मृदगंध
मृदगंध
मृग नक्षत्रातला पहिला पाऊस बरसत होता, पावसाचे थेंब मोत्यासारखे पसरत होते, तू आला होतास दरवळाची शाल पांघरून... कस्तुरीची नजर झूकून जावी ईतका मनमोहक होता तो सुगंध . अजूनही माझ्या श्वासातच आहे तो .
हे 'मृदगंधा '....या श्रावण सरीतच येतोस नेहमी... तिन्ही ऋतूत येणं जमणार नाही का रे तुला. अरे ये ना.... तिन्ही ऋतूत कुठे बिघडलं.
तू आलास ना की असं वाटतं सखीची अर्धी भेटच झाली , किती वाट बघावी लागते रे तुझी ....किती साकडे घालावे लागतात देवाजवळ . फक्त मीच नाही रे अवघं विश्व तुझी वाट बघत असते . तुझा गंध येतो अन् सगळी सृष्टी आनंदून जाते .
तुझ्या आगमनाने सुरुवात होते हिरवळीला शेत शिवार सगळं बहरून येते .. तो चातक सुध्दा सुखावतो त्याला पहिल्या सरीचा पहिला थेंब प्राशन करायची ओढ लागलेली असते, सगळीकडे कसा आनंदीआनंद होतो बघ ना तुझ्या येण्याने पीकं डोलू लागतात वाऱ्याचा लाटेवर , भविष्यातले सूख आजच अनुभवतात सगळेच्या सगळे . तुझ्या येण्याच्या चाहूलीने सुगीचे स्वप्न सत्यात उतरते, एक ईश्वरीय वारसा लाभलाय तुला सर्वांना सुखाऊन टाकण्याचा.
' हे मृदगंधा ' साक्षात अमृताचा गंध आहे तुझ्या दरवळाला.
'मृदगंधा 'कधी हट्ट कर ना रे ...त्या ढगा जवळ सांग त्याला की भर उन्हाळ्यात मला जायचंय धरतीवर, तू पावसाने त्या तप्त मातीला नाव्हू घाल अन् मला अलगद त्या मातीच्या ढेकळातून ऊमलू दे , सारी सृष्टी गंधाळून टाकू दे... येऊ दे ना दोनदा सुगी या धरतीवर बिघडलं कुठं , तो ढगं ऐकेल तुझं गार्हान अन् बरसेल तुझ्यासाठी, मातीला नाव्हू घालण्यासाठी.
'मृदगंधा ' माझ्यासाठी खूप अनमोल आहेस रे तू . तुझ्याशिवाय मी माझी आणि माझ्या पहिल्या प्रेमाची कल्पनाच करू शकत नाही. तुझं नि माझं एक हळवं नातं आहे , माझ्या अंतर्मनात... आतल्या कप्प्यात... खूप जपून ठेवलं आहे मी त्याला. तुझ्या येण्याचा नुसत्या कल्पनेने शहारून जातो मी. हे श्वास फक्त तुझ्याचसाठी घेतो आहे असं वाटतयं कधी कधी .
'मृदगंधा' तू एकटाच आला नव्हतास माझ्या जीवनात, सोबत माझ्या सखीचं प्रेम घेऊन आला होतास तू....म्हणूनच तू सदैव माझ्या आठवणीत राहतोस . आता जेव्हा जेव्हा तुझा दरवळ येतो तेव्हा तेव्हा वाटतं माझी सखीच पुन्हा परतून आली असावी.
पण आजकाल तू एकटाच येतोस, माझी सखी नसते तुझ्या सोबतीला ,खरच खूप प्रेम होते रे माझं तिच्यावर अगदी ईश्वरा सारखी पूजा केली होती मी तिची. तुलाही ते माहित आहे कारण तू एकटाच तर होतास आमच्या प्रेमाचा पुरावा तुझ्या साक्षीनेच तरी झाली होती आमची पहिली भेट.
'हे मृदगंधा ' तुला आठवतं ना ! तिनं जीवनभर साथ निभवन्याचं मला वचन दिलं होतं. आणि आज बघ मला एकट्याला सोडून निघून गेली ती ,बघ माझ्या डोळ्याकडं अजूनही रडत आहेत ते तिच्या आठवणीत.
'मृदगंधा' तुझ्यासारखंच निष्पाप प्रेम होतं रे माझं मला फक्त तिला गंधाळतांना बघायचं होतं .कुठलीच अपेक्षा नव्हती तिच्याकडून. तिचं आयुष्य सुंदरअन् सुगंधी करायचं होतं मला ,काय मागितलं होतं मी तिच्या जवळ माझ्यासाठी , सगळे तिलाच अर्पण करण्याच्या तयारीत होतो मी. तिनं मागितले असते तर हसत हसत प्राणही नसते दिले का तिला. तिला जिंकून पुन्हा तिलाच सुपूर्त करायचं होतं स्वतःला पण तिला मात्र काही कळालंच नाही. अन् कळाले असेल तरी समजून घेण्याच्या तयारीत नव्हती ती खूप विनवण्या केल्या खूप रडलो मी तिला मात्र पाझर फुटला नाही.
गेलीच अखेर ती चढली बोहल्यावर सनईच्या सुरात गगन ठेंगणे झाले होते तेव्हा तिच्यासाठी.
'मृदगंधा' ती आली होती जाण्याअगोदर डोळ्यात दोन फसवे असून घेऊन, तिला सांगावं वाटलं की, अगं ज्याला रडता येत नाही ना ...!त्यांनं उगीच डोळ्यात डोळ्यात पाणी आणायचं नसतं ,दिसून पडतं ते...तुझा अन् अश्रूंचा संबंध असूच शकत नाही . तू समजतेस ना तीतकं रडणं सोपं नसतं... अगं काळीज फाटलेलं असावं लागतं त्याच्यासाठी, उगीच नाही अश्रू मोती बनत रक्त गोठलेलं असावं लागतं त्याच्यासाठी , दोन अश्रू तर कोणीही आणतं डोळ्यात पण रडताना तोल अश्रूचा सुटलेला असावा लागतो , सूर तर हजार आहेत रडण्याचे पण रडतांना खरचं कंठ दाटलेला असावा लागतो.
मेहंदी होती तिने रचलेली ,आत्तरात होती ती न्हालेली, गळ्यात मोत्याचा हार घातलेला, हिरवा चुडा होता सोबतीला . आली होती ती माझ्याजवळ प्रेमाचा तह करण्यासाठी बघवत नव्हतं तीचं दुसऱ्यासाठी सजनं सवरनं डोळ्यात अश्रू भरून घेतली मी पापणीच्या काठोकाठ .अस्पष्ट मूर्ती उभी होती तिची नजरेसमोर आजही प्रत्येक शब्द आठवतो तिचा कारण दुर्दैवानं कान बंद करायचे विसरलो होतो मी.
ती बोलू लागली "मला माफ कर, माझा नाईलाज आहे ,शरीराने आपण एक झालो नाही तरी काय झालं प्रेम अमर असतं, मला विसरून जा ,दुःख करू नकोस, नवे स्वप्न पहा, वेळ निघून जाईल तसा तुला माझा विसर पडेलच ,माझं चुकलं मी कबूल करते पण मला माफ कर, बर चलते मी स्वतःला जप, काळजी घे स्वतःची...." तिच्या या शब्दात सांत्वना होती ,उपदेश होता, दिलासा होता ,मातृत्व होतं, लाचारी होती, सहानुभूती होती, अन् कबुली होती तिच्या बेईमान वागण्याची पण हे फक्त ऐकवण्यासाठीच नाटकी रंग शब्दातला कधीच हेरला होता मी.
तिचा प्रत्येक शब्द मी ओंजळीत चेहरा धरुन ऐकत होतो आणि प्रत्येक शब्दा सरशी ओंजळीत एक एक अश्रू सांडत होता ती निघून गेली बरच काही बोलून तरी तिची पाऊलखुण उमटली होती माझ्या हृदयाच्या उंबरठ्यावर ओंजळीतले सारे अश्रू मी त्या पाऊलखुणेला अर्पण केले .
एक क्षण होता माझा माझ्यासाठी मीच घडवलेला. तेव्हा मी सूर्याशी स्पर्धा करत असो त्याच्या डोळ्यात डोळे घालून कधी कधी त्याला नजर झूकवायला लावत असो. वार्याचाही पुढे पळत जाऊन त्याला वाकुल्या लावत असो अंधाराची चीड आणि एकटेपणाचा मला तिरस्कार होता. फुलांना दैवत मानलं होतं तो एक क्षण होता माझा माझ्यासाठी मीच घडवलेला.
पण... पण आता निस्तेज झालो मी सूर्याचा एक किरण आता डोळ्यात अश्रूचा सागर उभा करते, आज वारा वादळ उठवण्याची धमकी देऊन जाते, प्रकाशात मी मेणासारखा वितळू लागतो , फुलं आज बेरंग झाली काजवा आसमंत सोडून गेला ,एकटे पण आज माझी साथ निभावते अन् काळोख मला बाहूपाशात घेऊन धीर देण्याचा निरर्थक प्रयत्न करतो. का .....का घडलं असं विपरीत..... फक्त - फक्त तिच्यामुळे तिच्या खोटया प्रेमाच्या पाशात अडकून मी जेरबंद झालो. मला लाभली ती बरबादी ...ते तिचंच प्रेम होतं ज्याला जपता जपता मीच जप्त झालो अंधाराच्या विळख्यात.
आता भूतकाळात परतून पाहिले की तिचे निर्दयीपणे हसणे आठवते. काळजात कळ उठते डोळ्यात अश्रू पापणीच्या काठोकाठ भरतात . छे.... अश्रू कसले काळीज फाडून थेट डोळ्यात उतरलेले रक्तच ते ... रक्ताचा हा प्रत्येक थेंब माझ्या वर्तमानाला चिंबचिंब करतो अन् रक्ताच्या प्रत्येक थेंबात सावली दिसते ती प्रत्यक्ष तिचीच.
आज पाण्यासाठी घशात प्राण आणून वाट पाहणाऱ्या त्या चातकाला पाहिलं अन् काळीज तीळ तीळ तुटू लागलं वाटलं काळीज फाडून रक्ताने त्या चातकाची तहान भागवावी ,चंद्राकडे टक लावून बघणारा चकोर दिसला आणि खरच त्याची दया आली, लाटांचा प्रचंड मारा सहन करून कणकण
झिजणारा किनारा पाहीला क्षणभर मन कळवळलं, फुलाची एक पाकळी पाहिली गळतांना अन् तिची वेदना हृदयात उठली, तेव्हाच तिच्या गावाच्या वेशी पलीकडे जंगलात पानझडीत पडलेल्या पानाला वणवा लागला काळीज वितळू लागलं तेव्हा अगदी माझ्यासारख्याच हो खरच अगदी माझ्यासारख्याच एका भ्रमिष्ट पतंगाने ज्योत समजून झेप घेतली त्या वणव्यात तेव्हा मीही नतमस्तक झालो त्याच्यापुढे नव्हे पुरता आधीनच झालो त्याच्या .
'मृदगंधा' अरे ती सखी होती माझी म्हणूनच तर माझ्या वर मात करून गेली त्या फुलांची साक्ष होती तिच्या आणि माझ्या मिलणाला अन् तू ही होतास सोबतीला. म्हणूनच तर मला बरबाद करताना तिला कष्ट पडले नाही खरं प्रेम होतं रे माझं तिच्यावर म्हणूनच आपण होऊन बंदिस्त झालो मी तिच्या प्रेमपाशात मला अखंड बुडवून टाकेल इतकी खोल नव्हती तिच्या डोळ्यातली नशा पण मीच गुडघे टेकले मीच घेतलं बुडवून स्वताला गुडघाभर पाण्यात.
तिच्या सौंदर्यावर भाळून किंवा मोहात पडून मी तिच्या पाशात बंदिस्त झालो नाही . ते तर माझं प्रेम होतं ज्याच्यासाठी मी हार पत्करली तिच्या त्या प्रेम पाशाला एका क्षणात उध्वस्त केलं असतं मी. पण त्या भ्रमराला मी आदर्श मानलं होतं म्हणूनच तर जमलं नाही मला तो नाजूक पाश तोडणं
बघ ना कठोर लाकडाची ह्रदय चिरून बाहेर पडणारा भ्रमर सूर्य मावळल्यावर बंदिस्त होऊन जातो त्या कमळाच्या पाकळ्यात . त्यांनी मनात आणलं तर क्षणार्धात पाकळ्या पोखरून मुक्ती मिळू शकतो तो पण नाही करत तो तसं त्या कमळाच्या सौंदर्यावर भाळून नव्हे तर त्या कमळा वरच्या प्रेमासाठी पत्करतो तो हार . म्हणूनच तर ईवल्याशा ल मकरंदात तो आकंठ बुडवून घेतो स्वतःला. त्या सरोवरात अजून दुसरे कमळें नसतात असेही नाही .
मृदगंधा... मी आजही तिथेच उभा आहे जिथे मला ती सोडून गेली होती, कारण पुढे पाऊल टाकावं तर तिचं सजलेलं सवरलेलं आयुष्य उध्वस्त होईल मागे फिरून जावं तर जगाने मला वाळीत टाकलं सगळे दारं बंद झालेत माझ्यासाठी फुलांनी काट्याचा बहिष्कार करावा नेमकं तसच झालं माझं माझे आपलेच आता माझे राहिले नाही .
तिच्या सोबत घालवलेले ते वांझोटे क्षण आठवले की न राहून माझं हृदय रडू लागतं. पण कधी कधी त्या वांझोट्या क्षणाचा मला अभिमान वाटतो. कारण त्यांच्या मुळेच आजही माझं प्रेम पवित्र आहे . कधी मला आपलेसे वाटतात ते क्षण. कारण त्या क्षणांना आठवता आठवता आता कितीतरी रचना मी लिहून टाकतो न अडखळता त्यावेळी माझी लेखणी कधीच थकत नाही .
ती चोरपावलांनी जेव्हा माझ्या जीवनातून निघून गेली तेव्हा खुप रडलो मी तेव्हा माझ्या अश्रूवर सुद्धा आक्षेप घेतला गेला तिचं माझ्यावर प्रेम होतं हे मानायला जग तयारच नव्हतं. मला एकट्याला जगानं दोषी ठरवलं जगाला सत्य सांगूनही फायदा नव्हता कारण ते कोणाला कळणारच नव्हतं . बदनामीच्या काळोखात माझं जीवन अंधारमय झालं म्हणूनच तिच्या दुनियेला सोडून खुप दुर आलोय मी . आजही मी तिच्या जगात बदनाम आहे पण त्या गोष्टीची मला खंत नाही जगाने मला कितीही हिनवलं तरी ती मला विसरू शकणार नाही कारण तिला माहित आहे माझं प्रेम पवित्र होतं.
'हे मृदगंधा ' तू पुन्हा एकदा त्याच दरवळाची शाल पांघरून ये ,अन् तिच्या घरी जा, हळुवार तिच्या श्वासाला स्पर्श कर, तिच्या श्वासात सामावून जा ...तिथून थेट तिच्या काळजात ऊतर ... अन् तिच्या मनाला प्रेममय करून टाक आणि येता येता तिला सांग.. म्हनावं 'अनिल ' अजूनही डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहत आहे.
'मृदगंधा 'तुझ्या अवतरण्यातच प्रेम दडलं आहे रे.... तप्त धरतीला तृप्त करण्यासाठी त्या ढगांनं मनसोक्त बरसावं अन् त्या धरतीने त्याचे आभार मानून गंधाळून जावं आणि तुझा जन्म व्हावा...! किती प्रेममय आहे ही घटना आणि म्हणूनच निसर्गातले सारे पाणी, फुले, नद्या, डोंगर, झरे... यांना सोडून मी तुझ्याशी बोलतो कारण मला वाटतं तुलाच फक्त कळत असावं प्रेम ....कारण तुझा जन्मच मुळात प्रेमातून होतो प्रेमाचं एक नातं आहे तुझ्याशी जोडलेलं .जिव्हाळा ,माया ,ममता याचं सुंदर प्रतीक आहेस तू...

