मोठ असणंं
मोठ असणंं
मी खूप भाग्यवान आहे. जी जशी जिथून गेले त्या प्रत्येक वाटेवर मला भाग्याचे ठेवे सापडले. सगळ्यात मोठ भाग्य म्हणजे मला ते वेचता आले. वेगळे ओळखता आले. असाच हा एक ठेवा.
'एक वेणी वर बांधलेली तर दुसरी सुटून गळ्यात लोंबणारी. सकाळी शुभ्र असणारा ब्लाउज अनेक रंगात हरवलेला, कोपराला भेटायला गेलेले शाईचे ओघळ, एक मोजा वर ते दुसरा पद्दच्युत झालेला आणि पेटीकोट स्कर्ट- ब्लाउजच्या मधून बाहेर डोकावणारा! असलं माझं ध्यान रोज रामबाग कॉलनीत बस मधून उतरायचं आणि दप्तर नावाची स्टीलची पेटी पायरीवर टाकून त्यावर जाऊन बसायचं. मग वेगवेगळ्या बसनी आणखी दोघी यायच्या. नंतर आमच हे त्रिकूट मजेत बागडत ३ किमी चालत घरी पोहोचायचं. इथे उतरल तर निम्म म्हणजे ५ पैसे तिकीट म्हणून इथे उतरायचो. पण ही वाट वैकुंठ स्मशानावारून जाणारी. त्या जरा मोठ्या होत्या पण घाबरट. मी लहान पण चांगलीच धीट. आणि घरून सक्त ताकीद, एकटीनी हिंडायचं नाही, त्यामुळे बरोबर जायचो.
नेहमीसारखीच पायरीवर बसले होते. पण काहीतरी चुकत होत. वरच्या मजल्यावर या वेळी रोज कोणीतरी गात असायचं. छान वाटायचं. पण गेले ३-४ दिवस मात्र सगळ शांत होत. मला त्या गाणा-या काकांची फारच काळजी वाटायला लागली. ते नक्कीच आजारी असणार अस डोक्यात आल्यावर दप्तर तिथेच टाकून मी सरळ वरच घर गाठलं. अजून कान्हे मात्रा वाचता येत नव्हत्या पण पाटीवरच प. भमसन जश वाचता आलं होत मला. दार उघडताच ते काका का गायले नाहीत ते पहायला आल्याच एका दमात सांगून टाकल. त्यांना गंमत वाटली असण
ार ‘मी गायलो नाही हे तुला कसं माहित अस विचारल्यावर मी रोज खाली बसून गाण ऐकते हे सांगीतल. ते अलगद हसले. माझा धीर चेपला. त्यांनी मला आतल्या सतरंजीवर बसवल आणि ऐक म्हणाले. काका गाताहेत म्हटल्यावर मी खुश. थोड्या वेळानी आता घरी जा आई काळजी करेल म्हणाले. मी मजेत उड्या मारत खाली गेले. तेंव्हाच पुणं पुणेकरांचच असल्यामुळे दप्तर जागेवर होत. आणि काव-या बाव-या झालेल्या मैत्रिणी देखील. त्यानंतर जाता येता ते काका माझ्याकडे बघुन जराशी मान हलवायचे.
नंतर त्या काकांचा फोटो पेपरमधे खूपदा दिसायचा. मला वाचता यायला लागल्यावर त्यांच नाव पं. भीमसेन जोशी आहे आणि ते फार मोठे गायक आहेत अस कळायला लागलं. उगीचच एक हक्क वाटायचा. त्यांच्या कलेबद्दल, गायकी बद्दल नंतर खूप ऐकलं वाचलं. पण एका ६-६|| वर्षांच्या तद्दन गबाळ्या गोळ्यासाठी जिला गाण्यातलं ओ की ठो कळत नाही तिच्यासाठी ताबडतोब गाणा-या माणसाच मोठेपण शब्दात मावणार नाहीच. ते गाण ना दर्दी रसिकासाठी होत, ना प्रसिद्धीसाठी, ना स्वत:साठी, ना बिदागी पोटी होत. उमलत्या फुलाचा सुगंध जसा अलगद तरंगत कुठेही जातो तसं ते उमललेल्या मनाच राजसपण असावं. जो समोर आला त्या भाग्यवानाच्या वाट्याला येणारं! तो क्षण, ते गाण आणि ते भाग्य माझं होत ! एका बालीश आठवणीला कायम तजेलदार आणि सुगंधी ठेवणार !आणखी एक, त्यांच्या गाण्याबद्दल बोलावं हा माझा अधिकार नक्कीच नाही, तेवढी समजही नाही. पण त्यांच्या उमदेपणाबद्दल कृतज्ञ राहू शकेन हा अधिकार नकळत त्या क्षणानी दिला. '
दादा अशी ही आठवण. केंव्हाही आली तरी मनावर सुखद तरंग उमटवणारी !