पैसा आणि त्याच्यामुळे बदललेला माणूस.
पैसा आणि त्याच्यामुळे बदललेला माणूस.
पवित्र इथली पावन भूमी
पवित्र इथली माती
याच भूवरी नांदत राहती
आपुलकीची नाती.
खरंच आहे ना. असंच होतं फार फार वर्षापूर्वी. अगदी फार पूर्वीचा काळ.गुण्या- गोविंदाने राहणारा. ना कशाचा हव्यास, ना कशाची ईर्षा, ना द्वेष,ना मत्सर ना कशाची चिंता. घासातला घास काढून देणारी माणसं. गेली कुठं? आजीच्या पदराखाली, आजोबांच्या छायेखाली बहरणारी संस्कृती आपलेपणा आहे कुठं? पुतण्यावरून जीव ओवाळून टाकणारी काका काकीची नाती पहायला मिळतील का ओ? नाही ना...खरंच नाही.
कारण...
*पैशापायी सारी तुटली*
*माया, ममता, नाती.*
*प्रेम, जिव्हाळा सारे संपले.*
*कुणा ना मिळाली शांती.*
इतकं माहित आहे पण *"वाढता वाढता वाढे भेदीले शून्य मंडला"* याप्रमाणे पैशाचा हव्यास वाढतच चालला आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास जसा वाढत गेला तस तसाच वृद्धाश्रमाचा आकडा ही वारेमाप वाढला आणि संस्कारांची खाण असणाऱ्या आजी आजोबांच्या मायेला पारखा आणि पोरकेपणा आला. माणसाचा स्वार्थीपणा इतका वाढला की, नात्यांची कदर त्याला उरलीच नाही.
आई-वडील त्यांचं कर्तव्य करतात ओ. त्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी जीवाचं रान करतात.पण हीच मुलं स्वतःचा स्वार्थ पाहतात. करियर पाहतात.
आहे ना करियर. नाही कोण म्हणत. पण करियर नातं सोडायला नाही ना सांगत.
पण ती तर आई बाबांना वाऱ्यावर सोडतात.कारण.. *पैशाने मात केली संस्कारावर.*
*अन् विभक्त कुटुंबाने हात पसरला जगभर*
अशीच अवस्था आता झाली आहे. पैसा, संपत्ती, घर, गाडी, बंगला, स्टेटसच्या मागे धावता धावता जीव थकतो.पण थकलास का म्हणून मायेचा हात फिरवणार कोणी नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
ना मुलांना आई -बाबाच प्रेम, ना संस्कार. दोष कोणाचा? बदलत्या राहणीमानाचा? बदलत जाणार्या स्टेटसचा की स्पर्धेच्या युगाचा की पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाचा? नाही यापैकी कोणाचाच दोष नसावा. तो असावा फक्त आपल्या विचारसरणीचा. पैसा, संपत्ती, धन -दौलत गाडी -बंगला असू द्या हो पण त्यामुळे आलेला नात्यातील दुरावा नको. त्यामुळे वृद्धाश्रमांचा आकडा वाढायला नको.
आज कोरोनाने संपूर्ण जगावर काळी छाया पसरवली. अन् नात्यांमध्ये ओल निर्माण झाली. नको ना असं. चांगलं घडायला वाईट परिस्थिती निर्माण व्हावीच लागते का? नाही ना? अजून आम्ही इतकं मृत झालेलो नाही. मायेची ओल अजून ताजी आहे. आज कोरोना मुळे सुना, मुलं, नातवंड घरी परतताना आई-वडिलांच्या मुखावरील आनंद ओसंडून वाहत आहे. परिस्थिती कशी का असेना काळजीने जीव तुटत आहे. हीओल नात्याची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, जुन्या पिढीची अशीच जपूया. पुन्हा माझा गाव माझी माणसं माझी माती, यांना जिवंत करूया.
*संस्काराचे बीज पेरूया*
*वांझ नाही माती*
*नात्यांमधली ओल जपूया*.
*जिवंत आहेत नाती.*
