मूल्यशिक्षण:-काळाची गरज
मूल्यशिक्षण:-काळाची गरज
मूल्यशिक्षण: काळाची गरज
आज आपण वर्तमानपत्र उघडला की बातमी दिसते ती अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांची.खून,चोरी,बलात्कार,वाईट व्यसने या सर्वांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी झालेली दिसतात.ही मुले वाईट विकृतींना बळी पडतांना दिसत आहेत.सामाजिक स्तरावर दिवसेंदिवस वाढत चाललेली अनैतिकता हा एक सामाजिक भूकंप आहे. त्याचे दुष्परिणाम भयानक असून शाळांमधून दिले जाणारे मूल्यशिक्षण हाच त्यावरील उपाय आहे.मूल्यशिक्षण ही मुख्यतः काळाची गरज आहे आणि अध्ययन अध्यापनातून ते सहजपणे साध्य करता येईल.इयत्ता १ली ते १२वी पर्यंत आपण १० मूल्ये प्रातिनिधिक मानली असली तरी सदाचाराचे वळण लावण्याचा उद्देश लक्षात घेता मूल्यविचार मर्यादित राहू शकत नाही.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक इ.च्या अति आहारी जाऊन समाजाची नैतिकता ढासळत चालली आहे,त्यासाठीच खरेतर मूल्यशिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे.
●मूल्यशिक्षणाची उद्दिष्ट्ये:-
१◆व्यक्ती म्हणून निरोगी आणि निरामय स्वरूपाचे जीवन अंतर्बाह्य जगता येणे.
२◆कुटुंबातील आणि समाजातील सर्वांशी आदरयुक्त वर्तन करणे.
३◆ज्या परिसरात आपण वाढतो त्या परिसराबद्दल सक्रिय प्रेम वाढीस लागणे.
४◆सदाचार,नैतिकता,सभ्यता,सुसंस्कृतपणा इ.सद्गुणांची वाढ होणे.
●मूल्य शिक्षणाची माध्यमे-
आजच्या दृक-श्राव्य साधनांच्या विपुलतेच्या काळात या साधनांचा उपयोग करून घेता येईल.एरवी हीच साधने मूल्यनिर्मूलनाचे संकट उभे करू शकते.या माध्यमाद्वारा विविध धर्मातल्या कथा,गोष्टीं दाखवून सर्वधर्मसहिष्णुतेबरोबरच इतर मूल्यांचा संस्कार करू शकतील.दैनिक परिपाठ हे मूल्यशिक्षणासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे.सहशालेय उपक्रमात बदलत्या काळानुसार इष्ट तो बदल करणे आवश्यक ठरतो.प्राप्त झालेल्या परिस्थितीत इष्ट तो बदल घडवून आणण्याची शक्ती मूल्यसंस्कारातून वाढू शकते.तसेच आज परिस्थितीवर मात करण्याची शक्ती देखील मूल्यशिक्षणातूनच व्यक्तीला मिळू शकते.घर आणि समाज यांची भूमिका मूल्यशिक्षणाच्या दृष्टीने महत्वाची आहे.घरावर मूल्यशिक्षणाची अधिक जबाबदारी आहे.आणि शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असल्यामुळे शाळेतील चरित्र्यसंवर्धनाचे उपक्रम व्यापकदृष्ट्या परिणामकारक ठरणारे आहेत.म्हणूनच ब्रिली ग्रॅहमचे"if character is lost everything is lost!"हे वचन शाळा शाळांमधून शिकवण्याची गरज भासते आहे.
मूल्यशिक्षणाची ही नांदी आजची नसून स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक महान व्यक्तींनी याला महत्त्व दिले आहे.तसेच त्यांची चरित्रे देखील मूल्यशिक्षणाची प्रभावी केंद्रे ठरली आहेत. साने गुरुजी यांचे मुलांसाठी असलेले लेखन साहित्य(श्यामची आई) याची आज संपूर्ण समाजाला आवश्यकता आहे.
●मूल्यांची ओळख:-
१)संवेदनशीलता,२)वक्तशीरपणा,३)नीनेटकेपणा,४)वैज्ञानिक दृष्टिकोन,५)सौजन्यशीलता,६)श्रमप्रतिष्ठा,
७)स्त्रीपुरुष समानता,८)सर्वधर्मसहिष्णूता,९)राष्ट्रभक्ती,१०)राष्ट्रीय एकात्मता ही दहा मूल्ये सर्वांना विदित आहेतच.
आपल्या देशात विविध धर्माची लोकं रहातात, प्रत्येक धर्माचे पारंपरिक उत्सव वेगळे आहेत.तथापि प्रत्येक धर्माची शिकवण मानवतेच्या कल्याणाचीच आहे,यावर भर देणे आवश्यक आहे.त्यासाठीच आज सर्वधर्मसहिष्णूता हे मूल्य रुजवणे हितावह ठरेल.
आरोग्यदायी सवयी,अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी रुजणे आवश्यक आहे.संवेदनशीलता आणि सौजन्यशीलता या मूल्यावर भर देण्यासाठी थोरांची चरित्रे उपयोगात आणता येतील.राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी रुजवतांना राष्ट्रभक्ती संदर्भात पावनखिंड लढविणारे बाजीप्रभू,स्वातंत्र्यवीर सावरकर,अन्य देशभक्तांच्या राष्ट्रभक्तीची तसेच रणांगणावर लढणाऱ्या सैनिकांची उदाहरणे प्रभावी ठरतील.स्त्री पुरुष समानता या अंतर्गत मुलगा मुलगी समान हे समाज मनावर बिंबवणे आवश्यक झाले आहे,यातूनच स्त्री भ्रूणहत्या ही सामाजिक विकृती नष्ट होऊ शकते.कोणत्याच कामात मुली किंवा स्त्रिया मुलांपेक्षा,पुरुषांपेक्षा कमी नाही,हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणतेही काम कष्टाचे नाही आणि कष्टाचे काम करणारा हलक्या दर्जाचा नाही हे समजावण्यासाठी श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवणे आवश्यक आहे.स्वच्छता,नीटनेटकेपणा याचा संबंध श्रमप्रतिष्ठेशी जोडता येतो.'जो स्वयेचि कष्टत गेला,तोचि भला'असे समर्थ रामदासांनी यासाठीच म्हटले आहे.'आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर'असे बहिणाबाईंनी म्हटले आहे.मुलामुलींमधील मूलभूत क्षमता सारख्याच असतात हे लक्षात घेऊन सर्व कामे प्रत्येकाला आली पाहिजेत,ती करताना कमीपणा वाटता कामा नये हे लहानपणापासून मुलांवर ठसले पाहिजे.
सौजन्यशीलता या मूल्याचा संबंध व्यक्तीच्या दैनंदिन आचरणाशी अधिक आहे.बोलण्यात,वागण्यात मार्दव असावे,अगत्य असावे,सोशिकता असावी,दुसऱ्याला समजून घेण्याचा समंजसपणा असावा..... अशा ह्या सकारात्मक गुणांच्या विकास मुलांमध्ये लहानपणीच होणे आवश्यक आहे.त्यामुळे त्यांच्या वागण्यात सौजन्यशीलता येऊ शकेल.मूल्य रुजविण्याच्या संदर्भात शिक्षक,मुख्याध्यापक यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत.त्यांच्यात परस्परसहकार्य असणे आणि भावनात्मक ऐक्य असणे मूल्यशिक्षणाला अत्यावश्यक आहे.
आज अनैतिकता,अराजकता,आतंकवाद,अवैध धंदे,भ्रष्टाचार,बलात्कारासारख्या सामाजिक विकृती इ.चे पडसाद देशभर ऐकू येत आहेत.त्यांचे उच्चाटन होण्यासाठी मूल्यशिक्षण ही आजच्या काळाची गरज बनली आहे.
विज्ञानवादी होऊन देऊ, वडीलधाऱ्यांना मान,
मुलगा मुलगी भेद न येथे सारे काही समान।
सत्शील असू आम्ही, संवेदनशील मनाची जाण,
सौजन्याने वागू आणि बाळगू देशाचा अभिमान!!
हे मुलांमध्ये बिंबवले तर देशाचे सुजाण,सुसंस्कारी भावी नागरिक घडतील यात शंकाच नाही.