अपर्णा ढोरे

Others

2.3  

अपर्णा ढोरे

Others

तिचे डोळे

तिचे डोळे

4 mins
15.6K


आम्ही दोघे एका संध्याकाळी नागपूर पुणे एक्सप्रेसने पुण्यासाठी निघालो होतो.आमच्या एसी कंपार्टमेंटमध्ये आमच्या समोर एक तरुणी बसली होती.तिने बुरखा परिधान केला होता.फक्त तिचे डोळे दिसत होते.तिचा वर्ण शुभ्र गोरा असावा,त्वचा नितळ असावी.आम्ही आसनावर स्थिर झालो आणि मी तिच्याकडे कुतूहलाने पाहू लागले.शिवाय आता ती माझी ट्रेन फ्रेंड (सखी)होणार होती.तसाही पटकन मैत्री करणारा माझा स्वभाव आणि मग या मैत्रीत कुठली जात,धर्म कधीच आडवी यायची नाही.सांगायचा मुद्दा हा की मला तिच्याशी संवाद साधायचा होता,तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या.शिवाय यांच्याशी मारून मारून किती गप्पा मारणार होते मी?मी तिच्याकडे पाहून हसले.तिनेही स्मित केले असावे,कारण ते तिच्या डोळ्यात दिसून येत होते.तिचं हे झाकलं सौंदर्य पाहून मला गुरुदत्त च्या "चौदाहवी का चाँद हो तुम"या गाण्याची आठवण झाली.

माझे तिच्याकडे असे टक लावून बघणे यांना रुचले नाही,यांनी मला याबद्दल टोकले.मी पण भानावर आले.तिनेही तिचे पाय वर घेतले,तिचे नितळ गोरी पावलं,नखांवर लावलेली फिकट गुलाबी नेलपेंट एवढी विलोभनीय दिसत होती,की नकळत,"इतने हसीन पैर जमींपर मत रखना,"हा संवाद आठवला आणि मी मनाशीच हसले....

आतापर्यंत मी तिला ती एकटीच प्रवास करतेय असे समजले होते.पण गाडी सुरू होताच ती कावरीबावरी झाली,तिचे डोळे कोणाला तरी शोधू लागले.तेवढ्यात एक थोराड वयाचा, दाढी,लाल जर्द भेदक डोळ्याचा माणूस तिच्याजवळ येऊन बसला.त्याच्या तोंडात तोबरा होता.तिला कदाचित तो आल्यावर हायसे वाटले असावे.पण तो तिचा पती असेल का,किंवा कोण असेल?हे प्रश्न माझ्या मनात रुंजी

घालू लागले.

मी तिच्याकडे काहीतरी बोलावे या हेतूने बघत होते,आणि तिचे ते डोळे च माझ्याशी संवाद साधत होते.आता डब्यात आम्ही चार जणं होतो,तिने चेहऱ्यावरचा नकाब काढून मोकळे बसावे असे मला राहूनराहून वाटत होते.आम्ही सोबत आणलेला टिफिन खायला बसलो,मी तिला आणि यांनी त्या माणसाला आग्रह केला.पण त्यांनी नकार दिला.त्यांनी काहीच खाल्ले नाही,कदाचित खाऊन आले असावे असा आम्ही विचार केला.तिच्याशी गप्पा माराव्याशा मला वाटत होत्या.पण हो नाही याव्यतिरिक्त ती काही बोलत नव्हती.हे बोलतांनाही ती त्याच्याकडे पाहत होती.

आम्ही झोपायची तयारी करू लागलो,त्याने ह्यांना "तुम्ही कोणत्या बर्थवर झोपणार?"असे विचारले जरा अजबच वाटले,पण मी खालच्या आणि हे वरच्या असे सांगितल्यावर त्याने तिला खालच्या म्हणजे माझ्या समोरच्या बर्थवर झोपायला सांगितले.आम्हाला दोघांनाही हे जरा अति आणि चमत्कारिक वाटले.त्यातच झोपण्यापूर्वी त्याने तिला काही सूचना केल्या.

झोपतांना तरी ती चेहऱ्यावरचा नकाब काढेल असे वाटले आणि मला तिच्याशी मोकळेपणाने बघता येईल आणि बोलताही येईल पण कसले काय!ती तिचा पडदानशी चेहरा उलट दिशेने करून पाठमोरी एका कडेवर झोपून गेली.मी जेव्हाही रात्री पाहिले ती तशीच झोपलेली होती,अवघडून!मग लक्षात आले त्याची तिला तशी सूचना होती.माझ्या नवऱ्यामुळे त्याने तिला तिकडे तोंड करून झोपायला लावले.मी मात्र मला हवी तशी कूस बदलत होती,चुळबुळ करीत होती,माझ्या वागण्यात एक मुक्त स्वातंत्र्य होतं.

मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला होता.मी किती नशीबवान आहे हे मी जाणले होते.मला चालण्या,वागण्या,बोलण्याची कसलीच बंदी नव्हती.तरी मी कधीकधी यांच्यावर माझ्या मनासारखे झाले नाही की कातावत, रागावत असते!आता मला माझ्याहीपेक्षा माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटू लागला होता.

पहाटे मला जाग आली.ती तशीच वन साईड झोपलेली होती,मी छान फ्रेश झाले आणि हे उठायची वाट बघू लागली. ती पण उठली,आणि मला पाहून हसली असेल असे मला वाटले.तिला टॉयलेट ला जायचे होते कदाचित,ती अस्वस्थ होऊ लागली असे जाणवले.मी तिला म्हटले की "आप जाके आईए!"पण ती गेली नाही.कदाचित तिथे जायलाही त्याची परवानगी घ्यायची असेल तिला.माझा नवरा उठून फ्रेश होऊन आला आम्ही बर्थ खाली घेतला आणि गप्पा मारू लागलो.आता तो उठला खाली आला,तिने सांगितले त्याला तेव्हा तो तिच्यासोबत गेला.तिने एक छोटी पर्स सोबत नेली होती.ती येईपर्यंत हा चकरा मारत होता.तिला जरा उशीरच झाला होता,ती बाहेर आल्यावर त्याने तिला रागावले सुद्धा!

पण आता ती फ्रेश दिसत होती.मी बर्थवरच छान वेणी घातली,आवरले.आता तिला माझे कुतूहल आणि नवलही वाटू लागले.हे सारे भाव तिच्या डोळ्यात दिसत होते.आताही तिचा चेहरा झाकूनच होता.कदाचित तिने त्या टॉयलेटमध्येच सारे आवरले असेल,स्वतःला पाहून घेतले असेल.त्या आरशानेच तिचे सौंदर्य पाहिले फक्त!

काल संध्याकाळपासून तिने काही खाल्ले नव्हते की पिले नव्हते.आताही चहा कॉफी काहीच नाही,कदाचित तिचा नकाब हटवावा लागेल,याची धास्ती त्या माणसाला वाटत असेल.आग्रह करूनही तिने आमच्याजवळचे काहीच खाल्ले नाही.मला माझ्या मैत्रिणी आठवल्या मरियम,सलमा,पण त्याही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायच्या,अगदी स्वच्छंद!ही मात्र एखाद्या गुलामसारखी वागत होती,हिच्यासारख्या अजूनही काही स्त्रिया कुठल्याच बाबतीत स्वतंत्र नाही याची जाणीव मला प्रकर्षाने झाली.त्यांच्या श्वासावर,जगण्यावर,प्रत्येक गोष्टीवर अधिकार फक्त पुरुषांचा!आता मलाच घुसमटायला होऊ लागलं.आमचे स्टेशन आले तसे सामान आवरायला घेतले,तेवढ्यात आधीच ही दोघे निघूनही गेली होती.आम्ही सावकाश खाली उतरलो.मी मात्र ते दोन डोळे शोधत होती,ज्यांना माझ्याशी खूप काही बोलायचे होते,सांगायचे होते.

आणि खरे सांगायचे तर मलाही जाणून घ्यायचं होतं खूप काही...............त्या डोळ्यांचे रहस्य!


Rate this content
Log in