मी अजूनही प्रेम करतो आहे...
मी अजूनही प्रेम करतो आहे...
काल नेहमीप्रमाणे चहा घेत दारातल्या पायऱ्यांवर बसलो होतो.
पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होता,
कोकिळा गाणे गात होती,
वाऱ्याच्या तालावर गवत, पानं-फुलं डुलत होती, चिंटू शेपूट हलवत माझ्याभोवती गिरक्या घेत होता. तेवढ्यात एक आवाज कानावर आला "आजोबा एक गुलाबाचं फुल घेऊ का? किती छान फुल आहे ते !!"
नजर वर करत पाहिलं तर एक गोड मुलगी माझ्या समोर येऊन उभी राहिलेली. अख्खाच्या अख्खा समुद्र सामावेल असे निळेशार डोळे, गुलाबाच्या पाकळ्यागत गुलाबी गाल, उसाच्या रसागत रसाळ ओठ !!
ती माझ्या बागेतील सर्वात सुंदर फुल घेऊन गेली; अन जाता जाता तुझ्या आठवणींना उजाळा देऊन गेली.
कित्येक घनाचे घाव घालत पाषाण केलेलं हे हृदय तुझ्या आठवणीत मऊ मेणागत पुन्हा वितळायला लागलं. मी पुन्हा म्हाताऱ्याचा जवान झालो, अन तुझे-माझे क्षण पुन्हा जगायला लागलो. किती स्वप्न रंगवली होती मी तुझ्या-माझ्या प्रितिची, पण कदाचित काहीच प्रतिमा नव्हती आपल्या भविष्याची
असो....
शेवटी नियतीचा खेळ सारा.....
पण आपल्या वेगळे होण्याला फक्त नियत
ीच कारणीभूत होती का ?
तर माझा अहंकार आणि तुझा हट्टहाशीपणाही तेवढाच जबाबदार....
हो.. हो चूक माझीही होती हे मान्य आहे मला. तू चालली होतीस ऐन वाटेत सोडून, तर तुला थांबवायला हवं होत...
तु हूड लेकरागत रुसुन बसली होतीस तर तुला मनवायला हवं होतं...
तुझ्या चेहऱ्यावरील उदास पण झटकून हसू आणायला हवं होतं..
तुझा रुसवा पुसून टाकायला हवा होता
थोडा हक्क गाजवायला हवा होता...
नाही हं... आता मी कसलाही राग राग करत नाही, कोणापाशी हट्टही करत नाही अन
तुझ्या आठवणीत रडतही नाही....पण
तुला पाहण्याची एक इच्छा आहे मनात
पाहायचं की म्हातारी झाल्यावर चेहऱ्यावरील सुरकुत्या तुझं सौंदर्य झाकु शकतात का ?
पाहायचं आहे की बोलण्यातील कंप तुझ्या गोड आवाजात काय बदल करतात...
या मनाला एक आस आहे तुझ्या येण्याची
तू येशील, तू भेटशील, तू बोलशील मला
बस....
याच आशेवर राहिले दिवस जगतो आहे,
मी तुझी वाट बघतो आहे...
मी अजूनही प्रेम करतो आहे...
मी अजूनही प्रेम करतो आहे...