पावसातली कविता... एक पूर्ण चित
पावसातली कविता... एक पूर्ण चित


"पावसातली कविता" याच विषयावर आज काही कविता सादर करायची संधी त्याला मिळणार होती. तसा तो रोमँटिक कवी म्हणून प्रसिद्ध होताच. कॉलेजच्या मासिकात एखादी कविता हमखास असायची. ती आवडली असे कळविणारी पत्र येत राहायची.. आठवडाभर. मग अधिक चांगली कविता लिहायला उत्साह यायचा.पण कविता स्वतः एखाद्या मंचावर सादर करायला मिळावी अशी इच्छा होती.. ती आज पूर्ण होणार होती.... हळव्या प्रेमाची ,पावसातल्या मैत्रीची...अशीच एखादी कविता तो सादर करणार होता.
आठवडाभर झाले... पुनर्वसु नक्षत्र सुरू झाले होते. पाऊस चांगला पडत होता. कविता सादर करण्यासाठी एक खास कविता निवडली त्याने...तो स्वतःच्या कविता फारश्या पाठ करायचा नाही... पण सुरुवात झाली की सगळी कविता आठवायची....संगतीने. कवितेच्या डायरीत त्याचा जीव होता. म्हणून तर पावसाळ्यात डायरी ऐवजी एका कागदावर कविता लिहून घेतली. कागद छान घडी करून एका पाऊचमध्ये ठेवला. चालत बस स्टँडवर जातानाही तो कविता सादरीकरणात हरवला होता... घरापासून जवळच बसस्थानक होते... छत्री न घेताच निघाला. पाऊस नव्हता पण कधीही पडेल असे वातावरण. गावातील बसने तो तालुक्यातील स्टँडवर उतरला. घरी चहा घेण्यापेक्षा स्टँडवर त्या टपरीवर कटींग चहा प्यायला आवडायचे त्याला. पावले आपोआपच वळली टपरीवर...
"एक कटींग"
असे म्हणायला आणि "ती" दिसायला एकच गाठ पडली. दोन वर्षे झाली.... एकाच वर्गात असूनही एकदाही न भेटलेली ती. आज चक्क आवडीच्या ठिकाणी दिसली... नेहमीच्या मैत्रिणी नव्हत्या सोबत... तिला चहा विचारावा असे वाटले पण धाडस केले नाही... आज महत्त्वाचा दिवस आहे... उगाच खराब जायला नको असा विचार करून तो चहाचा आस्वाद घेऊ लागला... तिनेही कटींग आणि डोनट मागविले होते. चोरुन त्याच्याचकडे पाहात उभी होती... त्याच्या कविता खूप आवडायच्या तिला. खूपदा मनात येऊनही पत्र किंवा प्रत्यक्ष सांगायची इच्छा आजही मनातच होती... आता भेट झालीच आहे तर बोलावे का या विचारात ती त्याच्याकडेच पाहात होती. दोघांनी एकमेकांना पाहिले... क्षणभरच. तो वरमला.नजर फिरवून कटिंगचे पैसे काऊंटरवर ठेवून लगबगीने बाहेर पडला... कॉलेजच्या दिशेने चालू लागला.
बस स्टँडपासून कॉलेज अगदी जवळ नव्हते.. पण चालतच जायचेत सर्व. तोही एकटाच चालला होता. पहिल्या तासानंतर "पावसातली कविता" कार्यक्रम होणार होता. पाऊस नव्हता आणि आला तर भिजून चालणार नव्हते. वाटेवर एक "कॉर्नर पॉईंट" सोडला तर एकही आडोसा नव्हता. चुकून पाऊस आला तर सगळे बिघडले असते. तो गडबडीने चालला होता. थोडावेळ गेला नसेल आणि हलक्या सरी सुरू झाल्या... नशीब चांगले म्हणून "कॉर्नर पॉईंट" जवळच होता. धावतच तिथे जाऊन उभा राहिला. एक त्रिकोणी छोटीशी शेडवजा जागा... जेमतेम तीनचार लोक मावतील एवढी.आतापर्यंत थांबवलेले विचार पुन्हा सुरू झाले. मघाशी तिला पाहून आपण इतके का वरमलो..? ती आणि तिची चित्रं किती आवडतात आपल्याला. पण कसली भिती वाटते कुणास ठावूक. आज योग चांगला आला होता. बोललो असतो तर बरे झाले असते.... पण तिला आवडले नसते तर..? पण ती तर माझ्याकडेच पाहत होती... म्हणजे किमान मी पाहिले तेव्हा तरी.... पण म्हणून का मी तिला आवडत असेल??? दोन वर्षात एकदा तरी बोलली असती.
मनात विचारांचा आणि बाहेर पावसाचा जोर खूपच वाढला. तिचे "ते" चित्र त्याच्या डोळ्यासमोर तरळले. गुलमोहराच्या झाडाखाली एक सुंदर जोडपे. फुलं नसूनही हिरव्याकंच पानांनी गच्च ...इवल्या इवल्या थेंबांनी नाहू घालत होते.... त्या दोघांना. ती मिठीत नव्हती पण दिठीत होती त्याच्या... तिची नजर जमिनीवर आणि त्याची तिच्या डोळ्यांत..... गुलमोहोर सचैल नाहू घालत होता दोघांना... तनचिंब... मनचिंब. याच चित्रावरून सुचलेल्या कवितेचे वाचन तो आज करणार होता. म्हणून तर मासिकात दिली नव्हती ती कविता.
"चपाक....धपाक...चपाक"
आवाज ऐकून तो भानावर आला... ती वळणाची जागा होती... कुणीतरी खूप जोरात इकडेच धावत येते आहे आणि पाण्यात पडणाऱ्या पावलांचा आवाज आहे इतके कळले... नजर वाटेकडे लावून तो पाहू लागला. काही क्षणातच एक मुलगी खूप जोरात पळत येते आहे असे दिसले. नुकताच पाहिलेला ड्रेस.... हो. "ती" च होती ती. हातात छत्री अस्ताव्यस्त मिटलेली. ओढणी तिरपी बांधलेली. आणि दुसऱ्या हातात काही तरी वस्तू अगदी प्राणपणाने छातीशी जपलेली... चिंब चिंब झालेली. तिची नजर "कॉर्नर पॉईंट"कडे गेली आणि क्षणभर जागीच थांबली ती....ब्रेक मारल्यासारखी.काहीतरी मिळाल्याचं समाधान स्पष्ट दिसत होते ओघळणाऱ्या शुभ्र थेंबासारखे. ती "कॉर्नर पॉईंट" कडे आली.... किती भिजली होती आणि कपडे तर खूपच खराब झाले होते. त्याचे कुतूहल जागे झाले पण पाऊस पडतो आहे म्हणून इथे येत आहे असेही वाटले. ती त्याच्या जवळ आली आणि पहिल्यांदा तिचा आवाज ऐकला त्याने
"कवी महाशय....हा तुमचा पाऊच तुम्ही चहाच्या टपरीवर विसरून आलात...मी पैसे देण्यासाठी गेले तेव्हा चहावाला मला तो तुमचा आहे म्हणाला"
"अ....च्...छा" इतकेच कसेबसे तोंडातून बाहेर पडले त्याच्या. खरेतर ती इतकी प्रचंड भिजूनही स्पष्ट बोलत होती... पण हा कोरडा असूनही कुडकुडल्यासारखा बोलत होता. ती सहज आणि सुंदर हसली.... अगदी चित्रातील तिच्यासारखी.म्हणाली,
"आज तुमच्या कवितेच्या सादरीकरणाचा कार्यक्रम आहे. मघाशी तुमच्या हातात दुसरे काहीच दिसले नाही... तेव्हा लक्षात आले की या पाऊचमध्ये महत्त्वाचे काही तरी... कदाचित कविता असू शकते... तुम्ही जाऊन फार वेळ झाला नव्हता म्हणून मागोमाग आले....पण मध्येच पावसाने गाठले. आणि तारांबळ उडाली"
"अहो.... पण....तु म्ही छत्री मिटवून भिजत का आलात"?
एका दमात बोलून गेला.
"अहो पावसात तारांबळ उडाली आणि..... छत्रीही😊"
ती पुन्हा हलकंसं हसली... किती गोड दिसायची...
"बरं हा तुमचा पाऊच घ्या... आणि निघा लगेच.... मी काय या अवतारात येऊ शकत नाही... वेळ खूप गेला आहे पावसात पहिला तास संपत आला असेल... पाऊस थांबलाय तोपर्यंत निघा....तुमची कविता ऐकायची होती.... पण पुन्हा कधीतरी.... कदाचित योग नसेल आज."
तिच्या शेवटच्या वाक्याने त्याच्या ह्रदयाची तार छेडली.. पाऊस थांबला होता पण हा भिजून गेला...तिच्या शब्दांच्या पावसात. तिच्या ओठांवर हासू आणि काहीतरी चुकणार याची नाराजी एकत्रच दिसत होती... काही तरी निश्चय करून तो म्हणाला....
"कविता ऐकायला आवडेल...?"
"आत्ता..."?
"इथे"
तिने मानेनेच नकार दर्शविला..
तो म्हणाला,
" पाऊच उघडून तर पाहा...माझी इच्छा म्हणून"
तिने ओलेत्या हातांकडे पाहिले.... त्याने खिशातून रुमाल काढून समोर धरला... तिने हात कोरडे केले आणि पाऊच उघडला. एक पांढराशुभ्र कागद... त्यावर दोनच ओळी....आणि आत एक फोटो होता.... तिच्याच सर्वात सुंदर चित्राचा फोटो... पण कविता तर दोनच ओळींची...मग सादरीकरण काय आणि कसले करणार हा....तिला प्रश्न पडला आणि वर पाहिले.
तो गालात हसत होता... तिला उत्तर मिळाले होते.
"पाऊस सोहळा भिजल्या नजरेचा
चित्रात चिंब छंद त्या दोन ओळींचा".
..........
..........
.........."
त्याने तो कागद घेतला आणि गुडघ्यावर बसला. तिच्या गालावर अजूनही काही थेंब चमकत होते... मोतीया.
तो कागद तिच्या समोर धरला आणि आता मात्र स्पष्ट बोलला....,"माझी कविता होशील का"?
आतापर्यंत बिनधास्त आणि सहजपणे बोलणारी ती आता लाजून चूर झाली होती.... गालावर गुलाब फुलला होता.... तिच्या हातात तिच्याच चित्राचा फोटो होता... तिने तो त्याच्या समोर धरला....बोलून गेली... कुडकुडत,
....." माझे चित्र पूर्ण झाले.... माझा होशील का?"
कविता आणि चित्र एक झाले... दोघेही एकत्र आले आणि ओठांवर एकच कविता आपसूकच आली. कॉलेजच्या वाटेवरची पावलं पुन्हा चहाच्या टपरीकडे वळाली....
तिने कप आणि त्याने बशी ओठांना लावली...