मृत्यूचे गूढ
मृत्यूचे गूढ


तो एक शास्त्रज्ञ होता. शहरापासून दूर अंतरावर असलेल्या घोस्ट हाऊस नावाच्या बंगल्यात त्याचे वास्तव्य होते. बंगल्याच्या नावाप्रमाणेच त्याचे भूत अस्तित्वावर संशोधन सुरू होते. ऐन जवानीत असल्याने त्याच्या मनात भीतीचा लवलेश नव्हता. राजन त्याचे नाव. दिवस रात्र त्याच्या मनात एकच विचार भूत सृष्टी खरोखरच अस्तित्वात आहे का? त्याच संशोधनात तो रमून गेला होता. रात्री अपरात्री। तो उठून बंगल्याच्या परिसरात फेरफटका मारत असे. त्याच्या बंगल्याच्या जवळच स्मशानभूमी होती. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी त्याच्या संशोधनाला गती येत असे.
आज अमावस्याच होती. रात्री बारा वाजता त्याला स्मशानभूमीत असलेल्या थडग्यातून मला बाहेर काढा मला बाहेर काढा असे आवाज ऐकू आले. तो सावध झाला. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. मधूनच कुत्र्यांचा रडण्याचा आवाज येत होता. त्याने हातात कंदील घेतला. त्याचा मुळी भुताखेतावर विश्वास न्हवता. तो त्या थडग्याजवळ गेला. त्या थडग्यातून एका बाईचा केवळ हात बाहेर आला होता. ती धडग्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत होती. मदतीची याचना करीत होती. हळूहळू थडग्यातून मी तुला सोडणार नाही असे ती वारंवार म्हणत होती.
राजनला काय करावे हेच सुचेना. भुतावर विश्वास न ठेवणारा तो देखील या घटनेने भयभीत झाला. थडगे खोदून वास्तव पाहण्याचा विचार त्याच्या मनात आला. तोच त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. त्याने वळून पाहिले तो एक 70 वर्षाचा म्हातारा त्याला दिसला. त्याने विचारले बाबा तू येथे काय करतोस? राजनने त्याला घडलेली घटना सांगितली. त्या म्हाताऱ्याने त्याला घरी जाण्याचा सल्ला दिला. राजनने त्याचा सल्ला मानून घरी जाण्याचे ठरवले. तो घराच्या दिशेने जाण्यास निघाला. त्याने मागे वळून पाहिले तो म्हातारा अदृश्य झाला होता. राजन शास्त्रज्ञ असून देखील भयभीत झाला.
असेच काही दिवस गेले. राजनने रिटा नावाच्या एका सूंदर मुलीशी लग्न केले. त्या बंगल्यात ती दोघेच रहात होती. आज त्याच्या लग्नाची पहिली सुहागरात्र होती. दोघांनी बेडची सजावट केली होती. दुर्देवाने ती अमावस्येचीच रात्र होती. दहा वाजता दोघे बेडवर आले. रिटा खूपच सुंदर दिसत होती. राजनने तिला मिठीत घेतले. हळू हळू प्रणयाचा पारा चढत गेला. नेमके त्याच वेळी घड्याळात बाराचे ठोके पडले. राजनला मागील घटनेची आठवण झाली. त्याने दारे खिडक्या आतून बंद करून घेतल्या. रिटा घाबरेल म्हणून तिला त्या घटनेची काहीही कल्पना दिली नाही.
थडग्यातून ती तरुणी बाहेर आली. तिने बंगल्याच्या दरवाजावर टकटक केले. रिटाने दरवाजा उघडला. पहाते तो एक सुंदर तरुणी दारात. तिला आश्चर्य वाटले. ती तरुणी आत आली. तिने खरे रूप रिटाला दाखवताच ती बेशुद्ध पडली. त्या तरुणीने आपला मोर्चा राजनकडे वळवीला. त्याच्या जवळ जात तिने त्याला आपल्या कवेत घेतले. त्याचे किस घेत त्याला बेडवर झोपवले. राजन तिच्या प्रेमाला थोपवू शकला नाही. ऐन प्रेमाच्या रंगात असतानाच तिने त्याचा शरीराचे चावे घेतले. राजन जागीच मृत झाला. तिचे काम संपले. ती निघून गेली.
थोड्या वेळाने रिटा शुद्धीवर आली. तिला राजन बेडवर मृतावस्थेत पडल्याचे दिसले. तिची इच्छा अतृप्त राहिली होती. ती राजनला दूर लोटू शकत न्हवती. तिने एका लाकडी पेटीत राजनचा मृतदेह बंद केला. ती पेटी साखळदंडाने बांधली. दोन चार दिवस गेले. रात्रीच्या वेळी अचानक पेटीचे साखळदंड ककोणीतरी सोडवत असल्याचा रिटाला भास झाला. तिने पाहिले राजन बाहेर येत होता. मात्र त्याच्यात खूपच बदल जाणवत होता. त्याच्यात ती तरुणी संचारली होती. त्याने रिटाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. घाबरून रिटा दूर जाऊ लागली. त्याने तिच्यावर झडप घातली. एका क्षणात तिला मारून टाकले.
सकाळ झाली. कोणीही त्यांच्या घराकडे फिरकले नाही. दोन दिवसांनी रिटाचा भाऊ तिला भेटण्यासाठी आला. ती मृतावस्थेत पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. त्याने तिचा अंत्यविधी केला.त्याचवेळी बहिणीच्या मृत्यूचे कारण शोधल्याशिवाय बंगला सोडून न जाण्याचा निर्णय घेतला. बहिणीच्या मृत्यूचे काही धागेदोरे हाती लागतात का याचाच तो विचार करू लागला. बघता बघता पुढील अमावस्या आली.
त्या रात्री तो गाढ झोपेत असताना त्याला त्या पेटीच्या साखळीचे आवाज आले. तो घाबरला. बंगल्याची कडी काढून रस्त्यावर धावतच गेला. त्याच्या ओरडण्याने लोक जमा झाले. त्यांनी विचारणा केली असता घडलेला प्रकार त्याने सांगितला. त्यातील एकाने त्याला आपल्या घरी झोपण्यास नेले. सकाळी काय ते पाहण्याचे ठरले.
सकाळी त्या परिसरातील काही मंडळी त्याच्या बंगल्यात आली. त्यांनी सर्व ठिकाणी शोध घेतला. त्यांना तेथे एक मोठी पेटी आढळली. ती साखळदंडाने बांधली होती. त्यांनी पेटी उघडली. त्यात एक मानवी सांगाडा आढळला. तो राजनचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सांगाडा पेटीबाहेर काढला. त्याचे दहन केले. पेटी साखळदंड दूर अंतरावर फेकून दिले. त्यानंतर मात्र रात्री ना राजन कुणाला दिसला ना रिटा कुणाला दिसली. अज्ञात आत्म्याने दोघांचा बळी घेतल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली.