माझी कथा! माझे शिक्षण!!
माझी कथा! माझे शिक्षण!!


अजय सकाळीसकाळी घाईतच माझ्या घरी आला अन् म्हणाला, "वाल्मीक, तू शिक्षणासाठी नवोदयला चाललास याचा आनंद तर खूप आहे पण मनातून मित्र दूर जातोय याचं दुःख वाटतंय."
तसे माझे व त्याचे डोळे पाणावले. सदऱ्यालाच डोळ्यांच्या कडा पुसत मी विचारले," पप्पा, येत आहेत ना"?.... हो येत आहेत, तुला तेच नवोदयला सोडवणार आहेत काळजी करू नको. अजय म्हणाला.
आई वडील आमचे संवाद ऐकत होते.त्यांचे ही डोळे पाणावले. एकुलतं एक लेकरू आज दूर शिकायला जातयं याचा आनंद त्यांचा चेहऱ्यावर दिसत होता. पण हुरहूर वाटत होती. आदल्या दिवशीच शाळेतून भेट मिळालेली नवी सुटकेस मी भरून ठेवली होती. राजापूरच्या माध्यमिक... प्राथमिक .. शाळांतील सर्व गुरुजन, शेजारी, मित्र..... नातेवाईक सर्वच घरी येत होते. एवढी गर्दी प्रथमच मी पाहत होतो. प्रत्येकजण खूप मनापासून कौतूक करत होता, खूप अभ्यास कर... सांगत होता.
एकजण हळूच म्हणाला, "बरं झालं चांगदेव तू यंदाच्या वर्षी ऊसतोडीला गेला नाही". बघ पोरगं किती हुशार आहे..... तालुक्यात नंबर आला त्याचा. तसा मीच विचारत पडलो, ज्या ठिकाणी आपण चाललोय, त्या साखर कारखान्याची हि
ऊसतोड केलीय म्हणे आईवडीलांनी... पण तीच माझी शिक्षणाची वारी होणार होती, नवोदयरूपी.
घरी जमलेल्या एवढयांना चहा पाजणं खूप मनापासून वाटत होतं आईबापाला माझ्यापण गुरूजींना माहीत होतं सारं.... (साखर कारखान्याची साखर ज्यांच्यामुळे शक्य आहे, त्यांच्या घरी चहाला एवढी साखर नसेल.) तेच म्हणाले, सर्वच स्टॅण्डवरच चहा घेऊ... अंबादासच्या हॉटेलवर.... घरातून पाय निघत नव्हते, पण आईवडीलांचे आशिर्वाद घेऊन
निघालो नवोदय वारीला... हळूच एका वयोवृद्ध बाबांनी माझ्या हातात एक रुपया दिला अन् आशिर्वाद दिला अन्
सुरूवातच झाली.... कोणी एक रुपया, दोन रुपये,..... असे करता करता माझी ओंजळ भरली. एवढे सुटे मी फक्त गावातील किराणा दुकानाच्या गल्ल्यातच पाहीले होते. तेव्हा त्या सर्वांच्या प्रेमाने मी भारावून गेलो होतो. अजयचे वडील म्हणजे गलांडे सर, आमचे हिंदीचे सर.. त्यांनी सर्वांना सांगितले, नवोदयही जिल्ह्यातील खूप भारी शाळा आहे. तिथं वाल्मिकसारखे जिल्हाभरातील हुशार मुलांना मोफत शिक्षण मिळणार आहे. त्याला मी राजारामनगर... कादवा साखर कारखाना येथील
नवोदय विद्यालय येथे सोडवणार आहे. शाळेचे सर मुलाला स्वतः सोडवणार म्हटल्यावर आईवडील निश्चिंत होते... हाच होता त्यावेळचा गुरुजनांवर विश्वास...
एसटी येण्याची वेळ झाली होती. स्टॅण्डवर बरीच गर्दी झाली होती. माझे काही वर्गमित्र, गावातील पुढारी, चव्हाण मंडळी... माझ्या नवोदय निवडीचे कौतुक करत होते. सर्वांचे आशिर्वाद घेत होतो, तेवढयात एसटी आली अन् बस कंडक्टर, ड्रायव्हर... गाडी थांबवून माझं कौतुक करत मला एसटीत बसण्यास मदत केली. गलांडे सरांनी सर्वांना नमस्कार करत विश्वास दिला अन् गाडी निघाली तशी मला माझी प्राथमिक, माध्यमिक शाळा दिसली अन् त्यांनी माझ्या वारीला शुभेच्छा दिल्या. मिस्तरी गुरुजी, बागडे सर... मुख्याध्यापक माध्य. विद्यालय, राजापूर यांचे शब्द आठवले.
राजापूर... येवला... पिंपळगाव... राजारामनगर असा प्रवास करत दुपारी नवोदय विद्यालयांच्या प्रांगणात 10/02/1988 रोजी (आजपासून 30 वर्षापूर्वी) पोहोचलो. मला नवोदयला सोडून गलांडे सर परतत असताना माझ्या डोळ्यातील अश्रू लपवत मी सरांना आश्वस्त केलं... अन् मनोमन धन्यवाद दिले. आज माझे वडील अन् गलांडे सर शरीररूपाने या जगात नाहीत पण माझ्या नवोदय वारीसाठी दिलेले आशिर्वाद मला सदैव प्रेरित करतात.