इर्शाळवाडी आणि पाऊस
इर्शाळवाडी आणि पाऊस
इर्शाळवाडी एक डोंगराच्या पायथ्याशी वसलेली छोटीशी वस्ती.सुंदर हिरवागार डोंगर, घनदाट झाडी डोंगरातून पाझरणारे पाणी, खळखळून वाहणारे झरे आणि धरणीशी एकरुप होण्यासाठी अवतरलेले काळे ढग. अगदी मनाला भूरळ घालणारे इर्शाळवाडीचं सौंदर्य.
१९जुलै २०२३ची ती काळ रात्र इर्शाळवाडीसाठी एक शापच . सर्वजण गाढ झोपले होते. रात्रसुद्धा अंधाराला घाबरेल अशी स्मशान शांतता होती.रिप रप पडणारा पाऊसच काही तो झोपलेल्या इर्शाळवाडीला मोठमोठ्यानं ओरडून जागं करत होता.क्षणांतच ४३कुटुंब वास्तव्य करत असलेल्या इर्शाळवाडीवर काळाने घाला घातला. भली थोरली दरड इर्शाळवाडी कोसळली. आणि होत्याचं नव्हतं झालं.सर्वच्या सर्व दरडीखाली गाढली गेली. बाहेर गावी गेलेलेच फक्त रडायला उरलेत. माझी माणसं कुठे आहेत म्हणून मोठ्यानं टाहो फोडतायंत पण ऐकायला कोणी नाही.
शासणाने तात्काळ मदतकार्य चालू केले. पण इर्शाळवाडीपर्यंत पोहोचायला पाऊलवाट पण राहिली नव्हती. चार दिवस अथक प्रयत्न करुन थोड्या फार लोकांचे मृतदेह बाहेर काढले .मुसळधार पावसामुळे मदतकार्य करणे अवघड झाले होते. अशातच हळूहळू मृतदेह सडायला लागले.मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणून अखेर शासनाने बचावकार्य थांबवले.
आपले नातेवाईक सापडतील ही वेडी आशा पण मावळून गेली. पाऊस काही केल्या थांबायचं नावंच घेत नव्हता. जणू काही तो मागील जन्माचा बदलाच घेत होता. लहान थोरापर्यंत सगळेच मोठमोठ्यानं ओरडून आक्रोश करुण त्या विधात्याला न्याय मागत होते.तो मात्र कठोर..कसला न्याय देतोय. उलट खूप दिवस तहानलेली धरती पावसाच्या पाण्याबरोबर माणसाचंही रक्त घटाघटा प्याली .
डोळ्यातुन येणाऱ्या आसवांना कोसळलेल्या दरडीचाच बांध घालून येथे प्रत्येकजण स्वतः ला सावरत आहे इर्शाळवाडी पुन्हा एकदा उभी करण्यासाठी काळजावर दगड ठेवतो आहे. आणि एक आर्त विनंती करतो आहे त्या विधात्याला ,मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढलेल्या रक्ताच्या नात्याला मला शोधून देशील का?
