Manisha Vispute

Tragedy Inspirational

4.7  

Manisha Vispute

Tragedy Inspirational

दु:खातही थाटला सुखाचा संसार

दु:खातही थाटला सुखाचा संसार

2 mins
528


         निसर्गाचा अहाकार... काळोखाचे साम्राज्य, ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट,वाऱ्याचा घोंघावतपणा, पावसाचा धिंगाणा आणि सोमनाथ व त्याची बायको सीमाची, किती ती घालमेल! 


        'काय आवरु अन् कुठे ठेवू' ह्यामुळे सोमनाथ व सीमाला वेड लागायची पाळी आली होती. घरात फक्त दोघच. एकमेकांच्या साथीने आधार देत परतीच्या प्रवासाला लागलेले म्हातारे जोडपं. निसर्गाचे थैमान माजले होते. स्वत:चा जीव सांभाळत, राहिलेला संसार दोघे वाचवीत होते. शरीरासह मनाचीही थरथर होत होती. वादळाचा जोर वाढला. ताडामाडाच्या झावळ्या एकमेकांना घासत होत्या. त्यांच्या सळसळीने दोघांना सळो की पळो करुन सोडले. अंगणात पानांचा सडा पडत होता. मेणबत्तीच्या उजेडात एकमेकांचा काळजीवाहू चेहरा बघण्याशिवाय काहीच हातात उरले नव्हते. तो प्रकाशही थरथरत होता. थाड् थाड् पत्रांच्या आवाजाने सीमाचे काळीज जोरजोरात धडधडू लागले. एकमेकांचा हात हातात घेऊन दोघे एका सुरक्षित जागी चिंता, भिती मिश्र भावनेने कुडकुडत बसून राहिले होते.


सीमा - अरे देवा,किती बघशील रे अंत?  


सोमनाथ - त्याला कशाला दोष... आपलच नशीब फुटके.


सीमा- अहो, छप्पर उडालं वाटतं.


सोमनाथ - बसा, बोंबलत. दुष्काळात तेरावा महिना!

       

        प्रशस्त वाडा, सभोवार अंगण, भोवताली भरपूर झाडे, जवळच नागावचा समुद्र. सोमनाथ आणि सीमा, एक मुलगा आणि मुलगी...छोट, आनंदी कुटुंब. मुलगी लग्न करुन गुहागरला रहायला होती. मुलगा मुंबईला होता. तिथेच तो बायका-पोराबरोबर रहात होता. अधूनमधून मुलांची ये-जा होती.

त्यातच हे म्हातारं जोडपं खुष होते. 

        

       निसर्गाने 'निसर्ग' चक्रीवादळ पाठवून पार वाट लावून टाकली. त्यात कोरोना, मदतीलाही कुणी नाही. वर्षभराचं साठवलेलं धान्य भिजले. छप्पर उडाल्याने दैन्यावस्था सोमनाथची झाली होती. दोघे खंबीरपणे लढा देत होते. वाचवता आले ते वाचवले. रोज थोडी- थोडी साफसफाई करुन संसारगाडा रुळावर आणला. पंधरा दिवसांनी मुलाला फोन लागला आणि आभाळच कोसळले. उरलेसुरले अवसान गळून गेले. मुलगा हॉस्पिटलमध्ये दाखल होता. कुणाचं आणि काय सांत्वन करणार?  

       

        सोमनाथची मुलगी डॉक्टरची चिठ्ठी आणि पोलिस, राजकीय ओळख काढून कशीतरी आईवडिलांकडे पोहोचली. दोन दिवसांनी खबर आली...मुलगा कोरोनात गेला. पुरते अवसान गळून गेले म्हाताऱ्यांचे. पण हिंमत हारली नव्हती. नशीबाने पुढ्यात जे वाढले आहे; त्याचा दोघांनी स्वीकार केला.


       सूनबाईला तिच्या इच्छेनुसार, आपल्याजवळ बोलावून घेतले. सून जरी शिकलेली होती तरी मुंबईसारख्या शहरात एकटीला कुठे ठेवणार? तिचे माहेर कोकणातले. तीही स्वखुशीने सासू-सासऱ्यांबरोबर रहायला आली. कार विकून आलेले पैसे होतेच. मुंबईतले घरही भाड्याने द्यायचे ठरविले होते. दोघांचे चार झाले. वाडा परत हसायला लागला. मुलाच्या कंपनीने थोडेफार पैसे दिले होते. त्याने घराची डागडुजी केली. अंगणात भाजी पिकवली आणि ती आजोबा-नातू आजूबाजूला विकू लागले. जमेल तेवढे ऑनलाईन क्लासला मुलगा बसायचा. जे काही नारळ मिळाले ते विकले. बायकोच्या बरोबरीने, सून आणि नातवाला बरोबर घेऊन परत नंदनवन फुलवले. सरकारकडून जे काही मिळालं त्यातून वाड्याची दुरुस्ती करुन एक भाग हॉटेलमध्ये रुपांतरीत केला. सुनेने सोशल मीडियावर त्याची जाहिरात केली. मैत्रिणींना फॉरवर्ड करायला सांगितले आणि बघताबघता लॉकडाऊन उठल्यावर पर्यटक आवडीने येऊ लागले. फक्त कुटुंबाला आणि ओळखीमध्येच राहायला देत असल्याने निर्धास्तपणे पाहुण्यांची उठबस ठेवत.


       निसर्गरम्य परिसर, शांत वातावरणात पौष्टिक-स्वादिष्ट घरचं जेवण, झोपाळा, खेळायला जागा, लाघवी बोलणे आणि चौघांची मेहनत यामुळे पर्यटक येत होते. सोमनाथ व सीमाने दुःखातही सुखाने संसार चालू ठेवला. स्वतःचा संसार थाटलाच पण सुनेलाही दुसऱ्या लग्नासाठी तयार केले. सून व नातवाला काही कमी पडू दिले नाही. मुलगा गेल्याचे दुःख होतेच. स्वत:चं दुःख विसरुन, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी सज्ज झाले होते ते चौघेहीजण!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy