माझं पेटून उठलेलं मन
माझं पेटून उठलेलं मन
मन पेटून उठतं म्हणजे नक्की काय होतं ? मन कुठल्या कारणासाठी पेटून उठतं? आणि पेटून उठल्यावर काय होतं ? एकदा पेट घेतल्यावर ते पुन्हा विझत का ? का धुमसत राहतं आतल्या आत ..सदोदित ?? असे अनेक प्रश्न मनाला भेडसावणारे, त्याची उत्तरं शोधण्याचा थोडासा प्रयत्न ही केला आणि काही उत्तरं सापडली.
मन पेटून उठतं एखाद्यावर झालेला अन्याय बघून मग तो व्यक्तीसापेक्ष असो किंवा समाजसापेक्ष. देश स्वतंत्र होऊन, राज्यघटना अंमलात येऊन इतक्या वर्षानंतर ही जाती धर्मा वरून दंगली उसळतात, आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात आज ही स्त्री कडे तुच्छतेने बघण्याचा दृष्टिकोन, आज ही स्त्री ला मिळणारी दुय्यम वागणूक, स्त्री भ्रूण हत्या, तिच्या शरीराचे लचके तोडून तिचीच केलेली अमानुष हत्या, स्वतःच्या स्वार्थापायी काही सत्ताधार्यांनी माजवलेला भ्रष्टाचार , शेतकाऱ्यांवरील अन्याय, आर्थिक फसवणूक आणि या मध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक अशी एक ना अनेक कारणं मन पेटण्यासाठी. आणि आपल्यासारखी सामान्य लोकं हे सगळं बघून मनात धुमसणार्या निखाऱ्यांना काही दिवस पेटतं ठेवतात आणि थोड्या दिवसांनी तेच निखारे विझवून टाकतात.
जेव्हा असामान्य लोकं खऱ्या अर्थाने पेटून उठतात तेव्हा इतिहास घडतो. चारशे वर्षांपूर्वी मोघलांकडून होणाऱ्या अन्यायाने शिवाजी महाराजांचं मन पेटून उठलं आणि त्या पेटलेल्या मनाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे अनेक क्रांतिकारक आणि समाज सुधारक, त्यांचं कार्य आणि त्यांच्या प्राणांची आहुती हे ही याचंच ज्वलंत उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आज ही समाजात अनेक अन्यायकारक घटना घडतात आणि माझ्या सारख्या सामान्य लोकांचं मन पेटून उठतं पण तेवढ्यापुरतचं.
पण मला
नेहमी असं वाटतं की किमान प्रत्येक माणसाने त्याच्यावर झालेल्या अन्यायाने तरी पेटून उठावं. समाजासाठी काही करण्याआधी त्याची सुरुवात किमान स्वतः पासून तरी व्हावी. समाजात अशी अनेक लोकं बघायला मिळतात जी स्वतः वर झालेल्या अन्यायविरुद्ध काहीही प्रतिक्रिया न करता मूग गिळून आहे त्या परिस्थितीला सामोरे जातात. आपल्यावर अन्याय करणारी आपल्याच आजूबाजूची माणसे असतात, तर कधी परिस्थिती तर कधी समाज.
माझंही मन अनेकदा पेटून उठलं जेव्हा आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या आणि वाटलं की आपल्यावर कुठेतरी अन्याय होतोय आणि मग त्याच अन्याया विरुद्ध मन पेटून उठलं आणि त्यामुळेच आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवू शकले. खडतर परिस्थितीत चांगलं शिक्षण घेण्याचा वसा, स्वतः बरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांची प्रगती, एकदाच मिळणारा हा मनुष्य जन्म जो शक्य तितक्या सत्कारणी लावण्याचा ध्यास अशा अनेक गोष्टी घडल्या जेव्हा मन पेटून उठलं.
समाजातल्या सकारात्मक बाजूंचा विचार केला तर आज समाजातल्याच काही लोकांमुळे आपल्याला अवतीभवती चांगले बदल दिसून येतात. भारताने आज गगनाला गवसणी घातलीये पण अजून ही समाजातला तो प्रत्येक माणूस जो या बदलापासून अनेक मैल दूर आहे, जो या गगनभरारी पासून अनभिज्ञ आहे. समाजात चांगला बदल तेव्हाच होऊ शकतो जेव्हा माणसाच्या विचारसरणीत तो बदल होतो, त्यासाठी गरज असते ती पेटून उठण्याची. त्या पेटलेल्या मनातून निर्माण होणाऱ्या मशालीच आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाचा मार्ग दाखवणार आहेत.
आज माझंही मन पेटलंय एक नवीन सकारत्मक बदल घडविण्यासाठी जे कधीच विझणार नाही. हा विचार प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आला तर आपला खारीचा वाटा नक्कीच हा समाज आणि देश सुधारण्यासाठी कारणीभूत ठरू शकेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏