शाळा आणि कावळीचा फोक
शाळा आणि कावळीचा फोक
तो दिवस मला आजही आठवतो आणि टचकण डोळ्यात पाणी येतं.मी जेमतेम सहा वर्षांचा होतो. त्या दिवशी आई लवकरच उठली होती. मला आणि माझ्या बहिणीला शाळेत जाण्यासाठी तयार केले होते. दोघांचे ही दप्तर पिशवीत भरले होते. एका फडक्यात मला आणि दुसऱ्या फडक्यात बहिणीला भाकरी आणि चटणी बांधून दिली.तेवढ्यात वस्तीवरच्या पोरानी मला आवाज दिला ए.... पप्या.. चल शाळेत.आईनं पटकन दाराखी लावली आणि माझ्या हाताला धरून शाळेत घेऊन जाऊ लागली. निम्म्या रस्त्यात गेल्यावर मला पुढे शाळेत जाऊ वाटत नव्हतं. आईनं माझा हात धरला आणि मला शाळेच्या दिशेने ओढत होती.वस्ती वरची पोरं पण माझा हात धरुन ओढू लागली तसा मी त्यांच्या हाताला जोरात चावलो होतो.हे पाहुन आईचा राग अनावर झाला. तीने रागातच वाटेतल्या कावळीचा फोक काढला आणि मला त्या ओल्या फोकाने मारायला सुरुवात केली.
शाळेत गेल्यावर माने गुरुजींनी मला जवळ घेतले.खेळायला खेळणी दिली.तरीही मी शाळेत काही केल्या बसत नव्हतो.शेवटी आईच्याच मागे लागून घरी आलो गुरुजींसमोर मला तिने मारलं नाही. पण तिच्यातील दुर्गा जागृत झाली होती. तीला माझ्या डोक्यात घर करुन बसलेल्या अशैक्षणिक आसूराचा वध करायचा होता.
घरी आल्यावर तीने मला दारातील सीताफळाच्या झाडाला हात पाय बांधून उलटे टांगले.रडून रडून माझा घसा कोरडा पडला होता. माझा आवाज बंद झाला. डोळे पांढरे झाले. दातखिळ बसली आणि मी बेशुद्ध होऊन मान ही टाकली.हे सर्व पाहुन आई अर्ध मेलीच झाली.मोठ मोठ्याने रडायला लागली. वस्तीवरची सगळी माणसं जमा झाली.माझी दातखिळ काढली पाणी पाजलं तेव्हा कुठं मी शुध्दीवर आलो होतो.
काही दिवसांनी मी शाळेत जाऊ लागलो.आई परत मारेल ही भीती मनात होती. नंतर रोज शाळेत जाऊ लागलो. आई माझा शाळेतून आल्यावर अभ्यास घ्यायची. मी शाळेत जातोय हे पाहुन तीला खूप आनंद झाला होता. शाळेतून आल्यावर मला जवळ घ्यायची. आज काय शाळेत शिकवलं ते विचारत. मी पण तीला सगळं सांगत होतो. मग ती मला घट्ट मिठी मारायची. माझा मुका घ्यायची.घासलेटचा दिवा हळूच फुकत आई मला कुशीत घेत म्हणायची बाळा लय शिक आणि मोठा साहेब हो .हेच सपान उरी धरुन तीही झोपी जायची.
