Kavita Navare

Romance

1.0  

Kavita Navare

Romance

प्रेम हे!

प्रेम हे!

7 mins
1.5K


“Happy third anniversary Aru!", मी त्याच्या पाठीवर ओठ टेकवत म्हटलं. त्याची हलकेच थरथर मला जाणवली. मान वर उचलून मी त्याच्याकडे बघितलं तर बंद मिटल्या डोळ्यातूनही मिश्किल भाव लपत नव्हता. विस्कटलेले केस, पाठीवरचा तीळ आणि झोपेतही चेहऱ्यावर असलेल एक मिश्किल हसू … परत नव्याने त्याच्या प्रेमात पडायला लावतं मला हे दृष्य.


त्याने कूस बदलून मला लपेटून घेत, “happy anniversary to you too love!" अस म्हणत माझ्या ओठावरुन हलकेच बोट फिरवलं तसं कालच्या रात्रीच्या आठवणीनेही माझं अंग शहारलं.


लग्ना आधीची चार आणि लग्नानंतरची तीन अशी सात वर्ष झाली आमच्या प्रेमकथेला पण या प्रेमाची नशा काही कमी होत नाही. अजूनही त्याच्या नजरेत अडकायला होतं अगदी पहिल्या भेटीत झाल होत तसच.


पहिली भेट … आई बाबा ताईकडे रहायला गेले होते. जाताना, “बनेकाकूंचा भाचा आला कि त्यांच्या घराची किल्ली दे आणि माणूसघाणेपणा न करता बोल त्याच्याशी” अशा सुचना चार चार वेळा देऊन गेले होते. खरतर मला राग आला होता त्या ‘माणूसघाणं’ शब्दाचा.


मला ताईसारखे भरमसाठ मित्र मैत्रिणी नाहीत, 'माझा माझा' असा खास गृपही नाही. मला एकूणच वेळ लागतो मैत्री करायला हे सगळं मान्य आहेच मलाही. पण म्हणून माणूसघाणं म्हणण्या इतकीही वाईट परिस्थिती नव्हती माझी. पण असो! आमच्या मातोश्री अशाच बोलत आल्यात माझ्याबाबतीत पहिल्यापासून म्हणत देऊ सोडून आणि मुद्याचं बोलू.


हम्म्! तर भेटीबद्दल बोलत होतो आपण. रविवारची सकाळ होती. दारावरच्या बेलने जाग आली. मी घरातल्या गबाळ्या अवतारातच जाऊन दार उघडलं आणि समोर 'अरु'. म्हणजे त्याच नाव 'अरुण' आहे हे नंतर कळलं आणि 'अरुणवरुन अरुवर' गाडी यायला अजून बराच काळ मोडला पण पहिल्या भेटीतच त्याच देखणेपण कोरलं गेलं हे मात्र नक्की.


तर असा हा 'अरु' माझ्यासमोर दारात उभा. ५.८ उंची, रफल्ड केस, ब्ल्यु डेनीम ब्लॅक टिशर्ट. दोन तीन दिवसांनंतर दाढी केल्यावर एक हिरवट झाक येते गालावर तशी झाक असलेला चेहरा आणि मिश्किल हसणारे डोळे. या नजरेत काहीतरी वेगळीच जादू होती. सांगता येत नाही नक्की काय? आणि कसं? पण त्याची नजर बांधून ठेवणारी होती. आजही तशीच आहे म्हणा.


आमच्या कॉलेजमधेही हॅन्डसम मुले होती. काही परत परत लक्ष वेधून घेण्याइतकी देखणी होती. आकर्षणाची जाणीव हळूहळू होत होती नाही अस नाही. त्यातल्या काहींवर जरा जरा क्रशही व्हायला लागला होता पुसटसा. पण अरु ज्यावेळी समोर आला त्यावेळी बाकी सगळे चेहरे एका फटक्यात पुसले गेले. तो आणि फक्तं तोच, बाकी कोणी उरलच नाही तनामनावर राज्य करणारं. हे अर्थात लक्षात नंतर आलं इतक्या तीव्रपणे पण त्यावेळी मात्र ’धडकन जरा रूक गयी है।’ गाण्याच्या ओळींसारखी अवस्था झाली होती.


आणि खरं सांगायचं तर त्याच्यापुढे मला माझ्या अवताराची लाजच वाटली होती एक क्षण. मी पटकन आत वळायच्या विचारात असतानाच त्याने “किल्ली .. ?” अस म्हणत हात पुढे केला आणि हाच तो ‘बनेकाकूंचा भाचा’ अशी माझी ट्यूब पेटली. त्याला बसायला सांगून मी आतून किल्ली आणून दिली. “बनेकाकूंना इतका हॅन्डसम भाचा आहे हे माहितीच नव्हत”, असा विचार करतच मी त्याच्यापुढे किल्ली धरली. त्यानेही हसून ती घेतली. किल्ली घेताना त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि काहीतरी झटका लागल्यासारख झालं. धडधड जोरात व्हायला लागली. आता हा अजून पाच मिनिट जरी राहीला तरी आपल काही खर नाही अस वाटून गेलं, पण तो जाऊही नये लवकर असही वाटत राहीलं.


“पाणी..?” त्याने किचेन तर्जनीत अडकवत आणि प्रवासाने शिणलेले खांदे स्ट्रेच करत म्हटलं.


मी खरतर विचारायला हवं होतं पाण्याचं पण त्याऐवजी त्यानेच माझ वाक्य बोलून घेतलं. पाणी दिलं पण चहा घ्यायला थांबवाव का हे ठरवता येत नव्हत. शेवटी नाहीच थांबवलं. पाणी पिऊन बाय म्हणून अरु गेला निघून. मला मात्र दिवसभर किल्ली देतानाच्यावेळेचा स्पर्श आठवत राहीला.


तो गेल्यावर मी परत झोपून स्वप्न पहायचा प्रयत्न केला पण तो गेला ते झोप उडवूनच.

नंतर त्याच्या हुशारीबद्दल आईकडून समजलं. तो इथे नोकरीच्या निमित्ताने आलाय हे ही कळलं. दरम्यान आम्ही येता जाता बघायचो एकमेकांना. इन्फॅक्ट काही दिवसांपासून आमच्या बसच्या वेळाही मॅच व्हायला लागल्या होत्या. म्हणजे माझी वेळ फिक्सच होती आधीपासून पण त्याच्या ऑफीसची वेळ बहूतेक बदलली असावी. काही का असेना पण आम्ही अधूनमधून एका बसला असायचो सकाळचे. माझ्या कॉलेजच्या स्टॉपनंतरच त्याचा स्टॉप येत असावा कुठेतरी. माझ्या बाजूला तो बसला तर… स्वप्नरंजन करण्यात माझा वेळ बरा जायचा. पण बहूतेकवेळा त्याला पाठची सीट मिळायची. एकाअर्थी बरही होतं ते. तो बाजूला बसलाच येऊन तर मला त्याच्याशी काय बोलाव सुचेलच याची खात्री नव्हती. स्वप्नरंजनातच माझी धिटाई फक्तं. प्रत्यक्षात तो समोर आला कि माझ्या हाताला घाम फुटायचा.


त्यादिवशी उशीर झाल्याने त्याने पळत येऊन बस पकडली. नेमकी माझ्या बाजूची जागा रिकामी होती. त्यादिवशी तो माझ्या बाजूला येऊन बसला. पळत आल्यामुळे त्याचा ऊर धपापत होता. घामाचे थेंब दिसत होते. चेहरा गुलाबी लाल झाला होता. त्यादिवशी मला त्याच्या गालावरची खळी नीट दिसली. एखाद्या पुरुषाला खळी इतकी खुलून दिसते हे पहिल्यांदाच जाणवलं मला. त्या खळीतून नजर हटत नव्हती पण मला त्याच्याकडे तस बघतही रहायच नव्हत. माझा नर्व्हसनेस मला दाखवायचा नव्हता आणि लपवताही येत नव्हता. अरु मात्र त्याचं नेहमीच मिश्किल हसू घेऊन माझ्याकडे बघत होता. त्यानेच बोलायला सुरवात केली. काय बोललो ते आठवत नाही मला. तसही सुरवातीला मला नसेलच जमलं एकही वाक्य धड बोलायला.पण हे आठवतय की बोलणं संपूच नये अस वाटत होतं.


त्यानंतर मात्र अशा बऱ्याच वेळा आल्या आणि मग हळूहळू मला खळीपलीकडे बघत त्याच्याशी बोलायला जमायला लागलं. आमच रेग्युलर बोलणं सुरु झाल. फोन नंबर एक्स्चेंज झाले. ‘वेळा’ जास्त वेळा मॅच व्हायला लागल्या. माझी सुरवातीची भिती कमी होऊन कधीतरी आपणहून त्याचा हात धरण्यापर्यंत माझी प्रगती झाली. मला आवडायच त्याच्याशी गप्पा मारणं, त्याला पहाणं. मला तो आवडला होता हे समजत होतं पण तरी ते स्वत:पाशी कबूल करायची मात्र हिंमत होत नव्हती. त्याला हे कळू देणं तर लांबचीच गोष्टं.


त्याची मैत्री माझ्यासाठी 'खास' होती. प्रेम व्यक्त करुन मैत्री तुटली तर? ही भिती दिवसेंदिवस मनात वाढत होती. हे जाणवू न देण्यासाठीच्या खटपटीत वावरताना तारांबळ उडत होती. माझी बदललेली बॉडी लॅंग्वेज त्याने ओळखली. त्याने विचारलही त्याबद्दल पण मी हसून टाळलं.


कॉलेज संपल्यानंतर कॅम्पस इंटर्व्ह्युमधून मला नोकरी लागली आणि आमच्या वेळा मागेपुढे व्हायला लागल्या. दरम्यान त्याने ऑफीसजवळ रेंटने जागा घेतली. आता रोज भेटणच काय पण दिसणही दुरापास्त झालं पण फोनकॉल्स आणि मेसेंजरमुळे किमान खबरबात लागायची. खूप गप्पा मारायचो आम्ही मेसेन्जरवर. भरपूर वेगवेगळ्या विषयांवर बोलायचो. एकमेकांची मतं जाणून घ्यायचो. कधी क्वचित सोसायटीच्या कार्यक्रमानिमित्त भेटीही व्हायच्या आमच्या. कधी आम्हीच कॉफी डेटवर भेटायचो. पण तरी अजूनही माझ्या भावना माझ्यापाशीच लपवून ठेवल्या होत्या मी. कधी वाटायचं बोलावं मोकळेपणाने पण भितीही वाटायची नकाराची आणि त्याहून जास्त मैत्री गमवायची. एकीकडे वाटायचं त्यानेच विचारावं मला.


एक दिवस विषय लग्न, प्रेम वगैरेचा निघाल्यावर गप्पांच्या ओघात मी त्याला "तू कसा कोणाच्या प्रेमात नाही पडलास इतक्या वर्षात?" असा प्रश्न विचारला तेव्ह, “यापूर्वी कोणी क्लिकच नव्हतं झालं” असं त्याने उत्तर दिलं. मी परत हिंट मिळते का बघावी म्हणून पुढे विचारलं “मग? आता झालय का कोणी क्लीक?” त्यावर, “you will get to know in a couple of days” असं उत्तर देत त्याने माझाच जीव टांगणीला लावला. मी परत परत विचारल्यावर ‘सांगेन पुढल्या कॉफी डेटला’ अस म्हणत विषय टाळला.


त्यानंतर दोन दिवस ऑफीसच्या कामात व्यस्त गेले. त्यादिवशी संध्याकाळी बनेकाकू आणि आई एकमेकींना फ़ेसबूक आणि व्हॉट्स ॲप वापरायला शिकवत होत्या. आईने दिलेला चहा घेत एकीकडे त्यांना फ़ेसबूक बघायला शिकवण्याचे पूण्यकर्म करत असतानाच माझं लक्ष अरुच्या डिपीवर गेलं. त्याने एका मैत्रिणीसोबतचा फोटो फेसबुक डिपीला लावला होता. त्या फोटोखाली पहिलाच रिप्लाय त्या मैत्रिणीचा होता – “best friends forever. You are a wonderful person, a beautiful soul with a brave heart .Love u besty”. त्या कमेन्टला त्यानेही लाईक केलं होतं. हे सगळं बघून कुणीतरी जोरात वार केल्यासारखे झाले. त्या फोटोवरुन लगेचच बनेकाकु आणि आईच गॉसिपिंग सुरु झालं ते ही माझ्याच समोर. त्यांनी तर मुंडावळ्या बांधून पार त्यांची वरातही इमॅजीन केली एका फ़ोटोवरुन. त्या दोघी तशाच आहेत म्हणा! पण माझा या प्रकारामुळे मूडच गेला. आधीच घरचे त्याच लग्न जमवायच्या मागे होते हे मला माहिती होतं त्यात आता या गॉसिपिंगने भर घातली. मी त्याला मेसेंजरवर 'याबद्दल' सांगून मुद्दाम ’अभिनंद’ पोस्ट केल्यावर त्याने नुसतं ’विंक’ स्मायली दिल्याने माझं इतकं डोकं फिरलं कि “कॉफी डे ला भेट मग बोलू” या त्याच्या मेसेजला मी, "गेट लॉस्ट" रिप्लाय दिला होता.


घरात दोघी अजूनही त्याच्या लग्नाबद्दल गॉसिप करत हसत खिदळत होत्या. आता मला तिथे बसवत नव्हतं. हे शांतपणे ऐकण्याइतका संतपणा माझ्यात नव्हता. मी ॲक्सेसला किक मारुन तिथून लांब जाणं पसंत केलं. डोक फिरलेल्या अवस्थेत स्पिडने गाडी चालवण म्हणजे अपघाताला आमंत्रणच हे कळत होत पण वळत नव्हतं. एका वळणावर गाडी स्किड झाली आणि मी अपघात ओढवून घेतला. त्याक्षणी मरण आल तर बरच अस वाटत होतं पण बहूतेक यमाच्या घड्याळात माझी वेळ लिहीलेली नव्हती तेव्हा.


मला कोणीतरी हॉस्पिटलमधे ॲडमीट केलं. कोणीतरी घरी कळवलं. आई आणि काकु दोघी बायकाच घरी असल्याने बहूतेक काकुंनी अरुला मदतीला बोलावलं. मी शुद्धीवर आल्यावर आई, "देवाजवळ दिवा लावून येते" असं म्हणत अरुला तिथे बसवून काकुंसोबत घरी निघाली. त्या गेल्या आणि त्या स्पेशल खोलीत आम्ही दोघेच उरलो. मी डोळे मिटून घेतले होते. मला हे माझ्याकडून असलेलं एकतर्फ़ी प्रेम संपवायचं होतं. मला त्याच्या डोळ्यात आत्ता तरी बघायच नव्हतं. बघितल असत तर माझा निश्चय टिकला नसता हे नक्की. अरुने माझा हात हातात घेतला. मला हाक मारुन त्याच्याकडे बघायला भाग पाडलं. त्यादिवशी पहिल्यांदा मला त्याच नेहमीच मिश्किल हसू दिसल नाही चेहऱ्यावर.


"Why are you so careless? तुला काही झाल असतं तर .. You are my life.” त्याच्या डोळ्यात मी पहिल्यांदा पाणी तरळलेल बघितलं. “It was you mad. मी तुझ्याच प्रेमात पडलोय. हेच सांगणार होतो कॉफ़ी डेटला.” माझा हात हातात घेऊन बोलताना तो लिटरली थरथरत होता.


पहिल्यांदाच मी काही धाडसी कृती केली. माझ्या हातातल्या त्याच्या हातावर मी हलकेच ओठ टेकवले. आम्ही दोघेही रडत होतो मुक्तपणे आणि त्या रडण्यातूनच आमच नातं त्यावेळी व्यक्त होत होतं मुक्तपणे.


आज आमची तिसरी ॲनिव्हर्सरी आहे. टोटल सात वर्ष झाली आमच्या नात्याला. लग्ना आधीची चार आणि नंतरची तीन. या सात वर्षात बरच काही सुटलं, सोडाव लागलं. आई, बाबा, ताई सगळ्यांनी साथ सोडली, विरोध केला पाठ फिरवली. घरातल्यांचा विरोध, समाजाचा विरोध, वाळीत टाकण्याची धमकी, कुत्सित नजरा… बरच काही घडल मधल्या काळात पण अरु माझा रॉक सॉलीड सपोर्ट होता, तेव्हाही आणि आत्ताही. त्याच्या कुशीत मला कालच्या इतकच आश्वस्थ वाटत आजही. त्याच्या नजरेत आजही अडकायला होतं. आत्ताही त्याच्या कुशीत झोपल्यावर त्याच्या खळीकडे ओढले जातात ओठ. 


“कसा रे प्रेमात पडलास माझ्या? तुझ्यासारखी उंची, खळी काहीच नाही माझ्याकडे. तरी कसा प्रेमात पडलास?” मी त्याच्या विस्कटलेल्या केसांना अजूनच विस्कटत नेहमीचाच प्रश्न केला.


त्यानेही नेहमीसारखच माझं नाक चिमटीत पकडत “वेडा आहेस तू समीर. You are my life.” अस उत्तर दिल आणि मी परत त्याच्या नजरेत विरघळून गेलो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance