Manisha V

Inspirational

4.5  

Manisha V

Inspirational

राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा-

राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा-

4 mins
573


       आज रखमाचा ऊस तोडणीचा पहीलाच दिवस. ती एक-दोन वेळा गेली होती मजुरीला, पण गरोदर राहिल्यानंतर काही जाताच आले नाही.  

पण आता जाणे गरजेचे होते. नवऱ्याच्या निधनामुळे कमवण्याची जबाबदारी पडली होती. मुकादमच्या नादाला लागून तिचा नवरा दारु- तंबाखूमध्ये व्यसनाधीन झाला होता. त्यातच खंगत-खंगत मरण पावला.

   " दारु आणि तंबाखूचा बसतो मेळ

     आयुष्याचा मात्र होतो खेळ "

दुष्काळात तेरावा महिना की काय सासू येऊन सोबतीला राहू लागली. घरात रखमा, तिची मुलगी-लक्ष्मी आणि सासू-पार्वतीबाई. तीन देवींचे घर म्हणून बायका तिला चिडवत. एकमेकींना आधार देत आनंदात दिवस जात होते. ऊसतोडणीतून दिवसाला ४०-५० रुपये मिळत. पै-पै साठवून रखमाने शिवण मशीन घेऊन दिली सासूला कारण सासूच्या माहेरी शिवणकामाचा धंदा होता. सासूला बऱ्यापैकी पोलकं शिवाला येत होतं; हे तिला माहीत होते. उन्नतीचा श्रीगणेश आपल्याच घरातून केला. सासूला तर आभाळ ठेंगणे झाले. "आनंद पोटात माझ्या मावेना गं मावेना" अशी गत! ‌काय शिवू अन् किती शिवू. रखमावर तिने जीव ओवाळून टाकला. एवढ्या वर्षाचं तिचं स्वप्न पूर्ण केले होते; ते पण न सांगता.  सूनेचे प्रेम,कष्ट आणि विश्र्वास बघून सासूमध्ये आत्मविश्वास तर आलाच पण न बोलताच रखमाने तो तिच्यात निर्माण केला होता. नवसाला पावणारी पिंपळगावची 'जगदंबा' आईच दिसली तिला सुनेच्या रुपात!!!


"हिंमत हारणे" हे रखमाच्या संस्कारात नव्हते. काबाडकष्टाची लहान पणापासून सवय. चौथीपर्यंत हट्टाने शाळेत गेली. म्हणतात ना, शिकलेलं कधी वाया जात नाही. तसेच रखमाबद्दलही झाले. मुकादमाकडून पैसे घेताना नीट मोजून घेई. पण मुकादम इतर मजुरीवाल्या बायकांना गंडवत आहे हे तिच्या तीक्ष्ण नजरेने हेरले. कुणी कमी पैशाबद्दल काही म्हटले तर संध्याकाळी थांबून जास्तीचे काम करायला सांगे. एकाचवेळी तो एकाच बाईला थांबवत असे. हे बघून रखमाचे कुतुहल जागे झालेच. तिचा स्वभावच धीट,हट्टी. ज्या गावात शौचालय त्या गावातील मुलाशीच लग्न करणार म्हणून अडून बसली. उधळलेल्या बैलाला एकदा काबूत आणले होते; अशी मजबूत गावरान कन्या, प्रसिद्ध होती पंचक्रोशीत. म्हणून मुकादमही तिच्या नादी लागायचा नाही. पण रखमा चाणाक्ष! 'पाणी कुठेतरी मुरतय'हे ओळखून होती. गीताबाईला थांबणार आहे असं कळल्याबरोबर,तीही शेतात लपून बसली. ऊसाच्या लांब तांडवात तिच्या वर कुणाची नजर पडली नाही. सगळ्या बायका गेल्यावर मुकादम व गीताबाई झोपडीवजा घरात गेले. तिथे काय झाले हे कळण्याइतपत रखमा खुळी नव्हती. तिला खूप वाईट वाटले. गीताबाईला नवरा-३मुले होती. परिस्थिती चांगली नव्हती;पण असे पाऊल? ह्या प्रश्र्नाने तिला रात्रभर झोपू दिले नाही. सासूशी पण रात्री चर्चा केली. 'पैशापायी बायका असं पाऊल उचलतात'-असे सासू बोलली; पण पटेल ती रखमा कसली...रस्त्यातच गाठले गीतेला. विचारताच, गीता लागली रडत-रडतच सांगायला, मलाबी नाय आवडत, पण पोरांसाठी करतेय. त्यांनी चांगलं शिकाव म्हनून. "आई, थोर तुझे उपकार" आई आपल्या पिल्लांच्या भल्यासाठी कुठची पातळी गाठेल कुणीही सांगू शकणार नाही. रखमाला रागही येत होता आणि कीवही. मुकादमला तर बघितल्या बरोबर 'पायाची कळ मस्तकात गेली'. ह्याला धडा शिकवायचाच. भरीला भर पडली ते एका बाईला कमी पैसे दिले आणि वहीत लिहिले होते जास्त. तिथल्या तिथेच थोबाड फोडावं असं तिला वाटलं.  घरी जाताना त्याबाईजवळ गेली आणि मुकादम कसा लबाडगिरी करतो ते सांगितले. त्या बायका अडाणी, मजुरीवरुन काढून टाकायच्या धमकीला बिचाऱ्या घाबरत. रखमा खमकी होती. 'घाबरणे' हे तिच्या शब्दकोशात नव्हते. बायकांची कमजोरी तिच्या लक्षात येऊ लागली. सासूबरोबर ह्यासंरदर्भात बोलून एके दिवशी मजुरीतल्या बायकांना तिने शिवणकामाच्या निमित्ताने घरी बोलावले. नीट समजावले, आपला गैरफायदा घेऊ द्यायचा नाही. बायांना तिच्यात सरस्वती दिसू लागली. आकडेवारीच्या संदर्भात मुकादम कसा फसवतो, पैसे कसे मोजायचे ज्ञान दिले. शिवणकामाची आवड असेल तर तेही शिकवू. असा आत्मविश्वास त्यांच्यात घातला आणि त्याला प्रतिसादही मिळाला. त्याची गंमत अशी झाली की, रोज बायका मुकादमशी पैशावरुन भांडू लागल्या. रखमा हे बघे आणि गालातल्या गालात हसे. घरातली बाई शिकली तर आख्खं कुटुंब शिकतं, इथे तर संपूर्ण गाव शिकत होता.  आता तिच्यातही खूप हिंमत आणि आत्मविश्वास आला होता. नवरा गेल्याचं दुःख असले तरी सासूचा भक्कम आधार होता.  

       मुकादमच्या सगळे 'नाकीनऊ आले'. 'सळो की पळो' अवस्था झाली. त्याच्या लक्षात यायला वेळ नाही लागला की, हे सर्व रखमाच्या जीवावर चाललं आहे. तोपर्यंत उशीर झाला होता. शेतमालकापर्यंत मुकादमची तक्रार गेली आणि त्याला कामावरुन काढण्यात आले. मुकादम चवताळला. बदल्याची आग स्वस्थ बसू देईना. एका रात्री, मित्राला घेऊन रखमाचं घर गाठलं. सासूने दरवाजा उघडल्याबरोबर तिला ढकलत रखमाच्या अंगावर धावून गेला. तिच्या पदराला हात घातलेला बघून म्हातारीने तिथेच पडलेला ऊसकापणीचा कोयता उचलला आणि वार करु लागली. आज कमवण्याचे साधन रक्षणार्थ शस्त्र बनले.  महिषासुरमर्दिनी बघून दोघांची पाचावर धारण बसली. जी धूम ठोकली ते परतलेच नाही गावात.  

       मुकादमाच्या दैत्यापासून सुटका झाली. रखमाच्या अजून एक गोष्ट लक्षात आली, बायका गर्भाशय काढून टाकत आहेत. कारण विचारले तर मजुरीला जाता येत नाही आणि मुले तर झाली, मग त्याचा काय उपयोग? ह्या प्रश्नाने तर रखमाचेही काळीज कापले. सरपंचाच्या मदतीने तिने तालुक्याच्या डॉक्टरला गावात बोलवले. प्रबोधन केले; चित्र स्वरुपात बायकांना समजावले. जीवनसत्त्वाच्या गोळ्या, महीन्यातून एकदा सर्वांची तपासणी होऊ लागली. पुरुषमंडळीही रखमाला साथ देत. त्यांना लक्ष्मीचं रुप तिच्यात दिसे. कारणही तसेच होते, घरासमोरील जागेत भाजीपाला पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. आठवड्याच्या बाजारात विक्री केल्याने, दोन पैसे हातात रहात होते. रखमाचं गावाबद्दलचं प्रेम, कष्ट बघून सरपंच, त्याची बायको, मास्तर, डॉक्टर सर्व आपल्यापरीने मदत करत होते. सगळ्यांबरोबर गावाचा विकास होत होता. दारु पिऊन बायकोला मारणाऱ्यांसाठी तर ती चंडिका होती. चौथी जरी शिकली होती तरी तिला देवीचा वरद् हस्त होता. गावागावात फिरुन बचत गटाद्वारे, मास्तरीणबाईला घेऊन शिक्षणाच्या आधारे बायकांना सक्षम करण्याचं व्रतच जणू घेतले होते. त्याला मोलाची साथ होती ती तिच्या विधवा सासूबाईची. ह्या सूना गावाला वरदायिनी ठरल्या होत्या. त्यांचा सत्कार, सन्मान नवरात्रीचेच औचित्य साधून करण्यात आला. प्रत्येक स्त्रीमध्ये नवदुर्गा असतात, रखमातही होती. फक्त ओळखता आले पाहिजे आणि हेच रखमाने, बायकांना स्वत:तल्या नवदुर्गांचा शोध घ्यायला शिकवले. त्या अडाणी होत्या; पण आजची स्त्री ज्ञानी, हुशार आणि शिक्षित आहे...मग तिने का मागे राहावे?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational