नकळत सारे घडले
नकळत सारे घडले
"असे म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात..." फक्त ती वेळ यावी लागते तेव्हाच त्यांच्या भेटी होतात. भेटीतून असे काही घडते की त्यांचे जीवन बदलून जाते... असेच काही दिनेश आणि स्वाती यांच्या जीवनात घडले.
दिनेश आणि स्वाती दोघे पण एकाच शाळेत शिकलेले होते. फक्त स्वाती एक वर्षाने लहान असल्यामुळे ती एक वर्ष मागच्या इयत्तेत होती. पण शालेय जीवनात दोघांची साधी भेट पण झाली नाही. पुढे दोघांनी आपले शिक्षण पूर्ण करून चांगल्या हुद्याची नोकरी मिळवली. नंतर दोघांच्या घरात लग्नाचे विषय सुरू झाले होते. पण दिनेशने ठरवले होते की आधी नवीन घर बांधणार आणि नंतरच लग्न करणार म्हणून त्याने घराच्या कामाला सुरुवात पण केली होती.
अशाच एका संध्याकाळी दिनेश फेसबुक बघत होता. बघता-बघता सहज नजर त्याची स्वातीच्या प्रोफाइलवर गेली. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट घडायला वेळ यावी लागते, ती हीच वेळ होती. त्याने तिला मैत्री करायची विनंती पाठवली. काही दिवसांपूर्वी स्वातीच्या मैत्रिणीने दिनेशची प्रोफाइल तिला दाखवली होती. ती बोलली पण होती हा मुलगा तुला शोभेल. म्हणून स्वातीने पण ती विनंती मान्य केली. त्यानंतर दोघांचे संभाषण सुरू झाले.
सर्वप्रथम दोघांनी एकमेकांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर घरच्यांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर दोघं एकमेकांशी दिवस-रात्र बोलायला लागले. आठ-दहा दिवसात दोघंही एकमेकांना चांगले ओळखायला लागले होते. त्यानंतर एके दिवशी बोलता-बोलता दिनेशने लग्नाचा विषय काढला. तुला कसा मुलगा हवा आणि तुझी अपेक्षा काय आहे. स्वातीने पण सगळं बोलून टाकलं आणि हीच ती वेळ जेव्हा मंगेश बोलून गेला की, मग मी तुला नवरा म्हणून चालेल का? स्वाती समोर हे अचानक बोलून गेल्यामुळे त्याला पण कसे तरी वाटत होते. त्यानंतर स्वाती बोलली विचार करायला हरकत नाही पण आधी आपण भेटूया. खरं तर दिनेश तिच्या आधीच प्रेमात पडला होता म्हणून तर हे बोलून गेला.
भेटायचा दिवस ठरला आणि वेळ पण ठरली. दोघांना पण थोडा तणाव होता. कारण घरच्यांना न सांगता भेटणार होते. दिनेश भेटायच्या ठिकाणी जाऊन पोहोचला तर स्वाती तिथे आधीच आली होती. दिनेश तिच्या समोर जाऊन बसला. दोघे इतके घाबरलेले होते की एकमेकांकडे बघत पण नव्हते. शेवटी धीर करून स्वातीने बोलायला सुरुवात केली.
स्वातीने विचारले, तू आधी बोलतोस की मी बोलू?
दिनेश बोलला, तूच सुरुवात कर.
स्वाती सगळं बोलून गेली. त्यानंतर दिनेश पण सगळे बोलून गेला. पहिल्या भेटीत असे काही होईल असे दोघांना पण वाटले नव्हते. स्वातीची होणारी घालमेल दिनेशला जाणवली.
शेवटी स्वाती बोलली, निघुया का आता? मला वेळ होईल घरी जायला. माझे उत्तर तुला कळवते.
त्यानंतर दोघे बाहेर पडली. स्वातीने आपली गाडी चालू केली आणि सरळ निघून गेली. दिनेशला प्रश्न पडला ही अशी का निघून गेली.
इकडे दिनेश घरी आल्यावर त्याच्या मनात घालमेल चालूच होती की काय असेल तिचे उत्तर. पण इकडे स्वाती पूर्ण कोमात गेल्यासारखी झाली होती कारण पहिल्या भेटीत दिनेशने तिला गार केले होते. त्या धक्यातून बाहेर आली नव्हती. शेवटी दिनेशने धीर करून तिला विचारले, काय आहे तुझे उत्तर.
ती थोडी लाजतच म्हणाली, मी तयार आहे लग्नाला. हे ऐकून दिनेशचा आनंद गगनात मावेना इतका आनंद त्याला झाला. पण तणाव होताच तो म्हणजे घरच्यांचा!
दोघांनी ठरवले की घरच्यांना आजच्या आज सांगून टाकायचे. त्याप्रमाणे दोघांनीही घरी सांगून टाकले. घरच्यांना पण हा प्रकार ऐकून धक्काच बसला. त्यातून ते सावरले पण घरच्यांनी एक अट घातली की पत्रिका जुळली तरच आपण पुढे जायचे. हे ऐकून स्वाती आणि दिनेश यांचा तणाव आणखी वाढला. ठरल्याप्रमाणे स्वातीचे काका दोघांच्या पत्रिका घेऊन गुरुजींकडे गेले. इकडे ही दोघं देवाकडे साकडे घालत होते की सगळं चांगले होऊ दे. पण म्हणतात ना,ज्याच्या नशिबात जे असते ते त्याला मिळतेच तसेच घडले. पत्रिका उत्तम जुळली, अशी बातमी घेऊन काका घरी आले. लगेचच स्वातीने पण ही बातमी दिनेशला कळवली. दोघांच्याही मनासारखे घडून आले म्हणून दोघांनी देवाचे आभार मानले.
त्यानंतर दोन्ही घरांनी मिळून बैठकीची तारीख ठरवली. बैठक पार पडली. साखरपुड्याची आणि लग्नाची तारीख ठरली. ठरल्याप्रमाणे दोन्ही कार्य थाटात पार पडले. दोघांनीही थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन नवीन जीवनात सुरुवात केली.
म्हणूनच म्हणतात ते खरं की, जे एकमेकांसाठीच बनलेले असतात त्याला कोणीच वेगळे करू शकत नाही! अशा प्रकारे अरेंज केलेली लव्ह-स्टोरी सफल झाली.
शेवटी काय नकळत सारे घडून आले एकमेकांचे होऊन गेले!!