सुनीलसाठी होते.

सुनील हा सुनीताचा मित्र. मित्र म्हणण्यापेक्षा सुनीतासाठी तो मित्रापेक्षाही अधिक होता. तिचं सुनीलवर जेवढं प्रेम होतं तेवढं ती कोणालाच देऊ शकत नव्हती. पण लग्न झाल्यापासून ती सुनीलला विसरण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. ते शक्य नव्हतं हे तिला माहित होतं पण तिने स्वतःला आपल्या संसारात झोकून दिले होते.

पण आज सुनील परत तिच्यासमोर आलाच. त्याच्या आठवणी परत जाग्या झाल्या होत्या. पण त्या एवढ्या वेदनादायी असतील ह्याची कल्पनासुद्धा तिने कधी केली नव्हती.

मनातल्या मनात ती सुनीलशी बोलायला लागली,

सुनील का गेलास असा? तू ह्या जगात नाहीस ही गोष्टच मला मान्य होत नाही. शरीराने आपण वेगळे होतो तरी तू माझ्यापासून कधीच वेगळा नव्हतास. मी तुझी होऊ शकले नाही पण तू कायमचा माझाच होतास.

मला आठवतं, तेव्हा मी नुकतीच दहावी पास झाले होते आणि कॉलेजला जाऊ लागले होते. त्याचवेळी तुम्ही आमच्या शेजारी राहायला आलात आणि मी ज्या कॉलेजमध्ये होते त्याच कॉलेजमध्ये तुही प्रवेश घेतलास. योगायोगाने तू माझ्याच वर्गात आलास आणि रोज कॉलेजला येता जाता आपली भेट होऊ लागली. तुझा स्वभाव एवढा चांगला होता की काही दिवसातच तू सर्वांना आवडू लागलास.

हसत खेळत पाच वर्ष निघून गेली. पण ह्या पाच वर्षात मी तुझी कधी झाले हे माझे मलाही कळले नाही. तुझ्यासोबत त्यावेळी घालवलेले क्षण मी आज ही विसरू शकले नाही. त्यावेळी पण जेव्हा तो काही दिवसांसाठी तुझ्या गावी जात होतास तरी मला कसंतरी व्हायचं. तू नेहमी माझ्यासोबतच रहावस असं नेहमी वाटायचं. पण ते होणे नव्हतं. माझ्या नशिबात तू नव्हतास. तू माझ्यापासून वेगळा झालास. वेगळा असून देखील तू कुठे तरी आहेस आणि कधीही मी तुला हाक मारली असती तर तू नक्की माझ्यासाठी धावून आला असतास हे मला ठाऊक होतं पण आता तोही आधार तू माझ्यापासून तोडून खूप दूर निघून गेलास.

आपण दोघांनीही एकमेकासमोर प्रेम व्यक्त केले नाही पण ते करायची गरजच कधी वाटली नाही. एकमेकांच्या मनातलं समजून घेण्याइतके आपण नक्कीच एक झालो होतो.

आपलं प्रेम हळूहळू फुलत आलं होतं पण हसतखेळत चाललेले दिवस फार काळ टिकले नाहीत. कॉलेज संपताच माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवले. घरातल्यांकडून संमती मिळाल्याशिवाय लग्न करायचे नाही ह्या गोष्टीवर तू ठाम होतास आणि घरात सांगण्याचे धाडस माझ्यानी कधी झालेच नाही आणि काही न बोलताच मी बोहल्यावर चढले आणि तिथेच माझी चूक झाली. तुही गप्प राहिलास. पण आज मी तुला दोष देणार नाही. मीच तेव्हा जर थोडं धाडस केले असते आणि तेव्हा तडजोड करून भावनांचा गळा घोटला नसता तर आज माझ्यावर ही पाळी आली नसती.

खरं सांगायचं तर तू माझा होणार नाहीस हे मला जेव्हा कळलं तेव्हाच मी संपले होते. मी दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्नाला होकार दिला पण तुझ्यासोबत सजवलेली फुलवलेली स्वप्नं साकार करण्यासाठी कोणी दुसरा माझा हात हातात घेत आहे हे मला पटत नव्हतं पण आता त्याला खूप उशीर झाला होता. तुझ्यासोबत घालवलेले ते मधुर क्षण बाजूला ठेवून मी दुसरा संसार थाटून मोकळी झाले पण तुला पूर्णपणे विसरणं मला कधी जमलच नाही. तू मात्र एकाकी तपस्याचे जीवन व्यतीत करत राहिलास आणि शेवटपर्यंत एकटाच राहिलास आणि आता मलाही एकटं सोडून गेलास. मी तुझ्या सहवासात जरी नसले तरी माझ्या मनाला कुठेतरी दिलासा होता की तू आहेस, फक्त माझा आहेस आणि माझाच राहशील.

माझं लग्न झाल्यापासून तू मला भेटायला सुद्धा आला नाहीस. तुझी सुनीता कशी आहे? एवढंसुद्धा बघावंसं तुला कधी वाटलं नाही का रे? की तुझ्यामुळे माझ्या संसारात ढवळाढवळ नको म्हणून तू आला नाहीस? मला माहित आहे तू त्यामुळेच आला नाहीस. तू समोर आलास तर मी माझी राहणार नाही आणि माझ्या सांसारिक जीवनात विष कालवायला नको म्हणून तू आला नाहीस.

तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांवर मी संपूर्ण जीवन व्यतीत करेन असा माझा विश्वास होता पण त्या क्षणांच्या स्मृतीपेक्षा ते क्षणच परत परत हवेसे वाटत राहिले. आता तर तुझ्याशिवाय वियोगाच्या आगीत जळत राहणे एवढच राहिलं होतं.

सुनीताच्या मनात विचारांचं चक्र फिरत असतानाच दाराची बेल वाजली. सुनीता भानावर आली. तिचं लक्ष घडाळ्याकडे गेलं. दुपारचे दोन वाजले होते. श्वेता शाळेतून आली होती. सुनीता पलंगावरून उठली, पदराने आपला चेहरा फुसला आणि तशीच दार उघडायला गेली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy