Daivashala Puri

Tragedy Others

3  

Daivashala Puri

Tragedy Others

!! मोकळा श्वास !!

!! मोकळा श्वास !!

6 mins
695


रोजच्या प्रमाणे अनामिका सकाळी आटोपून घाईघाईने स्कूटरवरून ऑफीसला जाण्यासाठी निघाली. रस्ता तोच होता दररोजचा. स्कूटरवरून जात असताना रस्त्यात दोन तीन गायी उभ्या होत्या. खूप हाॅर्न वाजवले पण गायी कांही रस्त्यातून हलेनात. अनामिकाने स्कूटर थांबवले व उतरून त्या गायींकडे जात होती तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीतून मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. ती मुलगी जीवाच्या आकांताने मोठमोठ्याने रडत होती. विव्हळत होती. नकळत अनामिकाची पावले त्या झोपडीकडे वळली परंतु अनामिका पोहोचेपर्यंत रडने वगैरे सर्व कांही थांबले होते. 

    एव्हाना सर्व गायी रस्त्याच्या बाजूला निघून गेल्या होत्या. रस्ता मोकळा झाला होता. अनामिकाने आपले स्कूटर चालू केले व ऑफिसला निघुन गेली. 

तिचा रोजचाच रस्ता होता तो. 

अशीच एक दिवस ऑफिसला जाताना तिची नजर त्या झोपडीकडे गेली आणि ती तीकडे पहातच राहिली. एक फारंच गोड, सुंदर १०-१२ वर्षाची मुलगी झोपडीच्या दारातील लाकडी खांबाला धरून उभी होती. जरा दुःखी वाटत होती चेह-यावरून. अनामिका अचानक भानावर आली (ऑफीसला उशीर होतोय) मनाशीच पुटपुटली व तिथुन निघुन गेली.


       तेंव्हा पासून ब-याच वेळा ती मुलगी दारात दिसायची. तिच्या चेह-यावरून ती खूप दुःखी आहे असे वाटायचे. 

अनामिका अशीच एक दिवस तिथुन जात असते. ती मुलगी झोपडीच्या दारात बसून दोन्ही गुढग्यात आपले डोके ठेवून फुंदुन फुंदुन रडत होती. अनामिकाला न राहवून ती थांबली व त्या मुलीकडे गेली व तिला विचारले की, " का रडते आहेस बेबी, घरी कोणी नाही का?" तिनेे उत्तर देण्यापूर्वीच घरातुन मोठ्याने खेकसण्याचा आवाज आला , " ए आरते घरात ये गुमान न्हाय तर मरूस्तर मार खासील बघ" तशी ती मुलगी उठून डोळे पुसत घरात गेली व अनामिका ऑफिसला निघुन गेली. 

अनामिका रोज ऑफीसला जाताना तिकडेे पहायची पण ती मुलगी कांही दिसायची नाही. दिवसामागून दिवस...दोन तीन महिने गेले..


         एक दिवस अनामिका ऑफिसला जात होती तेंव्हा त्या मुलीला झोपडीच्या दारातच एक ४५-५० वर्षे वयाची बाई व २०-२५ वर्षे वयाचा एक मुलगा बेदम मारीत होते. ती मुलगी बिचारी खूप रडत होती पण तिच्या मदतीला कोणीही येत नव्हते. आजुबाजुचे फक्त गर्दी करून बघ्याची भुमीका करीत होते. अनामिका त्या गर्दीतून वाट काढत पुढे पुढे गेली तेंव्हा त्या मुलीला एक बाई व मुलगा खूप मारीत होते. आणखी पुढे जाऊन अनामिका त्या बाईवर ओरडली भांडणे सोडवू लागली तेवढ्यात त्या बाईने अनामिकाला धक्का देऊन बाजुला ढकलले व म्हणाली, "ए बाई , ही आमच्या घरची गोष्ट हाय. तु मधी पडायच नाय हं " असे ओरडून अनामिकाला जवळ जवळ हाकललेच. अनामिका निघुन ऑफीसला गेली. 

      अनामिकाच्या डोळ्यांसमोरून ते चित्र जातच नव्हते. ती गोष्ट तिला खूपच अस्वस्थ करीत होती. का बरे एवढ्या लहान इतक्या गोड मुलीला तिच्या घरचे एवढे मारत असतील हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता.


   अनामिकाने निश्चय केला, "त्या मुलीला मारण्याचे कारण आपण शोधुन काढायचे." 

         एक दिवस अशीच पुन्हा ती मुलगी झोपडीच्या बाहेर गुढग्यात डोके ठेवून रडत होती. अनामिका हळूच तिच्या थोडे जवळ कांही अंतरावर जाऊन उभी राहिली आणि पहाते तर काय त्या मुलीच्या हातावर भाजल्याचे डाग,डोक्याला माराचे टेंगूळ आलेले दिसले. तशी अनामिका आणखी थोडे पुढे गेली हळूच तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला हळूच विचारले,"का रडते बाळ... काय झालं " तसे ती मुलगी ओक्सा बोक्सी रडायला लागली. अनामिका घाबरली.परंतु त्या दिवशी घरात दुसरे कोणीही नव्हते. तीला जवळ घेवुन कुरवाळत अनामिकाने पुन्हा विचारले,"काय झाले बाळ, तु का असे रोज बाहेर दुःखी होऊन रडत बसतेस. त्या बाई व तो मुलगा कोण आहेत तुझे. ते तुला असे का मारतात?" तेंव्हा तीने अनामिकाच्या गळ्याला घट्ट मिठी मारली कदाचित तिला अनामिका विश्वासपात्र वाटली असेल. मायेची ऊब वाटली असेल कोण जाणे. ती बोलू लागली आणि अनामिकाच्या पायाखालची जमीनच सरकली....


     ती(मुलगी) बोलत होती, " ती मही सावतर माय हाय आन त्यो मवा सावतर भाऊ हाय. दोघं बी मला रोज मारत्यात,चटके देत्यात. आण कोण त्यो एक मानूस घरी येतुय त्याच्या जवळच बस त्याला बोल म्हणत्यात. त्यो मानूस लय आडदांड हाय मला लय भेव वाटतंय त्याच पण न्हाय बोललं की मला हे दोघबी लई मारत्यात , चटके बी देत्यात . "

हे ऐकून अनामिका अगदी सुन्न झाली काय करावे तीला कांही सुचेना .त्या मुलीला तीने विचारले, तुझं नाव काय आहे बेटा आणि तुझे सख्खे आईवडील कुठे आहेत. तेंव्हा ती मुलगी म्हणाली," माज नाव आरती हाय. मपली सख्खी माय मेली... आन जरा दिस झालं बा बी मेला ."तेवढ्यात आरतीला लांबूनच तिच्या आईचा आवाज आला आणि ती घाबरून म्हणाली,"तुम्ही जावा इथुन लवकर नाय तर पुना लय मारील माजी माय."

अनामिका तिथुन निघाली व ऑफिसला न जाता घरीच परत आली. तिचे डोके जड पडले होते,मन सुन्न झाले होते. विचार करण्याचे बळंच संपले होते.मग तिने ठरवले या मुलीची यातुन सुटका करायचीच.


    पुन्हा नेहमी प्रमाणे अनामिका ऑफिसला जायला लागली. तीने आरतीच्या घराकडे पाहिले पण ती दिसली नाही. दोन तीन दिवस तसेच घडले तेंव्हा तीने आरतीच्या शेजा-यांकडे चौकशी केली तेंव्हा शेजारी म्हणाले की,"आता त्यांची भांडन बींडन झालेली नाय दिसंत. लई लाड करत्यात आता तिचा. "तेंव्हा अनामिकाला खूप छान वाटले. जीव भांड्यात पडल्या सारखा वाटला. देर आये दुरुस्त आये म्हणतात ना तसे तिला वाटले ही लोकं सुधरली आता.


  असेच दिवसा मागून दिवस जात होते. अनामिका रोज तीच्या झोपडीकडे पहात असे . ती कधी दारात खेळत असायची अनामिकाला पाहून गोड हासायची. तर कधी बाहेर कोणीही नसायचे. 

एक दिवस अशीच जाता जाता अनामिकाची नजर नेहमी प्रमाणे तिच्या घराकडे गेली.पहाते तर काय तिच्या झोपडीच्या दाराला भलं मोठं कुलूप लावलेलं दिसलं... थोडं आश्चर्य वाटलं तिला.. पण तिने पाहिले आणि ऑफिसला निघुन गेली.


    परत दुसरे दिवशी पाहिले तरी कुलूप होते. परत तीस-या दिवशीही कुलूपच.मग मात्र तिला राहवेना... शेजा-यांना विचारपूस केली तर कळले की, आरतीची सावत्र आई, सावत्र भाऊ आरतीला घेऊन मामाच्या गावाला राखीसाठी गेले आहेत. हे ऐकून अनामिकाला छान वाटले तिचे मन सुखावले आणि पुन्हा ती तिच्या रोजच्या कामाला लागली. अनामिकाचा रोजचा दिनक्रम चालूच होता.  

एक दिवस ऑफिसला जाताना अनामिकाला आरतीचे दार उघडे दिसले.तिने आशेने पाहिले पण बाहेर कोणीही नव्हते. चारपाच दिवसात एकदाही आरती तिला दिसली नाही. म्हणून तिने हळूच आजुबाजुला चौकशी केली तेंव्हा कोणीही सांगायला तयार नव्हते. "आरती न आसंल तिच्या मामाच्या गावाला" असेच सर्व सांगत होते.


    एक छोटा मुलगा तेवढ्यात अनामिकाच्या जवळ आला आणि म्हणाला,"बाई बाई, आरतीला किनाय इकलय मन.... तिच्या मायन न भावान." हे ऐकून अनामिका एकदम घाबरली. पटकन खालीच बसली. तिला कांहीच सुचंत नव्हते ती घरी निघुन गेली...तिचं डोकं काम करेनासे झाले. तिने ठरवले हे सर्व घरी सांगुया... कांही तरी मार्ग निघेल...

अनामिकाने सर्व सुरूवाती पासुन ते आत्तापर्यंतची इत्थंभुत गोष्ट घरच्यांना सांगीतली परंतू त्यांनी अनामिकालाच समजवले की," जावूदे ना आपली कोणी लागते का ती? जगाची आपण काळजी करीत बसणार काय? अमुक न तमुक."


पण अनामिकाच्या मनाला ही गोष्ट काही पटत नव्हती. तिने रात्रभर विचार केला व दुसरे दिवशी जरा लवकरच घरुन निघाली. आता ही आरती तिच्या घरी नव्हती.... अनामिका सरळ पोलीस स्टेशनला गेली..व घटना सांगीतली. पोलीसांनीही तिला संपुर्ण सहकार्य केले तिची तक्रार तात्काळ नोंदवून घेतली आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच संपुर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. सगळीकडे फोन लावुन नाकेबंदी केली व आरतीच्या मामाच्या गावाकडे मोर्चा वळवला. तर मामाच्या घरालाही कुलूप. शेजारी पाजारी विचारणा केली तर कोणालाही माहिती नव्हते.आरतीच्या घरचे रात्री उशिरा निघुन गेले होते. 

     आता मात्र पुढील तपास करणे पोलिसांना अवघड झाले होते. 

अनामिका सतत पोलिसांच्या संपर्कात होतीच....

मग मामाच्या शेजा-यांच्या आरतीच्या शेजा-यांच्या मदतीने मामाचे व आरतीचे स्केच तयार केले व पुन्हा जोमाने तपास सुरू झाला. नाकाबंदी केलेली होतीच. एका चेकनाक्यावर तपासणी साठी एक कार थांबवली. त्यात एक मुलगी व इतर तीन माणसे होती. स्केच पाहिले तर लगेच कळले की हे तेच आहेत...त्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि आरतीला ताब्यात घेतले व सर्वांना पोलीस स्टेशनला घेवुन आले. त्या राक्षसांच्या तावडीतून आरतीची सुटका झाली... अनामिकाचा फोन वाजला. उचलला तर समोरून," मॅडम, मिशन सक्शेस झाले. तुमची आरती सापडली आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला या." असे सांगण्यात आले. अनामिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती लगेच पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला आरती एका बेंचवर बसुन बिस्कीट खात होती. अनामिकाला पाहून आरती धावतं गेली आणि बिलगली. अनामिकाने तिला गोंजारत जवळ घेतले...

आता पोलिसांनी कार्यवाही पुर्ण केली व आरतीला अनाथालयात सोडण्याचे ठरले....

तेंव्हा अनामिका पुढे सरसावली व म्हणाली "आरती अनाथालयात जाणार नाही. ती माझ्या सोबत येईल...माझ्या घरी...तिला आता तिचे घर मिळाले आहे...आपली कायदेशीर काय कार्य वाही आहे ती आपण पुर्ण करूया...असे म्हणत आरतीला गोंजारत अनामिकाने आपल्या जवळ घेतले व तिचा हातात हात घेऊन घरी निघाली. 

आरतीला हक्काचे सुंदर घर मिळाले. रक्ताचे नाही पण मायेच्या नात्याचे आई बाबा मिळाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy