UMA PATIL

Inspirational Others

0.8  

UMA PATIL

Inspirational Others

म्हातारी

म्हातारी

3 mins
4.0K


एक म्हातारी सुरकुतलेल्या चेह-याची. रापलेल्या कातडीची. तिच्या हातातून हिरव्या नसा स्पष्ट दिसायच्या. पण तिला त्याची पर्वा नव्हती. फाटकंच लुगडं नेसून ती बसलेली असायची. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या, तरी त्या सुरकुत्यांमधून आडमुठेपणाची भावना बघणाऱ्याला स्पष्ट जाणवायची. कदाचित तिच्या याच हट्टी आणि आडमुठेपणाच्या स्वभावामुळे तिच्या मुलाने तिला घराबाहेर हाकलून दिले असावे. आपण असे म्हणतो की, "ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर ठेवणे हे चुकीचे आहे." पण काही ज्येष्ठ नागरिकच जर चुकीचे वागत असतील, तर काय करावे ? कदाचित मुलाशी, सुनेशी न पटल्यामुळे तिला घराबाहेर काढले असावे.

मी जेव्हा बाजारात भाजी खरेदीसाठी जायचे, तेव्हा ती म्हातारी तिच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यांनी बघत राहायची येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे. तिच्या डोळ्यांत कधीच निराशा जाणवली नाही. तिच्या त्या बारीक डोळ्यांतही जगण्याची उमेद दिसायची. तिचे घर म्हणजे एक मोडका ढकलगाडा. त्याच मोडक्या ढकलगाड्यावर तिचा एकटीचा संसार होता. त्या गाड्यालाच म्हातारीने तिची एक फाटकी साडी गुंडाळली होती. त्या साडीच्या आडोशामुळे म्हातारीला कुणी पाहू शकत नव्हते. पण म्हातारी मात्र त्या साडीच्या पडद्यातून सर्वांना निरखत असायची.

म्हातारीचा संसार म्हणजे एक मडके, एक मातीची चूल, दोन-चार मोडकी भांडी, दोन लुगडे, दोन पोलके एवढाच होता. म्हातारीला कधी आरसासुद्धा नको होता. कारण, तिला त्याची गरजच नव्हती. सतत-सतत आरशात डोकावायला तिच्याकडे रूप होतेच कुठे ? म्हातारीकडे जर आरसा असता, तरी तिने स्वतःचे रूप आरशात न्याहाळून पाहिलेच असते असे नाही ! तिला तिच्या दिसण्याची काहीही पर्वा नव्हती. पण तिला तिच्या जिंदगीची काळजी होती.

म्हातारी निरक्षर होती. म्हणून तिच्याकडे असलेल्या थोड्याफार पैशामधून लोकांकडून सांगून ती तेल, मीठ, हळद, तिखट वगैरे खरेदी करत असेल. म्हातारी काहीतरी खाऊन दुपारी त्या गाड्यावर बसलेली असायची. मी तिच्या समोरून गेल्यावर ती माझ्याकडे बघायची. मी ज्याप्रमाणे तिला निरखत असायचे, त्याचप्रमाणे ती सुद्धा माझे निरिक्षण करायची. म्हातारी जेव्हा माझ्याकडे पाहत असेल, तेव्हा तिच्या मनात माझ्याबद्दल काय विचार येत असतील कुणास ठाऊक ? पण माझ्या मनात मात्र तिच्याबद्दल भरपूर विचार यायचे. मी कधीही त्या गाड्याजवळ गेली तर मला ती म्हातारी तिथेच बसलेली दिसायची. म्हातारीच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नव्हत्या. पण तरी तिने जगण्याची उमेद कधीच सोडली नाही. ती कुणाशी फारशी बोलताना वगैरे कधी दिसली नाही. ती स्वतःतच गुंग असायची. तिचाच विचार करत.

मी सुद्धा भाजी खरेदीला बाजारात नियमित जात असे आणि ती म्हातारी मला दिसत असे. असेच दिवस जात होते. आपण लोकांचा विचार करतो आणि घरी आल्यावर त्यांना विसरूनही जातो. मी कामानिमित्त १०-१२ आठवड्यांसाठी बैंगलोरला गेले होते. तिथे बैंगलोरी कल्चर अनुभवत मी घरच्या सर्व आठवणी विसरत चालले होते. काही दिवसानंतर घरी परत आल्यावर भाजी आणायचे काम मलाच करावे लागले. त्या दिवशी त्या ढकलगाड्याजवळ चार-पाच माणसे काही बोलतांना दिसली. मी तेथे गेल्यावर मला म्हातारी झोपलेली दिसली. मला वाटले, म्हातारीला बरे नसावे पण ती माणसे म्हातारी मरून गेल्याबद्दल बोलत होती. ती माणसे तिच्या अंत्यविधीची तयारी करत होती.

काही माणसे आपल्याशी बोलत नाहीत, पण तरीही आपल्याकडे पाहात राहतात आणि आपल्या मनात खोलवर कुठेतरी आठवणीत साठून राहतात. आजही मी जेव्हा, तो रिकामा ढकलगाडा पाहते तेव्हा मनात वाईट वाटतं. आपण संसारासाठी उगाच भरमसाठ वस्तू जमवत असतो आणि आपले घर हे वस्तूंचे कोठार बनवून टाकतो. ज्या माणसांना घरच नाही, ज्यांच्याकडे वस्तूच नाही, ज्यांना बघणारे कोणीही नाही ते सुद्धा सुखी राहून एकट्यानं संसार करतांना दिसतात.

रस्ता एकाच जागी असतो कायमचाच. पण त्या रस्त्यावरून येणारे जाणारे प्रवासी बदलत असतात. येणाऱ्या- जाणाऱ्यांना मार्ग दाखवणे, हे रस्त्याचे काम. काही बरोबर मार्गाने जातात तर काही चुकीच्या मार्गाने. अंधार पडल्यावर सुद्धा गुडूप वातावरणात रस्त्यावरची मात्र रहदारी चुकत नाही. रस्त्यावर काही ओळखीची माणसे भेटतात, तर काही अनोळखी माणसे भेटतात. काही माणसे आपल्याकडे बघून स्मित हास्य करतात, तर काही करत नाही. रस्त्यावर एवढी वर्दळ असूनही रस्ता स्थिरच असतो. तो जागचा हलत नाही. एखाद्या वाटसरूला माझ्यावर चालू नकोस, माझ्या कडेला बसू नकोस, झाडाखाली उभा राहू नकोस, असे तो काहीही सांगत नाही. एखाद्या पांथस्थाला रस्ता वेडी-वाकडी वाट कधीही दाखवत नाही. स्वतः योग्य दिशेने जावे आणि दुसऱ्यांनाही योग्य दिशा दाखवावी, हेच रस्ता सांगतो. जीवनात कितीही संकटे आली, तरी प्रत्येक संकटाला तोंड देऊन धैर्याने पुढे चालत राहावे, हेच तर आपल्याला रस्ता शिकवतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational