हरवलेली संवेदना
हरवलेली संवेदना


शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु होती. झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावामध्ये प्रभातफेरी काढायची असल्याची सुचना मुलांना देण्यात आली. सुंदर गजरा घालुन आणि नटून - थटून आलेली पिंकी सर्वांच लक्ष वेधत होती. बघता - बघता प्रमुख पाहुण्यांच आगमन झालं. मोहनलाल आणि त्यांच्या पत्नी शशिकलाबाई व्यासपीठावर आसनस्थ झाल्या. मोहनलाल यांनी या वर्षी भरपूर देणगी दिली होती. पण देणगी देताना त्यांनी शाळेला अनेक अटी घातल्या होत्या. पहिली अट होती, शाळेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्याचं हस्ते ध्वजारोहन झालं पाहिजे. दुसरी अट होती, माझी देणगी सर्वात जास्त असल्यामुळे देणगी दारांच्या बोर्डावर माझ नाव पहिल्या नंबरवर असावं. तिसरी अट, ध्वजारोहनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसमोर मोहनलाल यांनी शाळेला देणगी दिल्याचे सांगण्यात यावे. शाळेने मोहनलाल यांच्या सर्व अटी मान्य करुन बोलविले होते. झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला. मोहनलाल यांच्या हाॕटेलातून आणलेली जिलेबी मुलांना वाटण्यात आली. मोहनलाल यांचे भाषण ऐकत - ऐकत सर्व मुले आनंदाने जिलेबी खात होती. शशिकलाबाई मुलांना जिलेबी वाटत होत्या;पण जिलेबी वाटण्याऐवजी फोटो आणि जिलेबी वाटत असल्याचा सेल्फी काढण्यातच जास्त लक्ष होते. त्यामुळे जिलेबी खाणाऱ्या पिंकीला शशिकला याचा धक्का लागताच पिंकी खाली कोसळली. जिलेबी साडीला लागून साडी खराब झाली याचा राग मनात धरुन शशिकलांनी पिंकीला कानशिलात लावली. रागारागाने पिंकीचा केसात माळलेला गजराही शशिकलांनी आपल्या केसात घातला.
कार्यक्रमाच्या घाईगडबडीत मोजकी काही मुले
सोडली तरी घडलेली घटना कुणाच्याही लक्षात आली नाही. पिंकी अजुनही रडत होती.
पिंकीच्या छोट्या मैञीणी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. मोहनलाल यांच
भाषण संपलं होत. मोहनलाल यांनी आपल्या भाषणामध्ये मुलांच्या आणि शाळेच्या
कौतुकाऐवजी स्वतःचेचं कौतुक करुन घेतलं होतं. आपल्या भाषणामध्ये शाळेला देणगी
दिल्याचा उल्लेख त्यांनी चार ते पाच वेळा केला होता. भाषण खूपच लांबत आहे. हे
लक्षात आल्यानंतर ते थांबले होते. मोहनलाल यांच्या भाषणानंतर शशिकलाबाई भाषणाला
उभ्या राहिल्या. मुलांना जिलेबी अथवा गोड-धोड न देता त्या पैशातुन मुलांना कपडे, वह्या , पुस्तके देण्यात यावीत. तसेच शिक्षकांनी
स्वतःच्या पगारातील काही पैसा शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी खर्च करावा. शाळेने
दुसऱ्यावर अवलंबून न राहता, वारंवार हात न पसरता स्वावलंबी व्हावे. असे
बोलून शशिकलाबाई यांनी आपले भाषण आवरते घेतले. पण त्याही शाळेला दिलेल्या देणगीचा
उल्लेख करायला विसरल्या नाहीत. समोर उभ्या असणाऱ्या शिक्षक आणि शाळा प्रशासन
यांच्या चेहऱ्यावर अपमानाची छटा स्पष्टपणे जाणवत होती. पण सर्वांचाच नाईलाज होता.
गरीब, खेड्यापाड्यातून , वाड्यावस्तीवरून शिक्षणासाठी आलेल्या त्या चिमुकल्यांचे भविष्य घडविण्याचं
व्रत शाळेनं घेतले होते. मग मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी कीतीही अपमान झाला तरी
ते सहन करायला तयार होते. दुसऱ्या दिवशी वृत्तपञामध्ये पहिल्या पानावर मोहनालल आणि
शशिकलाबाई यांचा मुलांना शालेय साहित्य आणि जिलेबी वाटतानाचा फोटो आला होता. वृत्तपत्रांमध्ये
आलेल्या बातमीचे शिर्षक होते, " दानशूर मोहनलाल आणि सवेदनशील
शशिकलाबाई यांची शाळेला भरघोस मदत"