Shrikant Nikam

Romance

3  

Shrikant Nikam

Romance

पहिली भेट

पहिली भेट

5 mins
1.7K



बरोबर ५ वाजता तो स्वारगेटहून पिएमटी गाडीत बसला. ५:४५ ते ६:०० हे १५ मिनिटे गाडी डेक्कनला ट्रॅफिकमध्ये अडकून पडली. आणखी वेळ लागणार होता म्हणून आरवने तिथून उतरून घेतले आणि बालगंधर्वपर्यंत तो पळत निघाला. आज खुप दिवसांची त्याची इच्छा पूर्ण होणार होती.


छत्रपती संभाजी गार्डनच्या थोडे पुढे गेल्यावर त्याला बालगंधर्वच्या गेटवर एक मुलगी स्कार्फ बांधून उभी असलेली दिसली. ती ओवीच असणार याची पक्की खात्री असल्यामुळे आरव तिकडे जायला निघाला. एव्हाना लोहाराच्या भात्यासारखं त्याचं हृदय धपापायला लागलं होतं. अगदी काही पावले अंतर बाकी असताना आरवच्या लक्षात आलं की, तिच्याशेजारी आणखी दोन माणसे उभी आहेत. कदाचित ही कोणीतरी दुसरीच मुलगी निघायची अन त्या आडदांड माणसांचा महाप्रसाद खावा लागायचा या विचाराने आरव तसाच मागे फिरला. त्या मुलीची नजर अजूनही खालीच होती. थोडे मागे येऊन आरवने ओवीला मेसेज केला,

"तोंडाला फडकं बांधून गेटवर तूच उभी आहेस का?"


लगेचच रिप्लाय आला.

"Excuse me! त्याला स्कार्फ म्हणतात आणि मागचे २० मिनिटे मी इथे वेड्यासारखी वाट बघत उभी आहे."


खात्री झाल्यानंतर आरव पुन्हा तिच्याकडे जायला निघाला. काही वेळापुर्वीचे ते २ आडदांड माणसे आता तिथे दिसत नव्हते. आरव तसाच तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि "हाय" बोलला. ओवीच्या डोळ्यात आनंदाचे भाव उमटले.


"किती वेळ रे....?" एवढं बोलून तिने तोंडाचा स्कार्फ काढला.


"ओवी….."


आयुष्यात एखाद्या गोष्टीचं नेहमी स्वप्न पाहावं आणि जेव्हा ते स्वप्न प्रत्यक्षात घडतं तेव्हा काय करावे ते सुचू नये हा माणसाचा गुणधर्म आरवच्या बाबतीत खरा ठरत होता.


साधारण साडे पाच फूट उंची, अंगाने नाजूक, व्यवस्थित बांधलेले केस, आत्म्यापर्यंत पोहोचणारी तिची नजर बघूनच आरव खुश झाला. ओवी त्याला खुप आवडली होती. तो सारखा तिच्याकडे बघत होता.


"इथे उभे राहण्यापेक्षा त्या कठड्यावर बसुयात का?" तिच्या प्रश्नाने तो भानावर आला.


अचानक गुलाबाची आठवण झाली म्हणून त्याने मागच्या खिशात हात घातला पण गुलाब सापडला नाही. बहुतेक डेक्कनवरून पळत येताना रस्त्यात फुल कुठेतरी पडले असावे. आरवला स्वतःचाच राग येऊ लागला.


ओवीचे सौंदर्य पाहूनच आरव घायाळ झाला होता. काय बोलावे हे त्याला कळत नव्हते. कठड्यावर बसताना त्याने मुद्दाम ४-५ फुट अंतर सोडले होते.


"ए वेड्या, इतक्या लांब बसशील तर बोलणं तरी ऐकू येईल का?" असं म्हणून ओवी हसायला लागली.


इतके दिवस आरवने ओवीला हसताना ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात तिला हसताना बघणे यात वेगळाच आनंद होता. मनात विचारांची मालिका चालू असली की तोंडातून शब्द बाहेर निघत नाही या अनुभवातून आरव पहिल्यांदा जात होता. फोनवर बडबड करणारा मुलगा, समोर आल्यावर एकदम शांत, अंग चोरून बसलाय हे पाहून ओवीही सुखावली होती.


पावणे सहा फुट उंचीचा, अंगापिंडाने मजबूत, वाऱ्यासोबत भुरभुरणारे डोक्यावरचे केस अन मनात जे आहे ते दाखवणारे बोलके डोळे असा आरव तिच्या मनात भरला होता.


"प्रत्येक वेळी मुलींना भेटल्यावर असाच शांत बसतो का?" ओवीने संभाषणाला सुरूवात केली.


"मुलींना भेटायचा अनुभव असता तर शांत बसलोच नसतो. हा माझा पहिलाच अनुभव आहे."


आरवने कसेबसे उत्तर दिले.


मनातून आरवलाही वाटत होते की स्टाईलमध्ये बोलावे, ओवीला इम्प्रेस करावे. पण तोंडातून शब्द का फुटत नव्हते हे त्यालाही कळत नव्हते. तो फक्त ओवीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. मनात खुप काही असूनही आरवला बोलता येत नव्हते. पण ओवी त्याला खुप आवडली होती.


तिचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती ज्या पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करायची ती अदा त्याला खुप भावली होती. पुण्यात जन्म झालेली, पुण्यातच वाढलेली एक मुलगी इतकी साधी असू शकते, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. पंजाबी ड्रेस घातलेली, कोणताही मेकअप न केलेली पण तेवढीच सुंदर आणि मोहक ओवी तो बघत होता. आज आरवला त्याच्या असण्यावर गर्व वाटत होता.


बऱ्याच वेळानंतर आपणही काहीतरी बोलायला पाहिजे असे वाटल्यामुळे आरव ओवीला, "तुझे मामा कुठले? शेती किती?" असे संदर्भहीन प्रश्न विचारायला त्याने सुरूवात केली. त्याच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर ओवीचे हास्य वाढू लागले.


एखादा तास झाला नसेल तोच ओवी उठून म्हणाली, "आता मला निघायला हवं. नाहीतर घरी पोहोचायला उशीर होईल."


मनात असूनही आरव तिला थांबवू शकला नाही. एकतर पहिलीच भेट, त्यात आतापासूनच थांब असं म्हणायला लागलो तर नंतर ती भेटणार नाही ही भिती त्याला वाटू लागली. आरव कोणत्या विचारात गढला गेलाय याचा अंदाज बहुतेक ओवीला आला.


उठून आरवच्या समोर हात करत, "तुला भेटून खरंच खुप छान वाटलं" असं म्हणाली. आरवने नकळत आपला हात पुढे केला. आज देव आरववर खुपच जास्त खुश होता. म्हणूनच एकामागुन एक सुखाचे धक्के त्याला बसत होते.


पहिल्या स्पर्शाची भावना शब्दात मांडणे अशक्य असते. जे शब्दातून शक्य नसतं ते स्पर्शातून बोललं जातं हेच खरं.


कधीकधी एखाद्या साध्या स्पर्शातूनही आत्मा त्रूप्त होतो याचा प्रत्यय आरव घेत होता.


असंच एखाद्या मंदिरात जाऊन ओवीसोबत सरळ लग्नच करून टाकावं हा विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला. पण ही फक्त सुरुवात होती.


संयम ठेवणे यासारखा पुरुषार्थ दुसर्‍या कशातही नसतो. आततायीपणामुळे घेतलेले निर्णय खुप महागात पडतात हे त्याला चांगलंच माहित होतं.


दोघेही पीएमटी स्टॉपकडे जायला निघाले. कोथरूडची डायरेक्ट बस कॉर्पोरेशनवरून निघायची. तिथे गेल्यावर बसायला जागा भेटतेच त्यामुळे दोघे चालत चालत कॉर्पोरेशनकडे वाटचाल करत होते. ओवीसोबत चालणे यातही केवढा आनंद होता आरवला. आयुष्यभर अशीच हिची सोबत राहू दे एवढंच मागणं तो मनातल्या मनात देवाकडे मागत होता.


"पुढच्या वेळी असा शांत बसणार असशील तर मी तुला भेटणारच नाही."


ओवीने असं बोलल्यावर आरव जागेवरच थबकला. चेहऱ्यावरचे आनंदी भाव लुप्त होऊन क्षणार्धात त्याचा चेहरा रडवेला झाला. ओवीची नजर त्याच्या चेहऱ्यावर पडताच रस्त्यावरच ती मोठमोठ्याने हसायला लागली.


"मी सहज बोलले रे. तू बोलावंस म्हणून."


तिने आरवची समजूत काढायला सुरुवात केली.


आरवही, "नाही नाही, पुढच्या वेळी तुला बोलायचा चान्सच देणार नाही." असं बोलत होता.


"आज तुझी कोथरूडची बस आलीच नाही तर?" आरवने असं म्हणताच ओवीने त्याच्या पाठीत एक चापट मारली अन "शहाण्या माणसाने नेहमी शुभ बोलावं" असं म्हणाली.

दोघांच्याही मनात गुदगुल्या होत होत्या.


माणसाच्या शरीरात न दिसणारा अवयव म्हणजे मन. डोळ्यांना दिसत नसला तरी माणसाच्या घडामोडीत सर्वात सक्रिय अवयव तोच. दुसऱ्या कोणत्याही अवयवापेक्षा मनाचे सुख महत्त्वाचे असते. ते मिळवण्यासाठीच माणसाचा लढा चालू असतो, आयुष्यभर.


कॉर्पोरेशनला पोहोचताच 'कोथरूड' ची बस दिसली. आजपर्यंत कधीही वेळेवर न मिळणारी बस आज आधीच उभी होती हे पाहून आरवच्या मनात बसचा निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम चालू झाला.


ओवीला बसमध्ये चढताना पाहून काळजात कुठेतरी चर्रर्रर्र झाल्यासारखं त्याला वाटू लागलं. बस निघून गेली तरी आरव बसकडेच बघत होता.


तिला भेटण्याचा जेवढा आनंद होता तेवढंच दुःख एका गोष्टीचं होतं, ते म्हणजे तिला जाताना बघणे. काही मिनिटांपूर्वी असणाऱ्या भेटीच्या आनंदाने आता विरहाच्या दुःखाची जागा घेतली.


माणसाचे मन पण खुप चमत्कारिक असतं. हातात गोष्टी हव्या असतात पण त्यासाठी आधीचं सोडायची त्याची तयारी नसते.


युद्ध जिंकलेला एखादा पराक्रमी राजा ज्या आवेशात चालतो तसाच काहीसा आरव चालत होता. सिगारेट पेटवल्यावर बंद पडलेला डोक्याचा भाग पुन्हा चालू लागला. तितक्यात त्याला आठवले की गिफ्ट द्यायचेच विसरलो.


त्याच्या स्वतःबद्दलच्या रागाच्या भावना तीव्र होत असतानाच फोनची मेसेज टोन वाजली.


“तुझ्याशी भेटून खरंच खुप छान वाटलं. तुझे डोळे तुझ्यापेक्षा जास्त बोलतात."


एकदा मेसेज वाचून समाधान झाले नाही म्हणून आरवने तो मेसेज पुन्हा-पुन्हा वाचला. त्याच्या डोळ्यांबद्दल असं काहीतरी बोलणारी 'ओवी' पहिलीच मुलगी होती.


प्रेमाचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की माणूस, मग ती स्त्री असो किंवा पुरुष; स्वतःवर प्रेम करायला लागतो. समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करते म्हणून स्वतःचा आदर करायला लागतो. इतके वर्ष अगदी सामान्य वाटणारा 'मी' अचानक स्पेशल होऊन जातो.असंच काहीतरी आरवच्या बाबतीत घडत होतं.


आरवची बोटे एव्हाना रिप्लाय करण्यासाठी धडपडत होती, त्या बोटांपेक्षा मनाची धडपड खूप जास्त होती.


"तू इतकी सुंदर असशील असा विचारच मी केला नव्हता. त्यामुळे तुला बघितल्यावर माझी दांडी गुल झाली. बोलायचं काय, मी तर तुला बर्थडे गिफ्ट द्यायलाही विसरलो."


आरवने रिप्लाय पाठवला. बर्थडे गिफ्ट पुढच्या भेटीत द्यायचे ठरले.  



Rate this content
Log in

More marathi story from Shrikant Nikam

Similar marathi story from Romance