नि:शब्द
नि:शब्द
विनय खूप दिवसानंतर आज पहिल्यांदा भेटला होता. थोड्या उदास वाटणाऱ्या विनयला मी बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही केल्या बदलत नव्हते.
मी विनयचा हात हातात घेवून म्हणालो...
अरे विनय काय झालय तुला? तू बोलत का
नाहीस?
इतक्या दिवसानंतर भेटूनही तुझ्या चेहऱ्यावर उदासी का?
विनय कोणाच्यातरी आठवणीने व्याकूळ झाला होता हे मला जाणवत होतं.
मी म्हणालो...
घरी सर्व ठीक आहे ना?
मुलांच शिक्षण कसं चालू आहे? आणि हो, वहिनी कशा आहेत? पण विनयचे माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.
विनयच्या मनात कोणतीतरी घालमेल सुरु होती, पण तो काही सांगत नव्हता.
शेवटी मी रागारागानेच म्हणालो...
ठीक आहे, मला नको सांगू, पण तुझ दु:ख ज्या व्यक्तीला सांगून हलक होत, त्या व्यक्तीला तू सांग.
असे म्हणून मी रागारागाने तिथून उठलो.
‘थांब प्रशांत’
विनयने हाक मारली, पण मी थांबलो नाही.
विनय पाठीमागून आला आणि माझ्या गळ्याला पडून रडू लागला.
प्रशांत, आज सगळं काही असूनसुद्धा आईची पोकळी सतत मनाला सलत असते.
आज पहाटे पहाटे आईच्या आवाजाचा भास झाला आणि मी खडबडून जागा झालो.
तो आईचा प्रेमळ स्पर्श, आपुलकी,जिव्हाळा आता कुठला आलाय...
विनय आईच्या आठवणीने गलबलून गेला होता.
मी त्याला धीर देत म्हणालो...
विनय, किती दिवस असं आईच्या आठवणीने झुरत बसणार?
आई या जगात नाही हे वास्तव तुला स्विकारायलाच हवं.
विनय डोळ्यातील आसवांना आवर घालत म्हणाला...
तू किती नशीबवान आहेस आज तुझी आई तुझ्याजवळ आहे.
विनय, तुझ दुख मला कळतंय, आईची कमी कोणीच पूर्ण करू शकत नाही, पण यातून सावरण्याचा प्रयत्न कर. आई या जगात नाही, पण तुझ्या हृदयात तर नेहमीच राहील.
विनयला थोडे बरे वाटावे म्हणून, त्याला घेवून मी माझ्या घरी आलो.
खूप दिवसानं आलास रे, आईची आठवण येत नाही वाटत तुला?
विनयला चहा देत माझी आई म्हणाली...
विनयला गहिवरून आल्यासारख झालं.
चहा बाजूला ठेवून विनयने माझ्या आईच्या चरणावर माथा टेकला.
चरणावर ओघळलेले अश्रू बघून माझी आई विनयला म्हणाली...
मला कळतंय रे तुझ दुःख, मी आहे ना, नको काळजी करू.
असे म्हणून माझ्या आईने विनयला जवळ घेतले.
काही क्षण विनय आईच्या आठवणीत रमून गेला...
माझी आई मला म्हणाली,
होऊ दे त्याला मोकळ...
विनयला त्याच्या आईच्या आठवणी जाग्या करू दे, त्याशिवाय त्याला हलके वाटणार नाही.
आईच्या आठवणीत विनय गढून गेला. आईशी संवाद साधता - साधता आईबरोबर घालवलेला एक – एक क्षण जागा करू लागला..
आई सगळ काही केलीस गं माझ्यासाठी, माझ बालपण,शिक्षण,नोकरी या सगळ्यासाठी दिवस-रात्र स्वतःला वाहून घेत राहिलीस. प्रसंगी स्वतः उपाशी राहून राब-राब राबत राहिलीस...
तुझ म्हातारपणातल दुखन-खुपण,आजारपण याची मला जाणीव असुनही मला शिक्षणासाठी खूप दूर जाव लागल.
त्यावेळी मी काहीच करू शकलो नाही. याचं गोष्टीच खूप दुख वाटतंय गं मला.
माझ्या मनातली हीच
सल मांडत असताना तू मला म्हणाली होतीस...
‘‘पोरा माझी काळजी करू नको,तू सुखी आनंदी रहा,शिक्षणाकडे लक्ष दे’’
आई, तुझ प्रेम, तुझी माया यापेक्षा दुसरं काही मोठ असू शकतं का?
तुझ्यासारख जीव लावणार या जगात कुणीच उरलं नाही गं.
पुन्हा – पुन्हा मला वाटत राहत,तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं.
तुझ्या अंगा-खांद्यावर लहान होऊन बागडत रहाव.
तुझी अंगाई ऐकत-ऐकत शांत झोपावं.
असं नेहमी वाटत राहत...
पण आता हे भाग्य कुठल आलय.
घर, संसार,ऑफिस,मुलांच शिक्षण यात गुरफटून गेलोय गं.
तुझाही संसार होताच...
घर,मुलबाळ या साऱ्या रहाटगाड्यात तू सर्वांना जपत राहिलीस.
नातीगोती सांभाळत राहिलीस, सगळ्यांच खुल्या दिलान,स्वच्छ,निर्मळ मनान करत राहिलीस.
आज तुझ्यासारख असं कुणालाच जमणार नाही.
सुखाच्या शोधात एखाद्या मशीनसारख दिवस-रात्र धावत सुटलोय...
पण हे खर सुख आहे का?
मी थकलो – भागलो असताना तुझ्या त्या गालावरून, डोक्यावरून फिरणाऱ्या हाताचा स्पर्श जाणवला कि,अंगावरून शहारे येतात.
ती मायेची उब आणि ओलावा कुठला आलाय...
आई,आज सगळ असूनही तुझ्याविना सगळ शून्य असल्यासारख वाटत.
कोणताही कार्यक्रम असो,आनंदाचा क्षण असो तुझी उणीव मला सतत जाणवत राहते.
गर्दीतही खूप एकट – एकट वाटायला लागत.
आज बंगला,गाडी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना त्याचा उपभोग घ्यायला मात्र तू या जगात नाहीस ही सल माझ्या मनाला सतत बोचत राहते.
मला आठवतात माझ्या शाळेचे दिवस,माझ्या शाळेच्या फी साठी तू आजारी असतानाही जीवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या बांधावर उन्हा-पावसात राबत राहिलीस.
आज आम्ही दोघंही कामाच्या गराड्यात इतकं अडकून गेलोय कि, तुझ्या नातवाबरोबर बोलायलाही आम्हाला वेळ नाही.
त्याला छान छान गोष्टी सांगायला,त्याच्याशी खेळायला त्याची आजी या जगात नाही. हे मी त्या निरागस जीवाला कसं सांगू?
परवा एकदा आमच्या कंपनीतील अधिकारी वर्गाचा गेट-टूगेदर प्रोग्राम होता.
सर्वजन आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेवून आले होते.
माझा मित्र गौतम आपल्या आईची ओळख करून देत असताना, मला तुझी तीव्र आठवण आली.
तुझ्या आठवनींचे अश्रू आपोआपच डोळ्यातून ओघळायला लागले.
या सुख – आनंदाच्या क्षणाला तू असायला हवी होतीस असं वाटून गेलं.
मी शाळा-कॉलेजमध्ये असतानाही नेहमी तुझ असंच व्हायचं
माझ्या बक्षीस समारंभालाही तुला कधी येता आलं नाही.
नेहमी माझ्या पोटाची आणि शिक्षणाची काळजी करत राहिलीस.
मी बक्षीस घेत असताना तुझी कमी खूप जाणवायची.
समोर टाळ्यांचा कडकडाट आणि भल्या मोठ्या गर्दीत मला तुझा चेहरा दिसायचा, तू मात्र उन्हा-पावसात काबाड कष्ट करत असायचीस,माझ्या उद्याच्या भविष्यासाठी...
मी एकदा खूप आजारी होतो,त्यावेळी तुझ्या जीवाची झालेली घालमेल मी पाहिली आहे गं.
तू त्या दिवशी न काही खाल्ल होतस, ना तोंडात पाणी घेतल होतस फक्त माझ्याजवळ बसून होतीस.
केवढे हे निरपेक्ष प्रेम आणि त्याग! तुझ्या निरपेक्ष प्रेमाची आणि त्यागाची तुलना कुणाशीही करता येणार नाही.
आईच्या आठवणींच्या स्वप्नात रमून गेलेला विनय स्वप्नातून बाहेर आलेला होता...
नि:शब्द झालेल्या भावूक आणि व्याकूळ विनयकडे पाहून आम्ही सुद्धा नि:शब्द झालो...