Pradip Joshi

Tragedy

3  

Pradip Joshi

Tragedy

मन हेलावणारे एक दृश्य

मन हेलावणारे एक दृश्य

3 mins
953


पावसाने अगदी कहरच केला होता. तप्त धरणीमातेला शांत करण्याइतपत पाऊस पडावा अशी परमेश्वराकडे मागणी केली होती. तो देखील आमच्यावर भलताच खुश झालेला होता. ये रे ये रे पावसा म्हणण्याऐवजी जा रे जा रे पावसा म्हणण्याची वेळ त्याने आमच्यावर आणली होती. मुसळधार पावसाने जीव अगदी नकोसा करून सोडला होता. गेल्या कित्येक वर्षात पडला नाही त्याच्या कितीतरी पट अगदी ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडत होता. मधूनच विजा चमकत होत्या. ढगांचा गडगडाट होत होता. मी पावसाचा आनंद लुटण्यासाठी भर पावसात घराच्या गच्चीवर गेलो. गच्चीवर देखील सर्वत्र पाणी झाले होते.

अचानक माझे लक्ष घराच्या नावाच्या फलकाकडे गेले. गेल्या काही महिन्यांपूर्वी पक्ष्यांच्या एका जोडीने त्या फलकाच्या मागे सुंदर घरटे बांधले होते. मात्र त्या घरट्याची आवस्था बघून मी सुन्न झालो. ते घरटे वारा पाऊस यांच्या माऱ्याने उध्वस्त झाले होते. घरट्यातील दोन चिमुकली पिल्ले फलकाखाली साठलेल्या पाण्यात निपचित पडली होती. मी मुद्दामच त्या पिल्लांना स्पर्श केला नाही कारण मला त्या पिल्लांना स्पर्श करताना त्या पक्ष्यांच्या जोडीने पाहिले तर ती त्या पिल्लांना त्यांच्यात मिसळून घेणार नाहीत याची मला भीती होती. मी त्या पडलेल्या घरट्याकडे अन पिल्लाकडे विमनस्क आवस्थेत पहात उभा होतो. पावसात भिजतोय याची जाणीव देखील मला नव्हती.

काही वेळानी त्या पिल्लासाठी चोचीत चारा घेऊन त्या दोन पक्ष्याचे आगमन झाले. ते दृश्य पाहुन त्या पक्ष्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार मनात आला अन माझेच डोळे पाणावले. त्या दोघांनी एकदा घरट्याकडे व एकदा पिल्लाकडे नजर टाकली. पिल्लांना स्पर्श करून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती निपचित पडली होती. खाली पडलेल्या घरट्याकडे बघून कदाचित त्यांना परिस्थितीचा अंदाज आलेला असावा. त्यांनी त्या दोन पिल्लांना उचलून फलकाच्या मागे नेऊन ठेवले. एकमेकांच्या जवळ येऊन सांकेतिक भाषेत त्यांनी संभाषण केले. नाउमेद न होता पुन्हा उध्वस्त झालेले घरटे बांधण्याच्या कामात ती मग्न झाली. या साऱ्या घटना अवघ्या अर्धा तासात घडल्या. पावसाचा जोर वाढल्याने मी घरात आलो. माझ्या डोळ्यासमोर ते चित्र खूप काळ होते. माझी विचारप्रक्रिया सुरू झाली. ही घटना माणूस व पक्षी यांच्यात अगदी एकसारखी घडली असती तर ? माझ्या नजरे समोर दोन वेगवेगळी दृश्ये आली.

एक तर माणसाच्या बाबतीत ही घटना घडली असती तर त्याने किती आकांडतांडव केले असते. या नैसर्गिक घटनेला देखील शासनाला जबाबदार धरून नुकसानभरपाई मागितली असती. कितीतरी दिवस हे दुःख उगाळत बसला असता. सगळ्यांपुढे त्याचा पाढा वाचला असता. गरीब बिचारे पक्षी त्यांचे दुःख कोणाला सांगणार? एक तर त्यांचा मदतीला धावून येणारे कोणी नसते. एकेक काटकी गोळा करून घरट्याची बांधणी करायची. ते किती काळ टिकेल याची कोणतीही शाश्वती नाही. पहिले घरटे पडले की त्याच जोमाने दुसरे घरटे बांधायचे. 

बर घरटी बांधायला जागा तरी माणसाने कोठे ठेवली आहे. झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे विजेचे खांब, विजेच्या तारा, टेलिफोनच्या तारा, घराच्या भिंती, घराच्या नावाचे फलक मिळेल तेथे धोका पत्करून घरटी बांधण्याची वेळ पक्ष्यावर आली आहे. त्यांची आश्रयस्थान आपण नष्ट केली आहेत. मला त्यांचे काही गुण यातून दिसून आले. आलेल्या संकटाने नाउमेद न होता बघ्याची भूमिका न घेता ते त्यातून लगेच मार्ग काढतात. संकट कितीही मोठे असो ते खचून जात नाहीत. त्यांच्याकडे निर्णय क्षमता मोठी असते. पिलांना उडता येत नाही तोपर्यंत ते त्यांची काळजी घेतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिले जाते. जगण्याच्या प्रक्रियेत त्यांच्यावर कोणाचा दबाव नसतो. मुक्त जीवन ते जगत असतात. दिवसभर बाहेर असले तरी सूर्य अस्ताला जाताच त्यांची पावले घरट्याकडे वळतात. खरच त्यांचे आयुष्य खडतर असले तरी ते वाखाणण्याजोगे निश्चित आहे नाही का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy